दादा कुठे आहेत…?

Subscribe

परवा खासदार गिरीश बापट म्हणाले, ‘अजित दादा कुठे आहेत?’

अजित दादांनी त्यांना उत्तर दिलं असेलही. पण बापटांच्या त्या प्रश्नाने मी स्वतः चकीत झालो.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या या सगळ्या काळामध्ये मंत्रालयात मला १० ते १२ वेळा जावं लागलं. आणि त्यातला असा एकही दिवस गेला नाही की, मंत्रालयात अजित दादा दिसले नाहीत.

उपमुख्यमंत्री झाल्यापासून दादांची एक ख्याती होती की, भल्या सकाळी ७.३० वाजता ते मंत्रालयात येऊन दाखल होत. अजून त्यांना रीतसर बंगला मिळालेला नाही. पण मुंबईतल्या आपल्या फ्लॅटवरून ते सकाळीच मंत्रालयातल्या आपल्या दालनात येऊन बसत आणि कामाला सुरुवात करत. मंत्रालयाचे दरवाजे उघडतात सकाळी १० वाजता. पण दादा पहाटे येऊन बसत ते यासाठी की दादांच्या मागे त्यांना भेटणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. त्या भेटीगाठीत मंत्रालयीन कामकाज बाजूला पडता कामा नये हा त्यांचा हेतू असे. तेव्हा सुद्धा दादा मला गराड्याशिवाय कधी दिसले नाहीत. दादांशी फोनवर बोलणं अधिक बरं पडायचं. आणि आपला फोन उचलला गेला नाही तर ते उलटा फोन करतात. कारण भेटायला गेलं की ही तोबा गर्दी. आता फरक इतकाच झालाय कोविडनंतर की लोकांची गर्दी मंत्रालयात नसते. कारण घराबाहेर पडायला मिळत नाही आणि मंत्रालयात प्रवेश नाही. पण दादा मंत्रालयात असतात.

- Advertisement -

अख्खं मंत्रालय रिकामं आहे अक्षरशः. कारण ५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी मंत्रालयात असता कामा नयेत, असा कोरोनामुळे प्रशासनाचा दंडक आहे. येण्याजाण्याची सोयही नाही. पण बहुतेक मंत्रालय ५ टक्के काय १ टक्कासुद्धा भरलेलं दिसत नव्हतं. मला पूर्ण मंत्रालयात या दहा दिवसात दिसले ते चार, पाचच मंत्री. कधी अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ शिंदे आणि राजेश टोपे. पण दादांचा दिवस चुकत नव्हता. दादा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैठकाहून बैठक घेत होते. त्यांच्या दिमतीला फक्त एक खाजगी सचिव, संबंधित खात्याचे सचिव आणि एक शिपाई. दोन, चार पोलीस. यापलीकडे मंत्रालयात कुणी दिसत नसे.

राजेश टोपे, अनिल परब, अनिल देशमुख आणि एकनाथ शिंदे या चार मंत्र्यांचे अपवाद वगळता अक्षरशः मंत्रालय रिकामं असायचं. मंत्रालयात आवाज येतात ते फक्त मांजरींचे. कर्मचाऱ्यांच्या डब्यातलं अन्न त्यांना मिळत नाही. त्यामुळे ते बहुतेक उंदीरच शोधत असतात.

प्रत्येकवेळी मला दादांकडेच जावं लागलं. संबंधित विषय दादांच्या खात्याशी निगडित नसताना सुद्धा. पण दादा दोन मिनिटात काम पूर्ण करायचे. तिथल्या तिथे रिझल्ट द्यायचे. मी एकदा त्यांना म्हटलं यूपीतल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना घरी जायचं आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, की हिंदी भाषिक शिक्षक आपल्याकडे इतक्या मोठ्या संख्येने आहेत.

दादांनी विचारलं,
इतके शिक्षक आहेत?

मी म्हटलं,
हो.

पण दुसऱ्या क्षणी त्यांनी सचिवांना फोन लावला.

ट्रेन जात असेल तर कपिल पाटलांचंही काम करा.

पुढे एक श्रमिक ट्रेन शिक्षकांसाठी उपलब्ध झाली. शिक्षक, त्यांचे कुटुंबीय गावी पोचलेही.

आयत्या वेळी ती ट्रेन रद्द होणार होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी मदत केली म्हणून ती ट्रेन गेली.

पण या सगळ्या काळामध्ये दादा कुठेही पडद्यावर येत नाहीत. पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर जात नाहीत. पण पडद्यामागे राहून एखाद्या फिल्ड मार्शल सारखं तेही युद्ध लढत आहेत. ठाकरे सरकारचे खरे फिल्ड मार्शल हे अजित दादाच आहेत.

दादांनी खात्यांच्या बैठका तर खूप घेतल्या. प्रत्येक खात्याची बैठक घेतली. तिजोरी रिकामी असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्यांनी करायला लावले. राजेश टोपेंच्या खात्याला जिथे जिथे अडचण असेल तिथे काही क्षणात ते फाईल तयार करायचे आणि मुखमंत्र्यांकडे पाठवून द्यायचे. लोक त्यांना भेटायला येत नाहीत. पण म्हणून फोन थोडी थांबले आहेत. सचिवांबरोबर चर्चा आणि फाईली मोकळ्या करत असताना शेकडो फोन ते रोज घेत असतात. आणि प्रत्येकाच्या कामाला न्याय देत असतात.

कुठे गुजरातमध्ये एक मुलगा अडकला होता. आईबाप इथे पुण्यात. त्या मुलाला आणण्याची व्यवस्था त्यांनी केली.

सिंधुताई सकपाळ यांच्या आश्रमात भाजीपाला पाठवण्यात अडचण येत होती. दादांनी पोलिसांना सांगितलं, अरं तिथं तर भाजीपाल्याची गाडी आश्रमापर्यंत गेली पाहिजे. भाजीपाल्याची गाडी रोजच्या रोज जायला लागली.

पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती हे दादांचं होमटाऊन किंवा कार्यक्षेत्र. दादांनी रेड झोनचं रूपांतर ऑरेंज आणि काही ठिकाणी ग्रीन झोनमध्ये करण्याचं शिवधनुष्य उचललं आणि करून दाखवलं. कारखाने चालू केले. छोटे मोठे उद्योग धंदे चालू करायला लावले. बजाजचा उद्योग समूह सुरू झाला. अर्थचक्र चाललं नाही तर राज्य चालू शकणार नाही, हे दादांना पक्कं ठाऊक आहे. म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे उद्योग सुरू करावेत, यासाठी दादा अक्षरशः व्यक्तीशः लक्ष घालतात. चालू करून देतात.

एकनाथ शिंदे, अनिल परब, राजेश टोपे, अनिल देशमुख हे वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत. त्यांच्या प्रत्येक अडचणीला दादा प्राधान्याने मदत करताहेत.

दादा बोलायला तसे फटकळ आहेत. तसे कसले पक्के फटकळ आहेत. पण दादा अत्यंत सहहृदय आहेत. संवेदनशील आहेत. ते निर्भय आणि निडर आहेत. अभ्यासू आहेत आणि निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे. कोविड युद्धामध्ये मी ती अगदी जवळून पाहिली. म्हणून चकित झालो माजी मंत्री आणि भाजप खासदार गिरीश बापट यांच्या त्या प्रश्नाने की दादा कुठे आहेत?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे स्वाभाविकपणे सर्वांना समोर दिसतात. त्यात आश्चर्य नाही. पण त्या दोघांच्या यशामध्ये दादांचा अदृश्य वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणून मी त्यांना या कोविड युद्धातला फिल्ड मार्शल म्हटलं. फिल्ड मार्शल म्हणजे काय हे गिरीश बापटांना सांगण्याची आवश्यकता नाही. बापट तसे दादांचे मित्र आहेत. आणि त्यांना माहीत नाही असं असू शकत नाही. हे बापटांसाठी म्हणून मी लिहीत नाहीये. अनेकांना वाटत असेल की दादा कुठे आहेत? म्हणून हा प्रपंच.


लेखक शिक्षक आमदार असून लोकभारतीचे अध्यक्ष आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -