वन ‘डे’ रिटर्न…!

कुसुमाग्रजांनी त्यांच्या ‘अखेर कमाई’ या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे महापुरुषांच्या पुतळ्यांना जातींमध्ये अडकवून ठेवणारे आपण, गांधींच्या फोटोंना फक्त भिंतींवर अडकवणारे आपण आणि देशात ‘साजर्‍या’ होणार्‍या दिवसांमध्ये आपापल्या फेसबुक वॉला भरून टाकणारे आपण हे सगळे एकाच माळेतले मणी आहोत. विचारांशी तुटलेला संपर्क आणि सतत वाढत चाललेला जनसंपर्क यासाठी त्या दिवशीची आपली प्रतिमा सुधारणं आणि चकचकीत ठेवणं आपल्या सर्वांनाच गरजेचं वाटू लागलं आहे. आणि म्हणूनच उथळपणे हे सारे दिवस साजरे करण्याची वृत्ती जन्माला आली, वाढली आणि आता हळूहळू फोफावू लागली आहे.

१५ ऑगस्ट आला तसा गेला…भरपूर ठिकाणी झेंडावंदन झालं…कुठे सोसायट्यांमध्ये, कुठे मोठ्या चौकांमध्ये, कुठे सरकारी कार्यालयात आणि काही ठिकाणी तर खासगी कंपन्यांमध्ये देखील! त्यातही आपल्या एक दिवसाच्या सुट्टीवर पाणी सोडून झेंडावंदनासाठी वेळ खर्ची घालणार्‍यांचं प्रमाण देखील लक्षात येण्याजोगंच असावं! सोशल मीडियावर तर देशभक्तीचा कोण महापूर! फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा अगदी अलिकडेच फुफाटा उडवलेलं हॅलो आणि टिकटॉक..सगळीकडेच देशभक्तीचा नुसता ज्वर चढलेला दिसत होता. यातल्या अनेकांमध्ये आपण किती मोठे देशभक्त आहोत हेच जणू दाखवण्याची अहमहमिका लागली होती. कुणी लंबेचौडे टेक्स्ट मेसेज टाकत होते, तर कुणी दुसर्‍याच कुणाचेतरी ढापलेले व्हिडिओ टाकत होतं. एखाद्या साठलेल्या लाव्हारसाचा विस्फोट व्हावा आणि हो भसाभस बाहेर यावा, तसे सकाळपासून अशा प्रकारचे मेसेज आणि व्हिडिओ पोस्ट आणि शेअर होत होते…आणि हे असं दरवर्षी होतं..न चुकता…फक्त त्या एकाच दिवसासाठी…एखादी वन डे रिटर्न ट्रीप असावी तसं!

हल्ली लोकांचा हा पॅटर्न अगदी सेट झालेला आहे. मग तो स्वातंत्र्यदिन असो, प्रजासत्ताक दिन असो, शिवजयंती असो, मातृदिन असो किंवा मग गेला बाजार महिला दिन असो! त्या दिवशी सकाळी त्या लाव्हारसाचा भसाभस विस्फोट होतो आणि जसजशी संध्याकाळ होत जाते, हा विस्फोट ओसरायला लागतो. मधल्या काळात सोशल मीडियापासून रील लाईफपर्यंत सगळीकडे हेच सगळं असतं. रील यासाठी कारण या दिवशी टीव्ही मालिकांमध्ये देखील मदर्स, फादर्स, फ्रेण्ड्स, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्य सेनानी-क्रांतीकारक ‘कॅमिओ’ रोलमध्ये झळकून जातात. सोशल मीडियावर अनेकांचे प्रोफाईल पिक्चर्स, फेसबुकच्या भिंती आणि व्हॉट्सअपचे स्टेट्स यानेच भरलेले असतात. ज्या-त्या डे नुसार त्यांच्या प्रोफाईल फोटोंची स्टाईल देखील बदलते. पण ती फक्त त्या एका दिवसापुरतीच!

मदर्स डे अर्थात मातृदिनी तर आपल्या आईविषयीच्या भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की हे सगळं जर त्या मातेला कळलं, तर तिला बिचारीला रडू आवरणारच नाही! पण हे सगळं सुरू असतं सोशल मीडियावर, सोशल लाईफमध्ये. पर्सनल लाईफमध्ये वर्षभर त्या मातेला कितीही बोललं, रागावलं, उडवून लावलं, खिजगणतीत देखील नाही धरलं तरी मातृदिनी एकदा का सोशल मीडियावर शुभेच्छा टाकल्या, एक-दोन चारोळ्या कॉपी-पेस्ट केल्या, दोन-चार इतरांच्या पोस्टी लाईक-शेअर केल्या की आपली वर्षभराची पापं धुतली जातात, असाच काहींचा गैरसमज असतो! आणि त्या दिवशी पापं धुतली, की पुढे वर्षाच्या उरलेल्या ३६४ दिवस आपण त्याच मातेला पुन्हा गृहीत धरायला मोकळे! स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उसळणारा देशभक्तीचा ‘जाज्वल्य’ का काय तो अभिमान जितक्या वेगाने त्या दिवशी उसळतो, तितक्याच वेगाने गडपही होऊन जातो. आणि त्या अभिमानाच्या आवेगामध्ये बिनबोभाट खरेदी केलेल्या झेंड्यांचं काय करायचं? असा प्रश्न दुसर्‍या दिवशी पडतो. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांना असे झेंडे सर्रासपणे रस्त्यावर, गटारात, साचलेल्या पाण्याच्या डबक्यात, झाडांच्या खाली, सोसायट्यांच्या कुंपणावर पडलेले आढळतात. वास्तविक ज्या देशाभिमानाने हे सगळं केलं जातं, त्या देशाभिमानाची जाण ठेऊन पुढे वर्षातले ३६४ दिवस फार काही करताना ही मंडळी दिसत नाहीत.

मुळात हे सगळंच फार उथळ पातळीवर उतरल्याचं अगदी सहज लक्षात येतं. अर्थात, या सगळ्याला काही अपवाद असतातच. गांभीर्याने, जबाबदारीने आणि पूर्ण जाणीव ठेऊन या व्यक्ती सोशल मीडियावर वा वास्तव जीवनात व्यक्त होत असतात. मात्र, त्यांचं प्रमाण फारच कमी दिसतं. बहुतांश ट्रेण्ड मात्र वरवरचाच! या सगळ्यामुळे एक प्रकारचा फुगा या दिवसांमध्ये फुगलेला दिसतो. या प्रकारामुळे या अशा दिवसांचा मूळ हेतूच साध्य होत नाही. आणि गंभीर बाब म्हणजे ही गोष्ट कुणाच्याही ध्यानात येत नाही. आणि याला कारण आहे त्या दिवशी निर्माण होत असलेलं ‘व्हर्च्युअल’ वातावरण. मदर्स डे असो, फादर्स डे असो किंवा मग आणखीन कुठला दिवस, त्या दिवसाचं महत्त्व आणि त्याच्या मागचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा आणि तो त्यांनी वर्षाचे उरलेले ३६४ दिवस अंमलात आणावा, हा त्यामागचा सर्वमान्य विचार. मात्र, त्या दिवशीच्या या व्हर्च्युअल वातावरणामुळे हेतू साध्य झाल्याचा आभास फक्त निर्माण होतो. तो दिवस संपतो आणि त्या अपेक्षित विचारापर्यंत देखील न पोहोचलेली मंडळी पुढचा दिवस पुन्हा त्याच पद्धतीने सुरू करतात. त्यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जर असंच होणार असेल आणि या दिवसांच्या असण्याचा परिणामच होणार नसेल, तर मग हे दिवस साजरे तरी का करायचे?

खरंतर हा प्रश्न विचारून त्याचं वास्तववादी उत्तर शोधण्याची गरज आज निर्माण झाली आहे. हे दिवस खरंच आपण का सेलिब्रेट करत आहोत? फक्त नव्या पिढीला त्या त्या व्यक्तीबद्दल माहिती व्हावी, त्या त्या घटनेबद्दल समजावं एवढाच जर या दिवसांचा हेतू असेल तर ती माहिती त्यांना सोशल मीडियावर, गुगलवर, पुस्तकांमध्ये किंवा अगदी अलिकडेच जन्माला आलेल्या आणि अजिबात विश्वासार्ह नसलेल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मिळतच असते. त्यासाठी अख्खा दिवस भरपूर पैसे आणि वेळ खर्ची घालून वेगवेगळे कार्यक्रम करून ‘साजरा’ का करायचा? त्या दिवसाची किंवा व्यक्तीची आठवण काढण्याचा जर आवच आणला जाणार असेल आणि उगीच घोषणा, सेंटी मेसेज किंवा गेला बाजार वाढीव सुट्टी इतकाच त्या दिवसांचा वास्तवित हेतू उरणार असेल, तर मग उगीच हा सगळा खटाटोप कशासाठी? शिवजयंतीच्या दिवशी ट्रेनमधून किंवा बाईक रॅल्यांमधून, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या फेसबुक वॉला किंवा व्हॉट्सअप स्टेट्स निळाईनं भरून टाकताना किंवा वर्षभर फक्त एकत्र राहतो म्हणून आठवण काढणार्‍या पण मदर्स डे च्या दिवशी श्रावण बाळाप्रमाणे पोस्टी करणार्‍या तरुणाईपर्यंत किंवा या दिवसाच्या ‘साजरेकर्‍यां’पर्यंत तो विचार कितपत पोहोचलाय? याचा काही ऊहापोह होणार आहे की नाही? की फक्त त्या दिवसाचे कार्यक्रम आणि मिळणारी हक्काची सुट्टी, इतकाच काय तो या दिवसांचा अर्थ आणि गरजही राहणार आहे?

मुळात या देशातल्या सर्वच प्रतिकांची मोठ्या प्रमाणावर उपेक्षाच सुरू असल्याचं चित्र हल्ली सगळीकडे दिसत आहे. मग ते विविध कारणांसाठी साजरे होणारे दिवस असोत किंवा मग देशाला घडवणार्‍या ऐतिहासिक महापुरुषांचे पुतळे असोत. कुसुमाग्रजांनी त्यांच्या ‘अखेर कमाई’ या कवितेमध्ये म्हटल्याप्रमाणे महापुरुषांच्या पुतळ्यांना जातींमध्ये अडकवून ठेवणारे आपण, गांधींच्या फोटोंना फक्त भिंतींवर अडकवणारे आपण आणि देशात ‘साजर्‍या’ होणार्‍या दिवसांमध्ये आपापल्या फेसबुक वॉला भरून टाकणारे आपण हे सगळे एकाच माळेतले मणी आहोत. विचारांशी तुटलेला संपर्क आणि सतत वाढत चाललेला जनसंपर्क यासाठी त्या दिवशीची आपली प्रतिमा सुधारणं आणि चकचकीत ठेवणं आपल्या सर्वांनाच गरजेचं वाटू लागलं आहे. आणि म्हणूनच उथळपणे हे सारे दिवस साजरे करण्याची वृत्ती जन्माला आली, वाढली आणि आता हळूहळू फोफावू लागली आहे.

देशाचं सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्व या प्रतिकांमधून तयार होत असतं. त्यांच्या जाणिवांमधून, जपणुकीतून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अवलंबातून समाज घडत असतो. अर्थात, या प्रतिकांचं महत्त्व कधीच नव्हतं असं नाही. किंवा आजही सगळेच उडत्या वारूवरून धावतायत असंही नाही. पण अशांचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. सोशल मीडिया आणि पराकोटीच्या स्वकेंद्रीपणा प्रोत्साहन देणार्‍या आजच्या काळात जर ही प्रतिकं फक्त नावापुरतीच उरली, तर येणार्‍या काळात त्यांचं नावदेखील उरणार नाही आणि तेव्हा नव्या प्रतिकांचा शोध घ्यावा लागेल. कारण ही प्रतिकं केव्हाच कालबाह्य झाली असतील. नव्हे, या ‘वन डे रिटर्न’ प्रवृत्तीने ती कालबाह्य केली असतील. आणि हे खूप वेगानं घडतंय. जागते रहो!