घरफिचर्समायमहानगर ब्लॉगनिसर्गाचं तांडव आणि बिच्चारा मानव!

निसर्गाचं तांडव आणि बिच्चारा मानव!

Subscribe

मुंबईत झालेल्या पावसाने शहराच्या चाळींमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी तर शिरलंच, पण त्याच वेळेला पॉश निवासी संकुलात राहणार्‍या नागरिकांच्या महागड्या चारचाकी गाड्यांवर झाडं कोसळल्यानं शेकडो कोटींचं नुकसान झालं आहे. एकट्या मुंबई शहरात सुमारे 3000 लहान मोठी झाडे उन्मळून पडल्याची नोंद मुंबई महानगरपालिकेकडे आहे. एका मुंबई शहराची ही स्थिती असेल तर या वादळाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सागर किनार्‍यावर वसलेल्या गावांमधील नागरिकांची स्थिती काय केली असेल याची कल्पनाही करवत नाही. निसर्गाच्या तांडवापुढे मानव हा खरोखर बिच्चारा आहे.

आजच्या घडीला देशातलं सगळ्यात महागडं खासगी निवासस्थान असलेल्या अँटालियामध्ये राहत असलेले मुकेश अंबानी असुद्यात किंवा वांद्य्राच्या कलानगरमधल्या साहित्य सहवास-पत्रकार वसाहतीत राहणारा साहित्यिक-पत्रकार. उपनगरातील एखादा पॉश निवासी संकुलात राहणारा लक्ष्मीपुत्र असूद्यात किंवा कोकणातील समुद्रकिनार्‍यावर रापण करणारा एखादा मच्छिमार असू द्या. मुंबईच्या किनार्‍यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर आत जाऊन तेल विहिरीवर काम करणारा तेल कंपनीचा एखादा तंत्रज्ञ असू द्या. निसर्गानं तांडव सुरू केलं की त्यावर कुणाचंच काही चालत नाही हेच खरं. सध्या आपण ते अनुभवतोय. खरंतर गेल्या पंधरा महिन्यांहून अधिक काळ आपण निसर्गाचं तांडव एका वेगळ्या पद्धतीने कोरोनाच्या रुपाने अनुभवतोय. एका विषाणूने पृथ्वीवरच्या मानवजातीला पुरतं भंडावून सोडलंय. ते दुःख-वेदना कमी म्हणून की काय तौत्केसारख्या वादळातून मानवाला आणि त्याच्या प्रगतीला पुरतं उखडून टाकण्याचे काम काही तासांसाठी आलेल्या या वादळाने केलं आहे. पूर्ण देश लशींसाठी तडफडतोय, नागरिकांची तासनतास पायपीट सुरू आहे. पावित्र्याचं मापक समजल्या जाणार्‍या गंगेमध्ये शेकडो प्रेतांचा खच पडला आहे.

सरकार कुठलंही असू द्या, उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथांचं किंवा महाराष्ट्रातल्या उध्दव ठाकरेंचं…इतकंच काय पण वरकरणी संन्यस्त वृत्ती दाखवणार्‍या केंद्रातल्या नरेंद्र मोदींचंही. निसर्गापुढं मानवाचं काहीच चालत नाही आणि चालणार नाही, असे दाखवणारे प्रसंग आपल्यापैकी अनेकांच्या वाट्याला आले असतील. माणूस विज्ञानाच्या जोरावर आपण प्रगती केल्याची निशाणं जागोजागी फडकतोय, पण ज्या निसर्गावर तो विजय मिळवतो असं त्याला वाटतं तो निसर्ग एखाद्या दिवशी तांडव करतो आणि समस्त मानव जात त्यासमोर हतप्रभ होते. हे आपल्याला अगदी गेटवे ऑफ इंडियापासून ते पर्यटनस्नेही गोव्यापर्यंत आणि तिथून मोदींच्या गुजरातमधल्या समुद्रकिनार्‍यावर ही बघायला मिळतं. गुजरातमध्ये तौत्के वादळानं जी दाणादाण उडवली तिचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बुधवारी गुजरातचा हवाई दौरा केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि टीमने कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन चक्रीवादळ आणि त्यामुळे उद्भवलेल्या वाताहतीची पाहणी केली. चक्रीवादळ समुद्र किनार्‍याच्या भागांना अधिक मोठ्या प्रमाणात हादरवून गुजरातच्या पोरबंदर परिसरामध्ये जाऊन धडकले.

- Advertisement -

मुंबईत झालेल्या पावसाने शहराच्या चाळींमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी तर शिरलंच, पण त्याच वेळेला पॉश निवासी संकुलात राहणार्‍या नागरिकांच्या महागड्या चारचाकी गाड्यांवर झाडं कोसळल्यानं शेकडो कोटींचं नुकसान झालं आहे. एकट्या मुंबई शहरात सुमारे 3000 लहान मोठी झाडे उन्मळून पडल्याची नोंद मुंबई महानगरपालिकेकडे आहे. एका मुंबई शहराची ही स्थिती असेल तर या वादळाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सागर किनार्‍यावर वसलेल्या गावांमधील नागरिकांची स्थिती काय केली असेल याची कल्पनाही करवत नाही. या वादळाचा तडाखा हा आंबा, काजू या मोसमी फळांच्या बागायतदारांप्रमाणे नारळ-सुपारीच्या शेतकर्‍यांनाही बसलाय.

तसाच तो किनारपट्टीच्या मच्छिमारांनाही बसलेला आहे. पाचही जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांना आपल्या बोटींचं, जाळ्यांचं तसंच घरादारांचंही नुकसान झालं आहे. आता महसूल विभागाचे सरकारी बाबू जाऊन या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करतील. कारण सरकार जे काही देतं त्याला मदत का म्हणायची असाच प्रश्न पडतो. गेल्यावर्षी जून महिन्यामध्ये आलेले निसर्ग वादळ रायगड, रत्नागिरी या कोकणातील भागाला हादरून गेले होते. त्यानंतर सरकारने रायगडसाठी 75 कोटी रुपये आणि रत्नागिरीसाठी 25 कोटींची मदत जाहीर केली. 100 कोटींच्या समोर प्रत्यक्षात मदत पोचलीय फक्त 49.50 लाखांचीच. ही आकडेवारी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत देण्यात आली आहे. हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार मागच्या ‘निसर्ग’ वादळापेक्षा या ‘तौत्के’ वादळाचा जोर आणि परिणाम कैकपटीने अधिक होता. सहाजिकच निसर्ग वादळाच्या नुकसानीपेक्षा तौत्केने केलेले नुकसानही खूपच भयंकर आहे. मग या खेपेला सरकार काय करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. कारण फक्त आंबा बागायतदारांचं सुमारे 100 कोटींचं नुकसान झाल्याचं जाणकार व्यावसायिक सांगतायत.

- Advertisement -

आपल्याकडे हवामान खात्याचा अंदाज वर्तवणे हा एक मनोरंजनाचा विषय म्हणून त्याकडे पाहिले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात या क्षेत्रात आपण उल्लेखनीय सुधारणा केलेली आहे. युरोपियन देशांमध्ये क्रिकेटचे सामने, ऑलिंपिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आयोजित केले जातात. भारतात मात्र तशी काही परिस्थिती नव्हती. पण गेल्या काही काळात अधिकाधिक बिनचूक भाकीत करण्याचा हवामान खात्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच काही प्रमाणात ह्या फटक्यातून सावरण्यासाठी आपल्याला फायदा झालेला आहे. अर्थात अपवाद मात्र मुंबईच्या समुद्रकिनार्‍याजवळ सुरू असलेल्या तेल विहिरींवरच्या कामाचा. ‘मुंबई हाय’ इथल्या हिरा तेल विहीर क्षेत्रात ओएनजीसीचा ‘बार्ज’( तेल उत्खनन करणारा निवासी तरंगता फलाट) खवळलेल्या समुद्रात बुडाला. या बार्जवर 273 कर्मचारी काम करत होते, त्यापैकी 180 कर्मचार्‍यांना सुखरूपरित्या वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांना यश आले आहे. 93 जण अजूनही बेपत्ता आहे.

समुद्र सोमवार, मंगळवार असे दोन दिवस तौत्के वादळामुळे तुफानलेला असणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आल्यावरही ओएनजीसी या तेल कंपनीने आणि तिच्यासाठी काम करणार्‍या अ‍ॅफकॉन्स कंपनीने कामगारांना का वेठीस धरले? त्यांच्या जिवाशी का खेळ केला? हाच इथे कळीचा मुद्दा आहे. यावर संबंधित कंपन्यांकडे जवाब मागायला हवा. ही जागा मुंबईच्या किनार्‍यापासून 38 सागरी मैल (70किलोमीटर) अंतरावर आहे. गेल्या तीस वर्षांपासून या ठिकाणी तेल उत्खनन सुरू आहे. तौत्के चक्रीवादळादरम्यान समुद्रात दीडशे किलोमीटर वेगाने सहा ते दहा मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. या लाटा सोमवारी पहाटेपासून 32 ते 36 तास उसळत होत्या. अशी माहिती ओएनजीसीनेच माध्यमांना दिली आहे. मग इथे प्रश्न पडतो, शेकडो कामगारांना वेठीला धरुन हे काम का सुरू ठेवण्याचा अट्टाहास केला जात होता? गेल्या 40 वर्षांतील हे सर्वात अवघड मदतकार्य करण्याची वेळ नौदल आणि तटरक्षक दलांवर कोणामुळे आली? हे कशामुळे झालं तर निसर्गाच्या अक्राळ-विक्राळ रुपानंतरही आपल्या मोहापायी मानवाला निसर्गाची चेष्टा करावीशी वाटली.

वरळी वांद्रे येथील सागरी सेतू (सीलिंक) वरील वाहतूक सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. समुद्राच्या पोटात शिरून भराव टाकून मानवाने पूल बांधला, पण त्याच समुद्राचा रुद्रावतार बघून शेवटी मानवाला सोमवारी थांबायला लागलं. तीच गोष्ट कोस्टल रोडची अर्थात सागरी महामार्गाची. हे काम देखील थांबवण्यात आले. श्रीमंत लक्ष्मीपुत्रांची वस्ती असलेल्या पेडर रोड, नेपियन्सी रोड या भागात गुडघाभर पाणी जमा झाले होते. एरवी वरळी सी फेस परिसरात राहतो म्हणून शेखी मिरवणार्‍यांना गेल्या दोन दिवसांत बहुमजली टॉवरमधील आलिशान घरात अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगावं लागत होतं. पंधरा-वीस, 30 ते 40 मजल्याच्या गगनचुंबी इमारतीत राहणार्‍या अनेक मुंबई आणि ठाणेकरांचा घोंघावणार्‍या वार्‍याच्या आवाजानं थरकाप उडवला.

तौत्केचं तांडव सुरू असताना जी हजारो झाडं कोसळली त्या अवाढव्य झाडांची कापणी करण्याची पद्धत, आणि ती उचलण्याची पद्धत ही अत्यंत जुनाट स्वरूपाची असल्याचं या दोन दिवसात बघायला मिळालं. यामुळे बर्‍याच ठिकाणी पडलेली झाडं दूर करताना किंवा उचलताना अधिक नुकसान झाल्याचं स्थानिक नागरिकांच्या समाज माध्यमांवरील तक्रारींमधून लक्षात आलंय. काही ठिकाणी तर संकुलांच्या परिसरातील झाडे उचलण्यासाठी या महामारीच्या दिवसांतही महापालिकेने करदात्या नागरिकांवरच या खर्चाचा उलट बोजा टाकलेला आहे. तौत्केच्या तांडवानंतरही शहरी मंडळींना अवघ्या काही तासांत पुन्हा आपापल्या कामांवर रुजू व्हावं लागलंय. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीकर,नवी मुंबईकर तसे आपापल्या दिनचर्यांमध्ये रुजूही झाले आहेत. पण वादळामुळे उन्मळून पडला आहे तो मात्र किनारपट्टीवरचा मच्छीमार, शेतकरी आणि बागायतदार.

गेल्यावर्षी ‘निसर्ग’ वादळ रायगड आणि कोकण किनारपट्टीवर वादळामुळे झालेल्या नुकसानातून किनारपट्टीवरचा कोकणी माणूस अद्यापही सावरलेला नाही. निसर्गाच्या या तांडवानंतर या ग्रामीण भागांना सगळ्यात जास्त फटका कसला बसतो, तर तो वीज टंचाईचा आणि दूरसंचार यंत्रणा खोळंबल्याचा. या तौत्के वादळात 10,752 गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा कॉलम लिहिपर्यंत 4000 गावं आणि 12 लाख वीज ग्राहक अंधारात आहेत. या भागात मंत्री अधिकार्‍यांचे दौरे होतील. गेल्या वर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा मोठमोठी पॅकेज घोषित केली जातील. प्रत्यक्षात या कष्टकरी मच्छीमारांच्या, धडपड्या आंबा-नारळ बागायतदारांच्या पदरात खर्‍याखुर्‍या अर्थाने काय पडणार? हाच प्रश्न आहे. कोणतेही सरकार नैसर्गिक प्रकोपानंतर संपूर्ण नुकसान भरपाई देऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी मंत्रालयात बसणार्‍या मायबाप सरकारने नुकसान भरपाईच्या नावाखाली थट्टामस्करी करू नये इतकीच माफक अपेक्षा. गुजरातच्या किनार्‍यावर तौत्के आदळल्यावर हवाई पाहणीसाठी लगबगीने जाणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची धडधड कोकण किनारपट्टीवरही ऐकायला मिळेल हीच अपेक्षा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -