घरफिचर्समायमहानगर ब्लॉगसर्वसामान्यांचा 'आपला' नेता

सर्वसामान्यांचा ‘आपला’ नेता

Subscribe

‘शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा’, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य जेव्हा जेव्हा वाचतो, ऐकतो तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यासमोर वर्तमानातील एकमेव नेता समोर येतो, तो नेता म्हणजे डॉ. जितेंद्र आव्हाड. परिस्थिती कितीही विरोधात असली तरी आव्हाडसाहेब विचारांशी, निष्ठेशी कधीही तडजोड करत नाहीत. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय वर्तुळाबाहेरही आव्हाडांना मानणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण खात्यासारखी महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आज वयाची ५६ वर्षे पूर्ण करत असताना तरुणपणापासून अविरत राजकीय, सामाजिक संघर्षानंतर त्यांना पूर्णवेळ मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. आव्हाड यांच्याबद्दल महाराष्ट्रात दोन मतप्रवाह आहेत किंवा त्यांना मानणारे आणि न मानणारे असे सरळ सरळ दोन गट आहेत. एक पुरोगामी गट आणि दुसरा अर्थातच प्रतिगामी. माझ्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या तरुणाला राजकारणात काम करताना आयडॉलॉजीची शिकवण देणारे आव्हाडसाहेबच आहेत. तर प्रतिगामी गटातून त्यांची प्रचंड बदनामी करण्याचे कारस्थान सतत सुरू असते. पण ते म्हणतात ना, “You Love him or hate him, but you can’t ignore him”. आव्हाडसाहेबांचं अगदी असंच आहे. राजकारणातील भीष्माचार्य आदरणीय शरद पवार साहेबांचा हा कट्टर पट्ट शिष्य महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात केंद्रस्थानी असेल, असा माझा गाढ विश्वास आहे.

५ ऑगस्ट हा साहेबांचा जन्मदिन साजरा करताना माझ्यासारख्या साहेबांच्या जवळ असणार्‍या अनेक कार्यकर्त्यांचा उर भरून येतो. काल परवाच बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन करत असताना आव्हाड साहेबांनी त्यांनी चाळीत राहत असताना शौचालयाबाहेर रांग लावल्याची आठवण बोलून दाखवली. ताडदेवच्या चाळीत राहत असताना त्यांनी घेतलेला गरिबीचा अनुभव इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी गृहनिर्माण खात्याच्या माध्यमातून आव्हाडसाहेब कसोशीने प्रयत्न करताना दिसतात. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आली. खरंतर आव्हाडसाहेबांकडे हे खाते देऊन गृहनिर्माण विभागालाच न्याय मिळालाय, असे माझे मत आहे. मंत्रालयासमोर असलेल्या त्यांच्या बंगल्यावर सकाळपासून लोकांच्या अनेक तक्रारी येतात. कुणाला बिल्डरकडून घराचा ताबा मिळालेला नसतो, कुणाला विकासकाने फसवलेले असते, कुणाचे भाडे थकलेले असते. अनेक तक्रारी साहेबांकडे येतात आणि साहेब प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी लोकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचे काम साहेबांनी केले. ही तळमळ कदाचित चाळीत राहून मोठे झाल्यामुळे त्यांना जाणवत असते.

- Advertisement -

आव्हाडसाहेबांची कार्यशैली ही त्यांच्या स्वभावाप्रमाणेच बंडखोर आहे. त्यामुळेच आपल्या खात्यात नुसत्या प्रशासनाच्या प्रस्तावावर विसंबून न राहता त्यांनी स्वतः नवीन योजना आणल्या. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाच्या माध्यमातून राहण्यासाठी घरे देण्याचा निर्णय. मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर म्हाडातर्फे एक हजार महिलांसाठी ४५० खोल्यांचे सुसज्ज वसतीगृह उभारण्याचा निर्णय. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासकामाचा शुभारंभ करून आशिया खंडातला सर्वात मोठा पुनरुत्थान प्रकल्प राबविण्याचा निर्णय. बीआयटी चाळ-परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या घराच्या ठिकाणी आणि मुंबईतील चिराग नगर-घाटकोपर येथे अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असणार्‍या घराच्या ठिकाणी गृहनिर्माण विभागामार्फत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार करण्याचा निर्णय किंवा एसआरएचे घर झोपडी तोडल्यापासून पुढच्या पाच वर्षांत विकण्याची मुभा देणारा निर्णय असो… हे सर्व निर्णय सामान्य माणसाची गरज काय? हे ओळखून घेतलेले निर्णय आहेत.

आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात म्हाडातर्फे पाच लाख घरांची निर्मिती करून त्यापैकी ५० हजार घरे पोलीस कर्मचार्‍यांना व ५० हजार घरे चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचार्‍यांना उपलब्ध करून देणार असल्याचा संकल्प साहेबांनी केला आहे. त्यांचा हा संकल्प सिद्धीस जावो, अशी प्रत्येक सामान्य माणसाची इच्छा आहे. आव्हाडसाहेबांचे वेगळेपण काय? कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूर आला. रायगडमधील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून अख्खं गाव नष्ट झालं. हे गाव म्हाडातर्फे वसविण्याची घोषणा आव्हाडसाहेबांनी तात्काळ जाहीर केली. आपल्या खात्याचा वापर गरजूंना कसा करता येईल? याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे. आदरणीय पवारसाहेबांना काय अभिप्रेत आहे. एखादा निर्णय घेत असताना साहेबांचे त्यावर काय मत असेल. याचे सर्व आडाखे बांधून सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा. अशी त्यांची कामाची पद्धत आहे.

- Advertisement -

२०१४ साली देखील अवघ्या काही महिन्यांसाठी त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन विभागाची जबाबदारी मिळाली होती. कालावधी जरी कमी मिळाला असला तरी आव्हाडांनी कमी वेळात टी-२० क्रिकेटप्रमाणे स्लॉग ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी थेट वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. या खात्याशी निगडीत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न त्यांनी सोडविले. जसे की, वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडीत रुग्णालयांत २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. सूर्योदय ते सूर्यास्त या १२ तासांतच पोस्टमॉर्टेम होत असल्यानं मृतदेह मिळण्यास अनेक तास लागायचे. त्यातून नातेवाईकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागायचा, वाद व्हायचे. आव्हाड साहेबांनी एका सहीसरशी हा प्रश्न सोडवला. आयुर्वेद (BAMS), होमिओपॅथी (BHMS) आणि युनानी (BUMS) या वैद्यकीय पॅथींच्या सुमारे दीड लाख पदवीधरांना कायद्यात सुधारणा करून अत्यावश्यक परिस्थितीत अ‍ॅलोपॅथी (MBBS) आधुनिक उपचारपद्धती वापरण्याची परवानगी देण्याचा कायदा वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी विधिमंडळात मंजूर करून घेतला. या कायद्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक मजबूत झाली. हा कायदा व्हावा ही मागणी २०१४ च्या आधी ३० वर्षे हे डॉक्टर्स करत होते. काही महिन्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी आपली छाप सोडली होती. मात्र, याची चर्चा माध्यमात किंवा राजकीय वर्तुळात झाली नाही, याची खंत आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

आव्हाडसाहेबांची माझी झालेली पहिली भेट अविस्मरणीय अशी आहे. तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई युवक संघटनेत काम करत होतो. २०१३ साली अक्षय कुमारचा ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दाऊदचे उदात्तीकरण करून त्याची प्रतिमा उजाळून दाखविल्याच्या विरोधात माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. चर्नीरोडच्या प्रसिद्ध मेट्रो सिनेमावरील या चित्रपटाचे बॅनर मी फाडून टाकले होते. इंग्रजी आणि हिंदी माध्यमांनी यावर मोठा गहजब केला. बातमी प्रदेश कार्यालयात पोहोचली. कोण हा नितीन देशमुख? अशी विचारणा झाली. पक्षश्रेष्ठी आता आपल्याला चांगलंच झापणार अशी कुणकुण मला लागली. त्यावेळी भास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष तर आव्हाडसाहेब कार्याध्यक्ष होते. आव्हाडसाहेबांच्या समोर गेल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी खूप झाडलं. ‘आंदोलन करताना जरा भान ठेवत जा, पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करता जा’, अशी समज दिली. मला वाटलं आज माझा पक्षातला शेवटचा दिवस होतोय. तसाच खाली मान घालून केबिन बाहेर आलो. थोड्यावेळाने आव्हाड साहेबांनी परत निरोप देऊन मला आत बोलावलं. मेट्रो सिनेमाचा उंचावर असलेला बॅनर नेमका फाडलास तरी कसा? याचा तपशील जाणून घेतला. मी त्यांना सांगितलं दहीहंडीप्रमाणे कार्यकर्त्यांनी थर रचले आणि मग वर चढून मी बॅनर फाडला. ‘ये ब्बात, याला म्हणतात कार्यकर्ता’ असं म्हणत साहेबांनी अक्षरशः शाबासकी दिली. आंदोलनाचा विषय चुकला असला तरी मी दाखविलेल्या हिंमतीची त्यांनी दाद दिली. त्या दिवसापासून साहेबांनी खांद्यावर जो आपुलकीचा हात ठेवला, तो आजतागायत कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला शरद पवारांनी आपली दखल घ्यावी, असे वाटत असते. त्यासाठी पक्षाचे कार्यक्रम, आंदोलने, मेळावे यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ता धडपडत असतो. शरद पवारांनी माझ्याही पाठीवर हात ठेवावा, अशी माझी इच्छा होती. माझ्या धडपडीला आव्हाडसाहेबांनी साथ दिली. माझ्या हाताला पकडून शरद पवारांकडे नेऊन माझी ओळख करून दिली. त्यातूनच मी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आणि शरद पवारसाहेबांचा मेणाचा पुतळा सुनील व्हॅक्स म्युझियममध्ये बसवू शकलो. या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण खुद्द शरद पवार यांनी केले होते. माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा दिवस आव्हाडसाहेबांच्या सहकार्यामुळे आला. आज जेव्हा कोकणातील महाड, चिपळूण येथे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत सगळीकडून मदत पाठवत असताना आदरणीय पवारसाहेबांनी मला या भागासाठी रुग्णवाहिका देण्यास सांगितले. कोकणातील लोकांवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी मी पाच रुग्णवाहिका देऊ केल्या. पवारसाहेबांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माझे नाव घेऊन मी देत असलेली मदत सर्वांना सांगितली.
कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता. एखाद्याचे चुकले तर त्याला समजावून पुन्हा मोटिव्हेट करण्याचे काम आव्हाडसाहेब करतात. आज राज्याच्या राजकारणात अनेक भाषांचे ज्ञान, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची अद्ययावत माहिती आणि जाण असलेला हा नेता कदाचित पवारसाहेबांनंतर एकमात्रच असावा, असे माझे ठाम मत आहे.

आव्हाडसाहेब बहुजन महापुरुषांचा वारसा चालवत असल्यामुळे साहजिकच प्रतिगामी शक्तींकडून आव्हाडसाहेबांवर चिखलफेक केली जाते. महाराष्ट्रातील संतांना, बहुजन महापुरुषांना एका जातीत अडकवून ठेवण्याचा प्रयत्न इतिहासात आणि वर्तमानात आपण होताना पाहिलाय. तोच प्रयत्न वर्तमान राजकीय नेत्यांबाबतही होतो. आव्हाडांना देखील एका जातीत अडकविण्याचा प्रयत्न कधी कधी होतो. मात्र, साहेबांची विचारांची पक्की बैठक या प्रयत्नांना यशस्वी होऊ देत नाही. उदाहरण म्हणून मला इथे शिव सन्मान परिषदेचा उल्लेख करावासा वाटतो. २०१५ साली फडणवीस सरकारने ब.मो.पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. त्यावेळी महाराष्ट्रातून आव्हाडसाहेब हे एकमेव नेते होते, ज्यांनी जाहीर निषेध करत याविरोधात चळवळ उभी केली होती. इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍यांचा सन्मान खपवून घेतला जाणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली. पक्षातून पाठिंबा मिळेल का? राजकीय भवितव्याचे काय होईल? याची कोणतीही तमा न बाळगता त्यांनी मैदानात उडी घेतली. महाराष्ट्र पालथा घालून शिव सन्मान परिषदा घेतल्या. एका परिषदेत तर त्यांच्यावर भ्याड हल्लाही करण्यात आला. मात्र, उपस्थित शिवप्रेमींनीच साहेबांना संरक्षण देऊन परिषद पूर्ण केली. ब.मो.पुरंदरेंच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राने अळीमिळी गुपचिळी साधली असताना, आव्हाडसाहेबांच्या मदतीस पवारसाहेब धावून आले. त्यांनीही ब.मो.पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, असे रोखठोक जाहीर विधान केले.

जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आव्हाडसाहेब राजकीय, सामाजिक जीवनात वावरतात. हिंदू द्वेष्टे, ब्राह्मण द्वेष्टे असे अनेक आरोप आव्हाडसाहेबांवर लावले जातात; पण हे खरं नाही. आव्हाडसाहेबांचे हिंदुत्त्व सर्वसमावेशक पद्धतीचे आहे. म्हणूनच त्यांनी दहीहंडी सारख्या हिंदू सणाला एक मोठे स्वरुप देऊन अनेक तरुणांना त्याकडे आकर्षित केलं. पंढरीच्या विठ्ठलाचा अवघ्या विश्वाला आपलं माननारा हिंदू धर्म आव्हाडसाहेब आचरणात आणतात. धर्माचे पालन करणे म्हणजे दुसर्‍या धर्माचा द्वेष बाळगणे असा होत नाही, हे आव्हाडांनी आम्हाला ठासून सांगितलेले आहे. त्यामुळेच आम्हा तरुणांना धारकरी आणि वारकरी यातील भेद स्पष्ट दिसतो. दुसरं असं की, त्यांनी कधीही जात मानली नाही. माझ्या सारखे राजकीय पार्श्वभूमी नसलेले हजारो तरुण आव्हाड यांच्या थेट संपर्कात आहेत. ते कोणत्या जातीचे आहेत, हे आजवर कुणालाही आव्हाड साहेबांनी विचारलेले नाही. ठाण्यातील त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत त्यामध्ये आनंद परांजपे पासून कितीतरी नेते, कार्यकर्ते हे विविध जाती, समाज, धर्मातून आलेले आहेत. ती फक्त आव्हाडसाहेबांची टीम म्हणून एकदिलाने काम करतात.

आव्हाडसाहेबांमधील मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे निष्ठा… पवारसाहेबांवरील त्यांची असलेली निष्ठा ही आजच्या स्वार्थाने बुरसटलेल्या राजकारणात डोळ्यात अंजन घालणारी आहे. दिवस कसेही, कितीही वाईट असले तरी आपल्या नेत्यासोबत ठामपणे उभं राहावं, हे आव्हाडसाहेबांकडून शिकावं. गुरु-शिष्याची ही जोडी सध्याच्या राजकारणात अभावानेच पाहायला मिळते. पवारसाहेबांनीही या आव्हाडसाहेबांच्या निष्ठेला वेळोवेळी न्याय दिला. म्हणूनच पवारसाहेबांच्या विश्वासातले असणार्‍या काही मोजक्या नेत्यांपैकी आव्हाडसाहेब एक आहेत. फक्त मनात एकच रुखरुख आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळाने आव्हाडसाहेबांकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांच्याकडून हा कार्यभार काही काळासाठी काढून घेण्यात आला. त्यानंतर त्यांना पुन्हा पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेलेली नाही. कॅबिनेट मंत्री असलेल्या आणि दूरदृष्टी ठेवून काम करणार्‍या अभ्यासू नेत्याकडे पुन्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. साहेबांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देताना माझा ऊर भरून येत आहे. साहेबांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, या शुभकामना!

(लेखक राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबईचे कार्याध्यक्ष आहेत)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -