घरफिचर्समायमहानगर ब्लॉगहर्बल तंबाखू म्हणजे काय रे भाऊ !

हर्बल तंबाखू म्हणजे काय रे भाऊ !

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी अलीकडच्या काळात नियमित पत्रकार परिषदा घेऊन केंद्रातील मोदी सरकार आणि केंद्रीय तपास संस्थांच्या महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर छापेमारीच्या ज्या कारवाया सुरू आहेत, त्याविषयी बाजू मांडण्याचा सपाटा लावलेला आहे. या तपास यंत्रणांचा राज्यातील सत्तेमधील राजकीय नेत्याचा मागे जसा ससेमिरा लागला आहे, तसेच नवाब मलिक याचे जावई समीर खान यांच्याकडे गांजा सापडला, असा एनसीबीचाच दावा आहे. त्यामुळे त्यांना काही महिने तुरुंगाची हवा खावी लागली. आता त्यांना जामीन मिळाला आहे. या सगळ्याविषयी आपल्या जावयाची बाजू मांडताना आणि तो कसा निर्दोष आहे, सांगताना नवाब मलिक म्हणाले की, अमली पदार्थविरोधी पथकाला (एनसीबी) गांजा आणि हर्बल तंबाखू यांच्यामधील फरक कळत नाही याला काय म्हणावे.

माझ्या जावयाकडे सापडला तो हर्बल तंबाखू होता, तो गांजा नव्हता. पण तो गांजा ठरवून एनसीबीने माझ्या जावयावर खोटे आरोप ठेवले आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागला. केंद्रातील मोदी सरकार सुडबुद्धीने या छापेमारीच्या कारवाया करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. कार्डिलिया क्रूझवर झालेल्या पार्टीमध्येही लोकांना कसे गोवण्यात आले, त्यात भाजपच्या लोकांचा कसा सहभाग आहे, अशा अनेक गोष्टींचे व्हिडिओ आणि फोटो सध्या मलिक प्रसारमाध्यमांना दाखवत आहेत. क्रूझ पार्टीमध्ये अमली पदार्थ घेतल्यावरून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सापडला आहे. तो सध्या तुरुंगात आहे. नुकतीच शाहरुख खान याने त्याच्यासाठी साडेचार हजार रुपयांची मनी ऑर्डर पोस्टाने पाठवली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सत्ताधार्‍यांवर सातत्यपूर्ण कोटी कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. कागदोपत्री पुरावे प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहेत.

- Advertisement -

राज्यातील सत्ताधार्‍यांवर आरोपांची सुरुवात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची पूर्वीची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यूपासून झाली. त्यानंतर काही दिवसात सुशांत सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यावर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी सत्तेतील विशेषत: शिवसेनेला टार्गेट केले. त्यामध्ये शिवसेनेच्या युवा नेत्यावर शंका घेण्यात आली. पुढे मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया या निवासस्थानासमोर सापडलेल्या जेलिटिन स्फोटकांच्या गाडीच्या प्रकरणावरून सचिन वाझे याची पोलीस दलात झालेली भरतीचे प्रकरण गाजले. त्यानंतर मनसुख हिरेनची झालेली हत्या, त्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूवरून द्यावा लागलेला राजीनामा, ठाकरे कुटुंबीयांची रायगडमधील जमीन, अशी आरोपांची मालिका सुरूच आहे. भाजपने किरीट सोमय्या यांच्याकडे या आरोप मोहिमेची मुख्य सूत्रे दिली आहेत, असेच दिसते आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर तर महाराष्ट्रात हाहा:कार उडाला. शेवटी नाईलाजास्तव अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांची पाठ घेतलेली दिसते, त्यात फारशा काँग्रेस नेत्यांचा समावेश नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून विरोधात असलेल्या भाजपचा समाचार घेत असतात, कालचा राऊत यांनी सामनामधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा आहे, अशी टीका केली आहे. सकाळी पत्रकार परिषद आणि सामनातून प्रत्युतर हा संजय राऊत यांचा शिरस्ता आहे, त्याचेच अनुकरण नवाब मलिक यांनी करण्याचे ठरवलेले आहे, असे दिसते. कारण आता तपास यंत्रणांची मोहीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, दिल्लीत मोघलांचे राज्य आहे, आम्ही घाबरणार नाही, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊ असे सांगत आहे.

- Advertisement -

पवार कुटुंबीय हे स्वत:ला सेक्युलर समजत असल्यामुळे शक्यतो जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणे टाळतात. पण ज्यावेळी स्वत:वर येते त्यावेळी मात्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, असे आवर्जुन सांगतात. मागे जेव्हा छगन भुजबळ यांच्यावर ईडीच्या धाडी पडत होत्या, त्यावेळी आता पवार कुटुंबीयांवरही धाडी पडणार असे बोलले जात होते, त्यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, आम्ही मराठे आहोत, घाबरत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्यावर कोसळते तेव्हा मात्र माणसाला आपली जात, धर्म, राष्ट्रपुरुष आठवतात हे विशेष आहे. सध्या नवाब मलिक यांच्याही घरापर्यंत तपास संस्थांची मोहीम पोहोचली. त्यांच्या जावयाकडून अमली पदार्थ जप्त केले. त्यात गांजा होता, असे एनसीबीचे म्हणणे आहे. तर दुसर्‍या बाजूला नवाबभाई म्हणत आहेत की, तो गांजा नसून हर्बल तंबाखू होता.

याच हर्बल तंबाखूने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सगळेजण एकमेकांना विचारत आहेत, हर्बल तंबाखू म्हणजे काय रे भाऊ? गांजा हा साधारण हिरवट दिसतो, त्यामुळेच त्यालाच हर्बल तंबाखू म्हणतात का, असाही काही जण प्रश्न विचारू लागले आहेत. हर्बल तंबाखू म्हणजे नेमके काय याचा गुगलवर शोध घेण्यात आल्यावर हर्बल तंबाखू असे काही सापडत नाही, पण हे शब्द टाईप केल्यावर हर्बल सिगारेटविषयी माहिती आणि चित्रे येतात. या हर्बल सिगारेटची माहिती अशी आहे की, हर्बल सिगारेटमध्ये अन्य सिगारेटमध्ये तंबाखू असतो तसा नसतो. त्यात अन्य वनस्पती असतात. थोडक्यात, ही तंबाखू विरहित सिगारेट असते, या सिगारेटमध्ये तंबाखू नसल्यामुळे ती आरोग्याला घातक नाही, असा दावा केला जातो, पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते ही हर्बल सिगारेटही आरोग्याला घातकच आहे. पण नवाब मलिक यांनी ज्या हर्बल तंबाखूचा उल्लेख केला, त्याचा मात्र गुगलवर शोध लागत नाही.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सत्तेतील तीन पक्ष आणि केंद्र तसेच राज्यातील भाजप यांनी महाराष्ट्राला अक्षरश: राजकीय रणभूमी बनवले आहे. भाजपला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे आहे, त्याच वेळी महाराष्ट्रातील शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देशभरातील प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी स्थापन करून मोदींना सत्तेवरून खाली खेचायचे आहे आणि शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान बनवायचे आहे. कारण तशी विधाने संजय राऊत करत असतात. महाराष्ट्रामध्ये सध्या ठिकठिकाणी एनसीबीच्या धाडी पडत आहेत. त्यामध्ये सेलिब्रिटी, त्यांचे नातेवाईक, मुले सापडत आहेत. त्यामुळे जसा उडता पंजाब झाला, तसा आता उडता महाराष्ट्र होणार की काय, अशी भीती जनसामान्यांना वाटू लागली आहे. अमली पदार्थांच्या चर्चेने सगळ्या वातारणात एक वेगळीच धुंदी पसरली आहे. एकूणच गेल्या तीन वर्षांच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर एक थरारक चित्रपट निघू शकेल, इतका वैविध्यपूर्ण मसाला आहे. त्यात नवाब मलिक यांनी गांजा आणि हर्बल तंबाखू यातील फरक एनसीबीला कळत नाही, असे बोलून हर्बल तंबाखूच्या लोकचर्चेला अधिकच हवा दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -