घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअनाकलनीय चाणक्य...!

अनाकलनीय चाणक्य…!

Subscribe

विशेष प्रतिनिधी – साधारण २३ वर्षांपूर्वी माजी खासदार संजय निरुपम यांनी माझी मिलींद नार्वेकरशी ओळख करून दिली. अंधेरीच्या बिसलेरी कंपनीसमोरील हायवेवर सिग्नलला रात्री मिलींद त्याची मोरपंखी रंगाची झेन कार घेऊन वाट पाहात होता. थोड्याच वेळात संजयजी आणि मी तिथे पोहोचलो. तेव्हा ते गोरेगाव पूर्वेला रहायचे आणि मिलींद मालाडला. मग आम्ही निरुपम यांच्या घरी गेलो. थोडा वेळ गप्पा झाल्यावर ते उशिरापर्यंत थांबणार हे माझ्या लक्षात आलं होतं. मग मी निघालो. मिलींदच्या या पहिल्या भेटीत थोड्या वेळातच माझ्या लक्षात आलं होतं, बॉस ये भिडू अलग है… ये लंबी रेस का घोडा है… माझा तेव्हाचा अंदाज तंतोतंत खरा ठरलाय.

आज तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खासगी सचिव आहे. काहींच म्हणणं आहे तो मुख्यमंत्र्यांचा नाही तर उद्धव ठाकरेंचा खासगी सचिव आहे. कुणाला काही म्हणू द्या. पण मला इतक्या वर्षांत एकच गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे मिलिंद नार्वेकर हे एक गूढ व्यक्तीमत्व आहे. तो उठतो कधी, वाचतो कधी, जेवतो कधी, झोपतो कधी, माणसांना भेटतो कधी आणि मित्रांना कुटुंबीयांना वेळ देतो कधी? त्या कुठल्याही वेळेबद्दल तुम्ही एक ठोस असं वेळापत्रक देऊ शकत नाही. माझं असं मत आहे की तो झोपेतही जागा असतो आणि ऑक्सिजन ऐवजी ‘पॉलिटिक्स’ वरच त्याचं ‘ब्रीदिंग’ सुरु असतं. अर्थात हे राजकारण खूपच वरच्या आणि वेगळ्या स्वरुपाचं असतं. तो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वर्तुळात आहे. म्हणून क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर टेस्ट क्रिकेट खेळायला तुम्हाला ४० टक्के प्रत्यक्ष खेळ आणि ६० टक्के मानसिक खंबीरता लागते. अगदी तस्संच मिलींदच्या कार्यशैलीचं आहे. त्याच्याकडे जी खंबीरता आहे, त्यावरच त्याचा गेम अवलंबून आहे. नाहीतर मला सांगा जगातील जमदग्नी नेत्यांमध्ये ज्यांचा समावेश व्हायचा त्या बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेविरुद्ध कोण इतकी वर्ष त्यांच्या सर्वात आज्ञाधारक मुलासाठी सेवा देऊ शकतो? आणि तेही त्यांच्याच मालकीच्या घरात राहून..?

- Advertisement -

कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की मिलींद शिवसेना भवनात शाखाप्रमुख बनायला गेला होता. त्याला मालाडमध्ये शिवसेना शाखाप्रमुख बनायचं होतं… आज तो काय झालाय आपण बघतोय. ही करामत करणाऱ्या मिलींदचा १८ मे हा वाढदिवस. त्याचं पक्षातील प्रस्थ वाढत गेलं तशी या वाढदिवसाला नेते आणि इच्छुकांची गर्दी वाढत गेलीय. अर्थात स्वत:भोवती आणि आपल्या ‘साहेबां’ भोवतीची गर्दी वाढवताना त्यानं कोणत्याही दुसऱ्या नेत्यापेक्षा अक्षरश: स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केलंय. विशेषतः नारायण राणे यांना उद्धव ठाकरेंचा स्पर्धक वाटू लागले तो काळ म्हणजे २००५ चा काळ. त्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले. आणि उद्धव ठाकरेंची पक्षावर एकहाती पकड आली. त्या काळातला सगळ्यात मोठा व्हिलन होता मिलींद नार्वेकरच. शिवसेना फुटण्यास तोच कारणीभूत होता असाच सगळ्यांचा समज होता. पण घडलेल्या आणि आज घडणाऱ्या गोष्टींपैकी ९५ टक्के गोष्टी या उद्धवजींच्या आदेशाने घडलेल्या असतात. उर्वरित विषयात तो स्वत:चा स्कोअर करत असतो. उद्धवजी आणि मिलींद यांना सर्वाधिक निशाणा करणाऱ्या राणेंना पुन्हा सेनेत येऊ देण्याच्या हालचाली सुरु झाल्या तेव्हा यानेच राणेंना आणण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वात जास्त प्रयत्न केले. अशी जाहीर कबुली खासगी वाहिनीच्या माध्यमातून आमदार नितेश राणेंनीच दिलीय. तेव्हा अनेकांच्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या.

Photo: मातोश्रीच्या चाणक्याचा आज वाढदिवस

- Advertisement -

संपूर्ण कुटुंबाला घेऊन वेगवेगळ्या मंदिराच्या वाऱ्या करणाऱ्या मिलींदचा देवावर गाढा विश्वास आहे. पण म्हणून तो सगळं देवावरच सोडत नाही. त्यासाठीच तर तो खूप माणसं जमवतो. तो कुठल्याही गोष्टीला तुमच्यावरच विसंबून रहात नाही. तुम्हीही सगळं त्याच्यावर सोडलत की फसलात म्हणून समजा. कारण तो चेहऱ्यावर जे गूढ भाव घेऊन जगतो तिथेच कुणाचीही गल्लत होऊ शकते. तरीही तगडा जनसंपर्क हा त्याच्या यशाचा आत्मा आहे.

मिलिंदचा दिवस पहाटेच झुंजूमुंजू होतानाच सुरु होतो. रोज घरा खालच्या जिममध्ये व्यायाम, त्यानंतर सगळी महत्वाची वर्तमानपत्रं चाळणं, कामाचं वाचणं, त्यानंतर संबंधितांशी थेट बोलून घेऊन आवश्यक ती माहिती जमवणं आणि साहेबाला अपडेट करण्यासाठी डाटा जमवून ठेवणं. पक्षातले पदाधिकारी, संघटनेतले वाद, मित्र पक्षातलं तापमान, पालिकेतला स्टॅंडिंग- अंडरस्टॅंडिंगचा खेळ हे सगळं त्याच्याकडे सकाळी १० च्या आधी जमा झालेलं असतं. त्याला रुचणाऱ्या काहींना सकाळीच घरी बोलावून तो काही गोष्टी नाष्टा करतानाच समजूनही घेतो आणि समजावतोही… पण हे सगळं करताना तो मैफल रंगवतोय, भसाभसा फोनवर बोलतोय, इकडचं तिकडचं चाललंय असं खूपच कमी वेळा घडतं. किंबहुना घडतच नाही. त्यामुळेच समोरच्याला त्याचा कच्चादुवा पकडायला खूपच कमी संधी मिळते. त्याची इतर पक्षांतील नेत्यांशी, बिल्डर, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, सनदी अधिकारी यांच्या बरोबरची मैत्री हा अचंबित करणारा विषय आहे. मैत्री खुलण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. हा वेळ तो कसा आणि कधी देतो हा अनेकांना प्रश्न आहे. पण मला वाटतं तो जेव्हा कुणाला वेळ देतो तेव्हा बहुधा मनापासूनच देत असावा. त्याशिवाय का मुकेश अंबानी आपल्या वानखेडेतल्या कॉर्पोरेट बॉक्सचे सगळे पासेस मॅचच्या वेळी त्याच्या हवाली करतात. या मॅचची एका पासची अधिकृत किंमत ४० ते ५० हजार रुपये आहे. संघात खेळणाऱ्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्यांचे पासेस लाख-लाख रुपयांना विकताना मी पाहिलंय. पण हे करताना मिलींद किंवा त्याचा कुणी माणूस मी तरी पाहिलेला नाही. तो चिरकूट गोष्टी करण्याच्या फंदात पडत नाही.

पण म्हणून तो कुणालाही उठून खिरापत वाटेल असं समजण्याचं काहीच कारण नाही. मात्र संघटनेत काम करताना खर्च कसा, कुणावर, किती आणि केव्हा करायचा हे त्याला नीट कळलंय. तो जेव्हा मुकेशभाईंना आपला वाटतो तेव्हा तो अंडरवर्ल्ड मधल्या अनेक भाईंनाही विश्वासू वाटतो. त्याच दरम्यान तो मुंबई पोलीस कमिशनर संजय बर्वे यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मुलुंडच्या स्मशानभूमीत उपस्थित मोजक्या व्यक्तींमध्ये सहभागी असतो. कधी अलिबागला जयंत पाटलांच्या घरी भल्या पहाटेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजर असतो, तर कधी एकनाथ शिंदेंच्या घरी वाढदिवसाचा केक कापायला सपत्नीक बाराच्या ठोक्याला उपस्थित असतो. म्हणून म्हटलं ना उत्तम टाइम मॅनेजर आहे.

खरंतर मिलिंद अतिशय उत्तम मॅनेजर आहे. मग सेनानेत्यांसाठी आकाशात घिरट्या घालणारी खासगी विमानं असू द्या किंवा राजभवनासह दिल्ली दरबारातील बड्या नेत्यांच्या निवासस्थानातली सेटिंग्ज…‌ तो व्यवस्था चोख बजावतो. बहुतेक मिडिया हाऊस मालकांच्या तो थेट संपर्कात आहे. अनेक लहान मोठे पत्रकार त्याच्या वरचेवर संपर्कात असतात. तूच माझा खास असा फील तो त्यातल्या अनेकांना देतो. काही नवखे त्याने हुरळतातही… पण म्हणून तो तुम्हाला ‘हवी’ ती बातमी देईल आणि तुमचा टीआरपी वाढवेल असं समजण्याचं कारण नाही. तो तेच पेरतो ज्यावर त्याला हव्या त्या पिकाची कापणी करायची असते.

खरं तर माध्यमं उद्धव ठाकरेंना आवडतच नाहीत. विशेषतः त्यांच्याबद्दल जड-हळू लिहिणारी तर मुळीच नाही. त्यामुळे त्यातल्या मंडळींना इच्छित स्थळी नोकऱ्या देणं, नेमणूका करणं असे भाजपाई उद्योग ते करत बसत नाहीत. मिलींदही त्यांचा कित्ता नीट गिरवतोय. पण म्हणून तो अडचणीत आलाय, चुकलाय आता त्याला हवा तसा ठोका असं काही मिलींदच्या बाबतीत पत्रकारांनी घडवल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. उलट प्रेस क्लबमध्ये बसून त्याला शिव्या घालणारेच त्याला जास्त ‘कॉलमस्पेस’ देत असतात. इतकंच काय पण त्याच्या आणि फडणवीसांच्या मैत्रीनं भेटी-गाठींनी सगळ्यांना हा घरचा भेदी तर नाही ना असं वाटण्याइतपत मजल गेली. त्यामुळेच काही बैठकांपासून त्याला दूर ठेवण्यात आलं होतं. पण त्याही बैठकांचे डिटेल्स त्याच्याकडे जेम्स बॉण्ड सारखे असायचे.

त्याला एक्सपोज करताना निवडून न येणाऱ्या नेत्यांकडून कधी त्याची देवेंद्र मैत्री अधोरेखित केली जाते तर कधी त्याचे पवारांना वरचेवर जाणारे मेसेजेस उद्धवजींच्या समोर मांडले जातात. तरीही या सगळ्यात त्याने इतरांना नकोशा वाटणाऱ्या अनेकांना मोठ्या खुबीनं आपलंस केलंय. त्यात कधी जितेंद्र आव्हाड आहेत तर कधी बिल्डर खासदार संजय काकडे, तर कधी सनदी अधिकारी अजोय मेहता आणि प्रवीण परदेशी. आदेश बांदेकर आणि जितेंद्र आव्हाड तर आपण मरणाच्या दाढेतून सुखरूप परत आल्याचं सर्वात मोठं श्रेय मिलींद नार्वेकरला देतात. पण म्हणूनच तो त्याच्या विरोधकांना डोकेदुखी वाटतो. त्यातूनच त्याला थोपविण्यासाठी हरसंभव ते प्रयत्न करतात. त्याच्या कार्यशैली आणि अती संपर्कामुळे त्याला अंतरावर ठेवा, असा सल्ला काही सेना नेत्यांनी आणि जवळच्यांनीही उद्धवजींना दिला. काहींनी तर आता ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्याची गरज संपली असल्याचा शोध लावलाय. म्हणून आपण त्याबाबतची माहिती जमवून पक्षातील नेत्यांकडून मिळायला कठीण असलेला ‘कोट’ जमवेपर्यंत याने ‘स्टोरी’च बदलून टाकलेली असते.

सेनेच्या नव्या नेतृत्वाला तो तितकासा ‘आपला’ वाटत नाही. त्यामुळे टीम आदित्य पूर्णपणे वेगळी आहे. बाळासाहेबांना मिलिंद फारसा आवडला नाही. म्हणजे भूत आणि भविष्यकाळात त्याला फारसं वजन नव्हतं अथवा असणार नाही, असं त्याचे टिकाकार म्हणतात. पण उद्धव यांची पत्नी रश्मी यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संदर्भातील अनेक गोष्टी मिलिंदच्या पोटात दडल्यात. त्या कुठल्याच पुस्तकात कधीच येणार नाहीत. कारण असे अनेक तपशील मिलींद नार्वेकर नावाच्या रहस्यमय व्यक्तीच्या पोटात दडल्यात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मैत्री आणि मैत्रीला जागणारा मिलींद हाच गेल्या ३ दशकांत सगळ्याच राजकीय पक्षांमधला एकच समान धागा आहे. तरीही तो ज्यांना माहित आहे ते सगळे एकच गाणं गुणगुणत असतील, प्रिय हा मिलिंद…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -