घरफिचर्सविरोधक सक्षम झाले लोकशाही जिंकली!

विरोधक सक्षम झाले लोकशाही जिंकली!

Subscribe

पंतप्रधान मोदी यांनीही नाशिक, सातारा, परळी येथे सभा घेतल्या तेथे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावताना भाजपची स्वच्छ चेहर्‍याची प्रतिमा डागाळली गेली. 2014 मध्ये याच राज्यातील काँग्रेस आघाडीच्या भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आकाश पाताळ एक केले होते. मात्र आता यापुढे विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत, अशी गुर्मी बाळगत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रवेश देऊन सगळ्या पक्षांच्या भिंती तोडून टाकण्याचा उद्योग केला. या तोडफोडीला लोकांनी सणसणीत चपराक लगावली.

लोकसभेच्या निवडणुकीत खासदारांचा 300 चा आकडा पार करणार्‍या भाजपला आता कोणी रोखू शकणार नाही, असेच गेले पाच महिने देशभर वातावरण होते. भाजपचा वारू चौफेर उधळला होता… आता आमच्यासमोर कोणी विरोधक शिल्लक राहिलेले नाही, असे वातावरण तयार करत त्यांनी लोकशाहीत राहून हुकूमशाहीचे जग तयार केले. नोटाबंदी, महागाई, बेरोजगारी, मंदीची लाट, बंद पडत चाललेले उद्योग, अजूनही 60 टक्के भारत शेतीवर अवलंबून असताना शेतकर्‍यांकडे केलेले दुर्लक्ष अशा सर्व अडचणी असतानाही भाजप देशासमोर मोदींचे परदेशातील कार्यक्रम, प्लास्टिक मुक्ती अभियान असे फक्त एक आणि एक चेहरा कार्यक्रम दाखवत राहिले आणि त्याला जोड दिली ती 370 कलम, रद्द केलेला तलाक कायदा आणि सैन्याचे यश लाटण्याची सतत सुरू असलेली श्रेय लढाई… यामुळे मोदीभक्तांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या; पण जगण्याचे भ्रांत असलेली सर्वसामान्य जनता पिचली जात होती आणि त्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. यात आणखी चिंताजनक बाब होती ती काँग्रेसच्या थंड बस्त्यात जाण्याची.

लोकसभेच्या मोठ्या पराभवातून अजूनही न सावरलेली काँग्रेस उठून उभे राहायला तयार नव्हती. आजारी सोनिया गांधी, निराशनजक राहुल गांधी आणि गांधी परिवार शांत म्हणून चिडीचूप झालेले काँग्रेस नेते यामुळे भाजपचे फावले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुका झाल्या. विरोधकांनी मान टाकल्याने त्या एकतर्फी होणार असे चित्र भाजपने निर्माण केले असताना या दोन्ही राज्यांतील जनता विरोधकांच्या पाठीशी उभी राहिली. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुतीने बहुमत मिळवले असले तरी त्यांची अवस्था गड आला पण… अशी झाली. अब की बार 220 पार! अशी घोषणा देणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमान जनतेने जमिनीवर आणले. भाजपला 104 आणि शिवसेनेला 56 वर आणत सत्ता हाती दिली तरी एक इशाराही दिला आहे.

- Advertisement -

लोकशाहीत तुम्ही राजे नाही. विरोधक संपलेत असे सांगून तुमची मनमानी चालणार नाही. विरोधी पक्षांना आत्मविश्वास देण्याचे काम आम्ही करू… आणि त्यांनी ते करून दाखवले. यासाठी एक 79 वर्षांचा तरुण दिला. त्यांचे नाव होते शरद गोविंद पवार. पाऊसपाणी, वादळवारे, यश अपयश, आजार चिंता, दगाफटका या कशा कशाची पर्वा न करता हा माणूस उभा राहिला आणि त्याने चित्र बदलून दाखवले… राष्ट्रवादीने आमदारांच्या संख्येचे अर्धशतक पार केले. सोबत काँग्रेसलाही पन्नासच्या जवळ आणले. 2014 पेक्षा सरस कामगिरी करून दाखवली. विरोधक सक्षम झाले… लोकशाही जिंकली! हरयाणातही लोकांनी विजयाचे दान एकतर्फी भाजपच्या पारड्यात टाकले नाही. भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवला पण, त्रिशंकू अवस्था करत.

देशाला काँग्रेसमुक्त केले की आपल्या समोर कोणी उभा राहणार नाही. शिवसेना आणि प्रादेशिक पक्षांच्या मुसक्या कशा आवळायच्या या गर्वात आजही भाजप आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना काँग्रेसचे चुकून त्यांनी नाव घेतले नाही. शिवाय राहुल गांधींच्या दोन एक सभा याशिवाय काँग्रेसचे अस्तित्व दिसत नव्हते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सारे आपापल्या मतदार संघात अडकून पडल्याने या निवडणुकीत काँग्रेसला चेहरा नव्हता. लोकांच्या मनात फक्त हात होता, असे असताना काँग्रेसने अस्तित्व कायम राखलं, हे विशेष! खरेतर यंदाची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई होती. त्यामुळे पक्ष म्हणून न लढता जिथे उमेदवार लढतीत आहे, तिथे त्यांनी वैयक्तिक स्वरुपात फाईट दिली. आणि ती स्ट्रॅटेजी यशस्वी झाली. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे आपले गड कायम राखण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच हातातून निसटलेल्या विदर्भाच्या बालेकिल्ल्यांत पुन्हा एकदा मुसंडी मारलीय.

- Advertisement -

विदर्भात काँग्रेसने आपल्या जुन्या जागा पुन्हा मिळवल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या जागा कमी होण्यात काँग्रेसचे यश कारणीभूत आहे. गेल्यावेळी 44 जागा जिंकणार्‍या भाजपला आता केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागतंय. त्याचवेळी 10 जागांवर असलेल्या काँग्रेसने 18 जागा जिंकल्यात. त्यामुळे आताच्या घडीला तरी काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचं भाजपचं स्वप्न सध्या तरी धुळीला मिळालंय. अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना लोकांनी जागा दाखवली हे सर्वात मोठे काम केले. पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद भोगून लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केवळ सत्तेसाठी भाजपचे कमळ हाती घेणार्‍या विखेंना दणका देताना भाजपला केवळ 3 जागा दिल्या. याउलट राष्ट्रवादीला 6 आणि काँग्रेसने 2 जागा पटकावल्या. नगरच्या कर्जत जामखेडमधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडून आले, ही सर्वात उल्लेखनीय बाब ठरली. हा चेहरा भविष्यात राज्याच्या राजकारणातील मोठा होऊ शकतो. आपल्या आजोबांप्रमाणे संयमी राजकारण आणि तरुणांची नस माहीत असलेले रोहित पवार घराण्याची राजकीय परंपरा पुढे घेऊन जातील.

काँग्रेसमुक्तीच्या बाता मारणार्‍या भाजपने गेल्या पाच वर्षांत काय केले याची चर्चा महाराष्ट्रात केली ना हरयाणात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात मोठ्या संख्येने सभा घेतल्या. शेवटी पावसाने त्यांना आता बस करा, म्हणून थांबवले. पंतप्रधान मोदी यांनीही नाशिक, सातारा, परळी येथे सभा घेतल्या तेथे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावताना भाजपची स्वच्छ चेहर्‍याची प्रतिमा डागाळली गेली. 2014 मध्ये याच राज्यातील काँग्रेस आघाडीच्या भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आकाश पाताळ एक केले होते. मात्र आता यापुढे विरोधकच शिल्लक ठेवायचे नाही, अशी गुर्मी बाळगत त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रवेश देऊन सगळ्या पक्षांच्या भिंती तोडून टाकण्याचा उद्योग केला.

या तोडफोडीला लोकांनी सणसणीत चपराक लगावली. वैभव पिचड, हर्षवर्धन पाटील, गोपाळ दास अग्रवाल, गोपीचंद पडळकर, धैर्यशील कदम, रमेश आडसकर, भरत गावित अशा प्रमुख नावांसह भाजपच्या 8 आयारामांना पराभूत केले. भाजपबरोबर जनतेने त्याहून मोठी चपराक शिवसेनेत आलेल्या आयारामांना दाखवली. दिलीप सोपल, जयदत्त क्षीरसागर, भाऊसाहेब कांबळे, शेखर गोरे, रश्मी बागल, विजय पाटील, संजय कोकाटे, दिलीप माने, नागनाथ क्षीरसागर, निर्मला गावित, प्रदीप शर्मा अशा 11 उमेदवारांना लोकांनी घरचा रस्ता दाखवला. सत्तेसाठी लोकशाही नासवू पाहणार्‍या या दलबदलू आणि सत्तापिपासू उमेदवारांना पराभूत करताना जनतेने तुम्ही केलेला नाच आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही, हे दाखवून दिले हे सर्वात मोठे काम केले. मतदारांनी काँग्रेसला जिवंत करताना पुढच्या पाच वर्षांत लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याच्या आणि ते सोडवण्यासाठी विधिमंडळात आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एकएक आमदार, नेता पक्ष सोडून जाऊ लागला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांचे अस्तित्व कमी होऊ लागले आहे, असे वाटू लागले होते आणि तसं चित्रही भाजपने तयार केले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी पवार पॅटर्नच्या राजकारणाचे दिवस संपल्याचे म्हटले होते. पण, शरद पवार हरलेली लढाई जिंकण्यासाठी लढले. आणि यात ते सत्तेच्या गणितापासून दूर राहिले तरी आपल्या अस्तित्वाचे गणित जिंकण्यात त्यांना यश आले, गेल्यावेळी 41 जागांसह चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आकडा यंदा 54 वर आला. शिवसेनेपेक्षा त्यांना फक्त दोन जागा कमी मिळाल्या. निकालावरून राष्ट्रवादीने आपली वोटबँक आणि मतदारसंघ जपलेले दिसताहेत. तसेच पक्ष सोडून जाणार्‍यांना चपराक दिली. त्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर केलेल्यांना दिलेले आव्हान फळाला आल्याचे दिसते. पश्चिम महाराष्ट्र या आपल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला 2014 ला 19 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्या 27 वर नेऊन ठेवल्या.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाड्यातही बरे यश मिळवले. सातार्‍यातील निवडणुकीकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले होते. आपल्या मनाला वाटेल तसे वागताना छत्रपतींच्या गादीचाही मान न राखणार्‍या उदयनराजे भोसले यांच्याविषयी ते राष्ट्रवादीचे खासदार असताना लोकांना आणि शरद पवार सोडून अजित पवार यांच्यासह बहुतांशी नेत्यांना आक्षेप होता. पण, पवारांनी कायम त्यांच्या कॉलर छाप चाळ्याकडे दुर्लक्ष केले. पण, चार महिन्यात त्यांनी पक्ष बदलल्यानंतर पवार खडबडून जागे झाले. विशेष म्हणजे राजेंविरोधात आपण स्वतः उभे राहण्याची तयारी त्यांनी केली. पण सातार्‍यात आपण अडकून पडू हे लक्षात आल्यानंतर त्यांनी विचार बदलून आपल्याच वयाच्या मित्राला श्रीनिवास पाटील यांना राजेंविरोधात उभे केले. खरेतर शरद पवार यांनी सातार्‍यात रान उठवण्यापेक्षा लोकांनी उदयन यांना धडा शिकवला. पाच महिन्यांपूर्वी आम्ही तुम्हाला निवडून देतो; पण आमच्या जनादेशाला तुम्ही ठोकर मारत असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे दाखवून दिले.

पवारांच्या आजच्या यशावर नजर टाकली असता राष्ट्रवादीचे अस्तित्व आज टिकून राहिले, पण पुढे काय? पवारांची ताकद अशीच पुढे राहील, याची खात्री नाही. प्रचंड इच्छाशक्ती असली तरी शरीर चालले पाहिजे आणि ते कोणाच्या हाती नाही. मग काही गोष्टी ठरवूनही होत नाही. राष्ट्रवादीने हीच संधी ओळखून पक्षबांधणी सक्षम केली पाहिजे. नेते आणि त्यांची संस्थाने मोठी करण्यापेक्षा कार्यकर्ते उभे केले पाहिजेत. पवारांना कायम शिवसेना आणि भाजपच्या केडर बेसचे संघटनेचे कौतुक वाटत आले आहे आणि त्यांनी ते मोठ्या मनाने मान्यही केले आहे. आता तशी बांधणी आपल्या पक्षात करायला हवी. रोहितसारख्या तरुण चेहर्‍यांना संधी द्यायला हवी. दुसर्‍या बाजूला अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्यापुरते जग मर्यादित न करता मोठे अवकाश निर्माण करायला हवे. आज अजित पवार यांनी मोठे केलेले लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने पक्षाच्या बाहेर पडले आहेत. मदतीला धावणारा, खुल्या दिलाचा आणि मोठ्या हाताचा असे मोठेपण अजित पवार यांना दादापण देऊन गेले आहे. त्यांना मानणारा पक्षात मोठा वर्ग आहे. ते दोनाचे चार कार्यकर्ते करताना काकांप्रमाणे संयमही त्यांनी ठेवला तर घड्याळ कधी बंद पडणार नाही.

या सगळ्या निकालांच्या रणधुमाळीत मनसेकडे दुर्लक्ष झाले. पण, विरोधकांकडे सत्ता येणार नाही, म्हणून तुम्ही मनसेला सक्षम विरोधी पक्ष बनवा, अशी वास्तवपूर्ण साद घालत राज ठाकरे यांनी लोकांच्या मनात प्रथम विरोधकांना प्रबळ बनवण्याची इच्छा जागृत केली. भले आज त्यांच्या पक्षाला एक जागा मिळाली असली तरी जनतेला जागे करण्याचे मोठे काम केले. नेहमीप्रमाणे त्यांची भाषणे ही ते या घडीला देशातील पहिल्या क्रमांकाचे नेते का आहेत, हे दाखवून देते. भाजप आणि शिवसेनेच्या नाकर्तेपणाचा मोठा पाढा वाचला तो राज यांनी. पण, अजूनही लोक 2009 प्रमाणे मोठे यश त्यांच्या बाजूने देण्यात तयार नाहीत.

असे का? हे त्यांच्या पक्षाच्या कार्य पद्धतीत आहे. बाळासाहेब यांनी जीवाभावाचे नेते आणि शिवसैनिकांची फळी जशी निर्माण केली तसे 2006 साली पक्ष स्थापन झाल्यानंतर आज मनसे तशी का उभी राहिली नाही, याचे आत्मभान जगवायला हवे. राज यांच्या मागे कुठल्याही नेत्याला नाही, असा मोठा युवा वर्ग समर्थक म्हणून लाभला आहे. पण, त्याचा ठोस उपयोग होताना दिसत नाही. या निवडणुकीत तसा तो झाला असता तर भाजप आणि शिवसेनेच्या तोंडाला फेस आला असता. मनसेने दोन आकडी संख्या पार केली असती तर महायुतीला सत्तेबाहेर जावे लागले असते… या सार्‍या गोष्टींचा राज यांनी विचार करायला हवा.

हा निकाल भाजप आणि शिवसेना महायुतीला सत्तेवर बसवत असला तरी तो इशाराही देत आहे. लोकांचे मूलभूत प्रश्न न सोडवता राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती अशाने जनता गप्प बसणार नाही. त्यांना त्यांच्या जगण्याचे आणि जगावण्याचे प्रश्न या सरकारला सोडवावेच लागतील… तुमचे प्रश्न सुटलेत का? याचे उत्तर शोधून मतदान करा, यावर साधक बाधक विचार करत राज्यातील जनतेने यावेळी मतदान केले आहे. सत्ताधारी माजणार नाहीत, याची काळजी घेत विरोधक संपलेले नाहीत, असा हा लोकशाहीला सक्षम बनवणारा निकाल आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्राला जाग आणणारा हा निकाल आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -