घरफिचर्समायमहानगर ब्लॉगबेदरकार वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे?

बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे?

Subscribe

बेशिस्त वाहतूक ही अपघाताला नेहमीच आयते निमंत्रण देत आली आहे. रात्रीच्या वेळी बेशिस्त वाहतुकीचा प्रत्यय प्रत्येक महामार्गावर येत असतो. समोरच्या वाहनाला हूल मारून सटकणे हा अनेकांच्या आवडीचा छंद आहे. कोणतेही नियम न पाळता वाहन चालविण्याचा असुरी आनंद घेतला जातो. सन २०१७ मध्ये अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुताई सपकाळ यांनी वाहन चालकांच्या आततायी वर्तणुकीवरून द्रुतगती मार्गावर रौद्रावतार धारण करून संबंधित अधिकार्‍यांची बोलती बंद केली होती. पण त्यानंतरही सरकारने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत.

गेल्या काही दिवसांत रस्ते अपघाताचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. दरवर्षी अपघातातील मृतांची, जखमींची यादी प्रसिद्ध होत असते. मात्र अपघातांचे प्रमाण वाढत असताना ते रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे कुठेच दिसत नाही. देशात महाराष्ट्र हा अपघाताच्या बाबतीत १ ते ५ क्रमांकात राहिला आहे. अपघात घडला की हळहळ व्यक्त करायची, मदतीचे सोपस्कार पूर्ण करायचे आणि नंतर सारे काही विसरून जायचे, असे चालले आहे. आकडेवारीच्या खेळात मूळ विषयाला हात घातला जात नसल्याने अपघातांची संख्या वाढत चालली आहे.

गेल्या रविवारी रायगड जिल्ह्यातील माणगाव-श्रीवर्धन मार्गावरील घोणसे घाटात एका प्रवासी मिनी बसला अपघात होऊन महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. याचा घटनाक्रम तपासला तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये कोंबले होते, तसेच चालकाची बेपर्वाई अपघाताला कारणीभूत ठरली. हा घाट अपघातांमुळे कायम विशेष चर्चेत राहिला आहे. दिघी पोर्टमुळे हा मार्ग प्रशस्त झाल्यामुळे घाटाचाही चेहरामोहरा बर्‍यापैकी बदलला आहे. एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात घडू लागले की तो भाग आपण ‘कुप्रसिद्ध’ करून टाकतो. घोणसे घाटालाही ही बिरुदावली लागलेली आहे.

- Advertisement -

मात्र एखाद्या ठिकाणाला कुप्रसिद्ध ठरविताना वाहनाची क्षमता, चालकाचा अनुभव, वाहनाची सुस्थिती याकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. रविवारच्या अपघातावेळी चालकाचा आततायीपणा नडलेला दिसत आहे. तीव्र उतार, वळण या ठिकाणी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा लागतो, किंबहुना हलके वाहन दुसर्‍या किंवा तिसर्‍या गिअरमध्ये, तर अवजड वाहन पहिल्या गिअरमध्ये उतरले पाहिजे. परंतु याकडे दुर्लक्ष करून फाजील आत्मविश्वास दाखविला जातो आणि नको ते घडून जाते. घोणसे घाटातील अपघाताच्या वृत्ताची शाई न वाळते तोच मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर प्रॉपेलिन गॅस वाहून नेणारा टँकर अनियंत्रित होऊन उलटला आणि त्याची धडक दोन कारला लागून त्यापैकी एका कारमधील तिघांना हकनाक जीव गमवावा लागला. तेथेही चालकाचा बेफिकिरपणा नडल्याचे लक्षात येते.

आधी कळस आणि मग पाया, अशा प्रकारची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच म्हणीचा वापर करून आपल्याकडे धोरणं राबविली जातात की काय, हे समजत नाही. वाहन उद्योगाला महाराष्ट्रासह देशात वेगवेगळ्या राज्यांतून चालना मिळाल्याने आधुनिक यंत्रणेवर आधारित वाहने बाजारात आली. वाहन खरेदी करण्यासाठी बँका, खासगी आणि सहकारी पतसंस्था सहजपणे कर्ज देऊ लागल्या. स्वाभाविक एकाचवेळी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहने आली. यात दुचाकींची संख्या लक्षणीय आहे. मात्र ही वाहने सुरळीत धावण्यासाठी सुस्थितीतील रस्त्यांचा नंतर विचार झाला. आज अनेक ठिकाणी धड रस्ते नाहीत. अनेक राष्ट्रीय महामार्ग कात टाकत असले तरी त्यांचे काम पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे.

- Advertisement -

रस्त्यांचा सुमार दर्जा अपघाताला हातभार लावत आला आहे. काही महत्वाचे मार्ग आजही असे आहेत की, ते वाहतुकीच्या तुलनेत अरूंद आहेत. नागमोडी वळणे कायम आहेत. अरूंद पूल, मोर्‍या वाहतूक खोळंबवून ठेवत असतात. यात वाहनांचा बराचसा वेळ जातो. मग पुढे रस्ता बर्‍यापैकी असला की वाहने वेगाने पळविण्याची अघोषित स्पर्धा लागते. यात अपघात होतात. महाराष्ट्रात गेल्या वर्षी २६ हजारांहून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. यात जवळपास १२ हजार निष्पापांचा बळी गेला, तर १४ हजारांच्या आसपास जखमी झालेले आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेकांवर कायमचे जायंबदी होण्याची वेळ आलेली आहे.

अलिकडे अपघाताचे वृत्त येते तेव्हा ‘विचित्र अपघातात’ असे शब्द हमखास वाचावयास मिळतात. असे विचित्र अपघात चौपदरी किंवा सहापदरी महामार्गावर प्रामुख्याने घडतात. याचे कारण साधे आहे. वाहनांचा वेग प्रमाणापेक्षा अधिक असतो आणि वाहने जवळ-जवळ चिकटून चालतात. पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक मारला की मागची वाहने एकावर एक आदळतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अशा अपघाती घटना अनेकदा घडल्या आहेत. इतकेच नव्हे तर मुंबई-गोवा महामार्ग प्रशस्त होताच त्यावरही विचित्र अपघाताच्या घटना घडत आहेत. अवजड वाहनांना पॉवर स्टिअरिंग दिल्यानंतर ही वाहने कारच्या रूबाबात चालविली जात आहेत. या वाहनांचा वेगही कारप्रमाणे आहे. त्यामुळे कोणतेही महामार्ग पाहिल्यानंतर ते ‘धावत’ असल्यासारखे वाटतात.

वाहनांच्या यंत्रणांमध्ये अनेक सुविधा असल्याने चालकांत बेदरकारपणा वाढला असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. यातून अपघातांचे प्रमाण वाढले आणि माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरू लागली. दरवर्षी हजारो बळी जात असताना अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत, ही बाब अतिशय क्लेशदायक आहे. सुरक्षा आठवडा किंवा पंधरवडा साजरे करून अपघात रोखता येणार नाहीत. वाहतूक नियमांचे प्रशिक्षण हा शालेय शिक्षणाचा असा एक भाग असावा, असे आता वाटू लागले आहे. वाहन बेदरकारपणे चालविताना आरटीओ किंवा पोलिसांचे भय राहिलेले नाही. तडजोडीनंतर प्रकरण ‘निकाली’ काढता येते हे पक्के माहीत असल्याने भय वाटण्याचा प्रश्नच येत नाही.

रात्री प्रवासाला निघण्याची अनेकांना हौस असते. कारण काय म्हणे तर वातावरण थंड असते. चालकाला दिवसभर पूर्ण विश्रांती मिळाली की नाही, ते पाहिले जात नाही. चालक जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा बहुतेक सारे निद्रेच्या आधीन झालेले असतात. अशा वेळी चालकालाही झोप अनावर होते आणि अपघात घडतो. अपघातांचे प्रमाण हे दिवसापेक्षा रात्री ते पहाटेच्या दरम्यान अधिक आहे. रात्रीचा प्रवास करताना अनेकदा वाहन सुस्थितीत आहे का, हेही पाहिले जात नाही. सुट्टीच्या हंगामात किंवा सणासुदीच्या दिवसात पैशांच्या हव्यासापायी अनेक वाहन मालक चालकांचा अक्षरश: घाम काढतात. काही चालकही जादा पैसे मिळणार म्हणून जीवावर उदार होऊन विश्रांती न घेता वाहन चालवत असतात.

यात वाहनाच्या देखभाल-दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जाते आणि मग कुठेतरी अनर्थ घडतो. रात्री वाहन चालविणारा चालक नवखा असेल तर समोरून येणार्‍या वाहनाच्या प्रखर दिव्यांमुळे त्याचे डोळे दिपतात आणि अपघाताला निमंत्रण मिळते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे रात्री अनेक चालक दारू पिऊन वाहन चालविण्याचा ‘आनंद’ घेत असतात. रस्त्यात दारू कुठेही आणि केव्हाही मिळत असल्याने अशा चालकांची आयतीच सोय होऊन जाते. दारू पिऊन वाहन चालविणे गुन्हा असला तरी त्यावर नियंत्रण आणणारी यंत्रणा कधीतरीच रस्त्यावर उतरून तपासणीचा फार्स करीत असल्याने चालक निर्धास्त असतात.

बेशिस्त वाहतूक ही अपघाताला नेहमीच आयते निमंत्रण देत आली आहे. रात्रीच्या वेळी बेशिस्त वाहतुकीचा प्रत्यय प्रत्येक महामार्गावर येत असतो. समोरच्या वाहनाला हूल मारून सटकणे हा अनेकांच्या आवडीचा छंद आहे. कोणतेही नियम न पाळता वाहन चालविण्याचा असुरी आनंद घेतला जातो. सन २०१७ मध्ये अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुताई सपकाळ यांनी वाहन चालकांच्या आततायी वर्तणुकीवरून द्रुतगती मार्गावर रौद्रावतार धारण करून संबंधित अधिकार्‍यांची बोलती बंद केली होती. त्यावेळी अनेकांना असे वाटले की सरकार याची गंभीर दखल घेऊन वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी गंभीर पावले उचलेल. पण तसे काही झाले नाही. द्रुतगती मार्गावर वाहतुकीचे तीन तेरा वाजवले जात असताना वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत.

या मार्गावर अपेक्षित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवली जातात. अवजड वाहने बिनधास्तपणे पहिल्या लेनमधून धावत असतात. त्यांना डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्यासाठी छोटी वाहने प्रयत्न करताना अंदाज चुकून दुर्घटना घडतात. द्रुतगती मार्गावर वाहने एका मागोमाग एक आदळण्याचे कारण म्हणजे वाहनांचा बेफाम वेग! या वेगावर नियंत्रण मिळवता आले नाही की वाहन पुढील वाहनावर आदळते किंवा दुसर्‍या लेनवर जाते. दोन दिवसांपूर्वी मनमाड मार्गावर अशा प्रकारचा अपघात होऊन तीनजणांचा बळी गेला. शुक्रवारी दोन ट्रकच्या अपघातामध्ये ५ जण दगावले.

वाहन अपघातांमध्ये दुचाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. हेल्मेट सक्तीला ठेंगा दाखवून दुचाकी चालविण्यात धन्यता मानण्यात येते. लायसन्स नसताना दुचाकी चालविणार्‍यांचे प्रमाण प्रचंड आहे. सायकलींची जागा बरीचशी स्कूटी, मोटरसायकल आदी वाहनांनी घेतल्याने शाळकरी पोरं-पोरींच्या हातातही ही वाहने आली. किंबहुना शाळा, कॉलेजात जाणार्‍या मुला-मुलींला स्कूटी किंवा मोटरसायकल घेऊन देण्यात पालकांना भूषण वाटू लागले. हेल्मेट न वापरणे, प्रमाणापेक्षा अधिक वेग, चुकीच्या दिशेने किंवा समोरून वाहन येत असल्याचे दिसत असतानाही पुढे जाण्याचा प्रयत्न करणे, यातून दुचाकींचे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. पोलीस कधीतरी अशा दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उचलतात. पण त्याचा कुणालाही धाक वाटत नाही.

रस्ते अपघात रोखण्यासाठी विविध उपाय योजण्यात येतात, परंतु त्याचा प्रभाव जाणवत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे वाहतूक नियम समजावून घेण्याबाबत असलेली अनास्था हे आहे. रस्ते चकाचक झाले की वाहनांचा वेग वाढतो. अनेकदा चालकांना वेगाचे भान राहत नाही. द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग प्रति ताशी १०० किंवा त्याच्या पुढेच गेला पाहिजे, ही मानसिकता धोकादायक आहे. मोठी दुर्घटना घडली की त्यावर काही दिवस चर्वितचर्वण होते, त्यानंतर ती विस्मृतीत जाते. अपघात हा विषय अजून पाहिजे तसा गांभीर्याने घेतला जात नाही, असे वाहतूक क्षेत्रातील जाणकार सांगत असतात. एकाच वेळी छोटी-मोठी वाहने रस्त्यावर उतरतात. बेशिस्तपणामुळे वाहन कसेही चालविण्यात येऊन अपघाताला निमंत्रण दिले जाते. अवजड वाहने सर्रास पहिल्या लेनवरून धावताना दिसत असली तरी त्याला कठोरपणे आळा घालण्याऐवजी तडजोड केली जाते. रस्त्यावरील चिरीमिरी बंद होऊन वाहतुकीच्या नियमांची जेव्हा कठोरपणे अंमलबजावणी होईल, तेव्हाच वाढत्या अपघातांना बर्‍याचशा प्रमाणात रोखता येणे शक्य आहे.

बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे?
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -