Tuesday, March 2, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मुत्सद्दी नाना फडणवीस

मुत्सद्दी नाना फडणवीस

Related Story

- Advertisement -

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणीशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला.

- Advertisement -

संकटकाळात मराठ्यांची एकी टिकविणे व इंग्रजांपासून स्वातंत्र्यरक्षण करणे, ही नानांची महत्त्वाची कामगिरी होय. फ्रेंच राज्यक्रांती, इंग्रज-फ्रेंच युद्धे, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध इ. घटना नानांना माहीत होत्या.

अखबारनवीसांची (बातम्या आणणार्‍यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले.. प्रसिद्ध पानिपतच्या युद्धकाळात ‘बातम्या’ वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले.

- Advertisement -

नाना फडणवीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.

प्रत्येक ठिकाणच्या ‘आतल्या’ बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.

कुणबिणी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, तेलंग, गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते. यांना ‘नजरबाज’ असे म्हणत. हे नजरबाज इतके तेज होते की कित्येकांच्या रोजकीर्दीच्या नोंदीही ते नानांना पाठवत असत. या गुप्तहेरांच्या बारीकसारीक माहितीमुळे नानांना शत्रू, प्रतिपक्षातील मोठे अधिकारी, बडे सरदार, धनिक, पेढीवाले, स्वकीय सरदार दरकदार यांची इत्थंभूत मासलेवाईक माहिती असे.

मद्रास येथील इंग्रजांची बातमी काढण्याकरिता नानांनी हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांजमार्फत ‘व्यंकटराम पिल्ले’ नावाचा एक मद्रासी इसम ठेवला होता. तो इंग्रजी जाणत असल्यामुळे त्याच्याकडून इंग्रजांच्या घरातील विलायतेची बातमी मिळेल, अशी नानांना आशा होती. त्यास पगार दरमहा शंभर रुपये द्यावा, अशी गोविंदरावांनी नानांना शिफारस केली होती. अशा या मुसद्दी फडणवीसांचे १३ मार्च १८०० रोजी निधन झाले.

- Advertisement -