घरफिचर्स‘ब्लॅक कॉमेडी’चा परिणामकारक विस्फोट

‘ब्लॅक कॉमेडी’चा परिणामकारक विस्फोट

Subscribe

बर्‍याचदा आपल्याला विनाकारण होणारा वाद आणि मनस्ताप टाळण्यासाठी अनेक गोष्टी सहन करण्याची सवय लागलेलीअसते. मुळात तो आपला कार्यकारणभाव असतो. ज्याद्वारे आपली बाजू कितीही बरोबर असली तरी माघार घेण्याची सवय झालेली असते. शिवाय वेळोवेळी अशा प्रकारचा व्यवहारी विचार केल्याने आपला वेळही वाचलेला असल्याने त्यावरच आपला भर असतो. मग कधीतरी या आगाऊ विनम्रतेच्या परिसीमेला पोचल्यावर आपल्या सहनशक्तीचा विस्फोट होतो, जे स्वाभाविक असते.

परिणामी आपण आजवर सहन केलेल्या सर्व गोष्टींचा राग जणू एका विशिष्ट बाबीवर केंद्रित करून सदर गोष्टीचा प्रतिकार करू लागतो. ‘आय डोन्ट फील अ‍ॅट होम इन धिस वर्ल्ड एनीमोअर’ हा चित्रपट मुख्यतः याच गोष्टीभोवती फिरतो. म्हणजे चित्रपटातील मध्यवर्ती पात्राच्या एरवी नको तितक्या सहनशील व्यक्तिमत्त्वातील सहनशीलतेचा अंत साधला जातो. ज्यातून अनपेक्षितपणे तिच्या आयुष्यात हिंसेचा झालेला समावेश आणि तिच्या कृत्यांचे परिणाम म्हणून समोर येणारे नाट्य घडते. रुथ (मेलनी लिन्स्किी) या नर्सिंग असिस्टंटच्या आयुष्यातील इतर कुठल्याही दिवसाप्रमाणे असलेल्या एका दिवशी आपण तिला पाहू लागतो. मात्र हळूहळू त्या दिवशी अनपेक्षित घटनांची रांग लागते. त्यातही इतरांच्या चुका सांभाळून घेत, आपले जीवन शांतपणे व्यतीत करणार्‍या या ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ संकल्पनेचं जणू सत्यातील रूप म्हणाव्या अशा नायिकेशी आपला अजूनच जवळून संबंध येतो. आधीच वाईट परिस्थितीत पार पडलेल्या याच दिवशी तिला घरी पोचल्यावर कळतं की आपल्या घरात चोरी झाली आहे. ज्यानंतर खर्‍या अर्थाने घटनाक्रमाला सुरुवात होते.

आपल्या स्वभावाला अनुसरून रूथ पोलिसांना पाचारण करते. एका विक्षिप्त अधिकार्‍याशी गाठ पडल्यावर इथून आपल्याला काहीच साध्य होणार नाही हे तिच्या लक्षात येते. मग मात्र ती स्वतःच आपला चोरीला गेलेला लॅपटॉप, आजीचे दागिने आणि स्वतःच्या मानसिक तणावासाठीच्या गोळ्यांचा शोध घेण्यास सुरुवात करते. दरम्यान तिची गाठ टोनीशी (एलाया वुड) पडते. आणि दोघांच्या एकत्र काम करण्यातून एकाच वेळी थरारक आणि हास्यास्पद ठरतील अशा घटनाक्रमाला सुरुवात होते.ब्लॅक कॉमेडी हा फार विचित्र आणि त्याच वेळी योग्यरित्या हाताळला तर परिणामकारक ठरणारा चित्रपट प्रकार आहे. या माध्यमातून अतरंगी आणि अतिशयोक्तीपूर्ण पात्रं तसेच घटनांच्या पार्श्वभूमीवर समकालीन तथा तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचे चित्रण केल्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यात सोबतीला क्राइम-थ्रिलर पटाची जोडी असेल तर सोन्याहून पिवळे ! कोएन ब्रदर्स, मार्टिन मॅक’डोना, क्वेंटिन टॅरंटिनोसारख्या लेखक-दिग्दर्शकांनी तर अशा चित्रपटांसाठीचा बेंचमार्क अजूनच वाढवून ठेवला आहे.हा चित्रपटही वाढती हिंसा, शासकीय यंत्रणांचा नको तितका संथ कारभार, एकाकीपणाची भावना वाढीस लागणे या आणि अशाच इतर समकालीन गोष्टींना हात घालत समोर आलेली समस्या प्रखर आणि जहाल पद्धतीने हाताळणारी मध्यवर्ती पात्रं उभी करतो. ज्यांच्याशी वेळोवेळी नातं सांगत सहमत होता येतंच असं नाही. मात्र त्यांच्या भावना सच्च्या असल्याने आणि ती ज्या भोवतालात वावरत आहेत तो खरा भासणारा असल्याने त्यांच्या कृती कुणीही अंमलात आणू शकेल इतक्या खर्‍या वाटतात. शिवाय आपणही अशाच सामाजिक-मानसिक तणाव असलेल्या परिस्थितीत आणि जगात वावरत आहोत हेही उघड आहे.

- Advertisement -

‘आय डोन्ट…’मध्ये इन्ट्रोवर्ट व्यक्तींच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचे परिणामकारकपणे चित्रण करणारी बरीच दृश्यं आढळतात. त्यात एखाद्या व्यक्तीला ओळख होताक्षणीच चांगले समजून बोलत असतानाच त्यांनी नको ती कृती करण्याच्या अगदी साध्या म्हणाव्याशा स्वाभाविकतेवर आधारित एक दृश्य आहे. ज्यात रूथ एका बारमध्ये बसलेली असताना शेजारी बसलेला एक अनोळखी माणूस (चित्रपटाचा दिग्दर्शक मार्कन क्लेर) ती वाचत असलेलं पुस्तक पाहून खूश होते. ज्यानंतर तो तिच्याशी संवाद साधू लागतो. आपल्यासारखेच विचार असणारी व्यक्ती पाहून साहजिकच तिला आनंद होतो. मात्र समोरील व्यक्ती रूथ वाचत असलेल्या पुस्तकातील रहस्य सांगून स्पॉयलर देतो आणि तिचा रसभंग करून निघून जातो. या साध्या म्हणाव्याशा दृश्यातून केवळ रूथच्या मानसिकतेचीच कल्पना येत नाही तर पुस्तकं आणि चित्रपट-मालिकांमध्ये गुंतणार्‍या एका सबंध पिढीचे मर्म मांडले जाते. असो. आणखी काही लिहून, चित्रपट स्पॉइल करून दिग्दर्शकाप्रमाणे शिव्यांचे भागीदार व्हायला नको. ‘आय डोन्ट फील अ‍ॅट होम इन धिस वर्ल्ड एनीमोअर’ हा ब्लॅक कॉमेडी प्रकाराच्या चाहत्यांनी टाळू नये असा चित्रपट आहे. तो वैचित्र्यपूर्ण असला तरी परिणामकारक आहे. मुख्य म्हणजे समाजातील हिंसेचे सार्थ चित्रण करणारा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -