घरफिचर्समायमहानगर ब्लॉगट्रम्प यांचे काय चुकले ?

ट्रम्प यांचे काय चुकले ?

Subscribe

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत जो राडा केला त्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत गेल्या 200 वर्षात अशी घटना घडली नव्हती. जगाला नियमित लोकशाहीचे धडे देणार्‍या अमेरिकेतच असे काही होणे ते अर्थातच कोणाच्या कल्पनेतही नव्हते. पण हे सहजासहजी झालेले नाही. त्याची पार्श्वभूमी मागील चार वर्षांची आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले हेच मुळी तेथील उदारमतवाद्यांना पटलेले नव्हते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली, एक उद्योगपती व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष कशी होऊ शकते, असा प्रश्न उदारमतवाद्याची झोप उडवत होती. डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना मोठ्या फरकाने हरवून ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विजयी झाले होते. सर्वसामान्य अमेरिकनाने लोकशाही पद्धतीने म्हणजे बहुमत देऊन ट्रम्प यांना विजयी केले होते. तरीही तेथील उदरमतवाद्यांनी, नॉट माय प्रेसिडेन्ट, अशी मोहिम चालवली. हे डेमोक्रॅट रस्त्यावर हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांनी अमेरिकेच्या रस्त्यारस्त्यांवर अक्षरश धुमाकूळ घातला होता. त्यानंतर ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत होते तेव्हा हेच उदारमतवादी वाँशिंग्टनमध्ये रस्त्यावर उतरून दंगली करत होते. त्यांनी दुकाने लुटली. जाळपोळही केली. ज्या सर्वसामान्य अमेरिकन नागरिकाने ट्रम्प यांना निवडून दिले त्याला मात्र आपल्या निर्णयाचा उदारमतवादी आदर का करत नाहीत, असा प्रश्न सतावत होता. त्याच्या मनात या डेमोक्रॅटबद्दल राग, असंतोष निर्माण होत होता. अमेरिकन मीडिया, तेथील उदारमतवादी सातत्याने ट्रम्प यांच्याविरोधात रान उठवत होता.

एरव्ही अमेरिकन लोकशाहीची उज्ज्वल परंपरा सांगाणारे हे उदारमतवादी मात्र तेथील सर्वसामान्यांच्या मताचा आदर करू इच्छित नव्हते. त्याचा राग अर्थातच सर्वसामान्य ट्रम्प समर्थकांना होता. ट्रम्प हे काही हाडाचे राजकारणी नाहीत. एक उद्योगपती असलेले ट्रम्प यांना राजकारणात कमालीचा संयम लागतो याचा गंधही नव्हता. त्यामुळे तेही अमेरिकन मीडिया आणि उदारमतवाद्यांना तितक्याच धुसमुसळेपणाने उत्तर देत होते. अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीची तेथील पोलिसाकडून झालेल्या हत्येचा प्रसंग हा ट्रम्प यांच्या समर्थकांमधील असंतोषाच्या कडलोटाला कारणीभूत ठरला. त्यानंतर उदारमतवाद्यांकडून राबवलेली ब्लॅक लाईफ मॅटर ही चळवळ म्हणजे ट्रम्प यांच्याविरोधातील असंसदीय कार्यपद्धतीचा कळस होता. अमेरिकेच्या रस्त्यारस्तावर हिंसाचार, जाळपोळ होत असताना उदारमतवादी त्याला आंदोलन हे गोंडस नाव देत होते. मात्र याच चळवळीमुळे ट्रम्प यांचे समर्थक उदारमतवादी आणि डेमोक्रॅट्सबद्दल भविष्यात रस्त्यावर उतरणार हे निश्चित झाले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर अमेरिकेत जे काही झाले याचा अंदाज येऊ शकतो. मग ट्रम्प यांचे चुकले काय, असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे. डेमोक्रॅट्स आणि उदारमतवाद्यांबाबत ट्रम्प समर्थकांच्या मनात असलेल्या असंतोषाची जाणीव ट्रम्प यांना तरी निदान यायला हवी होती.

- Advertisement -

मात्र ट्रम्प हे निवडणुकीच्या पराभवानंतर सातत्याने डेमोक्रॅट्स आणि उदारमतवाद्यांना दोष देत राहिले. ट्रम्प यांचे निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचे काही दावे खरे असले तरीही त्यामुळे आपले समर्थक बिथरताहेत हे ट्रम्प लक्षात घेऊ शकले नाहीत. त्यातच पुन्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सोडायला तयार नव्हते. त्यामुळे ट्रम्प समर्थकांच्या मनातील असंतोषाचा कडेलोट झाला होता. त्यांना व्यक्त होण्यासाठी माध्यम हवे होते. ते पुन्हा ट्रम्प यांनीच पुरवले. 20 जानेवारीला अमेरिकेत सत्तांतर होणार हे निश्चित झाले असताना ट्रम्प यांनी वाँशिंग्टन डीसीमध्ये मेळावा घेण्याचे जाहीर करून टाकले. कँपवाँशिंग्टन अशा नावाने होणारा हा मेळावा अमेरिकेच्या संसद भवनाच्याजवळ निश्चित करण्यात आला होता. खरंतर हा मेळावा घेणे ट्रम्प यांनी टाळले असते. तर त्या दिवशीचा प्रसंगच उद्भवला नसता. पण ट्रम्प यांनी केवळ हा मेळावाच घेता नाही तर त्यात चिथावणीखोर भाषण केले आणि ट्रम्प समर्थक प्रत्यक्ष कृतीत उतरले. त्यामुळे अमेरिकेच्या संसद इमारतीत जे काही झाले त्यासाठी ट्रम्प हे जितके जबाबदार आहेत तितकेच अमेरिकेतील उदारमतवादीही जबाबदार आहेत. ट्रम्प हे आपल्या समर्थकांच्या मनातील खदखद ओळखू शकले नाहीत तर उदारमतवाद्यांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या ट्रम्प यांच्याबद्दल असंसदीय पद्धतीने रान उठवून ट्रम्प समर्थकांना चिथावणी दिली. कुठलाही देश वा संस्थेचा कारभार हा काही नियमावली वा कायद्याच्या चौकटीतून चालत असतो. ज्याला कुणाला त्या व्यवस्थेत स्थान हवे असते किंवा सत्ताधिकार हवा असतो, त्याला त्या नियम कायद्याचे पालन करूनच ती सत्ता प्राप्त करता येते.

पण अशा लोकशाही मुखवट्याच्या मागे एक दरबारी व्यवस्थाही कायम उभी असते आणि जनतेच्या मतांवर सत्ता मिळवणार्‍यांना अशा बुरख्यातल्या शहाण्यांच्या मर्जीलाही उतरावे लागत असते. कायद्याने आवश्यक असलेल्या पात्रतेपेक्षाही अशा वर्गाचे आशीर्वाद महत्वाचे असतात. अन्यथा जनमानसात विष कालवून नव्या सत्ताधीशाला जमीनदोस्त करायला ही मंडळी सज्ज असतात. लोकशाही दिसायला जनतेच्या मतावर चालत असते. पण त्यात मतभेदाला वाव म्हणून जी तरतूद ठेवलेली आहे, तिचा वापर करून नेहमी सत्ताधीशाला घाबरवण्याचे व मुठीत ठेवण्याचे प्रकार चालू असतात. त्यांना मतांमध्ये वा लोकप्रियतेमध्ये हरवता येत नसेल, तर बदनामी करून वा खोटेनाटे आरोप करून संपवण्याचे डाव खेळले जातात. ट्रम्प यांच्या बाबतीत तेच झाले. जे अमेरिकन लोकशाहीचे सदोदीत गोडवे गात होते तेच मागील चार वर्षात तेथील लोकशाहीच्या मुळावर उठले होते. मात्र ही दुसरी बाजू जगभरातील उदारमतवादी मान्य करणार नाहीत. कारण ती मान्य केली तर उदारमतवादीच लोकशाहीसाठी मारक कसे आहेत हे जगासमोर येईल. त्यामुळे कोंबडे झाकण्याचा प्रयत्न जगभरात होईल. पण म्हणून उजेडायचे काही थांबणार नाही.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय अमेरिकेतील उदारमतवाद्यांना सहन झाला नाही, त्यामुळे त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. आता जो बायडेन निवडून आले तेव्हा ट्रम्प यांच्या समर्थकांना त्यांचा विजय पचनी पडला नाही. त्यामुळे त्यांनी हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांच्याही पुढचे पाऊल टाकून अमेरिकेच्या संसदेचे कामकाज चालते त्या कॅपिटॉल इमारतीवर चढाई केली. त्यांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या संसदेवर अमेरिकेतील नागरिकांनी जो हल्ला केला, मग ते कुठल्याही पक्षाचे असतो, हे अत्यंत केवीलवाणे असे दृश्य होते. अमेरिका हा जगातील सगळ्यात शक्तीशाली आणि वर्ल्ड ऑडर्र्र म्हणजेच जगाची पुढील दिशा कशी असावी हे ठरविण्याचे समर्थ्य असलेला देश मानला जातो. त्यांच्याकडून जगातील विविध देश आदर्श लोकशाहीचे धडे घेतात. जगातील अनेक बुद्धिमान लोकांच्या प्रतिभेला वाव देणारा हा देश आहे, अनेक लोक आपले नशीब काढण्यासाठी अमेरिकेत जातात, पण डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या कालावधीत चालू झालेल्या या राजकीय अनागोंदीमुळे दुसर्‍यांना नवी संधी देण्यार्‍या अमेरिकेच्या भवितव्याबद्दल अनेकांच्या मनात शंका उत्पन्न होऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -