घरफिचर्सनाटेकर... क्रीडा, कलेत रमणारा अवलिया!

नाटेकर… क्रीडा, कलेत रमणारा अवलिया!

Subscribe

‘एक बॅडमिंटनपटू म्हणून कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर आपण या खेळाला परत काहीही देऊ शकलो नाही’, अशी प्रांजळ कबूली ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांनी व्यक्त केली होती. निमित्त होते २०१६ मध्ये मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ‘लिजन्डस क्लब’मध्ये नाटेकर यांचा समावेश करण्यात आला होता त्या कार्यक्रमाचे. ‘लिजन्डस क्लब’मध्ये विजय मर्चंट, विजय हजारे, विनू मंकड, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर अशा क्रिकेटपटूंचा समावेश यापूर्वी करण्यात आला आहे, पण प्रथमच क्रिकेटेतर खेळाडूला यात स्थान देण्यात आले. या कार्यक्रमासाठी त्यावेळी ८३ वर्षांचे असलेले नाटेकर हे पुण्याहून उपस्थित राहिले होते. ‘मला आज एक गोष्ट कबूल करायची आहे. आपली कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक खेळाडू त्या त्या खेळासाठी योगदान देत असतात. प्रकाश पदुकोण, गोपीचंद आणि उदय पवार यांनी हे योगदान दिले आहे. पण मी असे काहीही करू शकलो नाही.’ आणि हे खरे होते. नाटेकर स्वतः कोर्टवर उभे राहिले असते तर त्यांनी एखादी सिंधू किंवा एकतरी श्रीकांत या देशाला दिला असता. एखाद्या कलेप्रतीअतिशय निष्ठावंत असलेला हा माणूस होता. सुरुवातीला टेनिस वर प्रेम करणारे नाटेकर यांचे पाय बॅडमिंटन कोर्टवर हलायला लागले तेव्हा त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून देशाची मान अभिमानाने उंचावली होती…नाटेकर यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. १९५४ मध्ये ही स्पर्धा जागितक अजिंक्यपदाची स्पर्धा म्हणून ओळखली जात असे.

१९५६मध्ये मलेशियातील सेलंगर स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय ठरण्य़ाचा मान नाटेकर यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकाविणारे ते पहिले भारतीय ठरले. पुरुषांच्या थॉमस कप स्पर्धेत १६पैकी १२ एकेरी सामनेही त्यांनी जिंकले होते. आचार्य विनोबा भावे यांचे मौनव्रत आपल्यामुळे कसे भंगले याचा किस्साही नाटेकर यांच्याकडून ऐकण्यासारखा होता. ‘तेव्हा विनोबा मौनव्रत धारण करून होते. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते ओरडले ‘जय बॅडमिंटन’. सुरुवातीला टेनिस व बॅडमिंटन या दोन्ही खेळांमध्ये त्यांची कारकीर्द सुरू होती. मात्र, बॅडमिंटनमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर त्यांनी बॅडमिंटनच्या सरावावर अधिक लक्ष केंद्रित केले. बॅडमिंटनमध्ये दहा वेळा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांनी स्थान मिळवले होते. त्यापैकी सहा वेळा ते विजेते ठरले. हे सुरू असताना फावल्या वेळेत अनेक गायकांचे शास्त्रीय गायन ऐकण्याची संधी ते कधी वाया दवडत नसत. त्यांच्या लहानपणी टेलिव्हिजन नव्हता. साहजिकपणेच रेडिओवर गाणी ऐकणे व्हायचे. त्यातून मिळणारा आनंद त्यांना खेळासाठी मनोधैर्य उंचावण्यास उपयोगी पडे. सरावानंतर थोडा विरंगुळा म्हणूनही ते गाणी ऐकत. बॅडमिंटनमध्ये सर्वोच्च यश मिळवले तरी या खेळाची अकादमी काढणे किंवा प्रशिक्षक म्हणून काम करण्यात त्यांना फारशी रुची नव्हती. १९६१ ते १९९२ या काळात हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये त्यांनी नोकरी केली. त्यामुळे आंतर-पेट्रोलियम कंपन्यांच्या स्पर्धामध्येही ते खेळत. तेथेही त्यांना प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी होती. स्पर्धात्मक खेळासाठी वा प्रत्यक्ष कोर्टवर शिकवण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक तंदुरुस्तीही त्यांच्यापाशी होती. परंतु बॅडमिंटनमधील व्यग्रतेमुळे संगीताकडे आपण फारसे लक्ष देऊ शकलो नाही याची त्यांना कोठेतरी खंत वाटत असे. म्हणूनच त्यांनी प्रशिक्षकाची ‘सेकंड इनिंग’ पत्करली नाही. आज शास्त्रीय संगीत शिकतानाही त्यांना बॅडमिंटनइतकाच आनंद मिळतो. आग्रा घराण्याच्या शिक्षिका संध्या काथवटे यांच्याकडे आठवडय़ातून दोन दिवस ते संगीत शिकतात. प्रत्यक्ष शिकवणी जरी दोन दिवसच असली तरी त्याचा नियमित सराव करण्यासाठी आठवडय़ातील इतर पाच दिवस ते भरपूर वेळ देत असतात.

- Advertisement -

खेळामुळे शिस्तबद्ध जीवनाची नाटेकर यांना सवय झाली आहे. त्यांचा मुलगा गौरव व सून आरती हे दोघेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटू होते. आता दोघेही प्रशिक्षक झाले आहेत. सीसीआयच्या कार्यक्रमात त्यांनी न दिलेले उत्तर ते आपल्या जवळच्या लोकांकडे दिले होते. तुम्ही बॅडमिंटन प्रशिक्षक का झाला नाहीत? त्यावर त्यांचे उत्तर होते : स्पर्धात्मक बॅडमिंटनमधल्या निवृत्तीनंतर प्रशिक्षक झालो असतो तर शास्त्रीय संगीत ऐकण्याच्या आणि शिकण्याच्या आनंदाला मुकलो असतो. बॅडमिंटन कोर्ट आणि नंतर नोकरीमधून बाहेर पडल्यानंतर नाटेकर यांनी पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले. एखाद्या छोट्या वयाच्या मुलाप्रमाणे ते शास्त्रीय संगीताची आराधना करत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा रियाज आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी चालणे आणि हलकासा व्यायाम सुरू होता. म्हणूनच ते नवद्दीच्या जवळ निरोगी जीवन जगू शकले…
आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमताना एकदा नाटेकर म्हणाले की, ‘आपल्या बॅडमिंटनच्या कारकीर्दीत काही जाहिरातीही चालून आल्या होत्या, पण बॅडमिंटनमधील कारकीर्द संपून जाईल असा सल्ला मला संघटनेकडून देण्यात आला. त्यांनी सांगितले की, सुभ्या (लेगस्पिनर सुभाष गुप्ते) आणि विल्सन जोन्स यांनी मला दोन जाहिराती दिल्या. ब्रिलक्रीमसाठी मला सहा महिन्यांची प्रतिमहिना ६०० रुपये व सहा बाटल्या अशी जाहिरीत मिळणार होती तर विक्स वेपोरबसाठी सहा महिन्यांची प्रतिमहिना ४०० रुपये आणि चार बाटल्या अशीही जाहिरात होती. मी भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या सचिवांकडे गेलो. तेव्हा त्यांनी मला हे न करण्याबद्दल सांगितले. त्यामुळे तू व्यावसायिक खेळाडू बनशील आणि तुझी हौशी बॅडमिंटनपटूची कारकीर्द संपुष्टात येईल, असा सल्ला त्यांनी मला दिला’.
नाटेकर हे क्रीडा आणि कला क्षेत्रात संचार करणारे मुसाफिर होते… आपल्याला मनाला भावेल तसे संपन्न जीवन ते जगले… साठच्या दशकात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये मराठी झेंडा अटकेपार नेणाऱ्या या अवलिया माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली…


 

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -