घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमहिला दिन फक्त औपचारिकता नको!

महिला दिन फक्त औपचारिकता नको!

Subscribe

जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा झाला. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याबरोबरच महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेचे स्मरण करून देण्यासाठीच 1911 पासून महिला दिन साजरा केला जात आहे. पण आश्चर्य म्हणजे आजही आपण त्याच कारणांसाठी महिला दिन साजरा करत आहोत. आंदोलन करत आहोत. लढत आहोत. म्हणजेच अस्तित्वासाठी एकेकाळी महिलांनी सुरू केलेला तो लढा अद्यापही सुरूच आहे. कारण परिस्थिती अगदीच जैसे थे वैसे नसली तरी फार सुधारलीही नाही. आजही समाजात महिलांचं आर्थिक शोषण, लैंगिक शोषण, हुंडाबळी, हत्या हे प्रकार सुरूच आहेत. ते केव्हा थांबणार याची उत्तरे अनुत्तरित आहेत. पण त्यासाठी आधी या जागतिक महिला दिनाच्या इतिहासाचा धांडोळा घ्यायला हवा.

जगात सर्वात पहिला महिला दिन हा 1911 साली साजरा करण्यात आला. पण खर्‍या अर्थाने त्याची बिजं रोवली गेली ती 1908 साली. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात 15,000 नोकरदार महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. कामाच्या वेळा कमी करण्याबरोबरच कष्टाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी हा लढा होता. पण अमेरिकेत सुरू झालेला हा महिलांचा लढा जागतिक लढा होईल हे ‘क्लेरा झेटकीन’ या सामाजिक कार्यकर्तीने अचूक ओळखले. 1910 साली कोपनहेगनमध्ये नोकरदार महिलांच्या प्रश्नावर आधारित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लेराने हा मुद्दा मांडला आणि तिथे उपस्थित असलेल्या 17 देशातील 100 महिलांनी त्याला एकसुरात होकार दिला. कारण या सगळ्या महिलांचे प्रश्न सारखेच होते. त्यानंतर टप्याटप्याने अनेक देशात 8 मार्च हा सरसकट जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. कारण जगभरात महिलांना सारख्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. यामुळे 8 मार्चला अन्यनसाधारण महत्व प्राप्त झालं.

पण असं असलं तरी त्यातून एकच साध्य झालं की महिला संघटित होऊ शकतात. अन्यायाविरोधात आवाज चढवू शकतात, हक्कांसाठी लढू शकतात हे जगाला कळालं. त्यानंतर काही प्रमाणात का असेना पण पुरुषसत्ताक देशांमध्ये महिलांच वेगळं स्थान निर्माण झालं. पण भारतात मात्र चार महिला एकत्र आल्या की त्या किटी पार्टी, हळदीकुंकू आणि सासरच्या कुचाळक्या करण्यापलिकडे जात नाहीत असाच समज होता आणि अजूनही आहे. यामुळे महिलांच्या अस्तित्वाच्या या लढ्याबद्दल भारतात सुशिक्षितांव्यतिरिक्त फार कोणाला माहीत नाही. किंबहुना महिलाच त्यात रस घेताना दिसत नाहीत. यामुळे जागतिक महिला दिन हा काही ठराविक वर्गापुरताच मर्यादित राहीला आहे. तो फक्त कॉर्पोरेट क्षेत्रात ठळकपणे दिसतो. फार तर मध्यमवर्गीय महिलांच्या ग्रुपमध्ये. पण त्यापलिकडे तो जात नाही. पण परदेशात प्रामुख्याने युरोपिय देशांमध्ये अनेक कंपन्या या दिवशी महिला कर्मचार्‍यांना सुट्टी जाहीर करतात.

- Advertisement -

जेणे करून महिलांना एक दिवस मनासारखा घालवता यावा. त्या दिवशी पुरुष सहकारी त्यांच काम करतात. ऐकायला आणि वाचायला हे सगळं मस्त वाटतं. पण आपल्याकडे असं होत नाही. कारण महिलांशी संबंधित विषय हे आमच्यासाठी टाईमपासचा भाग असतो. तिच्यावरील जोक्स हे आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधला विरंगुळा असतो. यामुळे महिलांना आपल्याकडे फार कोणी सिरियसली घेताना दिसत नाही. त्यामुळे या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. महिला दिन हा केवळ एक दिवशाची औपचारिकता होऊन बसता कामा नये. महिलांविषयीचा आदर आणि त्यांना आपल्यासोबत बरोबरीने सामावून घेण्याची तयारी पुरुषांनी दाखवायला हवी. शिक्षणाच्या बाबतीत आपण विचार केला तर दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये मुलीच बाजी मारताना दिसतात. त्यामुळे एकेकाळी ज्यांना शिक्षणाचा हक्कच नव्हता, त्या महिला आता पुरुषांवर बाजी मारत आहेत. पण महिला हुशार असल्या तरी पुरुषांची त्यांच्याकडे पाहण्याची मानसिकता अजून हवी तशी बदललेली नाही. त्यात बदल होण्याची गरज आहे.

याउलट परदेशात महिलांना पुरुषांबरोबरीने सन्मान दिला जातो. तिच्या कार्यक्षमतेवर विश्वास दर्शवला जातो. यामुळेच आज अमेरिकाच नाही तर अनेक देशांमध्ये राष्ट्राची धुरा सांभाळताना महिला दिसतात. याच ताज उदाहरण म्हणजे कोरोना काळात ज्या देशात सर्वप्रथम कोरोना नियंत्रणात आला त्या देशाच्या पंतप्रधानपदी आणि राष्ट्राध्यक्षपदावर महिला होत्या. ज्यांनी अख्ख्या राष्ट्राला कोरोनाच्या उद्रेकापासून कुटुंबासारखं सांभाळलं. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. पण आज त्यामुळे त्यांचा देश कोरोनामुक्तीकडे वाटचाल करतोय. जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आपल्याला हे शक्य झाल्याचं या महिला नेत्यांनी प्राजंळपणे कबुलही केलं आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांना कधीही स्त्री म्हणून त्रासाला सामोरे जावे लागले नाही. तर यातील प्रत्येक स्त्री ही स्वयंसिद्धा आहे. जिद्दीने पेटून उठलेली आहे. यामुळे अनेक विरोधांच्या झळातून ती तावून आणि सुलाखून निघालेली आहे. पण तिच्यामागे उभे असलेल्या पुरुष सहकार्‍यांनींच तिला पुढे येण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांना स्त्रीचं महत्व कळालं आहे. आपल्याला केव्हा कळणार हा प्रश्न आहे.

- Advertisement -

पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्याकडे सगळ्याच महिलांवर अत्याचार होतात आणि तिला पुढे जाऊ दिले जात नाही. पण एकंदर पाहता स्त्रीला उपभोगाची वस्तू समजण्याकडे आशियाई लोकांचा अधिक कल आहे. यामुळे स्त्रीच स्वांतत्र्य आपल्या समाजाला रुचत नाही आणि पचतही नाही. यामुळे चूल आणि मुलाच्या संकल्पने पलिकडे गेलेल्या, स्वत:ची मतं मांडणार्‍या महिलांचं अस्तित्व स्वीकारणं आपल्या समाजाला जड जात आहे. त्यातूनच तिच्या स्त्रित्वावर घाला घालण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. कधी तिने एकतर्फी प्रेमास नकार दिला म्हणून तर कधी शरीरसुख देण्यास विरोध केला म्हणून तिच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड ओतून तिला विद्रुप होण्याची शिक्षा दिली जाते. तर कधी तिला भररस्त्यात रॉकेल टाकून जाळंल जात. चाकूने भोसकलं जातं.

तर कधी ऑनर किलिंगच्या नावाने जन्मदात्यांकडून मारून कुठल्यातरी खड्यात पुरलं जात.तिचा दोष काय तर तिने समाजाने आखून दिलेली मर्यादा ओलांडली. पुरुषाच्या हो ला हो न करता नाही म्हणाली….बस्स ..एवढाच काय तो तिचा दोष….आजही ती पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात उभी आहे. पण तरीही स्त्री म्हणून तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आज तीही पुरुषांप्रमाणेच आठ तास काम करते तरी त्याबदल्यात तिला मिळणारा मोबदला पुरुषापेक्षा कमी असतो. आज तीही कठीणातील कठीण निर्णय घेऊन कंपनी चालवू शकते तरीही तिच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तिचा 1911 साली सुरू झालेला लढा आजतागायत कायम आहे. वर्षामागून वर्ष सरत आहेत. केव्हा सगळं बदलणार माहीत नाही. पण यासाठी नुसता लढा, मोर्चे, जागतिक महिला दिन साजरा करून होणार नाही. तर त्यासाठी महिलांनीच महिलांसाठी वाटा मोकळ्या केल्या पाहिजे.

तसंच घरातील पुरुषांनीही घरातील महिलांना सतत प्रोत्साहीत करणं महत्वाचं आहे. काळ बदलतोय. तसेच विचारही बदलायला हवेत. नाहीतर दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्ताने आपण महिलांना फक्त त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ. पण जेव्हा त्या खरंच त्या लढाई लढण्यासाठी पुढे येतील तेव्हा त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहायला हवं. तरच खर्‍या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा करण्याचे समाधान महिलांना मिळेल. आज जवळजवळ सगळ्याचं क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. पण तरीही जर महिलांना अनेक अग्निदिव्यातून जावे लागत असेल तर ही शरमेची बाब आहे. तर दुसरीकडे महिलांच्या बाबतीत जातीनिहाय अत्याचाराच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे जातीनिहाय, धर्मनिहाय त्यांच्यावर अत्याचार करायचे असे दुटप्पी धोरण समाजात वापरले जाते. पण त्यानंतर फक्त चर्चांशिवाय काही होताना दिसत नाही. एखादी दलित लेक मात्र यात जीवानिशी जाते. हा खेळ थांबवायचा असेल तर महिला सक्षमीकरण हे फक्त भाषणापुरते न राहता ते प्रत्यक्षात कसे राबवले जाईल याकडे महिलांनीच लक्ष ठेवायला हवे. त्यासाठी सामाजिक बदल करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच महिलांनी राजकारणात येऊन हे बदल करायला हवे. त्यासाठी नवीन नेतृत्वानेही महिलांना प्रोत्साहन द्यायला हवे. तरच खर्‍या अर्थाने महिलांची प्रगती होईल. महिलांची प्रगती म्हणजेच समाजाची प्रगती हे दाखवून द्यायची हीच वेळ आली आहे. ती वाया जाता कामा नये.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -