घरफिचर्ससमान न्यायसंगत "न्याय के भंवर में भंवरी"

समान न्यायसंगत “न्याय के भंवर में भंवरी”

Subscribe

मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित ‘न्याय के भंवर में भंवरी!’ या नाटकात स्त्री आणि पुरुष यांची समान न्यायसंगत व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आवाज उठवण्यात आला आहे. या नाटकात अश्मयुगीन काळापासून ते आतापर्यंतचा मानव जातीचा, पितृसत्ताक समाज पद्धतीचा संपूर्ण इतिहासच आपल्यापुढे उलगडत जातो. अश्मयुगामध्ये मातृसत्ता होती. तेव्हा स्त्री-पुरुष हे एकमेकांना पूरक होते आणि एकमेकांना Complement करत, निर्भेळ सहजीवन अनुभवत होते, जगत होते.

स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी कैक वर्षांपासून आपला देश करत आला आहे.स्त्री-पुरुष समानता म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न फार दिवस झाले मनात होता. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहुना आजवरचे माझे मत असे आहे की पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीला केवळ ‘वस्तू’ या दृष्टिकोनातून पाहिले जाते. ती आर्थिकदृष्ठ्या परावलंबी असते, शिक्षणापासून वंचित राहते. संपत्ती आणि अधिकारामध्ये तिला वाटा नसतो.

- Advertisement -

चूल आणि मूल ह्या संकल्पनेतून तिचे अस्तित्व सुरू होते आणि इथेच संपते(हे समाजातील तळागाळापासून ते एलिट क्लास असे सर्व स्तर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे).

हो मान्य आहे, आज असे चित्र आहे की शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ठ्या स्वाबलंबी होतेय, तिला अधिकारांमध्ये वाव मिळायला सुरुवात झाली आहे. ती सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. पण पायलट बनणे, इंजिनिअर होणे, equally काम करणे म्हणजे समानता का? स्त्री कितीही म्हटलं सबला झाली, जॉब करते; पण आपल्या समाजातील स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरंच बदलला आहे का?

- Advertisement -

स्त्रीने उत्तरोत्तर प्रगती केली, यशाची शिखरे गाठली. आज कितीतरी उच्च पदांवर स्त्रिया काम करत आहेत; पण तेवढ्याच प्रमाणात स्त्रियांच्या शोषणाच्या सूचना, घटनाही आपल्यासमोर तीव्रतेने येतात. याचा अर्थ इथे प्रश्न पदाचा नाही, प्रश्न आहे दृष्टिकोनाचा…खरंच समानतेचा दृष्टिकोन प्रत्येकात निर्माण झाला का? समानतेसाठी समान संधी प्रत्येक स्त्रीला मिळते आहे का?

‘सर्व पातळीवर समान संधी’ म्हणजेच शिक्षण, करिअर, अधिकार, कामाचे स्वरूप ह्यामध्ये समानता मिळणे? की स्त्रीला उद्देशून असणार्‍या विचारसरणीत समानता मिळावी, याचा आपण विचार करायला हवा. जसे आजही स्त्रियांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची मुभा नाही, आजही मुलं जन्माला घालण्याचा निर्णय स्त्रीच्या सहमतीने नसतो, आजही स्वतःच्या घराची लाडकी असून तिला तिच्याच संपत्तीच्या समान अधिकारापासून बेदखल केले जाते. समानतेच्या नावावर घोषणा देणारे, हे बारकावे पाहतात का? स्त्रीने घरचा उंबरठा ओलांडणे म्हणजे पुरोगामीत्व नाही, जेव्हा आपल्या सर्वामध्ये ‘7 च्या आत घरात’ असणारी पितृसत्ताक मानसिकता कायमस्वरूपी नष्ट होईल तेव्हा आपण खरे पुरोगामी होऊ. हा दृष्टिकोन जेव्हा रुजेल तेव्हा मनात, विचारात आणि व्यवहारात समानता दिसेल आणि खर्‍या अर्थाने देशात समानता येईल.
हा विचार घेऊनच, अर्ध्या लोकसंख्येचा आवाज होऊन पितृसत्ताक व्यवस्थेच्या शोषणाविरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची ललकारी देते नाटक ‘न्याय के भंवर में भंवरी!’

मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित या नाटकात स्त्री आणि पुरुष यांची समान न्यायसंगत व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आवाज उठवण्यात आला आहे. या नाटकात अश्मयुगीन काळापासून ते आतापर्यंतचा मानव जातीचा, पितृसत्ताक समाज पद्धतीचा संपूर्ण इतिहासच आपल्यापुढे उलगडत जातो.

अश्मयुगामध्ये मातृसत्ता होती. तेव्हा स्त्री-पुरुष हे एकमेकांना पूरक होते आणि एकमेकांना Complement करत, निर्भेळ सहजीवन अनुभवत होते, जगत होते. स्त्रीची इच्छा सर्वोपरी मान्य होती. एकंदरीतच हा काळ स्त्रीचे मातृत्व एक दैवी शक्ती आहे.. हा मानणारा होता. कारण तोपर्यंत पुरुषाला हे ज्ञान अवगत नव्हते की, प्रजनन प्रक्रियेमध्ये त्याचाही वाटा आहे.
उत्क्रांती काळात मानवाला शेती व पशूपालनाची कला अवगत झाली. बी टाकल्यानंतर झाड तयार होते, हे ज्ञान कालांतराने त्याला मिळाले आणि यामधून शेती करण्याची आणि शेतीकरण्याकरिता पशुचा वापर करण्याची कल्पना त्याला सुचली.

या कल्पनेमधून मानवाच्या जीवनात शेती आणि पशुपालन व्यवसाय सुरू होऊन मानवी संस्कृतीच्या विकासाकडे मानव वळत गेला. पशूंच्या लैंगिक व्यवहाराकडे पाहून पुरुषाला ज्ञात झाले की, स्त्री माझ्याशिवाय मुलाला जन्म देऊ शकत नाही.

मग पशुपालनापासून शेती, शेतीतून जीवन व्यवहार, व्यवसाय आणि व्यवसायातून संपत्ती! या संपत्तीच्या विकाराने माणसाचा मर्द झाला (इथे मर्द ही मी पितृसत्ताक वर्चस्ववादाची घोर शोषणकारी मानसिकता म्हणते आहे.)

हे संपत्तीचे भूत जेव्हा या मर्दच्या डोक्यात गेले तेव्हा तो असुरक्षित झाला. असुरक्षा स्वतःची, संपत्तीची आणि आपली संपत्ती दुसरा पुरुषच बळकावील याची भीती कायम त्याला सतावत होती. मी मिळवलेली संपत्ती केवळ माझीच कशी राहील, ही माझी संपत्ती माझ्याचसारख्या पुरुषाला म्हणजे माझ्या वारसाला कशी मिळेल यासाठी त्याने सर्वात आधी स्त्रीला गुलाम केले. चार भिंतीची गुलामी मानसिक गुलामीदेखील झाली, स्त्रीने व्रतवैकल्ये उपवास करावेत, सर्व धार्मिक कार्ये रीतीप्रमाणे पार पाडावीत.

रुढीवादी परंपरांचे निर्वाहन तिनेच करायचे, परंतु त्यामध्येसुद्धा धार्मिक कार्य-विधी करणे ही मर्दची मक्तेदारी आहे आणि वेदपुराणात यांचे दाखले दिले जातात. पितृसत्तेच्या व्यवस्थेला या नाटकाने आव्हान दिले आहे. हे आव्हान मानवी संस्कृती आणि सभ्यता या दोघांची अदृश्य बाजू दर्शवते.

आजही भारतात एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के स्त्रिया आहेत आणि या निम्म्या लोकसंख्येला आजही शिक्षण, आरोग्य, नोकरी, आर्थिक स्वावलंबन या सर्वच क्षेत्रामध्ये मागे ठेवले जाते. स्त्रियांना फक्त कुटुंबामध्येच नाही तर एकूण समाजातच दुय्यम स्थान आहे. आपल्या सामाजिक जडणघडणीमध्ये स्त्रीची भूमिका ही एकाच पद्धतीने रंगवलेली आढळते. स्त्री ही उदात्त कुटुंबातील सदस्यांच्या उन्नतीसाठी त्याग करणारी, इतरांसाठी स्वतःला बाजूला ठेवून सर्वांसाठी झटणारी. ती आणि तिची भूमिका समाजाने तिच्या जन्मापासूनच ठरवलेली आढळते.

वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या मर्द मानसिकतेने शोषणकारी बेड्या स्त्री जीवनाभोवती निर्माण केल्या, या सार्‍याला झुगारून एक स्त्री या पितृसत्ताक व्यवस्थेला ललकारते, त्याच्या अन्याय-शोषणाचा विरोध करते अशा राजस्थानच्या ‘भंवरीदेवीचा’ जीवनानुभव या नाटकात लेखकाने मांडला आहे.

या नाटकात भंवरीदेवीची भूमिका बबली रावत या सशक्त आणि अनुभवी अभिनेत्रीने केली आहे. त्यांनी या नाटकात केवळ अभिनय केला नाही तर त्या भंवरी जगल्या आहेत. त्यांनी आपल्या अभूतपूर्व अभिनयातून राजस्थानी भाषेचा लहेजा तसेच एक प्रतिकात्मक पोलादी स्त्री प्रेक्षकांसमोर उभी केली आहे.

या नाटकातील भंवरी वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिक मानसिकतेचं सत्य उघड करते. आपल्या देशातील स्त्री विषयीची समज असो वा पोकळ संस्कृतीतील अनिष्ट प्रथा असो या सार्‍यावरच प्रश्न उचलून विचारमंथन करण्यास प्रेरित करते.खरंतर या पितृसत्ताक समाज व्यवस्थेचे-स्त्री आणि पुरुष दोघेही शिकार आहेत. या व्यवस्थेत स्त्री आणि पुरुष दोघेही भरडले जात आहेत, हे ती सांगते. फरक इतकाच की पुरुषांचे शोषण थेट दिसून येत नाही. जसे आपल्याकडे ऐन पंचविशीत मुलगा येतो तेच त्याच्या मागे अख्या घराची जबाबदारी थोपवून त्याची इच्छा असो अथवा नसो तरी त्याला नोकरी करणार्‍यास भाग पाडले जाते. मुलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर काय मुलींसारखा रडतोस असे हिणवून त्यांच्या मानवी संवेदनांचा गळा घोटला जातो. म्हणून पुरुष रडत नाहीत किंवा व्यक्त होत नाहीत, यामुळे पुरुषांत हार्टअटॅकचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच हे नाटक स्त्री आणि पुरुष यांच्याशी निगडित पितृसत्ताक भारतीय समाजाची मानसिकता, बंधन, परंपरा, समज यांना मुळापासून नाकारते. हे नाटक पाहून प्रेक्षकांनी, आपली सामाजिक जडणघडण अशी आहे हे पाहून त्यांचे मन द्रवले. काहींनी आपले स्वानुभवदेखील व्यक्त केले.

असे विषय नाटकांतून प्रस्तुत होणं आवश्यक आहेत, हे विषय नाकारून चालणार नाहीत असे अनुभव ही प्रेक्षक संवादातून समोर आल्या. आजही आपल्या देशात, समाजात अशा कितीतरी भंवरी आहेत ज्या आपल्या अधिकारांसाठी आणि न्यायासाठी लढत आहेत. अशा प्रत्येकीसाठी हे नाटक उत्प्रेरक म्हणून त्याची भूमिका निभावते.

सक्षमतेची सुरुवात आधी स्वतःपासून होते…एक स्त्री जेव्हा सक्षम होते तेव्हा परिवारही सक्षम होतो आणि परिवारासोबत समाजही सक्षम होतो… आणि जसजसा समाज आपल्या नवीन सकारात्मक आणि रचनात्मक निर्माणाच्या दिशेने मार्गक्रमण करतो, देश आपोआप सक्षम होऊन जातो. म्हणून हे अनिवार्य आहे की देशातील स्त्रियांनी सक्षम होणे. कारण जेव्हा स्त्री प्रगतीशील असते तेव्हा तो देश खर्‍या अर्थाने प्रगत आणि विकसित होतो.

-अश्विनी नांदेडकर (रंगकर्मी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -