Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स विश्व कमोडिटी मार्केटचे !

विश्व कमोडिटी मार्केटचे !

गेल्या काही दशकांत मराठी माणसांनी शेअर-मार्केट, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट अशा इतर लाभदायी [परंतु अधिक जोखमीच्या ] योजनांत आपले पैसे गुंतवण्यास प्रारंभ केला. पारंपरिक गुंतवणूक साधनांच्यापलीकडे काही साधने आहेत, जी काही श्रीमंतांची मिरासदारी नाही, हे अलीकडे लक्षात आल्याने आपली मंडळी नव्या बाजारात म्हणजे रोख्यात, अपरिवर्तनीय कर्जरोखे अशा काही कमी लोकप्रिय पण लाभदायी गुंतवणूक साधनांत आपले पैसे ठेवू लागले. त्यापैकीच एक म्हणजे कमोडिटी मार्केट. हे नेमके काय आहे? हे आपण पाहणार आहोत.

Related Story

- Advertisement -

आपल्याकडे जसा शेअरबाजार असतो, रोखे-बाजार असतो [तसा राजकारणात घोडे-बाजारही असतो!] पण त्याही व्यतिरिक्त काही बाजार असतात आणि त्याद्वारे लाखोकोटींची आर्थिक उलाढाल होत असते. आपण मुळातच कमी उत्पन्न कमावणारे मध्यमवर्गातले म्हणून आपल्या पैसे कमावण्याच्या संकल्पनादेखील चाकोरीतल्या उदाहरणार्थ – नोकरीत ओव्हरटाईम किंवा बोनस कमावणे.अलीकडे बोनस नसल्याने वार्षिक इन्क्रिमेंटरुपी पगारवाढ मिळवणे, प्रमोशन मिळवणे इतपतच आपली धाव असते. पैसे गुंतवताना पोस्ट व बँकेच्या चाकोरीबाहेर जाण्यास आपल्या काही पिढ्या कालवश झाल्या. अर्थव्यवस्थेत असलेली प्रमाणित गुंतवणूक साधने कळली तरी आपण स्वतः त्यात आपले पैसे गुंतवण्याबाबत आपण भित्रे व साशंक होतो.

गेल्या काही दशकांत मात्र मराठी माणसांनी शेअर-मार्केट, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट अशा इतर लाभदायी [परंतु अधिक जोखमीच्या ] योजनांत आपले पैसे गुंतवण्यास प्रारंभ केला. पारंपरिक गुंतवणूक साधनांच्यापलीकडे काही साधने आहेत, जी काही श्रीमंतांची मिरासदारी नाही, हे अलीकडे लक्षात आल्याने आपली मंडळी नव्या बाजारात म्हणजे रोख्यात, अपरिवर्तनीय कर्जरोखे अशा काही कमी लोकप्रिय, पण लाभदायी गुंतवणूक साधनांत आपले पैसे ठेवू लागले. त्यापैकीच एक म्हणजे कमोडिटी मार्केट. हे नेमके काय आहे? हे आपण पाहणार आहोत. कारण आपली आर्थिक साक्षरता ही फक्त बँक-पोस्ट व शेअरबाजार इतकीच मर्यादित असायला नको, कारण आपली गुंतवणूक कक्षा विस्तारली तर अधिक उत्पन्न मिळवता येईल आणि वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आणखी काही मार्ग मिळू शकतील.

- Advertisement -

पार्श्वभूमी – मुळात कमोडिटी म्हणजे महत्वाचे धातू, ऊर्जा साधने तसेच अनेक प्रकारच्या वस्तू, अन्न पदार्थ किंवा जिन्नस. फार पूर्वी बार्टर सिस्टीम होती म्हणजे एकमेकांना लागणार्‍या वस्तूंची देवाणघेवाण केली जायची. पुढे चलन अस्तित्वात आले आणि व्यापार सुरु झाला. शेती माल किंवा अन्य जिन्नस विकणे -खरेदी करणे हा आपल्या अंतर्गत व्यापाराचा एक भाग होता. शिवाय राजा, संस्थानिक व पुढे ब्रिटिश राजवट अशा राज्यकर्त्यांच्या तिजोरीत भर टाकणारे उत्पन्न अशा उलाढालींतून मिळत होते. जगातील कोणत्याही देशांच्या आधी आपल्याकडे अशी बाजारपेठ कार्यरत होती. अडत बाजार, त्यातले अडते म्हणजे दलाल त्यात कारभार करायचे. पुढे दुष्काळ, सरकारी निर्बंध व टंचाई आणि महागाई अन्य काही कारणांनी असे बाजार बंद झाले. नंतर म्हणजे अलीकडच्या काळात ही संकल्पना पुन्हा सक्रिय झाली आणि आजच्या घडीला विविध कमोडिटी एक्सचेंजेस अस्तित्वात आली.

जागतिक व देशी इतिहास – इतिहासात डोकावल्यावर असे कळते की, फार पूर्वी म्हणजे सतराव्या शतकात जपानमधील ओसाका शहरात अशा प्रकारची व्यापारी उलाढाल चालू होती. त्याआधी चीनमध्ये कमोडिटी ट्रेडिंग होते. मात्र खर्‍या अर्थाने व्यावसायिक पद्धतीने कमोडीटी मार्केट सुरु झाले ते १८४८ मध्ये अमेरिकेतील शिकागोमध्ये ‘सीबीओटी’ म्हणजेच शिकागो बोर्ड ऑफ ट्रेंड सुरू झाले आणि एकूणच उलाढालीला दिशा मिळाली. भारतात कापूस म्हणजे कॉटन मार्केट अर्थात वायदेबाजार होते. १८७५ साली मुंबई कॉटन ट्रेंड असोसिएशन कार्यरत होते. कारण मुंबई हे टेक्स्टाईलचे मोठे आगर होते, कापडाच्या मोठमोठ्या मिल्स धडधडत होत्या. १९६० मध्ये नैसर्गिक आपत्ती व मालाची टंचाई अशा काही कारणांनी कॉटन-बाजार बंद झाला व पुढील काही दशकानंतर मिल्सदेखील बंद झाल्या.

- Advertisement -

कमोडिटी मार्केट नेमके काय असते- कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी पिके, अन्य उत्पादने आणि अनेक प्रकारचे धातू यांची व्यापारी पद्धतीने उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असते. चालू उत्पादन, भविष्यातील उत्पादन यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारांतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. अशा उत्पादनांचा पुरवठा, मागणी आणि किंमतीतील चढ-उतार यांचा अनेक स्तरावर परिणाम होत असतो. अशी खरेदी-विक्री योग्य पद्धतीने व्हावी व त्यावर अंकुश असावा म्हणून शेअरबाजारप्रमाणे कमोडिटी बाजार अस्तित्वात आले. कारण असंख्य उत्पादने यांची मागणी-पुरवठा आणि किंमतीतील बदल यांचा विघातक परिणाम होऊ नये, म्हणून अर्थकारण सुस्पष्ट व पारदर्शक असणे जरुरीचे असते. अशा वस्तू एकतर विक्रीयोग्य असायला हव्यात व गुंतवणुकीस पोषक असल्या पाहिजेत.

महत्वाच्या कमोडिटीज म्हणजे जिन्नस किंवा वस्तू :-
शेती उत्पादने -खाद्य तेल, धान्य, मसाल्याचे पदार्थ [ काळीमिरी, लवंग, जिरे, धने, हळद, मिरची ] विविध डाळी
बिगर -शेती उत्पादने- ऊर्जा साधने , मूलभूत धातू, मौल्यवान धातू

१] धातू-मेटल्स – सोने, चांदी, तांबे आणि प्लॅटिनम
देशाच्या विकासात अनेक प्रकारच्या धातूंचा विविध कामांसाठी वापर होत असतो. उदाहरणार्थ अनेक प्रकारचे पायाभूत प्रकल्प, कारखान्यांची उभारणी, शेती व अन्य प्रकारची अवजारे, वाहने अशा अनेक उपयोगांसाठी अनेक धातू लागतात. विशेषतः घरे व इमारती यांच्यासाठी सिमेंट, स्टील असे बांधकाम साहित्य वापरले जाते. सोने, चांदी हे जसे आभूषणे याकरिता वापरले जातात तसेच औद्योगिक कारणांसाठी उपयोगात आणले जातात. म्हणूनच अशा धातूंचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते.

२] ऊर्जा-एनर्जी-खनिज तेल, धन, नैसर्गिक गॅस आणि गॅसोलीन
पूर्वी कोळसा हे महत्वाचे इंधन होते, नंतर रॉकेल, डिझेल असा वापर वाढला. घरगुती व औद्योगिक कारणांसाठी वापर तसेच वाहतुकीसाठी इंधन महत्वाचे असल्याने वापर, पुरवठा व किंमती यात समन्वय असणे जरुरीचे असते. देशांतर्गत पुरवठा व उत्पादन यांचे प्रमाण व्यस्त झाल्यास आयात करणे असे उपाय अपेक्षित असतात, त्याचा ताण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

३] पाळीव प्राणी-लाईव्ह स्टोक्स – मेंढ्या, बकर्‍या इत्यादी अशा प्राण्यांच्याद्वारे मिळणारी उत्पादने व आर्थिक आवकजावक याकडे वित्त-दृष्टीकोनातून पाहणे अगत्याचे असते.

४] शेती उत्पादने – कापूस, मका, सोयाबीन, गहू , तांदूळ, साखर, डाळी, कॉफी इत्यादी
आपल्या देशात नव्याने कमोडिटी बाजाराचे नवयुग – देशात जेव्हा आर्थिक सुधारणांचे वारे वाहू लागले, त्याचे पडसाद अनेक स्तरावर उमटले. परिणामी काही वर्षात आपल्याकडे एकूण २० कमोडिटी एक्स्चेंजस प्रस्थापित झाली व त्यात ४२ कमोडिटीजचे व्यवहार करण्याची सोय आहे. २०१५ मध्ये पूर्वीच्या फॉरवर्ड मार्केट कमिशनचे [एफएमसी] सेबी – या शेअरबाजार नियंत्रकात विलीनीकरण करण्यात आले.

आपल्याकडील तीन विविध प्रकारची एक्सचेंजेस –
१] एम सी एक्स -[मल्टी कमोडिटी एक्स्चेंज]- हे २००३ मध्ये मुंबईमध्ये पब्लिक कंपनी म्हणून स्थापित झाले. फायनान्शियल टेक्नॉलॉजिज या कंपनीने निर्मिती केली. हे एक्स्चेंज प्रामुख्याने फ्युचर ट्रेडिंग इन बुलियन्स, एनर्जी व नॉन-फेरस मेटल्स व्यवहार करतात.
२] एन सी डी
एक्स – [नॅशनल कमोडिटी एन्ड डेरिव्हेटीव्ह एक्स्चेंज]- हेही मुंबईत २००३ पासून कार्यरत आहे, एकूण ३१ कमोडिटीजचे व्यवहार या एक्स्चेंजद्वारे घडतात.
३] एन एम सी
-[ नॅशनल मल्टी कमोडिटी एक्स्चेंज]- हे एका ट्रेडर म्हणजे व्यापारी व सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे अहमदाबाद येथे उभे केलेले आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या जिन्नस – खोबरे, मसाल्याचे पदार्थ असे एकूण ४४ भिन्न कमोडिटीजचे सौदे होतात.
कमोडिटी फ्युचर्स मार्केट म्हणजे वायदे बाजार, इथे जे विविध जिन्नसांचे वायदे व्यवहार होतात आणि आडत सौदे म्हणजेच कमोडिटी मार्केट ट्रान्झॅक्शन्स असे म्हटले जाते. आपल्याकडे एकीकडे कंपन्यांच्या शेअर्ससाठी जसा शेअरबाजार असतो तसा विविध व्यापारयोग्य जिन्नस-वस्तूंचे व्यवहार वायदे बाजार असतो. ज्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. आपला देश कृषिप्रधान असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य व अन्य जिन्नस ह्यांचे पीक व उत्पादन होते, मोठी उलाढाल नियंत्रित करण्यासाठी असा वायदे बाजार अस्तित्वात आहे.
सहभागी व्यक्ती /संस्था- अशा बाजारात प्रामुख्याने शेतकरी-कृषी उत्पादक, व्यापारी, सर्वसाधारण गुंतवणूकदार व निर्यातदार असे घटक सहभागी असतात.
कमोडिटी फ्युचर्समधील गट – हेजर्स, स्पेक्युलेटर्स व ऑरबिट्रेजर्स असतात
हेजर्स – शेतकरी व पीक उत्पादक, व्यापारी व निर्यातदार
स्पेक्युलेटर्स – सर्वसाधारण गुंतवणूकदार

मुख्य संकल्पना -स्पॉट प्राईज, फ्युचर्स प्राईज, लॉट साईज म्हणजे युनिट्स, कॉन्ट्रॅक्ट क्वालिटी, कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन, एक्सपायरी डेट, इनिशिअल मार्जिन, तसेच मार्केट टू मार्केट -अशा संकल्पना सर्रास वापरल्या जातात.
कार्यपद्धती – मुळात हे सौदे का केले जातात? हे आपण पाहूया. बाजारपेठेत जेव्हा अन्न धान्य व अन्य कृषी उत्पादने वगैरे येतात, तेव्हा मागणी-पुरवठा यांचा खेळ सुरु होतो. [पाऊस, हवामान आणि अन्य कारणांनी एखाद्या मोसमात पीक कमी जास्त येते. त्याचा परिणाम पुरवठा व किंमतीवर होतो. कारण खरेदी विक्रीचे प्रमाण किमतीच्या चढ-उतारावर अवलंबून असते. नजीकच्या काळात येणार्‍या पिकाबाबत वा उत्पादनाबाबत आधीच करार करणे याला कमोडिटी फ्युचर्स असे म्हणतात. यात खरेदीदार किंवा विक्री करू इच्छिणारा एका निश्चित दिवशी अमुक तारखेला अमुक जिन्नसबाबतचा करार केला जातो. भविष्यात एखाद्या जिन्नस वा पिकाचे किती उत्पादन आहे? याबद्दल अनिश्चितता असते. परिणामी त्यांच्या किंमती अस्थिर राहिल्या तर नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी, एक प्रकारचे संरक्षण म्हणून असा व्यवहार केला जातो. असा फ्युचर करार अमुक किंमतीला फिक्स केला जातो, त्यामुळे भविष्यात म्हणजे प्रत्यक्षात कराराची मुदत पूर्तीच्यावेळी समजा वाढली तरी करार किंमतीत फरक पडत नाही. आधी जी निश्चित केलेली असते, त्यानुसारच व्यवहार पूर्ण केला जातो. हाच मुख्य हेतू आणि फायदा असतो. भविष्यकाळातील किमतीच्या फरकाने घेणार्‍याचे किंवा विकणार्‍याचे आर्थिक नुकसान होऊ नये व त्यांना हवे ते पीक हवे तितके घेण्याची मुभा असावी, म्हणून ही फ्युचरची तरतूद आहे.

फरक -शेअरबाजार आणि कमोडिटी बाजार –
१] शेअरबाजारमध्ये शेअर्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक रूपातील शेअर्सची खरेदी-विक्री करता येते.
या उलट कमोडिटी बाजारात पीक उत्पादने, धातू व जिन्नसा यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात.
दोघांमध्ये फरक –
१] स्वरूप-
शेअरबाजार- डीमॅट स्वरूपातील शेअर्स
कमोडिटी- जिन्नस -वस्तूंची उलाढाल केली जाते.
२] लाभ-
शेअरबाजार- बहुतेक कंपन्या नफा झाल्यावर लाभांश देतात, तसेच बोनस शेअर्स मिळू शकतात
कमोडिटी – किंमतीत होणारी वाढ हा नफा ठरतो शिवाय जिन्नसांचा फिजिकल ताबा मिळतो.
३] वेळ मर्यादा –
शेअरबाजार – एखाद्या कंपनीचे शेअर्स कितीकाळ शेअरबाजारात राहावेत याबाबत काही बंधन नाही, कारण जितके काळ कंपनी कार्यरत आहे, तोवर व्यवहार चालू राहू शकतात.
कमोडिटी – जिन्नस वा पिके यांच्या मागणीनुसार डिलिव्हरी घेतली-दिली जाते. नाशिवंत पदार्थ, स्टोअर करण्याजोगे आणि मौल्यवान वस्तू अशी वर्गवारी केली जाते.
४] दर्जा व प्रत –
शेअरबाजार – शेअर्सबाबत प्रत नसते, शेअर्सचे मात्र विविध प्रकार मात्र असतात.
कमोडिटी – वस्तू व जिन्नस याबाबत वेगवेगळ्या प्रती उपलब्ध असतात.
कमोडिटी व्यवहारात नफा-तोटा कसा होतो, हे पाहूया – कोणत्याही गुंतवणुकीत आधी पैसा गुंतवायला लागतो, मग बाजारभावानुसार त्याचे मूल्य हे कमी जास्त ठरत असते. हे तत्व कमोडिटी व्यवहारातदेखील लागू असते. घातलेल्या किंमतीपेक्षा बाजारभाव अधिक झाला मी तुम्हाला नफा मिळू शकतो. मात्र बाजार पडला, तर हीच स्थिती विरुद्ध होते म्हणजे तुम्हाला तोटा सहन करावा लागतो.
कमोडिटी कशी निवडाल व कोणत्या कमोडिटीज अधिक प्रमाणात व्यवहारात असतात-
कमोडिटी म्हणजे वायदेबाजारातील वस्तू ,जिन्नस निवडताना पुढील निकष लावले जातात-

१] उपलब्धता – अमुक जिन्नस ही किती गरजेची आहे, मागणी-पुरवठा चक्र कसे आहे? ते पाहून निवड केली जावी. दैनंदिन उपयोगातला जिरे-हळद असा काही जिन्नस आहे की, सोने -चांदीसारखा मौल्यवान आहे, हेही बघणे जरुरीचे असते.
२] साठवणे- हे व्यवहार भविष्यकालीन असल्याने आणि वस्तूंबाबत असल्याने त्याची डिलिव्हरी घेतल्यावर ‘स्टोरेज’ व्यवस्था असली पाहिजे. कारण या बाजारातील गुंतवणूक ही पाच-दहा किलोंइतकी मर्यादित नसते, क्विंटल किंवा तत्सम मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते.
३] बंधन-मुक्त – अशा जिन्नसा निवडाव्यात की, ज्यावर सरकारचे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसावेत. ज्याचे उत्पादन /पीक हे काढण्याची मुभा असावी. शिवाय त्याचा वापर, व्यापार व वितरण याबाबत किती बंधने वा करदायित्व आहे हेही अभ्यासले पाहिजे.
४] जोखीम – एखाद्या वस्तुबाबत किती जोखीम असू शकते व आपण ती किती प्रमाणात पेलू शकतो हेही पाहिले पाहिजे.
५] भांडवल – आपल्याकडे गुंतवणुकीसाठी किती भांडवल आहे, त्यानुसार ठरवले पाहिजे. केवळ इच्छा व माहिती असून उपयोग नाही.
६] वितरण व्यवस्था – एखाद्या जिन्नसाची वितरण व्यवस्था किती प्रभावी आहे, कारण त्यांची डिलिव्हरी घेण्याबाबत हा मुद्दा विचारात घेता येतो.
७] माहिती – अमुक जिन्नस हा गुंतवणुकीस योग्य आहे हे कळण्यासाठी त्यासंदर्भात पुरेपूर माहिती असणे व त्यावरून जोखीम व नफ्याचा अंदाज करता आला पाहिजे.
८] पेशन्स – असे व्यवहार करताना स्थिर बुद्धी व कमालीचा पेशन्स असायला हवा, उतावळेपणा असून चालत नाही. झटपट नफा कमावू अशी वृत्ती असणार्‍यांनी या बाजारापासून थोडे लांब राहिलेलेच बरे.
९] कमोडिटीची लिक्विडीटी – तुम्ही निवडलेली वासू/जिन्नस ही वेळप्रसंगी चटकन विकता येणे शक्य आहे का? हेही तपासून बघितले पाहिजे.
१०] स्थानिक -आंतरराष्ट्रीय बाजारपेठ – याबाबत अभ्यास असलेला उपयोगी पडतो.
११] मालाचा दर्जा -प्रत – जी काही जिन्नस असेल त्यात वेगवेगळ्या प्रतीचे उत्पादन असल्यास अधिक चांगले, प्रतीनुसार भाव आणि मागणी ठरते.
१२] व्यवहाराचे नियमन – अशा उलाढालीचे योग्य प्रकारे नियंत्रण असेल तर गुंतवणूकदार निर्धास्तपणे सहभागी होतात.
१३] पारदर्शकता- व्यवहारात पारदर्शकता असणे जरुरीचे कारण तरच संबंधित घटक यात सहभागी होतील.
१४] शेतकरी – शेतकरी व कृषी उत्पादकांना चांगला भाव मिळावा
१५] माहिती व पृथ:करण – यात सहभागी असलेल्या सर्व कमोडिटीजबाबतची अद्ययावत माहिती व अ‍ॅनलिसिस असल्यास त्यातील व्यवहार अधिक चांगले होऊ शकते.

साधारण कोणते जिन्नस /कमोडिटीजचे अधिक व्यवहार होतात –
एकूण ११० पेक्षा अधिक कमोडिटीजचे व्यवहार केले जातात, पैकी खालील वस्तू अधिक व्यवहारात आहेत-
१] सोने २] खनिज तेल ३] तांदूळ ४] साखर ५] मका

कमोडिटी फ्युचर्सबाबतच्या अपेक्षा व सद्य:स्थिती – सरकार व सेबीचे प्रयत्न चालू आहेत. म्युच्युअल फंडांनी या व्यवहारात सहभागी होण्यास सुरवात केलेली आहे. धोरणात्मक पाठिंबा, काही अडसर दूर करणे लिक्विडीटी जपणे आणि गुंतवणूकदारांच्या मनात अधिक विश्वासार्हता निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. एकेकाळी शेअरबाजार हा फक्त श्रीमंतांसाठी असायचा पण आता मध्यम -कनिष्ठ असे सर्वच त्यात भट घेत आहेत. तीच स्थिती म्युच्युअल फंडबाबत आहे, यात गुंतवणारी लोकसंख्या वाढतेच आहे. त्याचप्रमाणे नजीकच्या काळात कमोडिटी बाजार विस्तारेल अशी आशा आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक विकसित होण्यातच आपले हित व प्रगती आहे. आपल्याला असे अनेकविध पर्याय माहिती असणे व जमल्यास सहभागी होऊन उत्कर्ष साधत राहणे हीच खरी अर्थ-साक्षरता आहे.

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ अभ्यासक 

- Advertisement -