घरफिचर्समायमहानगर ब्लॉगतेल उत्पादनात भारत स्वयंपूर्ण कधी होणार?

तेल उत्पादनात भारत स्वयंपूर्ण कधी होणार?

Subscribe

आखाती देशांवर तेलासाठी अवलंबून असलेली अमेरिका कालांतराने अथक प्रयत्न करून देशांतर्गत तेल साठे मिळवून स्वयंपूर्ण झाली. भारत अद्यापही आखाती देशांवरच अवलंबून आहे, हे दुर्दैवी आहे. समजा भारत-पाकिस्तान युद्ध झाले, तर पाकिस्तानला आखाती देशांकडून तेलाचा लवकर पुरवठा होऊ शकतो. भारतात ते पोचण्यास काही कालावधी जाईल. सर्व रणगाडे, काही युद्धसाहित्य यांना तेलाची आवश्यकता भासते. आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यास आणि त्याच वेळी पाकने युद्ध चालू केल्यास भारत युद्धसाहित्याचा उपयोग तेलाविना कसा करणार ?

सौदी अरेबियातील तेलाची प्रक्रिया करणारी सर्वात मोठी कंपनी ‘सौदी अरामको’चे तेल शुद्धीकरण क्षेत्र आणि टाक्या यावर हौऊथी बंडखोरांनी ३ दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यामुळे तेल उत्पादनाचे पुष्कळ नुकसान झाले आहे. परिणामस्वरूप सौदी अरेबियाने ५० टक्के तेल उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला. सौदीच्या या निर्णयामुळे जगाच्या तेल उत्पादनापैकी दिवसाला ५ टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे ‘सौदी अरामको’ने म्हटले आहे. याचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर झाल्याने तेलटंचाईच्या धोक्यासमवेत तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

येमेनमधील हौऊथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारीचे स्वीकारली असली, तरी प्रादेशिकदृष्ट्या हा भाग आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हल्ला झाला ते क्षेत्र यांमध्ये ५०० किलोमीटर आणि त्याहून अधिक अंतर आहे. ‘एवढा मोठा प्रवास करून ‘ड्रोन’ जाऊ शकेल का आणि तेही बंडखोरांकडे अथवा सौदीच्या दृष्टीने आतंकवादी असलेल्यांकडे असा ड्रोन असू शकतो का ?’, हा प्रश्नच आहे. यापूर्वी हौऊथी बंडखोरांनी सौदीच्या दक्षिण भागात हल्ले केली आहेत. सौदीनेही येमेनमधील हौऊथी बंडखोरांच्या क्षेत्रात यापूर्वी हवाई हल्ले केली आहेत, असे हौऊथी बंडखोरांचे म्हणणे आहे. आता या दहशतवाद्यांकडे एवढा लांब पल्ला पार करून हल्ला करणारे ड्रोनचे तंत्रज्ञान असणे म्हणजे जग आणि भारतासाठीही मोठा धोका आहे; कारण अन्य दहशतवादी गट हे तंत्रज्ञान सहज मिळवू शकतात.

- Advertisement -

सौदी अरेबिया हा सुन्नीबहुल आहे, तर शेजारील इराण हा शियाबहुल आहे. शिया आणि सुन्नी यांच्यात पारंपरिक संघर्ष असतो, तसा या राष्ट्रांमध्येही तो आहे. सौदीचा तसाच संघर्ष येमेनसमवेतही आहे. सौदीभोवती हवाई सुरक्षेचे कडे असते, अमेरिकेची सुरक्षा त्यांना असते, तर पाकच्या सैन्यदलाकडे सौदीच्या काही अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. ‘सौदीच्या ७ प्रकारच्या सुरक्षा यंत्रणेला भेदून ही ड्रोन विमाने तेथपर्यंत पोचली कशी ?’, असा अनेकांना प्रश्न आहे. ज्या भागात हे तेलसाठे आहेत तेथील लोकसंख्येत शियांचे प्रमाण सौदीच्या अन्य भागांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाचा यामागे हात आहे का, हीसुद्धा चाचपणी होऊ शकते, तर ‘अमेरिकेनेच हे हल्ले केले असावे’ असाही काहींचा संशय आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. दोघांनीही एकमेकांना अनेक वेळा युद्धाची धमकी दिली आहे. ‘त्यातूनच अमेरिकेने इराणच्या शेजारील देश असल्यामुळे सौदीच्या तेल क्षेत्रावर हल्ले केले असावे’, असे म्हणणे आहे. याविषयी कितीही तर्क-वितर्क काढले जात असले, तरी सखोल चौकशीतून नेमके कोणी हल्ले केले, हे स्पष्ट होईल. तसेच त्यानंतर सौदी कशाप्रकारे प्रत्युत्तर देतो, ते पहाणेही महत्त्वाचे ठरेल.

सौदीकडे स्वत:ची स्थल सेना नसल्यामुळे अमेरिकेने दिलेल्या विमानांद्वारे हवाई हल्ले करणे हाच पर्याय आहे. स्वत:च्या तेल साठ्यांवर वारंवार हल्ले सौदीला परवडणारी नसल्यामुळे इराणवर हवाई हल्ले केल्यास ते अमेरिकेच्या दृष्टीने फायद्याचेच ठरेल. आधीच अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध घातले असल्यामुळे त्याची स्थिती केविलवाणी झाली आहे. आता सौदीने इराणविरुद्ध पावले उचलल्यास अमेरिकाही यात सहभागी होऊन हात धुवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेने नुकतेच इसिसच्या इराकमधील तळांवर हजारो किलोंचे बॉम्ब टाकून तिचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्याचाही वचपा काढण्यासाठी दहशतवादी प्रयत्न करतील ही शक्यता आहे. इराण जागतिक तेलपुरवठादार देशांपैकी एक देश आहे. इराणमध्ये अण्वस्त्र निर्मिती करण्याचा प्रकल्प चालू आहे. ही अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडल्यास मोठा विध्वंस आणि तोही विशेष करून अमेरिकेच्या विरोधात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात शीतयुद्धासारखी स्थिती आहे. यामुळे भारताने सतर्क रहाणे आवश्यक आहे.

- Advertisement -

भारत अद्यापही तेल आयात करतो त्यापैकी ८० टक्के तेल हे सौदीकडूनच आयात केले जाते. मध्यंतरी ‘पेट्रो डॉलर’चे मूल्य वाढल्यावर भारतात प्रतिदिन पेट्रोल आणि डिझेल यांचे भाव वाढत होते. त्यामुळे सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. आखाती देशांवर तेलासाठी अवलंबून असलेली अमेरिका कालांतराने अथक प्रयत्न करून देशांतर्गत तेल साठे मिळवून स्वयंपूर्ण झाली. आपण अद्यापही आखाती देशांवरच अवलंबून आहोत. हे दुर्दैवी नव्हे का? समजा भारत-पाकिस्तान युद्ध झाले, तर पाकला आखाती देशांकडून तेलाचा लवकर पुरवठा होऊ शकतो. भारतात ते पोेचण्यास काही कालावधी जाईल. सर्व रणगाडे, काही युद्धसाहित्य यांना तेलाची आवश्यकता भासते. आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यास आणि त्याच वेळी पाकने युद्ध चालू केल्यास भारत युद्धसाहित्याचा उपयोग तेलाविना कसा करणार? तेलाचे उत्पादन घटल्यामुळे आणि कच्चे तेल महाग झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. आखातातील अस्थिर वातावरणामुळे पुढील १५ दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ ते ७ रुपयांची वाढ होऊ शकते. तेल शोधण्यासाठीचे कार्यक्षम प्रयत्न आणि दूरदृष्टीने पावले टाकणे भारतासाठी गरजेचे बनले आहे. भारतात इथोनेलच्या सहाय्याने तेल उत्पादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -