Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग सुखात्मे

संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग सुखात्मे

Related Story

- Advertisement -

डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे हे प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांना १९७१ साली भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा हातभार होता. डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म २७ जुलै १९११ रोजी महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील बुध गावात झाला. १९३२ मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून गणित विषयात पदवी मिळवली. लंडन युनिव्हसिर्टी कॉलेजमधून पीएच.डी. (१९३६) व डी.एस्सी. (१९३९) ह्या अत्युच्च पदव्या संपादन केल्यावर आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गरीब जनतेस व्हावा म्हणून सुखात्मे यांनी सुखाच्या प्राध्यापकीऐवजी कर्तबगारीस आव्हान देणारे शेतकी संशोधनक्षेत्र नोकरीसाठी निवडले.

(त्याचबरोबर जागतिक भूक, अपुरा आहार, कुपोषण यांच्या जोडीने विशेषत: सेवानिवृत्तीनंतर गरिबांसाठी पोषक आहाराकरिता ‘इंदिरा कम्युनिटी किचन’, खेड्यातली स्वच्छता यांसारखे प्रकल्प राबवले.) त्यासाठी लंडनला शिकताना, विषयाच्या सैद्धांतिक बाजूऐवजी त्यांनी नमुना निवड पाहणी, सर्वेक्षणाचं पद्धतीशास्त्र अशा कौशल्यांचा उपयोग करून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, एकरी पिकांचा अंदाज, जागतिक भूक इ. सामान्य माणसाच्या जीवनाशी भिडणार्‍या मूलभूत प्रश्नांकडे आपल्या संशोधनाची दिशा वळवली.

- Advertisement -

भारतात परतल्यावर ‘अ. भा. स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य’ या कोलकात्याच्या संस्थेत केलेल्या पहिल्याच नोकरीत, डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवातून सुखात्म्यांना सैद्धांतिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली. पुढे दिल्लीच्या ‘भारतीय कृषीसंशोधन मंडळात’ (आय.सी.ए.आर.) संख्याशास्त्र सल्लागार म्हणून नियुक्त झाल्यावर सुखात्मे यांनी नमुना निवड पाहणी व जीवमितीशास्त्र या दोन्हींत बारकाईने लक्ष घातले. त्या आधारे उत्तर प्रदेशातल्या इटाह इथे ब्रिटिश प्रजनन तज्ज्ञांच्या प्रमुखत्वाखाली चाललेला शेळीच्या दुधाचा, तोपर्यंत यशस्वी मानला गेलेला प्रकल्प, वार्षिक संख्याशास्त्रीय विश्लेषणाअभावी फसल्याचा सुखात्म्यांचा धक्कादायक निष्कर्ष पचवणे अधिकार्‍यांना जड गेले. पण नंतर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुखात्म्यांनाच देण्यात आली.

डॉ. सुखात्मे यांनी व्यावहारिक उपयोगासाठी नमुना निवड पाहणी व पद्धतीशास्त्रविषयक जे अनेक नवीन उपक्रम भारतात विकसित केले, त्यांची कीर्ती युनोच्या एफ.ए.ओ.पर्यंत जाऊन धडकली. त्यामुळे त्या संघटनेने सुखात्मे यांना आग्नेय आशियातल्या सरकारी अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केले. कृषी सर्वेक्षणाच्या संदर्भात भूखंडाचा आकार आणि विस्तार याबद्दल सुखात्मे यांचे अग्रगण्य संख्याशास्त्रज्ञांशी तात्त्विक मतभेद झाल्यावर त्या मंडळींनी, संशोधनाच्या कोणत्याही उपयोजित क्षेत्रातला संख्याशास्त्रीय प्रस्ताव एका केंद्रीय यंत्रणेने मंजूर केल्याशिवाय पुढे जाऊ नये असा धोरणात्मक निर्णय केंद्रशासनाकडून मंजूर करवून घेतला. त्यामुळे सुखात्मे यांचे बरेच अधिकार काढून घेतले गेले.

- Advertisement -

आय.सी.ए.आर.चं ‘इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स’ असे नामांतर करण्यास अनेकांचा विरोध होता. या दोन्ही कारणांसाठी सुखात्म्यांची घुसमट वाढली व हा कोंडमारा इत:पर सहन होणार नाही म्हणून १९४८पासून त्यांना आलेले एफ.ए.ओ.चे संख्याशास्त्र प्रमुखपद स्वीकारून ते १९५१ साली रोम येथे रुजू झाले. एफ.ए.ओ.त दाखल झाल्यानंतर सुखात्मे यांनी विविध देशांना नेमून दिलेले कार्यक्रम फलद्रूप झाले. अशा या महान संख्याशास्त्रज्ञाचे 28 जानेवारी 1977 रोजी निधन झाले.

- Advertisement -