घरताज्या घडामोडीकेवळ पश्चाताप...

केवळ पश्चाताप…

Subscribe

आपण करायला जातो एक आणि होतय भलतंच हा अनुभव अनेक महिलांना सातत्याने येतो. खास करुन विवाहबाह्य संबंध ठेवणार्‍या महिला जेव्हा समुपदेशनाला येतात तेव्हा त्यांची मानसिक, भावनिक सोबतच आर्थिक फसवणूक झाल्याचेच पहायला मिळतेे. स्वतःला पतीपासून न मिळणारे सुख, समाधान, प्रेम शोधण्यासाठी महिला परपुरुषाकडे आकर्षित होते आणि अगदीच नवथर तरुणीसारखं स्वतःच सर्वस्व गमावून बसते. विवाहित पुरुषाशी असे संबंध ठेवताना महिला कोणताही मागचा पुढचा विचार करीत नाहीत आणि त्यांना जेव्हा वास्तवतेचे भान येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

सुधा (काल्पनिक नावं ) अतिशय मोठ्या पदावर गडगंज पगारावर सरकारी नोकरी करणारी बुद्धिमान महिला. दोन मोठ्या मुलांची आई. तिचं वय पंचेचाळीस. पती सोबत नुकत्याच झालेल्या घटस्फोटामुळे बरीच खचली होती. मुलं बर्‍यापैकी मोठी असल्यामुळे स्वतःच्या नोकरी व्यवसायात व्यस्त होती आणि मोठ्या शहरात वास्तव्याला होती. सुधाला बर्‍यापैकी नैराश्य, एकटेपणा जाणवत होता. नौकरी, पगार, आर्थिक स्थिती कितीही उत्तम असली तरी वयाच्या या वळणावर कोणीतरी हक्काची सोबत असावी या विचाराने ती अस्वस्थ होती.  कामांच्या निमित्ताने एका मध्यमवर्गीय विवाहित पुरुषासोबत म्हणजे रवी (काल्पनिक नाव) सुधाची ओळख झाली. रवीदेखील पंचेचाळीस वर्षाचा. दोन मोठ्या मुलांचा बाप. स्वतःची बायको, मुलं आणि एकत्रित कुटुंबातील कर्ता करविता माणूस.

- Advertisement -

रवीचे देखील पत्नीशी अनेक वर्षांपासून  पटत नाही. मतभेद आहेत. वादविवाद आहेत म्हणून ती लांब राहाते. मुलं पण तिच्यासोबत राहतात. आपण एकटेच आहोत या कारणास्तव सुधाला आपण कसे समदुःखी आहोत या भावनेतून मानसिक आधार तो देऊ लागला. साधारण एक वर्ष सुधा रवीच्या चांगल्या स्वभावामुळे, रवी सतत संपर्कात राहिल्यामुळे, तिला मानसिक भावनिक आधार देऊन सावरल्यामुळे बरीच स्थिरावली होती.  तिला वाटणारा एकाकीपणा दूर केल्यामुळे रवीवर सुधा पूर्ण विश्वास ठेऊ लागली होती.  साहजिकच सुधाच्या घरी अनेकवेळा त्याचे जाणे येणे वाढले. सुधाचे नातेवाईक, शेजारी, मित्र मैत्रिणी दोघांनाही एकत्र राहताना वावरताना पाहत होतेच. पण त्यांच्या संबंधांबाबत कोणीही काही आक्षेप घेतला नव्हता.  सुधाच्या मुलांना आईच्या आयुष्यात खूप ढवळाढवळ करण्याची इच्छा नव्हती, ते त्यांच्या व्यापात व्यस्त होते,  परंतु ते रवीला ओळखत होते, त्याला आदर देत होते आणि जेवढा संबंध येईल तेव्हा त्याच्याशी चांगले वागत बोलत होते.

आम्ही दोघेही वयाने, परिस्थितीने पूरक आहोत, शारीरिक, भावनिक बाबतीत जवळ आलेले आहोत, कायमस्वरूपी एकत्रच असणार आहोत ही मानविकता दोघांची झालेली. सुधा रवीच्या उद्योग धंद्यात देखील जमेल तितका सहभाग स्वतःची नोकरी सांभाळून देत होती. रवीने दोन तीन वर्षात व्यावसायिक काम, व्यावहारिक अडचणी, कर्जाची परतफेड  या नावाखाली सुधाकडून वेळोवेळी  वीस-पंचवीस  लाख रुपये परत देण्याच्या बोलीवर घेतले होते. माझ्या मूळ गावी स्वतःचे घर घ्यायचं आहे, घरात वस्तू घ्यायच्या आहेत, मुलांना पैसे पाठवायचे आहेत  यासारखी कारणे सांगून सुधाला भावनिक करुन रवीने वेळोवेळी तिच्याकडून पैसे घेतले होते. सुधा आर्थिक बाबतीत संपन्न आणि कमवती असल्यामुळे तिलादेखील प्रेमाखातर रवीला पैशाची मदत करणे वावगे वाटत नव्हते. तरीही सुधाला त्यांचं नातं असुरक्षित वाटत असल्यामुळे तिने रवीच्या मागे आपण लग्न करूयात असा तगादा लावला होता. मोठ्या प्रमाणात आर्थिक आवक सुधाकडून होत असल्यामुळे रवीनेदेखील मंदिरात लग्न करु असे सांगून सुधाला पटवले होते. रवीची पहिल्या पत्नीपासून कायदेशीर फारकत झालेली नसतानादेखील रवीने सुधासोबत एका मंदिरात विधिपूर्वक लग्न लावले आणि सुधा आपण आता बर्‍यापैकी सेटल झालोय, रवी आता आपलाच आहे, या भावनेतून रवीला अधिकाधिक आर्थिक मदत करु लागली होती. रवीने सुधाकडून घेतलेल्या पैशातून स्वतःच्या नावावर त्याच्या मूळ गावाला घर घेतले, उंची फर्निचर, घराची इतर सजावट इथपासून ते रवीला उत्कृष्ट ब्रॅण्डचे कपडे खरेदी, हॉटेलिंग, टूर्स सर्व काही सुधाच्या पैशातूनच होऊ लागले होते. सुधा स्वतःच त्याला हवं ते पुरविण्यासाठी इच्छुक असायची कारण तिने डोळे झाकून रवीवर विश्वास ठेवला होता.

- Advertisement -

सुधा जेव्हा समुपदेशनाला आली तेव्हा सांगत होती की काही दिवसांपूर्वी तिला रवीमुळे मोठा मानसिक धक्का बसला होता. चक्क आठ दहा दिवस हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत अ‍ॅडमिट होती. तिचं कामात लक्ष लागत नव्हतं, ती ऑफिसला जाऊ शकत नव्हती. झाले असे होते की अचानक सुधाने रवीच्या मोबाईलमधील चॅटिंग, फोटो, व्हिडिओ पाहिले होते आणि रवीचे अजून एक दोन सर्व मर्यादा ओलांडलेली  प्रेम प्रकरण सुधाला समजली होती. इतकंच नाही तर ज्या ज्या परदेशातील रवीच्या वैयक्तिक  टूर्सला सुधाने पैसे पुरविले होते त्या त्या ठिकाणी तो दुसर्‍याच मैत्रिणींनासोबत घेऊन गेल्याचे विमान तिकीट, हॉटेलची बिल सुधाच्या हाती लागले होते. रवीच्या नवीन घरी जे अर्थात सुधाच्या आर्थिक मदतीने घेतले गेले होते यातील काही मैत्रिणी मुक्कामी राहून गेल्याचेदेखील सुधाला समजले होते आणि तिला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. सुधाने रवीला उत्तम राहणीमान पुरविण्यासाठी स्वतःची क्रेडिट कार्ड्स देऊ केली होती तीसुद्धा इतर मैत्रिणीच्या खरेदीसाठी हौसे मौजेसाठी रवीने वापरली होती.  सुधाला स्वतःची नोकरी असल्यामुळे, तिचे स्वतःचे घर असल्यामुळे सातत्याने रवीवर लक्ष ठेवणे अथवा सतत त्याच्या सोबत परदेशात जाणे, राहणे, बाहेरगावी रजा काढून कायम त्याच्या सोबत राहणे, त्याच्या मूळ गावी सतत जाणे  शक्य नव्हते. त्यामुळे अनेकदा रवीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे, स्वतःची एटीएम कार्ड्स वापरायला देणे सुधा डोळे झाकून करीत होती. रवीने स्वतःसाठी तिचे पैसे खर्च केलेले एकवेळ तिला मान्य होतं, पण तिच्याच पैशांवर तो इतर मैत्रिणींसोबत चंगळ करतोय यामुळे ती प्रचंड दुखावली गेली होती.

आजपर्यंत आपण पंधरा वीस लाख रवीवर उधळून बसलोय, त्याची अजून प्रेम प्रकरणे आहेत, त्याने आपल्याला फसवलं  या जाणिवेतून सुधा अक्षरशः आजारी पडली होती, मोठ्या नैराश्यात गेली होती. सातत्याने आत्महत्येचे विचार तिच्या मनात येत होते, म्हणून तिला हॉस्पिटलला भरती करण्याइतपत परिस्थिती ओढवली होती. रवी तिला भेटायला हॉस्पिटलला आला होता, त्याचे कुटुंबातील लोकसुद्धा भेटायला आले होते.

सुधाच्या सांगण्यानुसार रवीने तिला अतिशय शांत भाषेत समजवून सांगितलं होत की, तू तुझ्या फारकतीमुळे नैराश्यात गेलेली होतीस, एकटी होतीस म्हणून फक्त एक मित्र म्हणून मी तुला साथ दिली, सोबत केली. तुला त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मी तुझा चांगला मित्र झालो. तुझ्या भावनिक शारीरिक गरजा मी पूर्ण केल्या. तुला त्या त्या वेळी इतर मदत सहकार्य केलं ते केवळ एक चांगला मित्र आणि सहकारी म्हणून माणुसकीच्या नात्याने. रवीने इतकंच स्पष्टीकरण देऊन तिथून काढता पाय घेतला होता.

सुधा हॉस्पिटलमधून घरी आल्यावर रवीचे कुटुंबीय सुधाला भेटायला आले होते. रवीच्या घरचे तर हे मान्य करायलाच तयार नव्हते की त्याने तिच्याशी देवळात लग्न केलं असेल. आमचा माणूस काय वेडा आहे का पाहिली बायको असताना तुझ्याशी लग्न करेल? त्याला काय कायदा कळतं नाही का?  तू त्याच्याशी लग्न करताना आम्हाला विचारलं होतं का?  अशा लग्नांना काही अर्थ आहे का?  सिरीयल आणि सिनेमात रोज अशी लग्न लागतात. आम्हाला विचारून तू त्याला आर्थिक मदत केलीस का?  तुमचे आर्थिक  व्यवहार आम्हाला माहिती नाहीत. त्याला किंवा आम्हाला दोष देऊ नकोस. तू स्वतःला यातून सावर आणि तूझ्या मार्गाला लाग हा सल्ला सुधाला सडेतोडपणे मिळाला होता.

सुधाने रवीशी केलेल्या लग्नाचे फोटोसुद्धा त्याच्या घरच्यांना दाखवले तर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून तिच्या पाया खालची वाळूच सरकली. रवीच्या काही नातेवाईकांनी सुधालाच दोष द्यायला सुरवात केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार सुधानेच रवीसारख्या एका विवाहित माणसाला नादी लावला. पैशाच्या जोरावर त्याला विकत घेतलं का तू ?  त्याने माणुसकीच्या नात्यातून तुला सावरलं. तरी तो आम्हाला सांगतच होता की सुधा मला ब्लॅकमेल करते, धमक्या देते, तिच्याशी मी दबावाखाली लग्न केलं, मला काही कायम तिच्यासोबत राहण्यात रस नाही. रवीची बहीण सुधाला बोलली होती की तू इतकी शिकलेली, नोकरी करणारी तुला अक्कल नाही का?  तुला तुझ्या टॉर्चरला वैतागूनच आमच्या भावाला शहर सोडून मूळ गावी  जावं लागलं, तिथे स्थायिक व्हावं लागलं, नवीन घर बांधवं लागलं, तुझ्यामुळे तोच खड्ड्यात गेलाय, त्याच्या व्यवसायाची घडी बिघडली आणि तुला त्याच्या उपकाराची जाणीव तर नाहीच उलट त्याच्या मागे लागलीस. रवीची मैत्रीण सुधाला बोलली की तुला त्याने सांगितलं नव्हतं का, आम्ही मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. तू दोन मोठ्या मुलांची आई असून तुला सगळं माहिती असून तूच रवीचा गैरफायदा घेतलास. मी रवीपेक्षा लहान आहे, तो काय तुझ्यासारख्या म्हातारीसोबत आयुष्य घालवणार होता का? रवीची अजून एक बहीण सुधाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन बोलली की इतकी वर्षे तुझे जे नाटक चालले होते ते आम्ही पाहत होतोच, पण रवी आम्हाला शांत बसवायचा. उद्या तुला, तुझ्या जीवाला काही झालं तर तू त्याला अडकवशील, तू आत्महत्या करशील आणि आम्ही फासावर जाऊ. रवीचे इतर कुटुंबातील सदस्य सुधालाच खालच्या दर्जाची स्त्री समजून वाटेल तसे बोलत होते. तुला माहिती नाही का त्याला बायको मुलं आहेत तरी तुला या वयात  मजा मारायला पुरुष हवा होता, म्हणून तू रवीला भरीला घातलंस. तू काय लग्न करुन त्याच्याशी संसार करणार होतीस का?  तुला तुझाच हक्काचा नवरा सांभाळता आला नाही, त्याला सोडला आणि आता आमचं घर बरबाद करायला निघालीस का?

रवीने तर घरच्यांना पुढे करुन सुधाशी सर्व संपर्क तोडून टाकले होते. तो त्याच्या नवीन घरी निघून गेला होता आणि सुधा ज्या शहरात होती तिथे येणेच त्याने बंद करुन टाकले होते. रवीच्या घरचे सुधाने फोन केल्यास तिच्यावरच प्रश्नांचा भडीमार करुन तिला बेइज्जत करीत होते. हे सर्व आरोप, घृणास्पद शब्द ऐकून, वाटेल तसं बोलणं ऐकून सुधाची मानसिकस्थिती खूपच बिघडली होती. यात चूक कोण, बरोबर कोण याहीपेक्षा सुधासारख्या उच्चशिक्षित महिलेने स्वतःची करुन घेतलेली अवस्था नक्कीच केविलवाणी झाली होती. न तिला भविष्यात रवीची साथ मिळणार होती न तिला तिने त्याच्यासाठी खर्च केलेला एक रुपया परत मिळणार होता. सुधाच्या आयुष्यात पश्चातापाशिवाय आता काय शिल्लक राहिलं होतं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -