हेडलेस काँग्रेसला हेड कधी मिळणार?

feature sampadkiy
संपादकीय

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताची मुक्तता करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ चळवळ चालली. पुढे काँग्रेसचे राजकीय पक्षात रुपांतर झाले. सुरुवातीला लोकमान्य टिळकांचे नेतृत्व या पक्षाला लाभले. टिळकांच्या निधनानंतर काँग्रेस आणि एकूणच स्वातंत्र्य चळवळीची धुरा महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळ पुढे चालू ठेवली. पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देश स्वतंत्र झाल्यावर गांंधीजींच्या सर्वांना समान न्याय देण्याच्या भूमिकेनुसार यांनी असे सांगितले की, आता देश स्वतंत्र झालेला आहे, देशातील सगळ्या विचारसरणींच्या लोकांना समान राजकीय संधी मिळावी यासाठी काँग्रेसचे विसर्जन करण्यात यावे. पण त्यावेळी पंतप्रधानपदाची राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना हे मान्य नव्हते.

त्यामुळे गांधीजींच्या या सूचनेकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. तसेच या सुचनेचा पाठपुरावा करण्यासाठी पुढे गांधीजी फार काळ हयातही नव्हते. पुढे पंडित नेहरू, इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून दीर्घकाळ सत्तेवर होते. देशासाठी चळवळ चालवलेल्या काँग्रेस या पक्षाचा आणि गांधी या महात्माजींच्या आडनावाचा चांगलाच फायदा त्यांना झाला आणि आजही होत आहे. इंदिराजींनी ज्यांच्याशी विवाह केला त्या फिरोज गांधी यांचे मूळ नाव फिरोज जहांगीर घांथे असे होते; पण ते महात्मा गांधीजींच्या विचारांनी इतके भारावून गेले होते की, त्यांनी आपले आडनाव बदलून गांधी असे करून घेतले. त्यामुळे इंदिरा नेहरू या इंदिरा गांधी झाल्या. अगदी आजही राजीव गांधी यांची कन्या प्रियांका विवाहानंतरचे वाड्रा हे आडनाव न लावता, गांधी हेच आडनाव लावतात. त्यामुळे गांधी या आडनावाचा नेहरुंच्या कुटुंबातील मंडळींना असा लाभ होत राहिला आहे. पण सध्या काँग्रेसची परिस्थिती पाहता या पक्षाचे पुढे काय होणार असेच राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

२००४ साली भाजपला पुढील लोकसभा आपणच जिंकणार असे वाटत असताना सोनिया गांधी यांचा करिष्मा चालला. त्यांचा नवा तेजस्वी चेहरा लोकांना पसंत पडला. त्याचसोबत लोकांना जे भाजप नेते आपलेसे वाटत होते, त्या अटलबिहारी वाजपेयी यांचे वयही झालेले होते. त्यामुळे काँग्रेसने अधिक जागा जिंकल्या; पण सोनिया गांधी या विदेशी असल्यामुळे ज्या फिरंग्यांविरुद्ध काँग्रेसने दीर्घकाळ चळवळ चालवून देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याच काँग्रेसने देशाच्या पंतप्रधानपदी एका फिरंगी महिलेला बसवावे, असा नैतिक पेच निर्माण झाला. अर्थात, त्यावेळी काही काँग्रेस नेते देहभान विसरून सोनियाजी आप नेता नही, हमारी माता हैं, असे सांगून तुम्ही पंतप्रधानपदी विराजमान व्हा, अशी आर्जवे करत होते; पण एकूणच परिस्थितीचा आणि आगामी काळातील संभाव्य कायदेशीर अडथळ्यांचा विचार करून आपल्या अंतरात्म्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि बाजूला राहून त्यांनी मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली.

पुढे दहा वर्षे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार चालले. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत देशभरात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. एका बाजूला मनमोहन सिंग यांच्यासारख्या विद्धान आणि विश्वासू व्यक्तीच्या बळावर केंद्रात संपुआचे सरकार चाललेले होते; पण त्याच वेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या देशाच्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया होत चालला होता. म्हणजे लोकांना राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रभावित करू शकत नव्हते, असेच त्यातून दिसून येत होते. पण तरीही काँग्रेसश्रेष्ठी ते काही मानायला तयार नव्हते. राहुल गांधी यांना आम्ही पंतप्रधान बनविल्याशिवाय राहणार नाही, असाच त्यांचा पवित्रा होता. पण वस्तुस्थितीकडे ते लक्ष द्यायला तयार नव्हते. काँग्रेसची सगळी जबाबदारी आणि निर्णयाचे अधिकार सोनिया गांधींकडे होते. कारण त्या पक्षाच्या अध्यक्ष होत्या.

काँग्रेस पक्ष हा जणूकाही काँग्रेसची खासगी मालमत्ता आहे, गांधींशिवाय काँग्रेस चालणार नाही, ही नेते आणि कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना असल्यामुळे सोनिया गांधींनी पक्षाचे अध्यक्ष होण्यात कुणी आडकाठी घालण्याचा प्रश्न येत नव्हता. पुढे २०१4 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी यांनी राहुल यांना उपाध्यक्ष म्हणून पुढे आणले; पण निवडणुकीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. पुढे सोनियाजींची प्रकृती ठिक नसल्यामुळे राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले; पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे नाराज होऊन राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. आता गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीने काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, असे सांगून ते त्या पदापासून आजवर दूर राहिलेले आहेत. पण त्यांना हे माहीत आहे की, आपल्या व्यतिरिक्त कुणीही काँग्रेसजन या पदावर दावा करणार नाही.

राहुल गांधींचे मोदी लाटेपुढे काहीही चालत नाही. त्यामुळे ते इतके नाराज झालेले आहेत की, काँग्रेसजनांनी कितीही आर्जवे आणि मनधरणी केली तरी ते काही काँग्रेस अध्यक्षपदाच्या बोहल्यावर चढायला तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते मोठ्या पेचात सापडले आहेत. त्यातून काँग्रेसने पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज आहे, असे कपिल सिब्बल यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आरोळ्या ठोकत आहेत. सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षात व्यापक बदलांचा आग्रह धरला होता; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पंजाबमध्ये नुकताच जो काही नेतृत्वबदल झाला, त्यावरून सिब्बल यांनी काँग्रेसला अध्यक्ष नसताना हे बदलाचे निर्णय घेतंय कोण, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरून दिल्ली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘कपिल सिब्बल लवकर बरे व्हा,’ असे उपरोधिक नारे सिब्बल यांच्या घरासमोर दिले. सध्या काँग्रेसची अवस्था हिच आजारी माणसासारखी झालेली आहे. त्यातून ती कधी बरी होणार हा प्रश्न सगळ्याच काँग्रेसजनांना पडलेला आहे.

काँग्रेसला हा जो उदासीनतेचा आजार जडलेला आहे, त्यातून बाहेर येण्यासाठी नव्या दमाच्या नेत्याची गरज आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत साठे यांनी प्रियांका गांधी यांना राजकारणात नेतृत्व देऊन सक्रिय करायला हवे, अशी सूचना काही वर्षांपूर्वी केली होती. ती सोनिया गांधी यांनी लक्षात घेतली असती तर काँग्रेसवर ही अवसान गळण्याची वेळ आली नसती. पण राहुल यांनाच नेता करण्यासाठी सोनियांची जी काही एककेनप्रकारेन धडपड सुरू आहे, त्यामुळे काँग्रेस अधिक खोलात जात आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसची अवस्था सध्या हेडलेस झाली आहे, यांना हेड मिळण्याची गरज आहे. राऊत यांच्या हेडलेस या शब्दातून वेगळाही अर्थ निघतो, तोही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी लक्षात घेण्याची गरज आहे. महात्मा गांधी यांची १५2 वी जयंती नुकतीच झाली. गांधी हे आडनाव आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वाढलेली काँग्रेस या पुण्याईवर आजवर नेहरुंच्या वारसदारांनी देशाच्या सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवली; पण आता मात्र काळ कसोटीचा आलेला आहे. कारण लोकसभेच्या मागील निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी आवश्यक असतात तितक्याही जागा जिंकता आल्या नाहीत.