घरफिचर्समायमहानगर ब्लॉगजागतिक आरोग्य संघटनेचे वाभाडे

जागतिक आरोग्य संघटनेचे वाभाडे

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेचे पुरते वाभाडे निघालेले आहेत. कोरोनाने घेतलेला तो सर्वात मोठा बळी मानावा लागेल. कारण कोरोनाचा जनक असलेल्या चीनला पाठीशी घालताना या संस्थेचा बळी गेलेला आहे. ज्या चौकशीचा प्रस्ताव नुकताच वार्षिक परिषदेत मंजूर करण्यात आला, ती चौकशी केवळ कोरोनाचा उगम वा त्यातली लपवाछपवी इतकीच मर्यादित नाही. त्यात विविध राजकीय हितसंबंधांचाही वेध घेतला जाणार आहे. कारण आरोग्य संघटनेची स्थापना ज्या हेतूने झाली होती, त्यालाच त्या संस्थेच्या विद्यमान नेतृत्वाने काळीमा फासला आहे. कोरोनाचा उद्भव झाल्यापासून त्याला यशस्वीरित्या पायबंद घालण्यात यश मिळवणार्‍या तैवान या देशाने त्यावर पहिला आवाज उठवला होता. पण या संस्थेने त्याकडे कानाडोळा केला. अधिक तैवानला त्या संस्थेच्या बैठकीत निरीक्षक म्हणूनही सहभागी करून घ्यायला नकार दिला होता.

उलट त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले असते आणि चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोनाचा वेळीच तपास घेतला गेला असता, तर आज दिसते तसे जग उद्ध्वस्त होऊन पडले नसते. ते अन्य कोणाचे काम नसून आरोग्य संघटनेचे कर्तव्य आहे. त्यात अक्षम्य हेळसांड झालीच. पण तैवानने इशारा दिला असताना त्याचीच मुस्कटदाबी करण्याला संस्थेने प्राधान्य दिले. त्याचे कारण उघड आहे. तैवान हा कम्युनिस्ट चीनचा सर्वात इवला शत्रू आहे. ‘वन चायना’ ह्या धोरणानुसार चिनी नेतृत्वाच्या मते तैवान हा वेगळा देश नसून चीनचेच एक बेट आहे. त्यामुळे त्याला देश मानला जाऊ नये व त्याचे मुख्यभूमीत विलीनीकरण झाले पाहिजे. ही चीनची भूमिका असली तरी आरोग्य संघटनेची असू शकत नाही, याचे त्या संस्थेला भान उरले नाही, तिथेच सगळा घोळ होऊन गेला.

- Advertisement -

या संघटनेचे विद्यामान नेते व पदाधिकारी यांना पदावर आणून बसवण्यात चीनने आपली राजकीय ताकद पणाला लावलेली होती. अर्थात त्यात नवे काहीच नाही. यापूर्वीही अशा जागतिक संस्था संघटनांना आपल्या मुठीत ठेवायला रशिया अमेरिकेनेही तेच केलेले आहे. नाणेनिधी वा जागतिक बँक या संस्था अमेरिकेच्या इशार्‍यावरच चालत असतात आणि निर्णय घेत असतात. मग चीनने त्याच मार्गाने जाणे अयोग्य म्हणता येणार नाही. पण चीनने त्या संस्थांचा खर्चही उचलावा. बोजा अमेरिकेने उचलावा आणि तिथे सिंहासनावर आरुढ झालेल्यांनी अमेरिकेच्या विरोधातले फतवे काढण्यापासून अमेरिकेलाच वाकुल्या दाखवाव्या, असे चालणार नाही. इथे तर आरोग्य संघटनेने जगालाच खाईत लोटून देण्यापर्यंत चीनला साथ दिली आणि सर्वाधिक अनुदान देणार्‍या अमेरिकेलाही मरणाच्या जबड्यात ढकलून दिलेले आहे.

कारण तैवानसारख्या देशाने इशारा दिल्यावर या संस्थेने चीनमध्ये कोरोनाच्या फैलावाने मृत्यूचे तांडव चालविले असल्याची सर्वात पहिली दखल घेणेच त्या संस्थेचे कर्तव्य होते. जगात कुठलीही आजाराची साथ वा प्राणघातक आजार सरसकट फैलावत जाऊ नये, याची देखरेख करण्यासाठीच या संघटनेची स्थापना झालेली होती आणि नेमक्या त्याच कर्तव्याला तिने यावेळी हरताळ फासलेला होता. तसा इशारा देण्यार्‍या तैवान देशाची मुस्कटदाबी केली आणि त्याच विषाणूविषयी लपवाछपवी करणार्‍या चीनला मोकाट रान दिले. त्यामुळेच अवघे जग गाफील राहून कोरोनाच्या जबड्यात जाऊन घुसमटले. लाखो लोकांचा बळी गेला आहे आणि लक्षावधी आजारी पडले असून जगाची अर्थव्यवस्थाही कोलमडून पडली आहे. मग एकटा चीन जबाबदार कसा? गुन्हेगारीत साथ देणारा वा त्यावर पांघरूण घालणाराही तितकाच गुन्हेगार असतो ना?

- Advertisement -

अर्थात कोरोना हाताबाहेर जातोय आणि जागतिक आरोग्य संघटनाच त्यातली भागीदार असल्याचे उघड झाल्यावर कोणी ते स्पष्ट बोलायची हिंमत करत नव्हता. पण अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फटकळ असल्याने खुलेआम त्यांनी पहिला आरोप केला. आधी चीन व नंतर आरोग्य संघटनेलाही आरोपीच्या पिंजर्‍यात ट्रम्प यांनीच उभे केले. तर त्यांच्याच देशातही ट्रम्प यांची हेटाळणी झाली होती. पण हळुहळू हा वेडा काय म्हणतो, त्याकडे जगाला कान उघडे ठेवून बघावे ऐकावे लागले आणि आता कोरोनाची जागतिक तपासणी चौकशी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यातून अनेकांची अंडीपिल्ली बाहेर येतीलच. पण त्यासाठी अमेरिकेसारख्या दांडग्या देशालाही किती आक्रमक पवित्रा घ्यावा लागला ते विसरता कामा नये. अन्यथा हे पाप खपून गेले असते आणि चीनची मस्ती चालूच राहिली असती. मात्र जागतिक आरोग्य संघटनाच एकमेव आरोपी वा गुन्हेगार नाही.

आजकाल जगात ज्या काही प्रतिष्ठीत संस्था, पुरस्कार वा ज्यांचा दबदबा आहे, अशा अनेक व्यक्ती संशयास्पद झालेल्या आहेत. त्यांनी आपले इमान विकून जगालाच गंडा घालण्याचा धंदा राजरोस चालू केलेला आहे. त्यात नोबेल, मॅगसेसे किंवा पुलित्झर अशा पुरस्कारांचाही समावेश आहे. जगाचे चिंतन करणार्‍या व जगाला विषाचेही डोस अमृत म्हणून दिवसाढवळ्या पाजणार्‍या थिंकटँक मोकाट झालेल्या आहेत. त्यांचेही पितळ उघडे पडण्याची गरज आहे. कारण अशा पुरस्कार वा गाजावाजा करण्यातून जगाला संभ्रमात टाकण्याचा धंदा माजला आहे. अमूक पुरस्कार मिळाला म्हणजे त्याच व्यक्तीचे पाखंड सुरू केले जात असते आणि त्याच्या माध्यमातून अब्जावधी लोकांना चक्क उल्लू बनवले जात असते. त्यांनाही यापुढे धारेवर धरण्याची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे पितळ उघडे पाडण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेची व्याप्ती तेवढ्यापुरती मर्यादित रहाता कामा नये. त्यातून चीनने कोणकोणत्या देशात किंवा क्षेत्रामध्ये आपले हस्तक घुसवून ठेवले आहेत, त्याचीही झाडाझडती घेतली गेली पाहिजे. फक्त चीनच कशाला? त्यांच्याप्रमाणेच अमेरिका, रशिया किंवा अगदी पाकिस्तानसहीत मोठमोठ्या धर्मदाय संस्थाही कोणकोणत्या अभ्यास संस्थांमध्ये घुसून ब्लॅकमेलिंगचा धंदा राजरोस उजळ माथ्याने करतात, त्यांचाही पर्दाफाश होणे अगत्याचे आहे. आताही भारतात कोरोनाची लागण सुरू होताच मे-जूनपर्यंत किती कोटींना बाधा होईल आणि किती लाख मुडदे पडतील त्याची भाकिते मार्चपासून सुरू करणारे त्याच पठडीतले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनापेक्षा अधिक लोकसंख्या भूकबळी म्हणून भारतात मरणार असले भविष्य वर्तवणारे कुठे आहेत? कारण मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला असून आता कुठे भारताची रोगबाधा लाखाच्या घरात पोहोचली आहे.

मृतांचा आकडाही पाच हजारापर्यंत पार जाऊ शकलेला नाही. मग कोट्यवधींना बाधा होणार वा लाखो मरतील, असा टाहो फोडण्याचा अजेंडा कशासाठी होता? चीन वा आरोग्य संघटनेइतकेच असे लोकही बदमाश असून त्यांचेही मुखवटे फाडले गेले पाहिजेत. आरोग्य संघटनेच्या मागोमाग गरीबांच्या यातना वेदना वा भावनांशी खेळून आपली तुंबडी भरणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे. चीनला पुढील काळात अमेरिकेला मागे टाकून पुढे जायचे आहे, त्यासाठी हा देश काहीही करायला तयार आहे. त्यासाठी त्यांनी जगातील सगळ्या लोकांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचा कोरोना मार्ग निवडला. या कोरोनामुळे चीनच्या फक्त वुहान शहरामध्ये हाहा:कार उडाला, पण बाकी चीन शांत होता, तर दुसर्‍या बाजूला जगातील अनेक देशांमध्ये या कोरोनाने हाहा:कार उडवून दिला. कोरोनाने अनेक मेले, पण जिंवत होते, त्यांना जगणे अवघड झाले. त्यामुळे आपस्वार्थी चीनचा बंदोबस्त करण्यासाठी जगातील सजग नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -