राष्ट्रवादी लेखक ग. त्र्यं. माडखोलकर

गजानन त्र्यंबक माडखोलकर हे प्रसिद्ध मराठी पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1899 रोजी मुंबईत झाला. गणित विषयात गती नसल्यामुळे ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, तथापि संस्कृत, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या दैनिक ज्ञानप्रकाशचे विभाग संपादक, नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रचे साहाय्यक संपादक अशा विविध नोकर्‍या केल्यानंतर नागपूरच्या नरकेसरी स्मारक मंडळाने काढलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले. एक पत्रकार या नात्याने त्यांनी तात्कालिक महत्वाच्या अनेक विषयांवर लेखन केले. प्रखर राष्ट्रवादी वृत्ती, वाङ्मय गुणांनी युक्त अशी प्रसन्न भाषाशैली आणि तर्कशुद्ध विवेचनपद्धती ही त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाची वैशिष्ठ्ये होती.

आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही कविता केल्या, यात संस्कृत काव्यरचनेचाही समावेश आहे. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या ‘उषा’ (१९२४) या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत. ‘देवयानी’(१९६४) हे त्यांनी लिहिलेले नाटक. ‘रातराणीची फुले’ (१९४०) आणि ‘शुक्राचे चांदणे’(१९४८) हे कथासंग्रह गाजले होते. १९३३ मध्ये ‘मुक्तत्मा’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर कांदबरीकार म्हणून त्यांना ख्याती लाभली. ‘भंगलेले देऊळ’(१९३४), ‘शाप’(१९३६), ‘कांता’(१९३९), ‘दुहेरी जीवन’(१९३९), ‘मुखवटे’(१९४०),‘नवे संसार’(१९४१), ‘नागकन्या’(१९४१), ‘डाकबंगला’(१९४२), ‘चंदनवाडी’ (१९४३), ‘प्रमद्वरा’ (१९४३), ‘अनघा’(१९५०), ‘स्वप्नांतरिता’(१९५३), ‘रुक्मिणी’(१९५९), ‘उर्मिला’(१९६३),‘सत्यभामा’(१९६८) इत्यादी कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. यांपैकी बर्‍याचशा कादंबर्‍या राजकीय स्वरूपाच्या आहेत. गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार त्यांच्या राजकीय कादंबर्‍यांतून प्रत्ययास येतो.

आधुनिक कविपंचक (१९२१) हे माडखोलकरांचे पहिले पुस्तक समीक्षात्मक होते.‘विलापिका’ (१९२७), ‘स्वैरविचार’ (१९३८), ‘माझे आवडते कवी’ (१९३९), ‘अवशेष’ (१९४०), ‘माझी नमोवाणी’ (१९४२), ‘जीवनसाहित्य’ (१९४३), ‘परामर्श’ (१९४३), ‘माझे आवडते लेखक’ (१९६५), ‘माझे लेखनगुरू’ (१९६५), ‘महाराष्ट्राचे विचारधन’ (१९७३), यांसारखे त्यांचे प्रबंध व लेखसंग्रह उल्लेखनीय आहेत. ‘दोन तपे’ (१९४६), ‘एका निर्वासिताची काहणी’ (१९४९), ‘मी आणि माझे साहित्य’ (१९६८), ‘मी आणि माझे वाचक’ (१९७२) ही त्यांची विशेष निर्देशनीय अशी आत्मपर पुस्तके.

अमेरिका, पश्चिम जर्मनी, इंग्लंड यांसारख्या देशांना भेट देण्याची संधी माडखोलकरांना पत्रकार या नात्याने मिळालेली होती. ‘मी पाहिलेली अमेरिका’ (१९६३) हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला. आपली लेखणी व वाणी त्यांनी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचारपसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडेही ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे. अशा या प्रसिद्ध लेखकाचे 27 नोव्हेंबर 1976 रोजी निधन झाले.