नाना वालावलकर

नाना वालावलकर

नाना वालावलकर काही डॉक्टर नव्हता. गावगाड्यातील एक सर्वसामान्य माणूस; पण वेळप्रसंगी हा माणूस असामान्य व्हायचा. लोक त्याला डॉक्टरच्या स्थानी मानायचे. कोळोशी-नांदगाव याठिकाणी अनिल कांबळी डॉक्टरने दवाखाना टाकण्यापूर्वी गावात कोणाला काही झालं की डॉक्टर म्हणजे कणकवलीला. आणि कणकवलीला जायला सकाळची एसटी गेली की दुसर्‍या दिवसापर्यंत गाडी नसायची. अशावेळी नानाचे उपचार चालू व्हायचे.

हल्लीच कधी माझी छोटी मुलगी श्रावणी संध्याकाळी रडायला लागली. रडायचं, कारण काही समजेना. दोन-तीन दिवस हा प्रकार चालू होता. त्यावर आई लगेच म्हणाली “बापडो! नाना जीतो आसतो तर पोरांच्या तीनसांजेच्या रडण्यावर कायतरी जालीम उपाय तरी केल्यान आसतो”.

आजीचं काळीज ते. तिला काही डॉक्टरी उपाय सुचण्याऐवजी मुलीच्या रडण्यावर उपाय कोणता सुचावा, तर तो नाना वालावलकराचा!

नाना वालावलकर काही डॉक्टर नव्हता. गावगाड्यातील एक सर्वसामान्य माणूस; पण वेळप्रसंगी हा माणूस असामान्य व्हायचा. लोक त्याला डॉक्टरच्या स्थानी मानायचे. कोळोशी-नांदगाव याठिकाणी अनिल कांबळी डॉक्टरने दवाखाना टाकण्यापूर्वी गावात कोणाला काही झालं की डॉक्टर म्हणजे कणकवलीला. आणि कणकवलीला जायला सकाळची एसटी गेली की दुसर्‍या दिवसापर्यंत गाडी नसायची. अशावेळी नानाचे उपचार चालू व्हायचे. हे उपचार म्हणजे केवळ योगायोगाने बरे होणे नव्हते तर त्यामागे रानातल्या औषधी वनस्पतीची माहितगारी होती. रानातल्या अनेक औषधी वनस्पती नानाच्या कमरेला बांधलेल्या असतं. काही पाळं मूळं तर असायची, त्याशिवाय बिबयाच्या बिया तर कायम कमरेला बांधलेल्या पिशवीत असायच्या. कोणाच्या पोटात दुखत असेल, कोणाला पायाखाली आलं असेल, कोणाचा ताप उतरत नसेल तर लोक नानाला बोलावून आणायचे.

नाना मग रानात जाऊन कसल्यातरी झाडाची सालं घेऊन यायचा आणि ती साल कुटून त्याचा रस काढून तो रस त्या मुलाला द्यायचा. आणि भरीला घरात धूप घालून त्या निखार्‍याची राख घरभर फुंकून “काय आसता! भायलीभुतूरली काय पीडा आसात तर त्याचो पण बंदोबस्त करूक व्हयो”. असं म्हणत घर धुपाने भरून टाकायचा. लहान मुलं, मोठी माणसं त्याच्या औषधोपचाराने बरी व्हायची.

मी गावी गेल्यावर वाटेत कधी भेटला तर म्हणायचा “काय रे बाबू! न्हानपणी आज्याक किती पिडलं रे ! आता मोठो झालस”. मी लहान असताना कधी रडू लागलो किंवा आजारी असलो की आजोबा नानाला बोलावून त्यांच्या पध्दतीने उपचार करायचे. नानाची फी म्हणजे एक नारळ. तो नारळ आणि समोर ठेवलेल्या ताटातल्या पानांचा परामर्श घेत एकएक भूताखेताच्या गोष्टी नाना सांगत बसे.

नाना एका पायाने अधू होता. तो चालताना नेहमी अधू पाय हातातल्या काठीवर आडवा करून तो चालत असे. पण या अधू पायाने त्याचं कधीच काही अडलं नाही. तो शेती करायचा, जोत धरायचा. प्रसंगी झाडावर चढायचा. आपल्या अधूपणाबद्दल त्याने कधी अवाक्षर काढलं नाही की कधी कोणाला दोष दिला नाही. नेहमी हसत खेळत असायचा ..कोणाची चेष्टा-मस्करी करत असायचा. एकेक जालीम किस्से करायचा. त्याचं वैदूपण हे केवळ माणसांपर्यंत मर्यादित नव्हते तर गाईगुरांनादेखील नानाने दिलेल्या औषधांची मात्रा लागू पडायची. एकदा अशीच गंमत झाली. आमच्या गावच्या घरी पूर्वी दुधदुभतं भरपूर असायचं, कायम म्हशीचं दूध घरात असायचं. एकदा अशीच घरातील दुभती म्हैस आजारी पडली.

आजारी म्हणजे दिवसाला पाचेक लिटर दूध देणारी म्हैस एकदम दूध देईनाशी झाली, एकदा जागेवर बसली तर उठेनाच, कणकवलीहून पशूतज्ज्ञ आणले. त्यांनी आपली इंजेक्शन, औषधे दिली; पण म्हशीचा आजार काही आटोक्यात येईना. दिवसेंदिवस म्हशींची अवस्था नाजूकच झाली. आजोबांनी म्हशीची आशाच सोडली. आता ही म्हस मरणार असेच घरातील प्रत्येकाला वाटत होते. एवढी मोठी म्हस एकाकी मरणार, कशाने आजारपण आलं ही चर्चा घरातील मंडळी खळात बसून करत होती, तेवढ्यात कुठून तरी नाना आला आणि आजोबांना उद्देशून “काय वो, भाऊनू ! अशें सगळे गप्प कश्याक बसलास, काय झाला?”

गोठातल्या गाईगुरांवर आजोबांचा खूप जीव होता. त्यांनी म्हशीची अवस्था नानाला सांगितली. नाना थेट गोठ्यात गेला, त्याने म्हशीला खालून-वरून, मागून-पुढून बघितलं. पशुवैद्यासारखे म्हशीचे पाय बघितले”. म्हशीने काय खालेल्यानं काय वो ?”
“रे काय म्हायती, पंधरा दिवसापासना गवताची काडी पण बघाल्यान नाय आसा”. ” भाऊनू! नाय तरी ही म्हस अशीनाय तशी मरतली, तर शेवटचो उपाय करूया”.

असं म्हणत माझ्या काकांना घरातून एक मोठी फाटी आणि कोयता आणायला सांगितलं. आणि दोघे म्हणजे काका आणि नाना थेट आगराच्या दिशेने गेले. आगारात गेल्यावर दर दोन झाडाच्या नंतर एक झाड बघून त्याची सालं, नाहीतर पाला त्या फाटीत नाना आणि काका टाकत होते. दीडदोन तास पायपीठ करून फाटीभर पाला आणि झाडाच्या साली भरून दोघे घरी आले. आणि खळ्यात बसून सर्व साली पाण्यात उकळून त्या पाट्यावर चेचून त्यात आणलेल्या झाडाचा पाला ठेचून मोठी बाटलीभर रस काढला. आणि चौघंपाच जणांनी म्हशीला धरून ती पूर्ण बाटली म्हशीला भरवली आणि सर्वजण खळ्यात येऊन बसले, आणि चहा घेत गप्पा करू लागले, एवढ्यात म्हशीच्या आजूबाजूला उभे असलेले काका सर्वांना बोलवायला आले. “भाऊ लवकर येवा, म्हशीक बघा काय झाला?”

सर्वांनी म्हस मेली असेल अशी खूणगाठ मनात बांधली, म्हशीच्या जवळ गेले आणि बघतात तर संपूर्ण गोठा शेणाने भरला होता. आणि म्हैस तरतरीत उभी राहिली होती. नानाचा काढा म्हशीच्या पोटात जाताच म्हशीला बुळकणी लागली. त्याबरोबर म्हशीला हुशारी वाटली. पुढील दोन दिवसांत म्हस पूर्ववत दूध देऊ लागली, ह्या गोष्टी केवळ योगायोगाने किंवा दैवीचमत्काराने घडत नव्हत्या. त्यामागे पूर्वपार बघितलेलं, लक्षात ठेवलेलं औषधी वनस्पतींचं ज्ञान होतं. हे ज्ञान म्हणजे काही सोपी विद्या नव्हती; पण लोक त्या विद्येचा देवाधर्माशी संबंध जोडून ठेवायचे. नाना अशा सर्वच कामात हुशार होता. लग्नघरात पत्रावळी द्रोण बनवणे असो की झाडावर चढून नारळ काढणे असो, अशावेळी एक वेगळाच नाना दिसायचा, नानाचा नाच हा गाववाल्यांच्या कौतुकाचा विषय होता. लग्नाच्या मिरवणुकीत नाना बेहोश होऊन नाचायचा, एका हाताने काठी फिरवून तो इतकी करामत करायचा की पायाने सशक्त माणूस नानाकडे तोंड आ करून बघायचा.

लोक नानाची जेवढी मस्करी करायचे तेवढी नानादेखील लोकांची करायचा. एकदा पावसाचे दिवस होते. पहिला पाऊस लागला की गावातले लोक नदीत खेकडे पकडायला जातात. असाच कोणी गावकरी नदीवरून खेकडे पकडून येत होता. त्याने पकडलेले खेकडे पिशवीत ठेवले आणि रस्त्याने चालत होता. तेवढ्यात पिशवीतला एक खेकडा पिशवीच्या बाहेर आला आणि नेमका त्या माणसाच्या हातावर चढला. हाताला काय टोचतं म्हणून हा माणूस बघायला गेला तर खेकड्याने डाव्या हाताला पकडले होते. तो खेकडा पुन्हा पिशवीत टाकावा म्हणून उजव्या हाताने तो खेकडा पकडायला गेला तर खेकड्याने आपल्या नांगीने उजवा हात पण पकडला. आता खेकड्याची नांगी सोडवावी कशी म्हणून त्याने तोंडाने नांगी सोडवायचा प्रयत्न केला तर खेकड्याने त्या माणसाचं नाक पकडलं. आता खरी पंचाईत झाली. दोन्ही हात आणि नाक खेकड्याच्या नांगीने पकडल्याने त्या माणसाची अवस्था अवघड झाली.

असह्य वेदना होऊ लागल्या. त्याच वाटेने नेमका नाना जात होता. तो माणूस धावत येऊन नानाच्या समोर उभा राहिला. त्याला नानाला नक्की काय झालं हे सांगता येईना. पण नानाला कळलं. नाना म्हणजे बेरक्या. त्याने त्या माणसाला म्हटलं, “मी तुका या संकटातना सोडावतय, पण ह्यो सगळ्यो कुर्ल्यो (खेकडे)माका देवक व्हयो”. त्या माणसाला आता मरणप्राय वेदना होत होत्या. त्याला कसंही करून संकटातून सुटायचं होतं. त्याने “सगळ्यो घी पण आता माका सोडव”, असं काकूळतीने सांगितलं. नाना पण काही त्याला सहज सोडवणार नव्हता. त्याने आपल्या जवळची कोयती निखार्‍यावर गरम केली आणि खेकड्याच्या नांगीला फक्त डिवचली त्याबरोबर खेकड्याने आपली नांगी अजून आवळली, त्यामुळे त्या माणसाला अजून वेदना झाल्या. असं एकदोन वेळा केलं आणि आता गंमत बस्स म्हणत त्याने गरम कोयती खेकड्याच्या नांगीवर दाबून धरली. त्याबरोबर खेकड्याने नांगीची पकड सोडली आणि त्या माणसाची सुटका केली. त्या माणसाने कबूल केल्याप्रमाणे नानाला कुर्ल्या देऊ केल्या; पण नानाने तेवढ्याच नम्रपणे त्या नाकारल्या.

आज नाना नाही. कोणाला काही रात्रीअपरात्री झालं तर कणकवली-नांदगाव येथे नेण्याची सोय आहे. लोकांच्या हातात उपचार करण्यासाठी पैसा आहे. नाना आणि त्याचे ते दैवी असो की गावठी उपचार असो ते नानाबरोबरच इतिहासात जमा झालेत. लग्नात लाठीकाठी फिरवणंदेखील आता बंद झालं. रिकामी झालेल्या गोठ्यात बैल, गाई-म्हशी नाहीत तर यांच्यावर उपचार करण्यासाठी नानासारखी माणसे तरी कशाला हवीत …नाना जनमानसातून गेला; पण आयनलकरांच्या मनात आजही कायम घर करून आहे.

– प्रा. वैभव साटम