घरफिचर्सनवी गाणीही जुन्यांना आवडू शकतात!

नवी गाणीही जुन्यांना आवडू शकतात!

Subscribe

आज आम्ही काही मंडळी साठीला आलेलो असलो तरी तरणीताठी गाणीही आम्हाला आवडतात. तरणीताठी म्हणजे आजच्या तरण्याताठ्या मुलांची गाणी. तरण्याताठ्या मुलांची म्हणजे तरण्याताठ्या गायकांची, संगीतकारांची, गीतकारांची गाणी. मुळात गाण्यात असा भेदभाव करायचं काही कारण नाही. गाणं जर सर्वांगसुंदर असेल तर ते चिरतरूण राहतंच. म्हातार्‍या देहावरही ते तारूण्याचा शहारा आणतं आणि तरुणांनाही आपली दखल घ्यायला लावतं. एकेकाळी ’अलबेला’ हा सिनेमा पार म्हातारा झाला होता, अडगळीत पडला होता, मोडीत निघाला होता. पण ‘आय अ‍ॅम अ डिस्को डान्सर’ म्हणणार्‍यांच्या काळात हा सिनेमा पुन्हा उगवला आणि डिस्को वगैरे डान्सच्या कोंडाळ्यात त्याने ‘भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे’, ‘शोला जो भडके, दिल मेरा धडके’, ‘शाम ढले, खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो’ वगैरे गाण्यांवर फेर धरायला लावला. ’आय अ‍ॅम अ डिस्को डान्सर’ या त्या काळातल्या अतिअत्याधुनिक गाण्याला त्याने मागच्या रांगेतली खुर्ची पकडायला लावली.

चकचकीत, झगझगीत कपड्यातल्या हायफाय मॅड्डमांमध्ये सुरेख सुंदर नऊवारी नेसलेली साधीभोळी ललना खुलून दिसावी तशी ही गाणी त्या काळात उठून दिसली. त्या गाण्यांनी जेव्हा डिस्कोच्या त्या काळात पुनरागमन केलं तेव्हा डिस्कोला भुललेली तरूण मुलंमुलीही त्या गाण्यांवर दिलोजानसे फिदा झाली. ‘अलबेला’तल्या त्या गाण्यात खरंतर साधासरळ बाज होता, लग्नाच्या वरातीत किंवा गोकुळाष्टमीला निघणार्‍या गोविंदांच्या मिरवणुकीतला तोच भोळाभाबडा ठेका होता, पण तरीही तेव्हाच्या तरुणाईने तोच ठेका प्रचंड बहुमताने पसंत केला आणि डिस्कोच्या झगमगाटाचा दारूण पराभव झाला. ‘अलबेला’तल्या त्या गाण्यात दिलखेचक असा कोणताही मालमसाला नव्हता, पण त्यात पब्लिकला खेचून आणण्याची आणि धरून ठेवण्याची धमक होती. सांगायचा मुद्दा हा की तुमच्या संगीतात, गाण्यात मुदलातच जर काही असेल तर ते गाणं दोन्ही पिढ्यांना आवडतं आणि कोणत्याही काळात तरूण राहतं.

- Advertisement -

लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, महंमद रफी, किशोरकुमार ते व्हाया सुरेश वाडकर आजच्या सोनू निगमपर्यंत कितीतरी गाणी अशी आहेत की ती काळाच्या कसोटीवर जुनी ठरलेली असली तरी आजही ती गाणी तरूणाईला साद घालताना दिसतात…आणि तरूणाईही ती गाणी गाऊन आपलं गाण्यातलं कौशल्य दाखवण्यासाठी आसुसलेली असते. तरूणाई या गाण्यांसाठी कशी आसुसलेली असते हे दाखवण्यासाठी एकाच गोष्टीचं उदाहरण देता येईल ते म्हणजे आजचे सगळ्याच भारतीय भाषांमधले रिअ‍ॅलिटी शोज्. ह्या सगळ्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये सहभाग घेणारी आजची तरूण पिढी जास्तीत जास्त जुन्या काळातली गाणी गाते. तेही जुन्या काळातल्या गाण्यांचं प्रमाण असतं 85% तर नव्या काळातल्या गाण्यांचं प्रमाण असतं 15%. खरं तर ही तरूण मुलं जन्मालाही आलेली नसतात त्या काळातली ही गाणी असतात. पण त्यांना ही गाणी चिरतरूण वाटत असतात. रिअ‍ॅलिटी शोतल्या स्पर्धेमध्ये आपल्यातल्या गायकीचा कस दाखवण्यासाठी त्यांना तीच गाणी योग्य वाटत असतात.

अगदी अलिकडचीच गोष्ट आहे. हिंदीतल्या अशाच एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये एक चौदा-पंधरा वर्षांची मुलगी गात होती आणि तिच्या गाण्याचे शब्द होते – क्यूं जिंदगी के राह में मजबूर हो गये, इतने हुए करीब के हम दूर हो गये. चित्रा सिंगनी गायलेलं हे मूळ गाणं 1982च्या काळातलं आहे, म्हणजे ती मुलगी जन्मालाही यायच्या वीस-बावीस वर्षं आधीचं. पण आपल्या काळातली गाणी सोडून तिला तेच गाणं गावंसं का वाटावं!…कारण तिच्या आवाजातला आरपार दर्द दाखवण्यासाठी तिला तिच्या काळातलं गाणं जवळपासचं वाटलं नसावं. ’क्यूं जिंदगी के राह में मजबूर हो गये’ हे गाणं मानलं तर त्या काळातलं तसं थोडंफारच गाजलेलं-वाजलेलं गाणं. पण चौदा-पंधरा वर्षांच्या त्या छोकरीला ते गाणं भावलं, कारण ते गाणं तिला तिच्या काळातही तरूण वाटलं.

- Advertisement -

त्याच शोमध्ये दुसर्‍या एका तरूण मुलीने कोणत्या गाण्याची निवड केली तर ती ’कांटों से खिंच के ये आंचल, तोड के बंधन बांधे पायल’ या देवानंद-वहिदा रेहमानच्या ’गाईड’ सिनेमातल्या गाण्याची. त्या मुलीने गाताना जो आजच्या काळातला अल्ट्रामॉडर्न पेहराव केला होता त्यावरून ती आजच्या काळातल्या रणवीर-दिपिका जमान्यातली वाटत होती, पण तिनेही गाण्यासाठी आजच्या रणवीर-दिपिका जमान्यातलं एकही गाणं न निवडता सरळ ‘गाईड’च्या गाण्यालाच हात घातला होता आणि ते गाताना ‘आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने कर इरादा है’ असं म्हणत ऐकणार्‍याच्या काळजालाही हात घातला होता. या मुलांना मागच्या काळातल्या गाण्यांचं त्यांच्या काळातल्या गाण्यांपेक्षा इतकं आकर्षण का वाटत होतं, याचं उत्तर ते गात असलेल्या गाण्यांच्या दर्जामधून थेट मिळत होतं. त्या गाण्यांच्या, त्या संगीताच्या काळाला संगीताचा सुवर्णकाळ का म्हटलं जातं, ते तर अशा वेळी अधिक प्रकर्षाने कळत होतं.

अलिकडेच एका ऑर्केस्ट्राला गेलो असतानाही असाच काहीसा वेगळा अनुभव आला. तसं ऑर्केस्ट्रात आजही जुनीच म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, महंमद रफी, किशोरकुमार यांच्याच काळातली आणि यांचीच गाणी गायली जातात…आणि त्यातही गंमतीदार गोष्ट अशी की दोन-चार बुजूर्ग मंडळी सोडली तर वादक-गायकांपैकी बहुतेक लोक तसे तरूणच असतात. यातही विशी-पंचविशीतले तरूण-तरूणी मुकेशदांचं ‘जल बिन मछली’मधलं ’तारों में सज के’, किशोरदांचं ’मेहबुबा’मधलं ’मेरे नैना सावन भादो’, महंमद रफींचं ’पत्थर के सनम’मधलं ’पत्थर के सनम’, लता मंगेशकरांचं ’जागते रहो’मधलं ’जागो मोहन प्यारे’, आशा भोसलेंचं ’बंदिनी’मधलं ’ओ पंछी प्यारे’, सुमन कल्याणपुरांचं ’एकटी’ या मराठी सिनेमामधलं ’लिंबलोण उतरू कशी’ अशी तो तो काळ गाजवलेली गाणी गातात. हे ऑर्केस्ट्रे हाउसफुल्ल जात असतात. अर्थात, ते महिन्या-दोन महिन्याने होत असतात हा भाग वेगळा, पण तरीही त्यांना गर्दी होत असते हे विशेष! इथे एक गोष्ट सांगायला हवी की या ऑर्केस्ट्राला येणार्‍या वर्गाचा वयोगट बराचसा पन्नाशी-साठीकहे झुकलेला असतो. पण त्यातही काही चुकार दर्दी तरूण दिसून येतात.

यातही आशा भोसलेंच्या बाबतीतला एक किस्सा आवर्जुन सांगण्यासारखा आहे…काही वर्षांपूर्वी आशा भोसलेंचं गाणं आलं होतं. ‘जानम समझा करो’ अशा शब्दांतलं. मजरूहजींनी लिहिलेलं. हे गाणं आशा भोसलेंच्या काळातल्या लोकांनी जेवढं डोक्यावर घेतलं नाही तेवढं ते नव्या पिढीने उचलून धरलं. आशा भोसलेंनी हे गाणं स्टेजवरून गायल्यावर तरूण पिढीने त्या गाण्याला सरसरून दाद दिली. खुद्द आशा भोसलेंनाही त्याचं आश्चर्य वाटलं आहे आणि त्यांनी ते जाहीररपणे बोलून दाखवलेलं आहे.

असाच एक किस्सा आहे तो ‘फनाह’ मधल्या ’चांद सिफारिश जो करता हमारी’ या गाण्याचा. ऑर्केस्ट्रातून शक्यतो आजच्या काळातली गाणी पेश केली जात नाहीत. कारण ऑर्केस्ट्राच्या आयोजकांनी ऑर्केस्ट्राला तरूण मंडळी फिरकणार नाहीत हे गृहित धरलेलं असतं. त्यातही ’चांद सिफारिश जो करता हमारी’ हे गाणं त्याचा कोरस वगैरे लक्षात घेता ऑर्केस्ट्रातून गाणं म्हणावं तितकं सोपं नाही. शिवाय ते तसं आजच्या काळातलं, आजच्या पिढीचं आहे. पण तरीही ते गाणं आजच्या एका ऑर्केस्ट्रात गायलं जातं. त्याचं एकमेव कारण ते गाणं जरी आजच्या काळात जन्माला आलेलं असलं तरी ते गाणं जेव्हा कानावर पडतं तेव्हा ते आपल्या मनाचा कब्जा घेतल्याशिवाय राहत नाही. त्या गाण्यातला तो दिलखेचक ठेका, गाण्यातलं गूढगंभीर, पण तरीही मिठ्ठास वातावरण ऐकणार्‍याचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय आणि गाणं ऐकल्यानंतर बराच काळ मनात रेंगाळल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच या गाण्याला आज तशाच एखाद्या रसिक ऑर्केस्ट्रात आवर्जून स्थान मिळतं. हे गाणं फक्त नव्या पिढीचंच राहत नाही तर जुन्या पिढीलाही ते भुरळ घालतं.

थोडक्यात काय तर गाण्यात नवं-जुनं हे काळाचं परिमाण असतं, पण गाण्यात जर तसाच गोडवा असेल तर हे परिमाण कधीच गळून पडतं. जुन्या मंडळींना तसंच एखादं नवं गाणं भावलं तर त्या गाण्यासाठी ते नक्की जीव टाकतात हे नव्या मंडळींनी लक्षात घ्यायला हवं! शेवटी गाणं तेच असतं जे ऐकल्यावर गुणगुणावंसं वाटतं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -