Women’s Day : नारी… कालची अन् आजची

संग्रहित

नीता कनयाळकर

“अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर” ही बहिणाबाईंची अजरामर कविता, प्रत्येकाच्या मनात ठसा उमटवून गेलेली. कदाचित कवियत्री बहिणाबाईंनी ११/८/१८८० ते ३/१२/१९५१ या त्यांच्या आधुनिक जीवनशैलीच्या स्वानुभवावरून लिहिली असावी.

खरं तर आपल्या पणजी-आजी यांचं जीवन किती खडतर होतं. त्यांना चूल‌ व मूल यापलीकडे आयुष्यच नव्हतं. ना शिक्षण, ना व्यवहारीक ज्ञान, ना स्वातंत्र्य, ना मान सन्मान. प्रचंड दडपणाखाली संसार करावा लागायचा. तरी सुद्धा त्याबाबत त्यांची कधी तक्रार नसायची. कारण आपली माणसं, आपला संसार हेच त्यांच विश्व असायच. पूर्वी तर मुला-मुलीची लग्न पाळण्यातच लावली जायची. शिक्षण नसल्याने व शारीरिक क्षमता नसतानाही वयात येताच आई-वडील लग्न लावून जबाबदारीतून मुक्त व्हायचे. पण त्या कोवळ्या जीवाच्या मनाचा कधी विचार केला का? जे वय भातुकली-भातुकली खेळायच होतं, तेच वय चूल फुंकण्यात-फुंकण्यात जायचं. घरच्या भावांच्या पलीकडे त्यांचा इतर मित्रांशी कधी सबंधच येतच नव्हता; यायचा तो एकदम बोहल्यावर चढल्यावरच.

बोहल्यावर चढताना तरी कधी कुठं कोणाच्या समंतीचा विचार केला जायच? जे स्थळ समोर असायचं, ते पत्करणं भाग होतं. मग तो कोवळा पोरगा असो, वयात आलेला पुरुष असो, एखादा विधूर असो वा वयाने आजोबा शोभेल असा असो. त्या पोरींना आवडी-निवडीचा विचार करण्याचा पण अधिकार नव्हता. कधी-कधी सवत म्हणून सुद्धा सामोरं जावं लागायचं. तर, कधी-कधी विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करणं, हे पाप असल्यासारखं त्यांचे केस वगैरे कापून तुरूंगवासासारखं बंद खोलीत कोंडून अख्खं आयुष्य घालवावं लागायचं. तर, कधी पतीचा मृत्यू झाला तर सरणावर जिवंत स्त्रीला, तिची काहीही चूक नसताना व तिची जगण्याची इच्छा असून सुद्धा, सती जाणं भाग पाडायचे. एकंदरीत स्त्रीला स्वतंत्रपणे व सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकारच नव्हता. प्रत्येक स्त्री आपआपलं नशीब घेऊन यायची; कोणाचं उत्तम, कोणाचं साधारण तर कोणाचं बेकार… परंतु त्या चौकटीतून बाहेर पडायच धाडस नसायचं, ते त्या परिस्थितीमुळे! ज्यांना समोर आशेच्या किरणाचा झरोका पण दिसणंही अवघड होतं.

परंतु हीच परिस्थिती सावित्री बाईंनी, महिलांच्या प्रगतीसाठी चिकाटीने घेतलेल्या पुढाकारामुळे हळूहळू सुधारत गेली. ज्या प्रमाणे चूल – स्टोव्ह – गॅस शेगडी – इलेक्ट्रिक शेगडी अशा दैनंदिन गरजांमध्ये प्रगती होत गेली, अगदीं तसाच प्रगतीचा चढता आलेख स्त्रीच्या जीवनात होत गेला… १९५३ ते १९७० ही सोनेरी पिढी म्हणायला हरकत नाही; ज्यांनी आयुष्याच्या प्रगतीचा खूप मोठा बदल बघितला, अनुभवला व‌ आत्मसातही केला.

नऊवार लुगडं, डोक्यावरील पदराची जागा हळूहळू सहावार साडी, खांद्यावरील पदराने घेतली. एवढंच नाही तर, खांद्यावरच्या पदराचं तर सलवार कुर्तीत रुपांतर होऊन हळूहळू पाश्चात्य पद्धतीत समाविष्ट झालं. कपाळावर ठसठशीत कुंकू हे खरं म्हणजे सौभाग्याचे प्रतिक. परंतु तेच कुंकू हळूहळू टिकलीमध्ये रुपांतरित होऊन आता तर ते पण संपुष्टात येत चाललं आहे.

गळ्यात भरभक्कम काळ्या मण्यांची पोत हे सुद्धा सौभाग्याचे प्रतिक. परंतु त्याच काळ्या मण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे व आताच्या मुलींना त्याची पण अडचण वाटायला लागली. पूर्वी मध्यमवर्गीय घराण्यातील मुलींचं पाचवीपर्यंत शिक्षण म्हणजे खूप वाटायचं.. क्वचितच शिक्षित घराण्यातील मुलींचं दहावीपर्यंत शिक्षण व्हायचे. मग वासरात लंगडी गाय शहाणी असाच भास व्हायचा.

मध्यंतरीच्या काळात तर फक्त शहरात मोजक्याच शिक्षणाची सोय उपलब्ध असायची. कित्येक मैल चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागायचं. ना वाहनांची सुविधा, ना सर्व पुस्तके उपलब्ध, ना शिकवणी, ना परीक्षेसाठी सराव, फी सुद्धा माफक. परंतु आता शिक्षणाचा केवढा विस्तार वाढलाय. दुचाकी किंवा चार चाकी वाहनाशिवाय मुलं घराच्या बाहेर पडणं मुश्किल, पुस्तके तर online उपलब्ध, शिक्षणाची स्पर्धा वाढल्याने गल्लोगल्ली परीक्षांचे सराव वर्ग व त्याच पटीने शिक्षणाची व सराव परीक्षेची फी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरी सुद्धा मुलींचेच वर्चस्व शिक्षणात जाणवायला लागलंय व प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा त्यांचाच उच्चांक वाढत चालला आहे, ही खरोखर कौतुकाची बाब आहे.

पूर्वी ज्या मुली गावची वेस ओलांडायला घाबरत असत, त्या आता स्वकर्तृत्वाने परदेशात जाऊन स्वतःच अस्तित्व बनवायला लागल्या. मुलींनी नक्कीच स्वावलंबी असावं; परंतु त्या शिक्षणाचा व स्वातंत्र्याचा आई-वडिलांना पश्चाताप होत नाही ना, या मर्यादेच भान जरूर ठेवावं. कारण महिलांनी शिक्षणाच्या अनेक पातळ्यांवर पुरुषांनाही मागे टाकलं आहे. शैक्षणिक पातळीत प्रगती झाल्याने त्यांना नोकरी, पैसा, मानरातब सगळं काही सहजपणे मिळत जातं. त्याचबरोबर संसारापेक्षा स्वतःच्या करियरकडे प्राधान्य देण्यात येतं, ज्यामुळे लग्नाचं वय निघून जातं व शेवटी अविवाहित रहाणं भाग पडत. ज्यांना लग्न करायचं असतं, त्या मुली तर स्वतःपेक्षा जोडीदार उच्चशिक्षित व चांगली नोकरी असलेला हवा, या अट्टाहासपोटी उतारवयात लग्न करतात व त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

एकमेकांशी पटलं नाही तर घटस्फोट घेणे, ही बाब त्यांच्यासाठी सर्वसामान्य झाली आहे. आता तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही वर्षं एकत्र राहून एकमेकांशी पटतं की नाही, हे बघूनच लग्नाचा निर्णय घेतात. यात त्यांना काहीच वावगं वाटत नाही. कारण आजच्या महिला स्वतःच्या पायावर उभं असल्याने त्याचं कुठंच काही अडत नसतं.

जेवढी प्रगती होत गेली तेवढ्याच प्रमाणात काही महिलांच्या आयुष्यातील अडचणीत पण वाढ होत चालली आहे. पूर्वीच्या महिला धार्मिक होत्या व सगळे सणवार एकत्रित येऊन साजरे करण्यास प्राधान्य देत होत्या. परंतु आजच्या महिलांना स्वतःच्या करियरपुढे देवधर्म व सणवाराची पण फिकीर नसते. कारण खूप लहान वयातच त्या परदेशात जायला प्राधान्य देतात. शिक्षण, इतर क्षेत्र व नोकरीमुळे व्यस्त असतात. साहजिकच आपल्या माणसांपासून दूर रहात असल्याने, संस्कार, रितीरिवाज, आपल्या कार्यपद्धतीपासून त्या वंचित राहतात.

ज्या महिला अशा गोष्टी स्वतः आत्मसात करत नाहीत, त्या त्यांच्या मुलांना व पुढील पिढीला काय समज देणार आहेत व काय संस्कार शिकवणार आहेत? मागील पिढी, वर्तमान काळातील पिढी व भविष्यात येणारी पिढी यांचं या सगळ्या गोष्टींबाबतचं अंतर दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.

अगदी थोडक्यात सांगायचे म्हटलं तर भारतीय महिलांचा पाश्चात्य राहाणीमानाकडे कल वाढत चाललाय, तर पाश्चात्य महिलांचा भारतीय संस्काराकडे… व त्यामुळे या पुढील पिढी कशी असेल हे एक न समजणारं कोड आहे.