घरफिचर्सअशी असते कविता ... !

अशी असते कविता … !

Subscribe

आता कवितेतल्या भागलेल्या चांदोबाची गट्टी संपते आणि ‘तोच चंद्रमा’ शांताबाईच्या कवितेतून पुन्हा नव्याने भेटण्यास येतो. तेव्हा त्याच्या सोबत अजून कुणाची तरी सोबत हवीहवीशी वाटू लागते. कविता अशी माणसांची, त्याच्या वयाबरोबर अखंड सोबत करत आलीय.

महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेल्या या कवितेने अखिल विश्वाला मानवी कल्याणाचा, महामंत्र दिला. तिने माणसांचे जीवन उजळून टाकले. कवितेचा नाद नाद सोपा नसतो. त्यासाठी खूप मोठी साधना लागते. जीव जाळून घ्यावा लागतो. रक्त आटवावे लागते. प्राणांतिक वेदनेतून, कोणत्यातरी उत्कट आसेतून तिचा जन्म होतो. कोणतेही व्यावहारिक अनुषंग कवितेच्या निर्मितीला मानवत नाहीत. अशा व्यावहारिक अनुषंगाने निर्माण झालेली कविता कृतक असते. तिला कविता तरी कसे म्हणावे. ती कारागिरी असते. शब्दांना शब्द जोडून, कविता येत नाही.

मानवी मनाच्या सर्वात जवळ असते ती कविता. ती प्रथम केव्हा भेटली… गोष्टीच्या आधी की नंतर? हे नेमके सांगता येत नाही. पण मागेपुढेच, अगदी बालपणात कविता आणि कथा आपल्या हातात हात घालून आपली सोबत करत आल्या..चिऊ-काऊच्या गोष्टीच्या सोबतीने जसे आपले भरण पोषण झाले. तसेच कवितेच्या नादाने आपण आईच्या मांडीवर विसावलेलो असतो. नंतर वाढत्या वयाबरोबर तिचेही रूप बदलत जाते. आता कवितेतल्या भागलेल्या चांदोबाची गट्टी संपते आणि ‘तोच चंद्रमा’ शांताबाईच्या कवितेतून पुन्हा नव्याने भेटण्यास येतो. तेव्हा त्याच्या सोबत अजून कुणाची तरी सोबत हवीहवीशी वाटू लागते. कविता अशी माणसांची, त्याच्या वयाबरोबर अखंड सोबत करत आलीय. अगदी माणसाच्या पहिल्या श्वासापासून ते त्याच्या विसाव्या पर्यंत ! एक एक पाऊल केवढा प्रयास होता, ‘घरापासुनी स्मशान इतुका प्रवास होता,’ कविता अशी अवघ्या मानवी जीवनाला कवेत घेऊन चालत असते.ती निजवते, पहाटच्या उगवत्या चांदणीच्या साक्षीने अवघ्या जगाला जागी करते. हसवते, रडवते, उधाणलेल्या मनाने कोणाला तरी साद घालते. संताच्या वाणीतून झंकारते, शाहिरांच्या कवनातून गर्जते तर पंडिताच्या अलंकृत वाणीतून निनादत मोहित करते. असे असले तरी कविता सर्वार्थाने समजलेली माणसे विरळच असतात. ती ज्ञानदेवांना आकळली, त्यांनी तिला जोखले, तिला परतत्वाचा स्पर्श देऊन भक्तीच्या रंगात न्हावू घातले. तुकोबांनी तिला भक्ती बरोबरच लौकिकतेच्या वळणावर आणून ठेवले. तिला परखड बनवून लोकमानसात घर करून दिले. आणि लोकांच्या ओठावर ती रुळू लागली.
महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेल्या या कवितेने अखिल विश्वाला मानवी कल्याणाचा, महामंत्र दिला. तिने माणसांचे जीवन उजळून टाकले. कवितेचा नाद नाद सोपा नसतो. त्यासाठी खूप मोठी साधना लागते. जीव जाळून घ्यावा लागतो. रक्त आटवावे लागते. प्राणांतिक वेदनेतून, कोणत्यातरी उत्कट आसेतून तिचा जन्म होतो. कोणतेही व्यावहारिक अनुषंग कवितेच्या निर्मितीला मानवत नाहीत. अशा व्यावहारिक अनुषंगाने निर्माण झालेली कविता कृतक असते. तिला कविता तरी कसे म्हणावे. ती कारागिरी असते. शब्दांना शब्द जोडून, कविता येत नाही. कला आणि कारागिरी creation आणि craft यातला हा तर मूलभूत फरक असतो. तो समजला पाहिजे. काही प्रतिभावंताना तो कमालीचा समजला होता. कविता त्यांच्या मनात, त्यांच्या ओठावर होती. आपल्या जनाबाईप्रमाणे ‘दळीता, कांडिता’ ती उत्कटतेने आपली वाट शोधत प्रकाशमान झाली. जी कविता आपल्या लोकभाषेचा, लोकोक्तीचा एक भाग बनून अखंड सोबत करत राहते ती कविता आणि ते कवी किती थोर असतात. असे थोर कवी मराठीने खूप दिले. त्यात आपले संत तर आहेतच, पण आधुनिक काळातील आपल्या बहीणाईने तिला किती मोठे केले. या साध्या, उत्कटतेने स्फुरलेल्या, अनलंकृत कवितेने जीवनाचा सारा आशयच रोजच्या शब्दातून कवेत घेतला. या कविता पाहूनच म्हणावे लागते ‘राजा अशी असते कविता’.
अलीकडे कविता करणे खूप सोप्पे झालेय. काही तथाकथित कवींचा आणि उत्साही तरुणांचा हा सार्वत्रिक समज झालाय. मलाही कवितेने असाच चकवा दिलाय. आज माझ्याच कविता प्रगल्भतेच्या जेव्हा मी प्रगल्भतेच्या वळणावरून वाचतो तेव्हा ती कविता माझ्याकडे पाहून हसताना मला ती दिसते. अनेक नामवंत लेखक प्रारंभी कवितेतून अभिव्यक्त झाल्याचे माझ्या ऐकिवात आहे. पण पुढे त्यांचेही कवितेचे बोट सुटलेले दिसते. भल्या भल्यांना कवितेने असे थकवलेले असते.
आज अनेक शहरात, हौशी कवींची मंडळे उदयाला आलीत. काही कवी मंडळे व्यावसायिकही झालीत. वर्षाकाठी हौशी कवींना गळाला लावून एखाद्या कार्यालयात किंवा पर्यटन स्थळी अशा कवींची संमेलने होतात. त्यांच्याच वर्गणीतून त्यांचा संग्रह त्यांना भेट मिळतो आणि ही सहल करून ते सुखेनैव स्वगृही परत आलेले असतात, ते पुढील संमेलनाचे निमंत्रण घेऊनच. काही वर्षापूर्वी असे अनेक कविता मंडळे स्थापित झाली. त्यात काव्यविषयक चर्चा घडत, त्यातून अनेक नामवंत कवी उदयास आले. रविकिरणमंडळ हे त्यातले एक अग्रणी नाव. पण असे चित्र आज दिसत नाही. आजची कवी मंडळे, त्यांची उजेडात येण्यासाठी चाललेली धडपड पाहिली की कीव येते. अशा सुमार लोकांनी कवींना पुरते बदनाम केलेय. कविता ही तिच्या जागी स्थिरच असते. त्या कवीचा खरा चेहरा ती दाखवत असते. दिखाऊपणा त्यांच्या कवितेत ठासून भरलेला असतो. सच्ची कविता कधी दिखाऊ नसते. ती प्रचार करत नाही. पण हा काळच मार्केटिंगचा असल्याने अनेक कवी स्वत:चे जोरदार लॉचिंग आणि मार्केटिंग करतात. असे कवी व्यासपीठावर भले टाळ्या घेत असतीलही; परंतु त्यांची कविता लोकमानसात प्रतिष्ठीत होत नाही.
मुळात कविता हा प्रकार खूपच निसरडा, टोकदार आणि माणसाला सर्वार्थाने एक्स्पोज करणारा असतो. इतर साहित्य प्रकारात लेखकाला कशाच्या आड तरी लपता येते, कवितेत मात्र तशी जागा नसते. कविता त्या कवीला सर्वार्थाने उघडे करत असते. तो दोष त्या कवितेचा नसतो. कविता त्या निर्मात्याकडे सखेद हासून त्यालाच वाकुल्या दाखवत असते’. म्हणत असते. हे बघ बेट्या! वाटते तितकी मी सोपी नाहीय रे. माझ्या नादापायी अनेकांचे आयुष्य वैराण झालेय. त्यांनी सर्व आयुष्य पणाला लावले तेव्हा कुठे त्यांना माझी प्रचीती आली. तुम्ही तर किती सवंगतेने माझ्याकडे पाहातायत. मुळात कोणतीही लेखनकृती ही अत्यंत गंभीरतेने करावयाची बाब असते. त्यातच समाजमाध्यमासारखी अभिव्यक्तीची सुलभ साधने हाताशी आल्याने तर या माध्यमावर कवींचा धुमाकूळ चाललेला. पण यातली कोणती कविता लोकांच्या मनाला, काळजाला भिडते? हा प्रश्न अलहिदा. त्यामुळे जी निरंतर लोकांच्या मनात, हजारो वर्ष टिकून रहाते ती सच्ची कविता असते. काही सन्माननीय अपवाद वगळले तर खरी कविता आज भेटत नाही. दर्जेदार कविता स्वयंप्रकाशित असते. तिला उजेडाची पेरणी करावी लागत नाही. ती आपसूकच लोकांच्या मनात ठाण मांडून बसते. तिला ना मिरवायची हौस असते ना गौरवाची प्रतीक्षा ! बहिणाबाईची कविता त्यांच्या पश्चात अजूनही तगून आहे ती तिच्यातील मौलिकतेमुळे. ते बावनकशी सोने आहे. मनाच्या गाभार्‍यातून भिजून आलेले अनुभव, शब्दांचे विविध आकार घेऊन अकुंरतात, फुलतात, तेव्हा खरी कविता मूर्तिमंत होत असते. ती हृदयाची भाषा असते ते यामुळेच ! तिच्या निर्मितीच्या मागे वेदनेचे आकाश असते, अस्वस्थतेचे घनव्याकूळ मळभ असते. आशा -निराशेचे ,हर्ष-खेदाचे जमलेले ढग असतात. अशा अनुभवांना मोकळे करत ती अर्थाचे अनंत अवकाश कवेत घेत, काही तरी सांगत असते. जे हजारो शब्दात मावत नाही, ती कवितेची एकच ओळ सांगून जाते. अर्थाची अनेक वलये मनात निर्माण करून, ती माणसाला वेदनेचा, आनंदाचा डंख करते. त्यासाठी किती वेणा द्याव्या लागतात, हे महान कवींची कविताच आपणास सांगत असते. असे जेव्हा घडते तेव्हाच एखादा कवी सर्वार्थाने आपल्या कवित्वाचा गौरव करू शकतो. बाकी उडदामाजी काळे -गोरे असतेच .
जेव्हा काही नवोदित कवी आपल्या कविता घेऊन दाखवायला येतात, तेव्हा त्यांना निराश करता येत नाही; पण म्हणावेसे वाटते ‘राजा अशी नसते रे कविता ! कविता कशी असते यासाठी तू ग्रंथालयात जा. शोध, तुला चांगली कविता तिथे नक्कीच भेटेल . तेव्हा तुला कळेल, अशी असते कविता .. !!

- Advertisement -

डॉ. अशोक लिंबेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -