Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स आईने 'माझी गोष्ट' पूर्ण केली

आईने ‘माझी गोष्ट’ पूर्ण केली

Related Story

- Advertisement -

माझी आई

सुशीला रामकृष्ण महाराव. जन्म १९ डिसेंबर १९२७.

- Advertisement -

प्रतिकूल परिस्थितीत शिकली. त्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांची आईला साथ मिळाली. वयाच्या १४ व्या वर्षापासून ती नोकरी करीत होती. १९४८मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याच्या शाळेत ‘शिक्षिका’ म्हणून नोकरीला लागली. १९८५ मध्ये ‘मुख्याध्यापिका’ म्हणून सेवानिवृत्त झाली. या ३७ वर्षांत सामाजिक जाणिवेतून हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनींना घडविले. त्यांना प्रतिकूल परिस्थितीत हिमतीने उभे राहण्याचे बळ दिले. त्यानंतरही सामाजिक जाणिवेनी जमेल तशी गरजूंना मदत करीत राहिली. आपल्या मुलांमध्येही सामाजिक जाणिवा रुजवल्या. कणखर, परखड आणि प्रगतिशील विचारांचा कायम आग्रह धरणारे प्रेरणादायी असे आईचे व्यक्तिमत्त्व होते. ते तिने शेवटच्या श्वासापर्यंत टिकवले. आचार्य अत्रे, साने गुरुजी, अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे आदि थोरा-मोठ्यांना आईने जवळून पाहिले. ६५ वर्षांच्या सांसारिक जीवनापैकी ४३ वर्षे ती आठ मुलांच्या संसाराचा गाडा एकटीच ओढत होती. (वडील १९ नोव्हे.१९७७ ला गेले.) आपला हा जीवनप्रवास आईने वयाच्या ९० व्या वर्षी ‘माझी गोष्ट’ ह्या पुस्तकातून मांडला. ह्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आणि विधान परिषदेतील शिक्षकांचे आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी आईने खणखणीत असे भाषण केले. तो उत्स्फूर्त वक्तृत्वाचा अजोड नमुना आहे. ते भाषण माझ्या fb अकाउंटवर (Dnyanesh Maharao) उपलब्ध आहे.

दादरच्या ‘शिवाजी पार्क’ला आपले घर असावे, अशी आईची तीव्र इच्छा होती. ती इच्छा तिने वयाच्या ९४ व्या वाढदिवशी दिनी (१९.१२.२०२०) पूर्णही केली. नव्या घरात राहायलाही आलो. वयोपरत्वे शरीराच्या कुरबुरी होत्या. पण वेळीच उपचार करून जिवावरच्या संकटाला दूर ठेवले. साथीला रोज ३ तास वाचन, दोन तास टीव्ही मालिका-बातम्या पाहणे होते. त्यामुळे पूर्णपणे ‘अपडेट’ असायची. पण काल (शनिवार २० फेब्रुवारी) संध्या. ७.३० वाजता चालती- बोलती, स्वत: सारं स्वत:च करणाऱ्या आईला ‘ब्रेन स्ट्रोक’ने आघात केला. तातडीने ‘हिंदुजा हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. पण तोपर्यत खूप नुकसान झाले होते. वैद्यकीय उपचार थकले. आज रविवार २१ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता आईने ‘माझी गोष्ट’ वयाच्या ९३+ वर्षी पूर्ण केली. आज ‘जागतिक मातृभाषा दिन.’ आईने जगण्याची आणि जगात वावरायची भाषा शिकवलीय. तिचा वापर अधिक कणखरपणे करणे, एवढेच माझ्या हाती आहे!

- Advertisement -

– ज्ञानेश महाराव लेखक ज्येष्ठ पत्रकार, चित्रलेखा मराठीचे संपादक आहेत


हेही वाचा : सुशीला महाराव यांचे निधन


 

- Advertisement -