घरफिचर्सऑनलाईन सिनेमांचा ऑफलाईन क्लॅश ?

ऑनलाईन सिनेमांचा ऑफलाईन क्लॅश ?

Subscribe

ओटीटी माध्यमांवर सिनेमे फ्लॉप किंवा हिट हे त्यांच्या कमाईवर ठरत नाहीत. कारण बहुतांश सिनेमांना त्यांच्या निर्मिती मूल्यापेक्षा अधिकची रक्कम मिळते आणि किती लोकांनी तो सिनेमा पाहिला? याचा फिक्स आकडादेखील सांगता येत नाही. कारण सिनेमा पेड मेंबरशिप घेऊन पाहणार्‍यांपेक्षा तो सिनेमा टेलिग्रामवर डाऊनलोड करून पाहणार्‍यांची संख्या अधिक असते. अशावेळी केवळ पेड व्ह्यूअरचा आकडा मोजूनच प्रतिसाद ठरवता येऊ शकतो. ‘दिल बेचारा’ सिनेमाच्या बाबतीतदेखील तेच झालं, सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर डिजनी हॉटस्टारने हा सिनेमा सर्वांसाठी मोफत केल्याने, त्याला चांगले प्रेक्षक मिळाले. कदाचित जर हा सिनेमा केवळ पेड व्ह्यूअरसाठी असता, तर त्यालाही एवढा प्रतिसाद मिळाला असता का? याचं उत्तर नाही असं आहे.

सिनेमा पाहण्याचा खरा आनंद चित्रपटगृहात असतो, हिरोच्या एंट्रीला टाळ्या शिट्ट्या असोत किंवा मग मोठ्या स्क्रीनवर आवडत्या हिरोइनला पाहण्याची मजा असो, चित्रपटगृह म्हणजे अनुभव, जो छोट्या मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर कितीही अपडेटेड तंत्रज्ञानावर मिळणं शक्य नाही. लॉकडाऊनमुळे थिएटर बंद झाले आणि ओटीटी माध्यमांना सुगीचे दिवस आले. डिजनी हॉटस्टार, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, झी 5 यांसारख्या ओटीटी माध्यमांवर नवीन सिनेमांचा ओघ सुरू झाला. वेबसिरीजला तुफान प्रतिसाद देणारा भारतीय प्रेक्षक या सिनेमांनादेखील प्रतिसाद देईल अशी अपेक्षा होती, याआधी देखील अनेक हिंदी सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले होते, पण त्यांना मिळणारा प्रतिसाद मर्यादित होता. लॉकडाऊननंतर हा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा होती, कारण या काळात ओटीटीच्या सब्स्क्राइबर्सची संख्या वाढली आहे. पण असे घडले नाही, गेल्या दोन महिन्यात ‘दिल बेचारा’ वगळता कुठल्याही दुसर्‍या चित्रपटाला खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला नाही. गुलाबो सीताबो, शकुंतला देवी, लूटकेस , खुदा हाफिज, रात अकेली है, गुंजन सक्सेना, यारा, यांसारख्या सिनेमांना नक्की कसा प्रतिसाद मिळाला? ओटीटीवर आशयाच्या भाऊगर्दीत आता मनोरंजनच बाजूला राहतंय का? सिनेमांच्या यश-अपयशाची कारणं नेमकी काय होती? शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणारा क्लॅश ओटीटीवर तेवढाच प्रभावी ठरला का? अशाच विविध मुद्यांवर आणि सिनेमांच्या कमतरतांवर आज सविस्तर चर्चा करणार आहे.

ओटीटीवर सिनेमा नेमका हिट कसा ठरतो, हा प्रश्न अनेकांना आहे. एका विशिष्ट रकमेत सिनेमाचे हक्क ओटीटी माध्यम निर्मात्यांकडून विकत घेतात, आता जी रक्कम ओटीटीकडून निर्मात्यांना दिली जाते, जर सिनेमा चांगला असेल तर ती बजेटपेक्षा अधिक असते. म्हणून एकूण कमाईच्या गणितात तरी सिनेमांना विशेष फायदा नसला तरी तोटादेखील नसतो हे सत्य आहे. अशावेळी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि व्ह्यूअर संख्या याच गोष्टी सिनेमासाठी महत्वाच्या ठरतात.

- Advertisement -

अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या काही सिनेमांबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा विचार करूया, गेल्या दोन/तीन महिन्यात अ‍ॅमेझॉनवर दोन मोठे सिनेमे प्रदर्शित झाले, ज्यात मोठ्या अभिनेत्यांनी काम केलं होतं. लॉकडाऊनच्या काळात रिलीज झालेला पहिला मोठा सिनेमा म्हणजे अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा यांचा गुलाबो सीताबो, सुजित सरकारसारख्या उत्तम दिग्दर्शकाच्या या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या असल्या तरी व्ह्यूअर मात्र याला चांगले मिळाले. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये रिलीज झाल्याने या सिनेमाला जास्त व्ह्यूअर मिळणे अपेक्षितच होते, 30 कोटीच्या आसपास बनलेल्या या सिनेमाला अ‍ॅमेझॉनने 65 कोटीत विकत घेतले होते आणि इतर हक्कांच्या रूपात 35 कोटी या सिनेमाला मिळाले. पैशांचा विचार केला तर सिनेमा हिट ठरला, पण बहुतांश तरुण मंडळींना हा सिनेमा आवडला नाही. जसा गुलाबो सीताबो सिनेमाला त्याचा योग्य मोबदला मिळाला तसा सर्वच सिनेमाना मिळाला असा नाही, काही सिनेमे त्या दर्जाचे नसतानादेखील त्यांना जास्तीचा मोबदला मिळाला. उदाहरणार्थ, प्राईमवर प्रदर्शित झालेला दुसरा महत्वाचा सिनेमा म्हणजे विद्या बालनचा शकुंतला देवी, ज्या सिनेमाकडून अनेक अपेक्षा प्रेक्षकांना होत्या, गणितज्ञाची बायोग्राफी असलेला हा सिनेमा केवळ 25 कोटीत बनला ज्याला अ‍ॅमेझॉन प्राईमने 35 कोटीत विकत घेतले, जर हाच सिनेमा थिएटरवर रिलीज झाला असता तर फ्लॉप ठरला असता, म्हणून ओटीटीवर सिनेमा प्रदर्शित होण्याचे काही फायदेदेखील आहेत. ज्याचा लाभ शकुंतला देवीसारख्या सिनेमाला झाला, आता या सगळ्याचा फायदा अ‍ॅमेझॉन प्राईमला झाला का ? तर हो, कारण त्यांच्या सबस्क्राईबर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. अ‍ॅमेझॉन प्राईमचे फक्त भारतात सध्या 20 मिलियनपेक्षा अधिक पेड सबस्क्राइबर्स आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राईमनंतर दुसरं महत्त्वाचं माध्यम म्हणजे नेटफ्लिक्स, कंटेटच्या बाबतीत नेटफ्लिक्सकडून भारतीयांना बर्‍याच अपेक्षा असतात. पण गेल्या काही काळात नेटफ्लिक्सवरील हिंदी कन्टेन्ट सिनेमांच्या बाबतीत तरी फार उत्तम झालाय असं दिसत नाही, ‘मिसेस सिरीयल किलर’सारखा सिनेमा प्रदर्शित करून त्यांनी ही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध केली आहे. सध्या दोन महत्त्वाच्या फिल्म्सची चर्चा नेटफ्लिक्स वर होते आहे, यातील पहिली फिल्म म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांची ‘रात अकेली है’ आणि दुसरी म्हणजे धर्मा प्रोडक्शनची गुंजन सक्सेना. यात तिसरी अजून एक फिल्मदेखील शर्यतीत आहे, पण मार्केटिंगच्या बाबतीत ती फिल्म जरा मागे पडली, बॉबी देवल अभिनीत क्लास ऑफ 83 नावाची ती फिल्म. रात अकेली है हा सिनेमा प्रेक्षकांनी बराच पसंत केलाय, स्मिता सिंगने लिहिलेल्या या सिनेमाची कथा उत्तम होतीच, पण इथेही वाढवलेली लांबी कमकुवत बाजू ठरली. 2 तासात संपू शकणारा सिनेमा अडीच तास खेचल्याने जरा कथेपासून संपर्क तुटतो, पण एकंदरीत गेल्या दोन महिन्यात प्रदर्शित झालेल्या मोजक्या चांगल्या सिनेमांपैकी एक हा सिनेमा आहे. बाकी गुंजन सक्सेना असो किंवा क्लास ऑफ 83 दोन्ही सिनेमे म्हणावे तितके उत्तम नाहीत, गुंजन सक्सेना कथेच्या बाबतीत वेगळा असला तरी दर दोन मिनिटांनी येणार्‍या महिला सबलीकरणाच्या गोष्टी सिनेमाला रटाळ बनवतात, त्यात भर म्हणून की काय जान्हवी कपूरचा अभिनय तुम्हाला कुठेही पहावा वाटतं नाही. क्लास ऑफ 83 च्या बाबतीतदेखील असच काहीसं घडलंय, सिनेमा चांगला होता पण क्राईम ड्रामा प्रकारात ड्रामा नसेल तर मजा निघून जाते, हेच या सिनेमाबाबत झालं आहे. पण या तीनही सिनेमांना किती व्ह्यूअर मिळाले याची फिक्स माहिती मात्र नेटफ्लिक्सकडून जाहीर करण्यात आली नाही.

- Advertisement -

ओटीटी माध्यमावर सर्वाधिक प्रतिसाद मिळालेला सिनेमा म्हणून, ज्या सिनेमाला ओळखलं गेलं तो, ‘दिल बेचारा’ हा सिनेमा ज्या डिजनी हॉटस्टारवर रिलीज झाला. त्याच हॉटस्टारवर नंतर दोन ते तीन हिंदी सिनेमे प्रदर्शित झाले, ज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला असं म्हणता येणार नाही. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे लूटकेस, आधी हा सिनेमा नेटफ्लिक्सला 25 कोटी रुपयात विकण्यात येणार होता. पण नंतर हॉटस्टार हा सिनेमा विकत घेतला, ड्रामा कॉमेडी प्रकारातील लूटकेस सिनेमा हा एक चांगला सिनेमा होता. कुणाल खेमू, गजराज राव, रणवीर शोरी यांचा अभिनय असो किंवा सिनेमाची कथा असो, सर्व काही व्यवस्थित होतं. पण तरीही याला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. पैशांच्या कमाईबाबत बोलायचं झाल्यास, याची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओने केल्याने आता ते आपल्या सिस्टर कंपनीला हा सिनेमा किती रुपयात विकतील हे सांगता येणार नाही. तरीही हा वीस कोटीत बनलेला सिनेमा 30 कोटी रुपयात तरी विकला जाईल आणि तसेच सॅटेलाइट हक्क पकडले तर दहा कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा निर्मात्यांना होईल असं चित्र आहे. हॉटस्टारवर रिलीज झालेला दुसरा मोठा सिनेमा म्हणजे विद्युत जामवालचा खुदा हाफिज, विद्युत जामवालची फिल्म करिअरमधील सर्वाधिक चांगली अ‍ॅक्टिंग या सिनेमात पाहायला मिळाली, असं अनेकांनी सांगितलं. पंधरा कोटीत बनलेला हा सिनेमा 20 कोटी रुपयांमध्ये हॉटस्टारला विकण्यात आलाय, म्हणजे तसा हा सिनेमादेखील फायद्यात आहे खरा, पण टोटल व्ह्यूअरशिप पाहिली तर लक्षात येईल की, खुदा हाफिज आणि लूटकेस या दोन्ही सिनेमांना 3 मिलियनपेक्षा जास्त पेड व्ह्यूअर लाभलेले नाहीत. सध्या डीजनी हॉटस्टारचे नऊ मिलियनच्या आसपास पेड व्ह्यूअर भारतात आहेत, त्यापैकी अंदाजे 25 टक्के दर्शकांनी हे सिनेमे बघितले असावेत.

ओटीटी माध्यमांवर सिनेमे फ्लॉप किंवा हिट हे त्यांच्या कमाईवर ठरत नाहीत. कारण बहुतांश सिनेमांना त्यांच्या निर्मिती मूल्यापेक्षा अधिकची रक्कम मिळते आणि किती लोकांनी तो सिनेमा पाहिला? याचा फिक्स आकडादेखील सांगता येत नाही. कारण सिनेमा पेड मेंबरशिप घेऊन पाहणार्‍यांपेक्षा तो सिनेमा टेलिग्रामवर डाऊनलोड करून पाहणार्‍यांची संख्या अधिक असते. अशावेळी केवळ पेड व्ह्यूअरचा आकडा मोजूनच प्रतिसाद ठरवता येऊ शकतो. ‘दिल बेचारा’ सिनेमाच्या बाबतीतदेखील तेच झालं, सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर डिजनी हॉटस्टारने हा सिनेमा सर्वांसाठी मोफत केल्याने, त्याला चांगले प्रेक्षक मिळाले. कदाचित जर हा सिनेमा केवळ पेड व्ह्यूअरसाठी असता, तर त्यालाही एवढा प्रतिसाद मिळाला असता का? याचं उत्तर नाही असं आहे. आपल्याकडे अजूनही पेड मेंबरशिप घेणार्‍या प्रेक्षकांची संख्या तेवढी झालेली नाही, लॉकडाऊनच्या काळात वाढ झाली असली तरी ती कधीपर्यंत राहील हे सांगता येणार नाही. याला कारण म्हणजे कंटेंट कितीही उत्तम असला तरी तो सिनेमागृहात बघण्याची सवय भारतीय प्रेक्षकांना लागली आहे, जी सहजासहजी सुटू शकत नाही. दुसरं कारण म्हणजे आपल्याकडे अजूनही मनोरंजन हाच सिनेमाचा केंद्रबिंदू ठेऊन पाहणार्‍या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. येत्या काळात अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ नावाचा मोठा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होतो आहे. आतापर्यंत ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी हा सर्वाधिक मोठा सिनेमा म्हणता येईल, कारण यात एक असा सुपरस्टार आहे, ज्याने गेल्या चार वर्षात सुपरहिट सिनेमे दिलेत. त्याच्या या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून, आपण अजून काही वेगळे अंदाज बांधू शकतो. पण तोवर ऑनलाइन रिलीज होणार्‍या सिनेमांचा हा क्लॅश ऑफलाइन राहणार असं चित्र आहे.

-अनिकेत म्हस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -