मराठीची सक्ती का गरजेची?

राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वादंग सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारचेे या मागणीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे मराठी सक्तीची गरज काय, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने शिक्षण कट्ट्यावर घेतलेला हा आढावा.राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वादंग सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारचेे या मागणीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे मराठी सक्तीची गरज काय, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने शिक्षण कट्ट्यावर घेतलेला हा आढावा.

सध्या सगळीकडेच इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी भाषेचा बोलबाला आहे. याबद्दल नक्कीच कोणाचंही दुमत नसेल. मराठी भाषा लोप पावत चालली आहे. याचा वापर जास्त होत नाही. महाराष्ट्राची ही भाषा असूनही महाराष्ट्रीयन अथवा मराठी भाषिकही आता याचा वापर जास्त करत नाहीत असा सूर नेहमीच ऐकायला येतो. बर्‍याचदा अमराठी लोक चांगलं मराठी बोलताना दिसून येतात तर मराठी मुलांना मात्र मराठी भाषेचा न्यूनगंड असल्याचे दिसून येते. पण, असे नक्की का होत आहे याचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मराठी, इंग्रजी आणि अन्य माध्यमांसह विविध बोर्डांचा अभ्यासक्रम शिकविणार्‍या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषेची सक्ती ही व्हायलाच हवी असा सूर आता प्रत्येक माध्यमातून विशेषतः अभ्यासक, साहित्यिकांमधून निघत आहे. दक्षिण भागात अर्थात केरळ, आंध्रप्रदेश यांसारख्या भागांमधून मातृभाषा शिकणे हे अत्यावश्यक आहे. मग मराठीच्या बाबतीत ही गोष्ट का घडू नये? मराठी भाषा बोलताना लाजण्यासारखे काय आहे? असे अनेक प्रश्न आता विचारण्यात येतात. पण, पालकच आपल्या पाल्याला मराठी बोलल्यावर इंग्रजीत बोल असे सांगत असतील तर मात्र असे होणे थोडेसे त्रासदायक ठरल्यासारखे वाटते. पण, अशक्य नक्कीच नाही. शाळांनीच अथवा सरकारनेच शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती केली तर प्रत्येकाला ही भाषा शिकणे अनिवार्य असेल.

मराठी भाषेची सक्ती का करावी हा सर्वात पहिला मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एकतर मराठी भाषेकडे आता दुर्लक्ष होत चालले आहे. महाराष्ट्राने त्रिभाषा सूत्र स्वीकारले आणि त्यामुळे हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषांपैकी दोन भाषांची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे पालक आणि पाल्य हे इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांचे गुण मिळविण्यासाठी निवड करतात. मराठी भाषेमध्ये गुण मिळणे अवघड असल्याचे वाटल्याने हा पर्याय निवडला जातो. विद्यार्थी इंग्रजी भाषेत शिकत असल्याने अशामध्ये मराठी भाषा घरातही कमी बोलली जाते. त्यामुळे मराठी भाषेची आवडही निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे जागतिक स्पर्धेमध्ये आपल्या पाल्याने टिकावे यासाठी इंग्रजीकडे कल वाढतच चालला आहे. म्हणूनच आता मराठीचा समावेश व्हावा आणि मराठी भाषा किमान महाराष्ट्रात तरी व्यवस्थित बोलली जावी यासाठी तरी आता द्विभाषा सूत्र स्वीकारण्याची गरज आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी ही मातृभाषा असल्याने सर्वात पहिल्यांदा विचार हा मराठी भाषेतून केला जातो. त्यानंतर इतर भाषा येतात. मग असे असताना केवळ जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपण इंग्रजीचा वापर जास्त प्रमाणात करतो. त्यामुळे मराठी भाषा मात्र लोप पावत चालली असल्याचे दिसून येत आहे. अनेक मराठी शिक्षणसंस्था या बंद पडत चालल्याचेही दिसून येत आहे. पण, यासाठी आपणच पावलं उचलून आपल्या पाल्यांना किमान आपल्या मातृभाषेची सक्ती करायलाच हवी. त्यासाठी शाळा आणि पालक या दोघांनीही समन्वयाने हा निर्णय घ्यायला हवा. किमान शालेय पातळीवर तरी मराठीला हिंदी, फ्रेंच असे पर्याय ठेवण्यात येऊ नयेत. त्यासाठी मराठीची सक्ती करणे आवश्यकच आहे. इतकंंच नाही तर मराठी न ठेवण्यासाठी ज्या शाळा पळवाटा शोधतात त्यांची मान्यताच काढून घ्यायला हवी. कारण इतर राज्य जर आपल्या मातृभाषा वाचवण्यासाठी आणि त्याचं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असतील तर मराठीसाठीसुद्धा असा प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो. आकलन चांगले झाले, तर त्याचे प्रकटन उत्तम प्रकारे होत असते. त्यामुळे शिक्षणाचा पाया असणारे शिक्षण हे मातृभाषा असणार्‍या मराठीतून देणेही योग्य ठरेल.

सीबीएसई अथवा आयसीएसई अशा बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविण्यात येत नाही अशी बाब बर्‍याचदा समोर आली आहे. यासाठी खरं तर गेल्यावर्षी जूनमध्ये कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल, असा आदेश त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. यासाठी बरीच आंदोलनेही होत असतात. आताचे मुख्यमंत्री हे नेहमीच मराठी भाषेला प्राधान्य देणारे आहेत. मग किमान त्यांनी तरी ही सक्ती आता प्रत्येक शाळांमधून केली तर मराठी भाषेचा आणि शाळांचाही दर्जा सुधारेल. त्यासाठी मराठी भाषा भवन उभारणे, मराठीचा अधिकाधिक प्रसार करणे यांसारख्या गोष्टीही घडल्या पाहिजेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषिकांनी आपल्या मुलांना मराठी भाषेचा अभिमान असल्याचे स्वतः सांगितले तरच मुलांच्या मनावरही त्याचा परिणाम नक्कीच होईल. मराठी ही भाषा केवळ सक्तीने शिकून चालणार नाही तर त्यातील गोडवा आणि त्यातील मजा ही आपल्या मुलांना आपणच शिकवायला हवी हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मराठीची सक्ती करण्यात यावी की नाही यावर अनेक वाद आहेत. पण, सक्ती केल्यानंतर त्या भाषेचा गोडवा मुलांच्या मनात निर्माण करण्याचं काम शिक्षक आणि पालक या दोघांचेही असायला हवेत. केवळ भाषा आहे आणि सक्ती केली आहे म्हणून ती शिकण्यात काहीच अर्थ नाही. पण, मराठी ही आपली मायबोली, आपली मातृभाषा आहे हे लक्षात घेणे जास्त महत्त्वाचे आहे. इतर राज्यांप्रमाणे आपल्या भाषेची सक्ती करणे हे योग्य आहे. पण, त्याचा दुसर्‍या बाजूनेही तितकाच विचार व्हायला हवा. सक्तीपेक्षाही त्याचा गोडवा निर्माण करता येण्यासाठी नक्की काय पावले उचलायला हवीत याचाही नीट विचार व्हायला हवा.

मराठी भाषेचा सद्यस्थितीचा विचार करता सर्व शाळांमध्ये भाषेची सक्ती होणे अत्यंत गरजेचे वाटत आहे. कारण मराठी भाषिक मुलांनाच धड मराठीत बोलता येत नाही. त्याला सर्वस्वी जबाबदार हे पालक आहेत. धड मराठी नाही आणि धड इंग्रजी नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. सध्या जिथे ऐकावे तिथे इंग्रजी अथवा हिंदी या दोनच भाषा ऐकू येतात. मराठी भाषा मला बोलता येत नाही अथवा मला जमत नाही असे म्हणणारे अनेक मराठी भाषिक लोकंच आहेत. याचं कारण जाणून घेतलं तर घरामध्ये मराठी जास्त बोललं जात नाही त्यामुळे मराठी भाषेचा न्यूनगंड निर्माण होणारी मुलंच आपल्याला अवतीभोवती जास्त दिसतील. त्यामुळे मुळात मराठी भाषिक लोकांनी घरात मराठी बोलायला हवे आणि शाळेमध्येही मराठी भाषा शिकवावी यासाठी आग्रही राहायला हवे. आपणच सक्ती केली तर आपल्या मुलांना व्यवस्थित मराठी भाषा किमान बोलता तरी येईल.

शाळेमध्ये मराठी भाषेची सक्ती कधीपासून होईल ते नक्कीच माहीत नाही. ती व्हायला हवी हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. पण, त्याआधी किमान आपल्या मुलांना अथवा आजुबाजूला ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याबरोबर सक्तीने आपण मराठी बोलायला हवे हे मात्र नक्की. मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनीच हा ‘सक्तीचा प्रयोग’ नक्कीच करून पहायला हवा.