घरफिचर्समायमहानगर ब्लॉगतिसर्‍या कोरोना लाटेची भालाफेक!

तिसर्‍या कोरोना लाटेची भालाफेक!

Subscribe

तिसर्‍या लाटेच्या तोंडावर ऑक्सिजनपासून ते बेड्स आणि छोट्या मुलांच्या कोविड सेंटरसारख्या अनेक उपाययोजना सरकारने केल्या आहेत खर्‍या. पण दुसर्‍या लाटेने जसे सगळ्यांचेच अंदाज चुकवले, तशी परिस्थिती या तिसर्‍या लाटेच्या निमित्ताने व्हायला नको अशी एकीकडे तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांच्या बेसुमार आणि बेशिस्त वागणुकीने सगळ्याच निर्बंधांना केराची टोपली दाखवली जात आहे. एकूणच या परिस्थितीत राजकीय पक्षांनी सर्वात आधी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. तिसर्‍या लाटेच्या नावाखाली निर्बंधांच्या भाला फेकीसाठीचे टायमिंग राजकीय नसावे इतकीच अपेक्षा सर्वसामान्य करताहेत.

कोरोनाच्या विरोधातील लढाईत धारावी, मुंबई महापालिकेपासून ते महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक झाले खरे, पण महाराष्ट्राची हीच ओळख आता एका वेगळ्या दिशेने भरकटताना दिसते आहे. राजकीय पक्षांचे भरगच्च गर्दीचे कार्यक्रम, मोर्चे, जनआशीर्वाद यात्रा, युवा सेनेचे आंदोलन, पक्षाचे कार्यक्रम, मंदिरांमधील राजकीय नेत्यांच्या पूजा यासारख्या अनेक कारणांमुळे राजकीय नेतेमंडळी सध्या चर्चेचा विषय आहेत. राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात, आंदोलनात कोरोना वाढत नाही का, असा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे. त्यातच आता कोरोना व्हेरिएंटच्या आणि तिसर्‍या लाटेच्या निमित्ताने पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. सण उत्सवाच्या कालावधीतच कोरोनाची भीती का दाखवली जाते असा प्रश्न आता विरोधकांसोबतच सर्वसामान्यांकडूनही यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेच्या भाला फेकीचा नेमका कोणता कालावधी असणार, हे कोडे सर्वसामन्यांना पडले आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये मिळालेली सूट ही तिसर्‍या लाटेच्या नावाखाली पुन्हा एकदा निर्बंधांच्या चौकटीत येणार का, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.

कोरोनाच्या नियमांच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकूणच सरकारकडून कोरोना निर्बंधाची खिल्ली उडवली होती. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या मुद्यावर समुद्राच्या लाटा आहेत का, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. त्याचवेळी राजकारणासाठी आणि सुडाच्या भावनेने या कोरोना निर्बंधांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हिंदूंच्या सण उत्सवाच्या कालावधीतच कसे काय निर्बंध अंमलात येतात, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका आगामी कालावधीत येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. या निवडणुकांच्या निमित्तानेही राज ठाकरेंनी एकूणच सत्ताधार्‍यांच्या सोयीच्या राजकारणावर टीका केली आहे. आपली आखणी करून घ्यायची आणि वाटेल तेव्हा निवडणुका लावायच्या असाच सरकारचा अजेंडा असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. त्यामुळेच सोयीने होणार्‍या कोरोना निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी कडाडून टीका केली. सण उत्सवाच्या कालावधीतही हिंदूंच्या सणांच्या वेळीच कसे काय निर्बंध लावले जातात, असाही सवाल त्यांनी केला होता. तर मंदिरे बंद असण्याच्या मुद्यावरही त्यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

मंदिरांच्या निमित्ताने अनेक राजकीय व्यक्तींचे व्हिडिओ हे मंदिरात दर्शन घेताना व्हायरल होत आहेत. राजकीय नेत्यांसाठी मंदिरे खुली आणि सर्वसामान्यांना मात्र बंद असे चित्र सध्या अनेक राजकीय नेत्यांच्या मंदिरातील पूजांच्या निमित्ताने पहायला मिळत आहे. पण जनतेचा रोष मात्र अशा घटनांमुळे पहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांसाठी वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांना मात्र बंधने असाच वेगवेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या या मंदिरांच्या फोटोंमुळेच सर्वसामान्यांच्या रोषात भर पडत आहे. राजकीय व्यक्तींसाठी होणारा वेगळा न्याय पाहता सामान्य माणसांमध्ये चीड आणणार्‍या या घटनांमुळे राजकीय नेत्यांविरोधात आणखी राग व्यक्त केला जात आहे. मंदिरांसारखाच राग हा राजकीय स्टंटबाजीविरोधातही आहे.

राज्यात जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने झालेली गर्दी कशी काय चालते असा सर्वसामान्यांच्या मनातला आणखी एक प्रश्न आहे. दुसरीकडे युवा सेनेच्या आंदोलनाने झालेला राडाही जनतेने पाहिलेलाच आहे. राजकीय पक्षांनी बैलगाडा शर्यत आणि दहीहंडीचे केलेले उत्सवही जनतेने लक्षात ठेवले आहेत. तर पक्ष वाढीसाठी चालले कार्यक्रम, मेळावे आणि आंदोलनांचे अधूनमधून होणारे स्टंट हेदेखील जनतेच्या आठवणीत आहेतच. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपआपल्या सोयीने राजकीय गर्दी जमवली. त्यांच्याविरोधात कारवाईची कोणतीच भाषा नसते. पण निर्बंधांच्या नावाखाली मात्र सर्वसामान्य जनताच भरकटली जाते, हे याआधीच्या दोन लाटांच्या निमित्ताने जनतेने अनुभवले आहे. मग सर्वसामान्यांचा लोकल ट्रेनमधील प्रवेश असो, शॉपिंग मॉल्सची एंट्री असो वा दुकानांच्या वेळा असो, कायद्याचा बडगा हा सामान्यांसाठीच.

- Advertisement -

राजकारण्यांना मात्र सगळ्यातूनच सूट. त्यामुळेच कोरोनाच्या निर्बंधांचं एक प्रकारे आता हसं झाल्यासारखी अवस्था आहे. एकीकडे मुख्यमंत्री राजकीय आंदोलन करू नका, म्हणून आवाहन करतात, तर दुसरीकडे शिवसेनेच्या मेळाव्याला भयंकर गर्दी दिसते. हे चित्र राज्यात कोरोनाच्या पुढच्या तयारीसाठी आशादायक चित्र निर्माण करणारे नाहीए. जगभरातील देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धुमाकुळ आणि तिसर्‍या लाटेचा सुरू झालेला कहर यामुळे अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची रूग्णसंख्या वाढतानाच दुसरीकडे कोरोना मृत्यूचा आकडाही अनेक देशात चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून सुरू झालेला हलगर्जीपणा हा येत्या काळात सर्वसामान्यांचे संकट वाढवणारा आहे.

राजकीय पक्षाच्या हलगर्जीपणाचे सोप उदाहरण म्हणजे पंढरपूरमध्ये झालेली विधानसभेची पोटनिवडणूक म्हणता येईल. गावोगावी झालेल्या राजकीय सभांमुळे पसरलेल्या कोरोनाने अजूनही पंढरपूरकर सुटलेले नाहीत. कोरोनाचे निर्बंध आणि फैलाव यामधून अनेक ठिकाणी रूग्णालयात रूग्णांना जागा नाही अशीच परिस्थिती निवडणुकीनंतरचा परिणाम म्हणून कायम आहे. त्यातच राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका येत्या दिवसात पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मेळावे असो, छोटेखानी कार्यक्रम असो, राजकीय पक्षांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे. त्यातच मुंबईसह राज्यातील रूग्णसंख्याही दुसरीकडे वाढायला सुरूवात झाली आहे. राज्यातला हा आकडा दुर्लक्षित करण्यासारखा नाहीए.

तिसर्‍या लाटेच्या तोंडावर ऑक्सिजनपासून ते बेड्स आणि छोट्या मुलांच्या कोविड सेंटरसारख्या अनेक उपाययोजना सरकारने केल्या आहेत खर्‍या. पण दुसर्‍या लाटेने जसे सगळ्यांचेच अंदाज चुकवले, तशी परिस्थिती या तिसर्‍या लाटेच्या निमित्ताने व्हायला नको अशी एकीकडे तयारी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र राजकीय नेत्यांच्या बेसुमार आणि बेशिस्त वागणुकीने सगळ्याच निर्बंधांना केराची टोपली मिळाली आहे. एकूणच या परिस्थितीत राजकीय पक्षांनी सर्वात आधी जबाबदारीने वागणे अपेक्षित असतानाच, त्यांच्यापासूनच नियम पायदळी तुटवड्याने प्रकार घडत आहेत. त्यामुळेच राज्यातील जनता राजकीय नेत्यांसाठीच्या खुलेआम अशा सूट सवलतीबाबत आश्चर्य व्यक्त करत आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांना नियम करतानाच राजकीय पक्षांनी तिसर्‍या लाटेचा सोयीने वापर करू नये अशी जनतेची अपेक्षा आहे. सण उत्सवाच्या नावावर फक्त जनतेला निर्बंध घालायचे, आपण मात्र बेछूट वागायचे हे चित्र राजकीय पक्षांनी बदलायला हवे. राजकीय पक्षांकडे जनता मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहते, अशावेळी त्यांनी आदर्श ठेवणे अपेक्षित आहे. तिसर्‍या लाटेच्या नावाखाली निर्बंधांच्या भाला फेकीसाठीचे टायमिंग राजकीय नसावे इतकीच अपेक्षा सर्वसामान्य करताहेत.

तिसर्‍या लाटेच्या तोंडावर उशिरा सुचलेले शहाणपण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडं उशिरा का होईना, पण राजकीय पक्षांना अखेर लोकांच्या गर्दीचे कार्यक्रम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह राज्यातील विविध भागात वाढणारी गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांना राजकीय पक्षांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. राजकीय आंदोलन, सभा आणि इतर कार्यक्रम थांबवण्यासाठीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आपण सणानंतरही साजरे करू शकतो, पहिली आपल्या नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. अशीच रूग्णसंख्या वाढत राहिली तर नक्कीच परिस्थिती हाताबाहेर जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यालाच प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने लगेचच प्रतिसाद दिला आहे. गर्दी होईल असा एकही कार्यक्रम राजकीय कार्यक्रम घेणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीसारखी भूमिका आता शिवसेना आणि भाजपनेही घ्यायला हवी. खुद्द मुख्यमंत्रीच आवाहन करत असताना अनेकदा शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या फर्मानाला हरताळ फासण्यात येतो. राणेंविरोधातील युवासेनेचे आंदोलन आणि उद्धव ठाकरेंकडून कौतुकाची थाप अशा दुहेरी भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी वागायला नको. त्यामुळे मुख्यमंत्री बोलतात तो शब्द शिवसैनिकांनीही पाळायची आता वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकीकडे राजकीय कार्यक्रम नको म्हणतानाच दुसरीकडे पक्ष वाढीसाठी आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छुपे अजेंडे राबवले जाऊ नये इतकीच अपेक्षा आहे. किमान कोरोनाच्या परिस्थितीत तरी राजकीय पक्षांनी जी जनता राजकीय पक्षांकडे लक्ष ठेवून आहे, अशा नागरिकांसाठी भान ठेवून वागणे अपेक्षित आहे. अन्यथा राजकारणाच्या नावाखाली आणि आंदोलनाच्या मुद्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याच्या नादात सर्वसामान्य कार्यकर्ते कोरोनाच्या विळख्यात भरडले गेले नाही म्हणजे मिळवलं.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -