या जन्मावर, या जगण्यावर…

कोरोनाचे निर्बंध जवळपास संपूर्णपणे उठल्यावर हा पहिला जागतिक आरोग्य दिन आपण साजरा केला. कोरोनाकाळात शारीरिक आरोग्य उपायांवर जेवढ्या चर्चा झाल्या त्या प्रमाणात मानसिक आरोग्याचा विचार झाला नाही. जागतिक आरोग्य दिनानिमित्त याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. निराशेचे मळभ दूर होऊन नव्या पहाटेच्या आशेची किरणं अंगणात येत असताना त्यांचे स्वागतच करायला हवे. अश्रू, तणाव, भीतीवर मात करून नव्या जगण्यावर प्रेम करणे शिकायला हवे.

कौटुंबिक पातळीवर घरातील सदस्यांचा आपसातील संवाद कमी झाला आहे. मोबाईलसारख्या गॅझेट्समुळे माणसे आत्मकेंद्री झाली आहेत. ती स्वत:मध्येच गुंतून पडली आहेत. त्यामुळेच मनातले दबाव, तणावाची चर्चा खुलेपणाने केली जात नाही. समाजमाध्यमे ही संवादापेक्षा मते मांडण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या ठिकाणी व्यक्तीची घुसमट कमी होण्यापेक्षा वाढते. जगाप्रती असलेला राग, अपयश आणि पराभवाची भावना, आपल्या अवतीभवतीच्या लोकांनी आपले मानसिक खच्चीकरण करण्यासाठी उपसलेले जातीयतेचे हत्यार, यामुळे भवतालाविषयी रोषाची भावना वाढीस लागते. गॅजेट्समुळे आलेले एकाकीपण ही भावना वाढवण्यास पोषक ठरते. त्यातून भावनांचा निचरा होत नसल्यामुळे ही घुसमट असह्य झाल्यावर आत्महत्येचे पाऊल उचलले जाते.

मानवी आत्महत्येची कारणे अनेकदा कौटुंबिक असतात. मात्र ज्यावेळी ही कारणे सामाजिक होतात, त्यावेळी स्थिती आणखी धोकादायक होते. कौटुंबिक कारणे अनेकदा तात्कालिक असतात. पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये आत्महत्येची कारणे आणि त्याहून मोठ्या वयाच्या साधारण 30 वर्षे वयानंतरच्या व्यक्तीच्या आत्महत्येची कारणे यात फरक असतो. तसाच फरक महिला किंवा पुरुषांच्या आत्महत्येच्या कारणांत असतो. पौगंडावस्थेत मानसिक आणि शारीरिक बदलांना सामोरे जाताना त्याचा मनावर परिणाम होत असतो. स्वत्वाची जाणीव याच वयात विकसित होत जाते. त्यामुळेच प्रेमात अपयश, विरह, परीक्षेत नापास झाल्याची भीती, कौटुंबिक दबाव आदी कारणे अशा आत्महत्येमागे असतात.

कुटुंब स्तरावर योग्य संवाद नसल्यामुळेही आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असते. भारतासारख्या विकसनशील देशांत मानवी आनंदाच्या व्याख्या झपाट्याने बदलत आहेत. जागतिकीकरणानंतर ही स्थिती आणखी भयावह झाली आहे. प्रोफेशनलिझम, करिअर, पैसा, यशाची गणिते, स्पर्धा यामुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे भवतालच्या जगासोबत जुळवून घेणे आणि या स्पर्धेत मागे पडण्याची भीती हेसुद्धा आत्महत्येचे कारण आहे. घुसमट किंवा तणाव असह्य होण्याला निश्चित अशी कालमर्यादा नाही. बरेचदा तणाव मनात कायम ठेवल्याने तो वाढत जातो.

संवाद होत नसल्यामुळे वाईट अनुभवांची मालिका मनात तयार होत जाते. त्यातून ताण वाढल्याने याची परिणती आत्महत्येच्या घटनेत होते. असा ढोबळ गैरसमज आहे की, आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे जीवनावर प्रेम नसते, जगण्याची ओढ नसते, मात्र हे खरे नाही. अशा व्यक्तीचेही जगण्यावर पुरेसे प्रेम असते, परंतु सहजसाध्य आणि मनासारखे जगण्याच्या वाटा बंद झाल्याच्या भ्रमातून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले जाते. जगण्याची सकारात्मक तीव्र इच्छा असल्याने ज्यावेळी त्यातून निराशा निर्माण होते. ती निराशाही त्याच प्रमाणात तीव्र स्वरुपाचीच नकारात्मक अशीच असते. मग असे जगणे टाळण्यासाठी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला जातो.

जाळून घेणे, उंचावरून उडी घेणे किंवा रेल्वेखाली स्वतःला झोकून देणे अशा घटना आपल्या आजूबाजूला घडल्याचे आपण ऐकतो. अनेकदा याची कारणे कौटुंबिक असतात. आपल्याला कुणीच समजून घेत नाही, अशी मानसिकता यामागे अनेकदा असते. कौटुंबिक स्तरावरील जिव्हाळा, प्रेम, आत्मियता नाहीशी होणे. त्यातून व्यक्तीच्या अपेक्षांची हेळसांड झाल्याने जगण्याविषयी नकारात्मकता वाढीस लागते. अन्न, घर, कपड्यांच्या पलिकडे शारीरिक गरजांचे सातत्याने होणारे दमनही आत्महत्येचे एक समोर न आलेले कारण असू शकते. कौटुंबिक भांडणात टोकाच्या तणावामध्ये मानवी संवेदना रागाच्या नियंत्रणात जातात. असा बधिर अवस्थेत विवेक काम करत नाही, ही स्थिती धोकादायक असते. त्यातूनच स्वतःला पेटवून घेण्याचे प्रकार घडतात. इतर वेळेच छोट्याशा चटक्यालाही घाबरणारी व्यक्ती संवेदना बधिर झाल्यामुळे रागाच्या भरात आत्महत्या करतात. ज्यावेळी ही केलेली चूक ध्यानात येते. त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. भयावह तणावाचा हा क्षण टाळण्याची गरज असते. मात्र विभक्त कुटुंबपद्धतीत आणि अलिकडच्या बदलत्या सामाजिक गरजांच्या परिस्थितीत ही बाब कठीण होत आहे.

माणसाचे स्वतःवर, कुटुंबावर, समाजावर, मित्र आणि नातेवाईकांवर प्रेम असते. या नातेसंबंधातून व्यक्तीच्या जगण्याच्या कारणांचा आनंद सामावलेला असतो. मात्र, या घटकांच्या प्रती असलेल्या जबाबदारीच्या बदल्यात त्याच्याही या घटकांकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा ज्यावेळी आत्मियता किवा जबाबदारीच्या तुलनेत मोठ्या होतात त्यावेळी तिथे तणाव निर्माण होतो. नातेसंबंधातील अविश्वास, संशय, चारित्र्यहनन, विसंवाद, आत्मियतेपेक्षा अधिकाराची भावना वाढल्यानंतर कुटुंब पातळीवर आत्महत्येच्या घटना समोर येतात. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. महिलांच्या तुलनेत पुरुषांना त्यांच्या भावनांचा निचरा करण्याची सुविधा समाजव्यवस्थेत जास्त असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना दुय्यम मानले जाते. ही दुय्यमता निराशाजनक असते. शिक्षणाचा अभाव, तणावाचं योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे कौटुंबिक कारणावरून होणार्‍या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. मानसिक घुसमटीतूनच महिलांच्या आत्महत्या वाढण्याचे हे महत्वाचे कारण आहे.

आत्महत्यांची सामाजिक कारणे थोडी वेगळी असतात. समाजनिंदा, भीती, चारित्र्यहनन, लोकलज्जा, मानहानी अशी कारणे या ठिकाणी असतात. शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागे घेतलेले कर्ज न फेडणे हे प्राथमिक स्वरुपाचे कारण असते, मात्र त्यातून होणारी सामाजिक अवहेलना, कुटुंबाची चिंता, घरातील लग्नकार्य, आर्थिक जबाबदारीच्या कारणांची अपूर्तता त्यातून होणारी सामाजिक थट्टा आदी कारणे असू शकतात. कुटुंबाची जबाबदारी म्हणजेच सदस्यांच्या गरजा पूर्ण न करण्याची असमर्थता यामागे असते. यातील महत्वाचा भाग आर्थिक असतो. वित्तीय व्यवहारात व्यक्तीच्या गरजांचे मूल्य सारखेच ठरवले जाते. त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी असलेल्या क्षमतांचा विचार दुय्यम असतो. आधुनिक समाजव्यवस्थेचाही हाच पाया असतो. त्यातून होणारी घुसमट संपवण्यासाठी आत्महत्येचा पर्याय निवडला जातो.

व्यसन हे आत्महत्येचे एक सामाजिक कारण असते. मानवी जगण्याला मर्यादा असतात. प्रत्येकाच्या जगण्याच्या आपापल्या सुप्त इच्छा असतात. मात्र, समाज अशा बेफिकीर जगण्याला परवानगी देत नसतो. भवतालचा एक दबाव मानवी मनावर कायम असतो. या दबावातून येणारे सोसलेपण, व्यसनाच्या अंमलाखाली झुगारले जाते. त्यामुळेच मद्यपान केलेली व्यक्ती बेफिकीरीने वागत असते. असे वागणे हे त्या व्यक्तीत दबलेल्या इच्छांची पूर्तता असते. राग, प्रेम, भावनिकता, अगतिकता, बेफिकीरी, टोकाच्या संवेदना, जिव्हाळा किंवा आत्मियता निर्माण होणे ही लक्षणे अमली पदार्थाचे सेवन केलेल्यांमध्ये दिसतात. मद्यासारखा अमली पदार्थाचे परिणाम व्यक्तीला कौटुंबिक, सामाजिक अधःपतनाकडे नेणारे असतात, तर तंबाखूजन्य पदार्थांचे व्यक्तीगत, परंतु तीव्र स्वरुपचे असतात. बधिर, चेतनाहीन असण्याची इच्छाही आत्महत्येकडे नेणारी असते.

सामाजिक स्वरुपातील आत्महत्येचे कारण ठरणारे घटक भारतीय समुदायात अनेक आहेत. जातवास्तव, रुढी, परंपरा, धार्मिक नियम, असे सामाजिक दबावाचे घटक समाजात विद्यमान असतात. जातवास्तवामुळे माणसाच्या मानवी संवेदनेची गळचेपी होते. व्यक्ती चांगली किंवा वाईट हे ठरण्यात जातवास्तवाचे निकष वापरले जातात. ही एक गटवादी चौकटीची भयानक स्थिती असते. जातव्यवस्था मानवी विश्वासाला तडा देते, त्यामुळेच जातींच्या गटांचे समुदाय बनतात. हे समुदाय इतर जात सदस्याला आपल्यात सामावून घ्यायला तयार होत नाहीत. यातून व्यक्तीला वाळीत टाकणे, दुर्लक्ष करणे, नकारात्मक वागणूक देणे आदी प्रकार होतात. आत्महत्येसाठी सामाजिक निराशेचे हे मोठे कारण असते.

जगाची लोकसंख्या अंदाजे 700 कोटीपर्यंत आहे. यातील 30 कोटी लोक नैराश्याच्या विकाराने ग्रस्त आहेत. अशी व्यक्ती वेळीच ओळखता येणे गरजेचे आहे. मात्र धावपळीच्या जगात आपणास स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही, अशा स्थितीत इतरांच्या आरोग्याकडे त्यातही मानसिक आरोग्याकडे लक्ष देता येणे कठीण होते. माणसाला घेरून असलेल्या निराशेच्या कारणांमागे त्याचा भूतकाळ असतो. कुटुंबातील मुलीला मुलापेक्षा दुय्यम वागणूक मिळाल्यावर बालपणापासून अशी मुलींच्या मनात निराशेचे घर उभारायला सुरुवात होते. लहान मुलांची सातत्याने होणारी इतर मुलांशी तुलना, शाळा, अभ्यासातील तसेच स्पर्धेची भीती पालकांकडून घातली जाते. लहान मुलांचे मेंदू हे लोण्याच्या गोळ्यासारखे असल्याने त्यांना मिळालेला भीती आणि तणावाचा आकार पुढे आयुष्यभर कायम राहतो. पालकांमधील तणाव, हाणामारी, भांडणांचा अत्यंत विपरीत परिणाम मुलांच्या जीवनावर होतो. हा तणाव कायमस्वरुपी मुलांमध्ये पेरला जातो. लहान वयात होणारे लैंगिक अत्याचार अनेकदा समोर येत नाही. ही मुले आयुष्यभर पुढील जीवनातही सावरली जात नाहीत.

मोठ्यांमध्ये नैराश्येची कारणे वेगळी असतात. कामाच्या ठिकाणी उत्साह नसणे, विपरित स्थिती, असुरक्षिततेची भावना, आर्थिक संकटे, स्पर्धेची भीती, मनातली खंत, वरिष्ठांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि टोमणे यामुळे होणारे मानसिक खच्चीकरण निराशेचा मार्ग प्रशस्त करते. निराशेवर योग्य समुपदेशनाने मात करता येते. निराश व्यक्तीला मानसिक आधार देणे आणि तुझे आमच्या जगण्यातील महत्व मोठे आहे. असे दिलासादायक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. नातेवाईक, कुटुंब, कार्यालयातील सहकारी आणि मित्रमंडळींकडून या गोष्टी शक्य आहेत. नैराश्याची कमाल पातळी गाठल्यास संबंधिताकडून आत्महत्येचा धोकादायक निर्णय तातडीने अमलात आणला जातो. त्यासाठी भवतालच्या लोकांनी एखादी व्यक्ती निराशेत असल्याचे ओळखणे गरजेचे आहे. पालकांना पाल्यांकडून असलेल्या अपेक्षा, पत्नीला पतीकडून असलेल्या अपेक्षा, पतीला पत्नीकडून असलेल्या अपेक्षा या अनेकदा व्यवहारी आणि वास्तवात साकारल्या जाऊ शकत नाहीत. त्यातून नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेली कटूता एकटेपणा वाढवते. अती अपेक्षा आणि प्रेमभंगाचे दुःख यातूनही आत्महत्या होतात. प्रेमी युगुलांच्या आत्महत्या हा त्याचाच परिणाम असतो.

सतत एकाकी राहाणे, जेवण न करणे किंवा एकाच वेळेस अती जेवणे, बडबड करणे, त्रागा संताप करणे, चीडचिड होणे, विचारमग्न, अबोल राहाणे ही नैराश्याची लक्षणे आहेत. भीती बाळगणे, भविष्याचा सातत्याने विचार करणे, प्रमाणापेक्षा जास्त भूतकाळात रमणे ही निराशेची कारणे आहेत. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांना आनंदाची दिशा दाखवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. मित्र, समाज, कटुंब आणि नातेसंबंधातील प्रेम जिव्हाळ्याने निराशेवर सहज मात करता येईल. सकारात्मकता आणि आनंद, निरपेक्ष भावना वाढीस लावून निर्माण झालेली भौतिक सुखाच्या बाजारातील भांडवली स्पर्धा कमी करता येईल. प्रत्येकाला योग्य पुरेसा आहार, शांत झोप आणि जगण्याइतके पैसे सहज मिळवता येतील, अशा पुरेशा संधी उपलब्ध असलेला समाज निर्माण करता येण्यासाठी माणसांनी राजकीय हेतू मागे सोडून माणूस म्हणून सामूहिक प्रयत्न करायला हवेत.