लॉकडाऊननंतरच्या मंदीतील संधी

करोना व्हायरस केव्हा नष्ट होईल हे सांगणे कठीण असल्याने सध्या सगळ्याच क्षेत्रावर अवकळा पसरली आहे. २००३ सालानंतर आता पुन्हा तशीच मंदीची लाट पसरणार असे सुतोवाच तज्ज्ञमंडळी करत आहेत. रोज पेपरमध्ये अमुक कंपनीने एवढ्या कर्मचार्‍यांना कामावरून काढले तमुक कंपनीने कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे सगळंच संपल्याचं मत काहीजणांचं झालं आहे, पण ज्यावेळी माणसांच्या सगळ्या आशा मावळतात त्यावेळी आत्मविश्वास, अचूक निर्णय आणि योग्य व्यक्तींची निवड व सोबत असेल तर अशक्यही शक्य होते. अशीच सध्याची परिस्थिती असल्याचे उद्योग जगतात बोलले जात आहे. यातूनच स्टार्टअपसाठी हीच योग्य संधी असल्याचा विचार प्रवाह उद्योग जगतात वाहू लागला आहे.

करोना आणि त्याच्यामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. करोनाचा प्रादुर्भाव व दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या बघून लॉकडाऊनचा अवधी कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर नामवंत कंपन्यांबरोबरच लहानमोठ्या कंपन्यांनीही पगार कपातीबरोबरच कर्मचारी कपातीचा मार्ग निवडला आहे, तर काहींनी सबटेकल पद्धतीचा अवलंब करून कर्मचार्‍यांना पुढील तीन महिने पगार मिळणार नाही, पण तुम्ही आमच्या कर्मचारी पटलावर मात्र राहणार. यादरम्यान, तुमची दुसरीकडे सोय झाली तर जाऊ शकता. असे सांगत कर्मचार्‍यांची कोंडी केली आहे. यामुळे तीन महिने फुकट राबण्यापेक्षा लोकांनी दुसरा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. परिणामी खासगी सेक्टरवर बेकारीचे ढग जमले असून माणसं करोनापेक्षा भविष्याच्या काळजीनेच खचत आहेत, पण असे असले तरी आशावादी लोक मात्र लॉकडाऊनच्या या मंदीतही संधी दडल्याचे भाकित करत आहेत. जे जर्मनीच्या बूट कंपनीने चीनमधून काढता पाय घेत उत्तर प्रदेश गाठल्याने स्पष्ट झाले आहे.

लॉकडाऊनमुळे बाजारच बंद झाल्याने कंपन्या बंद आहेत. उत्पादन निर्मिती थांबली आहे. त्यामुळे कर्मचारीही बेकार झाले आहेत. करोनामुळे जगभरातील व्यवहार ठप्प झाल्याने साहजिकच त्याचा आर्थिक फटका कंपन्यांना बसला आहे. कंपन्या या बाजारातील उत्पादनांच्या मागणीवरच चालत असतात. त्यावरच कंपन्याचे व त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे भविष्य अवलंबून असते, पण करोनामुळे सगळेच विस्कळीत झाले आहे. जेव्हा कंपनीची आर्थिक घडी विस्कटते तेव्हा त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या घराचेही वासे फिरतात. असेच काहीसे दृष्य सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. करोना व्हायरस केव्हा नष्ट होईल हे सांगणे कठीण असल्याने सध्या सगळ्याच क्षेत्रावर अवकळा पसरली आहे. २००३ सालानंतर आता पुन्हा तशीच मंदीची लाट पसरणार असे सुतोवाच तज्ज्ञमंडळी करत आहेत. रोज पेपरमध्ये अमुक कंपनीने एवढ्या कर्मचार्‍यांना कामावरून काढले तमुक कंपनीने कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे सगळंच संपल्याचं मत काहीजणांचं झालं आहे, पण ज्यावेळी माणसांच्या सगळ्या आशा मावळतात त्यावेळी आत्मविश्वास, अचूक निर्णय आणि योग्य व्यक्तींची निवड व सोबत असेल तर अशक्यही शक्य होते. अशीच सध्याची परिस्थिती असल्याचे उद्योग जगतात बोलले जात आहे. यातूनच स्टार्टअपसाठी हीच योग्य संधी असल्याचा विचार प्रवाह उद्योग जगतात वाहू लागला आहे.

त्यातच करोनाच्या याच प्रतिकूल परिस्थितीत कंपन्यांना पुन्हा सुरुवातीच्या चुका सुधारण्याची व नव्याने कंपनीला उभारी देण्याची ही योग्य वेळ असल्याचे बोललं जात आहे. कर्मचारी कपात हा त्यातीलच एक निर्णय असून बुडत्या कंपनीला अधिक न बुडवता उरले सुरले वाचवत गाशा गुंडाळायची हीच योग्य वेळ असल्याचेही काही जणांचे म्हणणं आहे, तर काहीजणांच्या मते करोना व लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्या व स्टार्टअपच्या विचारात असलेल्यांसाठी रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.

चीनने करोना संबंधी केलेल्या कपटामुळे जगभरातील देश चीनवर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक देश चीनमध्ये सुरू केलेले व्यवसाय गुंडाळून भारतात येऊ इच्छित आहेत. चीननंतर सर्वाधिक लोकसंख्येबरोबरच भारतातच स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होते. यामुळे अनेक देशांच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. ही देखील येथील तरुण वर्गासाठी मोठी संधी असणार आहे.

यात काही तज्ज्ञमंडळींनी येत्या काळात नागरिक आरोग्याविषयी अधिक जागृक होणार असल्याचे अंदाज व्यक्त केले आहेत. यामुळे स्टार्टअपच्या विचारात असलेल्यांनी या संधीचा फायदा घेत कमी भांडवलात आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्मितीत उतरावे असे मत व्यक्त केले आहे. करोना बराच काळ आपल्यासोबत राहणार असल्याचे बोलले जात असल्याने सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज, पीपीई किट, साबण, फिनेल, वॉटर फिल्टर, यांसह व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या उत्पादनांची निर्मिती करण्याचा सल्ला दिला आहे.

यापुढे सोशल डिस्टन्सिंगला अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याने व यासाठी लोकांना शिस्त लावणे गरजेचे असल्याने प्रशिक्षित आरोग्य कर्मचारीही कंपन्यांमध्ये यासाठी प्रशिक्षण शिबिर घेत पैसा कमावू शकतात. तसेच यापुढील आयुष्यात सावधगिरी बरोबरच सर्वप्रकारच्या ताणतणावाला सामोरे जावे लागणार असल्याने कंपन्यांना समुपदेशकांचीही मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे. हॉटेलचे खानपान संसर्गासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता असल्याने ‘होममेड फूड’ सारखे छोटेखानी व्यवसाय जोम पकडतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे नोकरी गेल्याने हताश न होता. उत्पन्नाचा दुसरा पर्याय काय ठरू शकतो याचा विचार भारतीय तरुणांनी करणे गरजेचे आहे.

तसेच करोनाच्या धोक्यामुळे पाल्यांना शाळा, कॉलेजात किंवा शिकवणीसाठी बाहेर न पाठवता घरातूनच ऑनलाईन शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नोकरी गेलेल्या उच्चशिक्षितांसाठी ही देखील एक उत्तम संधी ठरणार आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी शारीरिक सुदृढतेबरोबरच मानसिक बळाचीही आवश्यकता असल्याने योग शिक्षक व फिटनेस टीचर्सलाही चांगले दिवस येणार आहेत. या प्रशिक्षकांना परदेशात मोठी मागणी असल्याने तरुणांना हा देखील पर्याय निवडता येणार आहेत. यामुळे नोकरी जाण्याच्या किंवा गेल्याच्या भीतीच्या सावटाखाली जास्त काळ न जगता दुसर्‍या पर्यायाचा विचार करण्याची भारतीयांना हीच नामी संधी आहे. असा विचार करणे ही आजची गरज आहे.

एक मात्र आहे की सकाळी ९ ते ६ च्या रुटीन नोकरीपेक्षा ही वेगळी वाट चोखाळावी लागणार आहे. यात कोणाची हुजरेगिरी न करता स्वता:मधील कौशल्य पणाला लावून पैसा कमावता येणार आहे. यात काहींना अल्पावधीतच यश मिळेल तर काहींना प्रयत्नांची पराकाष्टाही करावी लागेल, पण मागे हटून चालणार नाही. शेवटी प्रयत्नांती परमेश्वरही मिळतो या श्रद्धेवर विश्वास ठेवून भूमिपत्रांना वाटचाल करावी लागणार आहे. यात अनुभव पाठीशी नसल्याने एकदा पडाल, दुसर्‍यांदाही तोंडावर आपटाल, कदाचित तिसर्‍यांदा कोसळाल, पण चौथ्यांदा याच अपयशाच्या पायर्‍यांवरून शहाणे होत यशाची पायरी नक्कीच चढाल हा विश्वास सगळ्यांनीच स्वत:मध्ये निर्माण करायला हवा. कारण अंधारानंतरच तर पहाट होते जी नवीन स्वप्नच नाही तर नवीन उमेद व नवीन समाजाची निर्मिती करते.