घरफिचर्समायमहानगर ब्लॉगलोकांच्या मनातलं बोलणारा लोकनेता!

लोकांच्या मनातलं बोलणारा लोकनेता!

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरील भाषणातून आणि त्यानंतर मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये अनेक विषयांवर सडेतोड भूमिका मांडली. त्यात त्यांनी राजकीय नेत्यांची पोलखोल करतानाच मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मेचा अल्टिमेटम दिला. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याबद्दल अभिनंदन करताना देशात समान नागरी कायदा आणि कुटुंब नियोजन कायदा आणण्याची मागणी केली. लोकांच्या मनात अनेक गोष्टी असतात, पण त्या व्यक्त करण्यासाठी बिनधास्त नेत्याची गरज असते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकांच्या मनातलं बोलणारे लोकनेते आहेत, हेच त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरून आणि त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेच्या भाषणातून मशिदींवरील भोंगे, मदरसा आणि मशिदी यांच्याविषयी जी भूमिका घेतली आहे, त्यावरून राज्यात सध्या विविधांगी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे त्यांच्या विधानांनंतर पुण्यातील मनसेच्या काही मुसलमान पदाधिकार्‍यांनी तत्काळ राजीनामे दिले. राज ठाकरे शिवाजी पार्कवरून गुढीपाडव्या दिवशी काय बोलणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता होती, नेहमीप्रमाणे त्यांच्या सभेला मोठा जनसमुदाय जमलेला होता. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि मदरसा यांच्याविषयी केलेल्या विधानांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरे हे आपल्या भूमिका बदलत असतात, त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले, पण या मंडळींनी राज यांना कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यांची दखल घ्यावीच लागते, हे आजवर अनेक वेळा दिसून आले आहे.

राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी नव्या पक्षाची स्थापना केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणूस हा मूळ विषय होता, पुढे त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर असेच दिसून येते. त्यांनी शिवाजी पार्कवर पक्षाची स्थापना करताना महाराष्ट्राच्या हितासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यानंतर त्यांचा स्वतंत्रपणे राजकीय प्रवास सुरू झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये अनेक गोष्टींचे साम्य आहे. त्यातील मराठी माणसांवर त्यांचा असलेला प्रभाव ही विशेष गोष्ट आहे. महाराष्ट्रात अनेक अमराठी लोक राहत असले तरी या राज्याची स्थापना ही मराठी माणसांनी मोठा संघर्ष केल्यानंतर झालेली आहे. त्यासाठी १०५ महाराष्ट्रप्रेमींनी हौतात्म्य पत्करले होते. महाराष्ट्रात मराठी माणसाचा हक्क पहिला आहे. हीच जाणीव राज ठाकरे यांनी पुन्हा करून दिली आणि त्या अनुषंगाने त्यांच्या पक्षाची वाटचाल आणि संघर्ष सुरू झाला.

- Advertisement -

आज जे राज ठाकरे यांच्याकडे लोकप्रियतेचे वलय आहे, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होते. त्यामुळे बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या हितासाठी आणि गरज पडेल तेव्हा उभा राहणारा नेता म्हणजे राज ठाकरे असा मराठी माणसांना विश्वास वाटतो. त्यामुळेच त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी होती. राज यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात भाजपला पूरक ठरेल अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. अर्थात आपल्या पक्षाच्या वाढीसाठी कुणी कुणाशी जवळीकता ठेवावी आणि युती आघाडी करावी, हा त्या पक्षनेत्याला निर्णय घ्यावा लागतो. शिवसेनाप्रमुखांनी भाजपशी जवळीक करून १९९५ साली युतीची सत्ता स्थापन केली. राज ठाकरे यांची भाजपसोबत होणारी जवळीकता अशाच वाटचालीचे संकेत देत आहे. कारण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला सत्ता आणि मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी ते एका विचित्र राजकीय कोंडीतही सापडले आहेत. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे काही हिंदुत्ववाद मानणारे पक्ष नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे आणि त्यांचे पुढील काळात वैचारिक पातळीवर किती जुळेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच पुढील काळात राज ठाकरे आणि भाजप हे एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. राजकारण कसे वळण घेईल हे काही सांगता येत नाही. कारण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, याची त्यांनाही कल्पना नव्हती.

राज ठाकरे यांचे निवडणुकीतील यशापयश हा एक वेगळा भाग आहे, पण आज जेव्हा कुठली सामाजिक कोंडी निर्माण होते, शासकीय पातळीवरून कुठल्या प्रश्नावर तोडगा सापडेल असे वाटत नाही, तेव्हा अनेक जण राज ठाकरे यांचे निवासस्थान गाठतात. जेव्हा राज एखाद्या प्रश्नावर भूमिका घेतात, तेव्हा सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरे यांची खासियत आहे ती म्हणजे अनेक लोक ज्या गोष्टी खासगीत बोलतात किंवा लोकांच्या समोर बोलण्यास धजत नाहीत, त्या गोष्टी राज जाहीरपणे बिनधास्त बोलतात. खरे तर अनेकांच्या मनात ती गोष्ट असते, ती कुणी तरी जाहीरपणे मांडावी, असे अनेकांना वाटत असते, पण ते बोलायचे कुणी हा प्रश्न असतो. ती गोष्ट राज बोलतात. नुकतेच गुढीपाडव्याला त्यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाही तर मनसे त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावेल, असे म्हटले. त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील उत्तर सभेतही आपली ही भूमिका कायम ठेवून ३ मेपर्यंत भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम दिला. तसेच राज यांनी मदरसा आणि मशिदींच्या तपासणीविषयी विधाने केली. खरे तर मशिदींवरील भोंगे उतरवा, हा सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाने अगोदरच दिलेला आदेश आहे.

- Advertisement -

पण त्याची अंमलबजावणी कुठेलीही सरकार करत नाही. कारण त्यामुळे सामाजिक शांती बिघडेल, अशी भीती सरकारला वाटते. आवाज कुठलाही असो मग तो मुसलमानांच्या मशिदींवरील भोंग्यांचा असो अथवा बिगरमुसलमानांच्या कार्यक्रमांचा असो, लोकांना त्याचा त्रास होत असेल तर त्याला मर्यादा घालायलाच हव्यात. भोंगे उतरविण्याची राज ठाकरे यांनी मागणी केल्यावर त्यांच्या पक्षाच्या काही मुसलमान पदाधिकार्‍यांनी तत्काळ राजीनामे दिले. खरे तर असे होणे अपेक्षित नव्हते, त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्याविषयी बोलायला हवे होते. त्यांना काय वाटते ते पक्षप्रमुख म्हणून त्यांच्यासमोर मांडायला हवे होते. तसेच या मुसलमान पदाधिकार्‍यांनी तुम्हाला ज्या मशिदी किंवा मदरसा यांच्याविषयी शंका वाटते तिथे आमच्यासोबत चला आणि पाहा, असे राज ठाकरे यांना सांगायला हवे होते. त्यांनी जर असे केले असते, तर अनेकांच्या मनामध्ये मदरसा आणि मशिदींबद्दलचा असलेला संशय दूर झाला असता, पण असे न करता या पदाधिकार्‍यांनी तुम्ही जर आमच्या धर्माबद्दल बोललात, तर आम्ही ते सहन करणार नाही, असे राजीनामे देऊन दाखवून दिले. कळीचा मुद्दा इथे आहे, तो असा की, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार, हवे असेल तर तुम्ही तुमच्या भूमिका बदला. खरे तर यात मुसलमान समाजाने बदल करण्याची गरज आहे.

हिंदू आणि मुसलमान जेवढे एकमेकांशी अंतर राखून राहतील, तितका दुरावा आणि गैरसमज वाढत जातात, जसे अभिनेता शाहरुख खानने शिवाजी पार्कवर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केल्यावर तोंडावरचा मास्क बाजूला करून आस्थेवाईकपणाने फुंकर घातली, पण पाहणार्‍या अनेकांमध्ये असा गैरसमज पसरला की शाहरुख खान थुंकला. तसे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातून एकच गहजब उडाला. पण पुढे असे निदर्शनास आले की, मृतात्म्याला शांती लाभावी म्हणून आस्थेवाईकपणे फुंकर घालण्याची मुसलमान धर्मांमध्ये पद्धत आहे. याचा अर्थच असा आहे की, जितके अंतर राखले जाईल, तितके गैरसमज वाढत जातात. त्यामुळे जितकी जवळीकता वाढेल तितके गैरसमज दूर होत जातील. आज शहरी भागातील मिश्र लोकवस्तीत गृहनिर्माण सोसायटीमध्ये घर विकत घेताना किंवा भाड्याने घेताना किती अडचणी येतात याची कल्पना अनेक मुसलमान व्यक्तींना आहे. याविषयीच्या बातम्याही वृत्तपत्रात येत असतात. इतर लोकांना आपल्याबद्दल असा दुरावा का वाटतो, याचा विचार मुसलमानांनी करण्याची गरज आहे.

बरेचदा काही मंडळी जोशात येऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देतात. हे काही वेळ बरे वाटते. पण आज पाकिस्तानमध्ये जाऊन राहण्याची त्या घोषणा देणार्‍यांची तयारी आहे का, हे त्यांनी स्वत:ला विचारून पाहायला हवे. आज पाकिस्तानची अवस्था काय आहे, पाकिस्तान हा अतिरेक्यांचा अड्डा होऊन बसला आहे. आज पाकिस्तानातील सामान्य माणूस, क्या इसी के लिए बना था पाकिस्तान म्हणत कपाळावर हात मारत आहे. आम्ही भारतासोबत असतो, तर ही अवस्था झाली नसती, असे म्हणत आहे. आज पाकिस्तानला सगळा काश्मीर हवा आहे, पण जो काश्मीर त्यांच्या ताब्यात आहे, तिथे त्यांनी अशी काय प्रगती करून दाखवली आहे. तिथे त्यांनी भारताविरुद्ध कारवायांसाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण देणारे तळ उभारले.

राज यांच्या भाषणानंतर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी अशा वक्तव्यावरून देश तुटेल, अशी धमकी दिली, पण तुटलेल्या देशात म्हणजे पाकिस्तानात आज काय अवस्था आहे, ते इथल्या मुसलमानांना दिसत आहे. आज अनेक कलाकार पाकिस्तानातून नशीब काढायला भारतात येतात. विशेष म्हणजे अर्धा तास पोलिसांना बाजूला करा. भारतातील २० टक्के मुसलमान ८० टक्के हिंदूंना शिल्लक ठेवणार नाहीत, अशी भाषा करणारे बहादूर ओवेसी बंधू राज ठाकरे यांच्या भोंगे उतरविण्याच्या तसेच समान नागरी कायदा, कुटुंब नियोजन कायदा आणण्याची मागणी करणार्‍या वक्तव्यानंतर शांत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांनाही शांत राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने महाराष्ट्र आणि एकूणच देशात शांतता स्थापित करण्याची क्षमता राज ठाकरे यांच्या आवाजात आहे, हेच दिसून आलेे आहे.

रझा अकादमीच्या आझाद मैदानावरील मेळाव्याच्या वेळी पोलिसांच्या गाड्या आणि पत्रकारांच्या व्हॅन्स जाळण्यात आल्या. पोलिसांची जननेंद्रिये पिळण्यात आली. महिला पोलिसांचे कपडे खेचून त्यांचा विनयभंग करण्यात आला, तेव्हा राज्यात असलेले सरकार सामाजिक शांतता कायम ठेवण्याच्या नावाने शांत होते, पण हा प्रकार लोकांना पटणारा नव्हता. याविषयी कुणीतरी जाहीरपणे बोलण्याची गरज होती. तेव्हा राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन लोकभावना मांडल्या. प्रश्न फक्त मुसलमान, मशिदी, भोंगे इथपर्यंत मर्यादित नाही, जेव्हा कधी कुणी येथील मराठी माणसांना कमी लेखत असेल, त्यांची हेटाळणी करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर देणारा मराठी नेता हवा असतो.

जेव्हा गुजराती मारवाडी लोक मराठी माणसांची अवहेलना करण्यासाठी म्हणायचे की, ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून जाहीरपणे सांगितले होते, ‘बायका तुमच्या आणि पोरे आमची’. त्यानंतर मराठी माणसांची हेटाळणी करणार्‍यांची तोंडे बंद झाली. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, पण त्यासाठी स्वत्व गमावून चालत नाही. कारण स्वत्व गमावलेला समाज हा थोडा जरी दम भरला तरी लगेच कोसळून पडतो. महमदअली जिनांनी तसा दम भरून भारताची फाळणी केली, पण आता पुन्हा पुन्हा असे होणे योग्य नाही. त्यासाठी कुणी तरी लोकांच्या मनात कोंडलेल्या भावना जाहीरपणे मांडायला हव्या. राज ठाकरे हे त्या लोकभावना मांडणारे लोकनेते आहेत.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -