घरफिचर्स'जय जय महाराष्ट्र माझा'

‘जय जय महाराष्ट्र माझा’

Subscribe

एका काळात मी ‘महानगर’मध्ये ‘संध्याकाळचं गाणं’ नावाचा संगीतविषयक स्तंभ लिहायचो. एकच एक गाणं घेऊन त्या गाण्याची जन्मकथा किंवा त्या गाण्याबद्दलची तशीच एखादी आठवण मी त्या स्तंभातून लिहायचो. दिनू रणदिवे तो स्तंभ वाचायचे किंवा नाहीत ते मला आज सांगता येणार नाही, पण एकदा माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले, तू संगीत ह्या विषयावर लिहितोस ना रे? मी मान डोलवली. आपण लिहीत असलेल्या स्तंभाबद्दल इतके ज्येष्ठ पत्रकार माहिती घेऊन आहेत ह्याबद्दल मी सुखावणं साहजिक होतं.

दिनू रणदिवे गेल्याची बातमी आली…आणि ‘महानगर’चे ते वादळी दिवस आठवले. ‘महानगर’च्या उभारणीत दिनू रणदिवेंचं महत्वाचं योगदान होतं. नव्वदीतल्या त्या काळात दिनू रणदिवे बातमी, अग्रलेख घेऊन ‘महानगर’च्या कार्यालयात यायचे. त्यामुळे आमच्यातल्या काही कर्मचार्‍यांशी त्यांच्याशी ओळख झालेली होती. आमची नावं त्यांना माहीत झालेली होती. माझंही नाव त्यांना माहीत झालेलं होतं. त्यांचं नखशिखांत साधेपण, स्वत:साठी हातचं काही न राखता पत्रकारितेतली त्यांची अखंड समर्पित वृत्ती यामुळे त्यांच्यातल्या ज्येष्ठत्वाबद्दल सर्वांनाच आदर असायचा. आपला अहंकार गळून पडावा इतका हा आदर असायचा.

त्याच एका काळात मी ‘महानगर’मध्ये ‘संध्याकाळचं गाणं’ नावाचा संगीतविषयक स्तंभ लिहायचो. एकच एक गाणं घेऊन त्या गाण्याची जन्मकथा किंवा त्या गाण्याबद्दलची तशीच एखादी आठवण मी त्या स्तंभातून लिहायचो. दिनू रणदिवे तो स्तंभ वाचायचे किंवा नाहीत ते मला आज सांगता येणार नाही, पण एकदा माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले, तू संगीत ह्या विषयावर लिहितोस ना रे? मी मान डोलवली. आपण लिहीत असलेल्या स्तंभाबद्दल इतके ज्येष्ठ पत्रकार माहिती घेऊन आहेत ह्याबद्दल मी सुखावणं साहजिक होतं.

- Advertisement -

…पण एका महाराष्ट्र दिनाला मी माझ्या त्या स्तंभात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ह्या गाण्याची आठवण लिहिली त्या दिवशी वेगळंच घडलं. झालं असं की त्या दिवशी मी माझं काम संपवून घरी निघालो. दादरला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलो. ती वेळ रात्री बारा-सव्वाबाराची होती. दिनू रणदिवे त्या इतक्या रात्री मला तिथे दिसले. मीच त्यांना हाक मारली. ते थांबले. माझ्याशी बोलले आणि बोलून झाल्यावर निघाले. निघता निघता त्यांना काही आठवलं म्हणून त्यांनी मला हाक मारली. मी परतलो तर ते मला म्हणाले, ‘ए, आज तू जय जय महाराष्ट्र माझा, ह्या गाण्याबद्दल लिहिलं आहेस ना?’ मी हो म्हटलं. ते कौतुकाने हसले आणि निघून गेले.

त्यांच्याबद्दलच्या आदरयुक्त दबावामुळे मी त्यांच्याशी त्याबद्दल फार काही बोललो नाही. पण नेमक्या त्याच गाण्याबद्दल त्यांनी मला का विचारलं ते माझ्या लक्षात आलं. दिनू रणदिवेंचा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आकाराला येण्यात हात होता. शेवटपर्यंत ती चळवळ त्यांनी सर्वांसोबत लढवली होती. हिंमत न हरता झुंज दिली होती आणि त्यांच्या त्या लढवय्येपणामुळे त्यांची ती झुंज यशस्वी झाली होती…आणि मी माझ्या स्तंभात लिहिलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं नेमकं त्याच संदर्भातलं होतं. त्यामुळेच त्या ऐतिहासिक चळवळीत सहमागी झालेल्या एका पत्रकाराने माझ्या त्या लिखाणाची नोंद घेणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं.

- Advertisement -

शाहीर साबळेंनी गायलेलं ते गाणं महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलं होतं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवरच त्या गाण्याची निर्मिती झाली होती. संयुक्त महाराष्ट्राचा तिढा सुटल्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता. हीच वेळ साधून एचएमव्ही ह्या ध्वनिमुद्रिकांच्या कंपनीने महाराष्ट्रगीतांची ध्वनीमुद्रिका लोकांसमोर आणायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी संगीतकार श्रीनिवास खळेंची निवड केली. पण त्यासाठी खळेंना त्यांनी फक्त तीन दिवसांची मुदत दिली.

खळे मग त्या कामाला लागले. प्रथम कवी राजा बढेंकडे गेले. तुमच्याकडे एखादं महाराष्ट्रगीत आहे का असं त्यांनी राजा बढेंना विचारलं. बढेंनी त्यांच्या पुढ्यात आपली कवितेची वहीच ठेवली. ती वही चाळता चाळता ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ ही रचना खळेंना मिळाली. नंतर ते कवी चकोर आजगावकरांकडे गेले. आजगावकरांनी त्यांना ‘माझे राष्ट्र महान’ ही रचना दिली. खळेंनी युध्दपातळीवर काम सुरू केलं. इथल्या मराठमोळ्या मनाला साजेशी चाल त्यांना सुचली. त्या दमदार चालीसाठी आता त्यांना तितकाच दमदार आवाज लागणार होता. तोपर्यंत भावगीताच्या क्षेत्रात खळेंचं खूप नाव झालं होतं, पण कळ्याफुलांची, चंद्रचांदण्यांची गाणी गाणार्‍या भावगीतगायकांच्या आवाजात ह्या राकट, कणखर, दगडांच्या देशावरचं तगडं प्रेम त्या गाण्यातून व्यक्त होणार नाही हे खळे जाणून होते. त्यांना मग त्या गाण्यासाठी एकच एक नाव आठवलं ते शाहीर साबळेंचं.

त्यांनी लागलीच साबळेंची गाठ घेतली. भेटीचा हेतू सांगितला. सगळं पटपट आटपायचं आहे म्हणून सांगितलं. पुरेशा रिहर्सल्सशिवाय कसं गायचं म्हणून साबळेंनी आश्चर्य व्यक्त केलं. खळेंचीही गाण्याची तशी पध्दत नव्हती. पण तरीही सगळं समजून घेऊन साबळे तयार झाले. खळेंनी मग त्यांची जी काही थोडीथोडकी रिहर्सल घेतली ती कुठे घेतली असेल?….साबळेंचे सहकारी विनोदमुर्ती राजा मयेकरांच्या कलाकार नावाच्या फोटो स्टुडिओत. दुसर्‍या दिवशीही खळेंनी साबळेंना रेकॉर्डिंग स्टुडिओत वादक येण्याच्या थोडं आधी रिहर्सलसाठी बोलवलं आणि मगच गाणं रेकॉर्ड झालं. साबळेंच्या खड्या आवाजात ती गाणी नुसती साकार नव्हे तर जिवंत झाली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गाणं तर तमाम महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. कायम दुमदुमत ठेवलं. हे गाणं नंतर शाहीर साबळेंची वेगळी ओळख बनलं.

वास्तविक मृदूमुलायम, संथ, शांत भावगीतांची स्वररचना करणारे खळे असं जातिवंत, तडफदार गाणं देतील हे कुणाच्याच गावी नव्हतं. खळेंनी ह्या गाण्यातून आपल्या त्या प्रतिमेलाच सुखद तडा दिला होता. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ह्या गाण्याचे संगीतकार कोण, असा प्रश्न विचारला की लोक खळेंचं नाव सोडून हमखास चुकीचं उत्तर देत. आजही खळे ह्या गाण्याचे संगीतकार आहेत हे कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात!

असो, दिनू रणदिवेंच्या आठवणीच्या निमित्ताने ह्या गाण्याची आठवण झाली, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण झाली. कधी कधी एखादं गाणं एखाद्या व्यक्तीशी निगडित असतं ते असं.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या दिनू रणदिवे नावाच्या एका थोर पत्रकाराला ह्या आठवणीच्या निमित्ताने श्रध्दांजली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -