टीम इंडियाचा नवा सारथी कोण?

एकेकाळी संपूर्ण विश्वावर वर्चस्व गाजवणार्‍या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझिलंड या साहेबांच्या देशांना मात देत भारतीय संघाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील कामगिरी न विसरण्यासारखी आहे, यात दुमत नाही. परंतु, त्यानंतर टीम इंडियाला अद्याप सक्षम नेतृत्व लाभत नसल्याने आता यंदाच्या आयपीएलमधून असे सक्षम नेतृत्व पुढे येते का, याचा शोध सुरू आहे. त्यात प्रामुख्याने के. एल. राहुल, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा यांच्या नावांची चर्चा झाली. परंतु, ‘चांगला खेळाडू चांगला कर्णधार बनतोच असे नसते’ याचा प्रत्यय अनेकदा आला.

आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या टीम इंडियाला महेंद्रसिंग धोनीनंतर अपेक्षित कर्णधार लाभलेला अद्याप तरी दिसून येत नाही. नावाप्रमाणेच विराट खेळी करण्याची क्षमता बाळगणारा कोहली कर्णधारपदाची धुरा हाती घेताच काहीसा बॅकफूटवर गेलेला दिसला. आजमितीस त्याला आपल्या फॉर्मशी झुंजावे लागतेय, हे आयपीएलमध्येही ठळकपणे दिसतेय. महाराष्ट्राचा लाडका हिटमॅन रोहित शर्माही वय आणि फॉर्मचा विचार करता फार काळ कर्णधारपदाची धुरा सांभाळेल, अशी शाश्वती नाही. यामुळेच आता यंदाच्या आयपीएलमधून बीसीसीआयने भारतीय टी-ट्वेन्टी संघाच्या कर्णधाराचा शोध सुरू केलाय. एकेकाळी संपूर्ण विश्वावर वर्चस्व गाजवणार्‍या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझिलंड या साहेबांच्या देशांना मात देत भारतीय संघाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील कामगिरी न विसरण्यासारखी आहे, यात दुमत नाही. परंतु, त्यानंतर टीम इंडियाला अद्याप सक्षम नेतृत्व लाभत नसल्याने आता यंदाच्या आयपीएलमधून असे सक्षम नेतृत्व पुढे येते का, याचा शोध सुरू आहे. त्यात प्रामुख्याने के. एल. राहुल, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा यांच्या नावांची चर्चा झाली. परंतु, ‘चांगला खेळाडू चांगला कर्णधार बनतोच असे नसते’ याचा प्रत्यय अनेकदा आला. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत यांचा कर्णधार म्हणून खेळ बहरला नाही, परिणामी संघाच्या कामगिरीवरही विपरीत परिणाम दिसून आला. म्हणूनच आता हार्दिक पंड्या अन् के. एल. राहुलकडे कर्णधाराच्या नजरेतून बघितले जातेय.

आयपीएलच्या टॉप स्कोअर्सच्या यादीत 2018 पासून प्रत्येक हंगामात सरासरी 600 धावा करणारा के. एल. राहुल हा एकमेव खेळाडू आहे. मुख्य म्हणजे त्याने कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे. यावरुन कर्णधारपदाच्या दबावाखाली के. एल. राहुलने आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होतेय. मुख्य म्हणजे, कर्णधार म्हणून खेळताना राहुलने अधिक जबाबदारीने खेळी साकारल्या आहेत. तो यष्टीरक्षणासह फलंदाजीत आक्रमक खेळीही करू शकतो. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याने 10 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून खेळताना 7 वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे. हे करताना त्याची स्वत:ची कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे, हे विशेष म्हणावे लागेल. अर्थात टीम इंडियाचा कर्णधार असताना पहिले चार सामने गमावणारा तो इतिहासातील एकमेव कर्णधार राहिला, हा अपवाद म्हणता येईल. परंतु, यात कच न खाता राहुलने संयमाने आपल्या चुकांमध्ये सुधारणा केल्याचे दिसून आले.

प्रत्येक कर्णधाराकडे सामन्यापूर्वी बारा पत्ते असतात, त्यातील कोणते ११ पत्ते वापरायचे आणि कुठल्या क्षणी कोणता पत्ता काढायचा, हे ज्याला जमलं.. तोच खरा यशस्वी कर्णधार. आपल्या हातातील पत्त्यांचा योग्य वापर करून कर्णधार राजा बाजी मारतो. हे खरे असले तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. त्यामुळे राजाला कुठल्याही क्षणी स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी घेत मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्यांवर मात करावी लागते, हेही तितकेच खरे. हे ज्याला जमले तो हुकमी एक्का ठरतो. अगदी तसचं काहीसं महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत घडत गेलं. त्याने आपल्या कारकिर्दीत भारताला प्रत्येक फॉरमॅटमध्ये विजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला. आयपीएलमध्येही आजवर त्याची कर्णधार म्हणून सुरू असलेली ‘इनिंग’ अनेकांना भुरळ घालते.

कॅप्टन कुल म्हणून जगभरात ख्याती असलेला माही कुठल्याही क्षणी डाव फिरवण्याची ताकद ठेवतो, हीच त्याची खरी खासियत मानली गेली. अनेक देशांच्या कर्णधारांनी त्याच्यासारखे गेम प्लॅन करून पाहिले, स्ट्रॅटेजी आखली, क्षेत्ररक्षण-गोलंदाज-फलंदाजातील बदल अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून पाहिला… पण प्रत्येकालाच ते जमेल असे नाही. धोनीने आपले वेगळेपण आजही जपले आहे. त्याच्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद हाती घेतले. तो यशस्वीही होत गेला. मात्र, स्वत:चा फॉर्म हरवून बसल्याने आजवर त्याला संघाच्या विजयात योगदान देता आले नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेल्या कोहलीला आज आयपीएलमध्येही आपल्या फॉर्मशी झुंजावे लागत आहे.

अर्थात हा बॅड पॅच फार काळ राहील असे नाही. परंतु कर्णधार म्हणून त्याला रोहित शर्माकडे सुत्रं द्यावी लागली, ही त्याच्यासाठी नामुष्कीच होती. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या हिटमॅन रोहित शर्माला भारतीय संघाच्या नेतृत्वात यश आले खरे, मात्र आजघडीला त्याच्या वयाचा आणि फॉर्मचा विचार करता निवड समिती नक्कीच दुसर्‍या पर्यायाच्या विचारात असावी. खेळाडू म्हणून रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लक्ष्यवेधीच आहे. मात्र, कर्णधार म्हणून आता भारतीय संघाचा विचार केला तर काही नावांचा विचार सुरू झाला आहे. आयपीएलमधून आजवर अनेक तारे भारताला मिळाले. यातूनच आता बीसीसीआय नवीन आणि सक्षम कर्णधाराच्या शोधात आहे. अशा स्थितीत फॉर्मात नसलेल्या विराटपेक्षा रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, के. एल. राहुल अशा काही चेहर्‍यांकडे बघितले जातेय. त्यांच्यातील क्षमता या झटपट क्रिकेट फॉरमॅटमध्ये सगळ्यांच्याच डोळ्यापुढे येताहेत. काहींच्या चांगल्या, तर काहींच्या चुकीच्या वर्तणुकीचाही अनुभव अनेकांनी घेतलाय. युवराज सिंगसह अनेकांनी ऋषभ पंतचा पर्यायच योग्य असल्याचा हट्ट धरला.

मात्र आयपीएलमधील काही सामन्यांत ऋषभची चुकीची वर्तणूक अनेकांना खटकली. यावरून त्याला अजून परिपक्व खेळाडू बनायचं आहे, असेही बोलले गेले. पंतने ज्या प्रकारे आपल्या दोन्ही फलंदाजांना खेळ सोडून मैदानाबाहेर येण्याचे संकेत दिले, त्यामुळे संपूर्ण जगासमोर भारतीय क्रिकेटची मान शरमेने खाली झाली. ‘आऊट द्या, नाही तर खेळणार नाही, नोबॉल दिला नाही तर आम्ही माघारी जाऊ’ अशी गल्ली क्रिकेटची धमकी देत ऋषभने आपला बालिशपणाच दाखवला. त्यावरून अनेक जाणकारांनी त्याच्या वर्तणुकीवर बोट ठेवत कर्णधारपदासाठी अद्याप तरी तो सक्षम नसल्याचे बोलून दाखवले. कर्णधार म्हणून खेळताना पंतने हंगामात खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये केवळ 33 च्या सरासरीने 234 धावा केल्या आहेत. परिणामी दिल्लीला फक्त चार सामने जिंकता आले आहेत. क्रिकेटप्रेमींची धडकन समजल्या जाणार्‍या दिल्लीवाल्यांना पंत आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संघाला प्लेऑफमध्ये नेईल अशी खात्री होती. आकर्षक आणि हटके परंतु लांबच लांब फटकेबाजी करणारा पंत अनेकांना आवडतोही. परंतु, या मोसमात तो फारसा यशस्वी ठरलेला नाही, हेच वास्तव आहे.

कर्णधार म्हणूनच खेळायची मनीषा बाळगणार्‍या श्रेयस अय्यरवर कोलकाताने मोठ्या अपेक्षेने बोली लावली. मुख्य म्हणजे त्याच्या मर्जीप्रमाणे कर्णधारपदही दिले. परंतु, संघाच्या कामगिरीसोबत श्रेयसची स्वत:ची कामगिरीही फारशी स्मरणीय राहिली नाही. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणार्‍या श्रेयसने यंदा मात्र 10 सामन्यांत 36 च्या सरासरीने केवळ 324 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही 133 आहे. 85 धावांची इनिंग खेळूनही तो सामना पूर्ण करू शकला नाही आणि संघाला पराभवाचा सामना करावा लागला, हा त्याच्या परिपक्वतेचा पुरावा ठरू शकतो. प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमसोबतचे त्याचे वाद अनेकांनी डोळ्यांनी पाहिले. भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील दुरीही हानीकारण ठरली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला श्रेयससारखा पर्याय कर्णधार म्हणून लाभला तर मॅक्युलमच्या बाबतीत जे घडतेय, त्याचीच पुनरावृत्ती भारतीय प्रशिक्षकासोबत होणार नाही ना, असा विचारही निवड समितीच्या मनात घोंगावला असावा. हीच भीती श्रेयसला भारताचा पुढचा कर्णधार होण्यास मारक ठरू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दुसरीकडे ज्या खेळाडूची क्रिकेट कारकीर्द संपण्याच्या गोष्टी ऐकिवात येऊ लागल्या होत्या, त्या हार्दिक पंड्याने आपल्या संघाला ८ पैकी ७ सामन्यांत विजय मिळवून देत आपल्या नेतृत्वकौशल्याची प्रचिती दिली. वरच्या फळीत फलंदाजी करण्याची, तसेच अगदी नवीन बॉलवर गोलंदाजी करण्यापर्यंत पंड्याने ‘करून दाखवले’! त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून गुजरातने पहिल्याच मोसमात अत्यंत दर्जेदार कामगिरी केली आहे. केवळ अ‍ॅग्रेसिव्ह नव्हे, तर प्रत्येक क्षणी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा पंड्या यशाचे श्रेय युवा खेळाडूंना देतो, हेही महत्त्वाचे आहे. कर्णधार म्हणून खेळताना त्याने 308 धावा केल्या आहेत. 4 बळीही टिपत त्याने गोलंदाजीत टिच्चून माराही केलाय. फक्त फिटनेसच्या बाबतीत हार्दिकला भविष्यात कर्णधार होण्यात अडचणी येऊ शकतात, हे विसरून चालणार नाही. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा तो मसाज घेताना दिसून आला. त्याला खेळताना जाणवणारी दुखापत त्याच्या फॅन्ससाठी आणि त्याच्या स्वत:साठीही भविष्यात चिंताजनक बाब आहे. याशिवाय मोहम्मद शमीसोबत केेलेल्या गैरवर्तनावरही अनेकांनी ताशेरे ओढले. त्यामुळे अद्याप हार्दिक पंड्यालाही खूप काही शिकावे लागणार हे मात्र नक्की.

यंदाच्या आयपीएलमध्ये धक्कादायक बाब ठरली, ती धोनीने सोडलेले कर्णधारपद. धोनीने भविष्याचा विचार करून रवींद्र जडेजाला कर्णधारपदाची जबाबदारी दिली. मात्र, आजवर टीम इंडियासाठी अनेकदा विजयी खेळी साकारणार्‍या सर जडेजाला आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळी करण्यात सपशेल अपयश आले. यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर बरीच टीका झाली. चेन्नईचे नेतृत्व करताना जडेजा कर्णधार असल्याचे अनेकदा लक्षात येत नव्हते, कारण उघडपणे कर्णधाराची धुरा सांभाळताना तो दिसलाच नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये धोनीनेच मैदानाच्या उभारणीपासून इतर सर्व गोष्टींमध्ये पुढाकार घेतला. मात्र, जडेजा आठ सामन्यांत केवळ दोनच सामन्यांत विजयापर्यंत नेऊ शकला. फलंदाजीत त्याने केवळ 113 धावा केल्या.

एकेकाळी चौकार, षटकारांची आतषबाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा जडेजा कर्णधारपदाच्या ओझ्याखाली पुरता दबलेला दिसला. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा विचार बीसीसीआय करेल, यात तथ्य वाटत नाही. याउलट के. एल. राहुलने दोन शतकांच्या जोरावर ५६ च्या सरासरीने 451 धावा करत संघाला उंचीवर नेऊन पोहचवले आहे. परिणामी, रोहित शर्मानंतर कर्णधाराचा शोध सुरू असताना त्याच्याकडे अनेकांच्या नजरा स्थिरावल्या आहेत. आयपीएलमध्ये गौतम गंभीरच्या तालमीत बनलेल्या के. एल. राहुलला आता टीम इंडियात कुलमॅन राहुल द्रविडसारख्या मेंटारसोबत कर्णधार म्हणून नवीन इंनिंग खेळायला मिळते का, हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे. कारण आत्ताच्या घडीला त्याच्या इतका सक्षम आणि इन फॉर्म खेळाडू भारतीय संघात दिसत नाही, हे आकडेवारी बोलते. त्यामुळे निवड समितीलाही त्याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरेल, यात शंका नाही.