घरफिचर्समृत्यूचे तांडव आणि दाहिन्यांची गरज

मृत्यूचे तांडव आणि दाहिन्यांची गरज

Subscribe

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
सुरेश भटांची ही गजल. मरणानं केली सुटका जगण्यानं छळलं होतं,  सर्वसामान्य भावना भटांनी या कवितेत शब्दबद्ध केलीय. पण आजची परिस्थिती अशी आहे की, जगण्याने तर छळलंच पण मेल्यानंतरही छळण्याचा प्रकार सुरू आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये याची प्रचिती येते.

मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी आज नातेवाईकांना चक्क तासंतास प्रतीक्षा करावी लागतेय. ज्याच्या घरात अशी मृत्यूची घटना घडलेली असते त्यालाच या वेदनांची तीव्रता अधिक समजू शकते. एकीकडे कोरोनामुळे सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागते. तर, दुसरीकडे मृत्यूनंतरही मृतदेहावर अंत्यसंस्कार तातडीने होऊ शकत नाहीत. त्यामुळे जो मनस्ताप सहन करावा लागतो तो संताप देणारच असतो. खरेतर प्रतीक्षा ही भारतीयांच्या पाचवीला पूजलेली असते. कधी कामकाजाच्या ‘सरकारी’ पद्धतीने, तर कधी बदलणार्‍या सरकारी धोरणांमुळे कामं प्रलंबित राहतात. त्यामुळे या कामांसाठी प्रतीक्षा करावीच लागते. तुम्ही बँकेत जा, पोस्टात जा किंवा अन्यत्र कुठेही.. तिथं वेटिंग करावंच लागतं. पण आता चक्क अंत्यसंस्कारासाठीदेखील वेटिंग करण्याची वेळ येणं ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. यापूर्वी रुग्णाची टेस्ट करण्यासाठी वशिला लावावा लागत होता. त्यानंतर रुग्णालयात बेड मिळावे म्हणून वशिला लावावा लागला आणि आता अंत्यसंस्कार वेळेत व्हावे म्हणून वशिला लावावा लागतो. जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींना आता ओळखीतल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी वशिला लावण्यासाठी रोजचे फोन येत असतात. राज्यात आजवर सुमारे २ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात तब्बल २६ हजार लोकांचा बळी गेला आहे. याशिवाय अन्य गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही या काळात वाढलं आहे. अशा गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणं दुरापास्त होतं. परिणामी त्यांना प्राण गमवावा लागतो.

- Advertisement -

एकूणच कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि कोरोनाच्या परिस्थितीमुळे अन्य रुग्णांचे झालेले मृत्यू बघता परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सर्वत्र अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दावे राज्य शासन आज कितीही करत असलं तरीही अमरधाम आणि दफनभूमीत दररोज येणार्‍या मृतदेहांची संख्या बघून आजाराचं गांभीर्य अधोरेखित होतं. मृतदेहांचं प्रमाण गेल्या पाच महिन्यांत अचानक वाढल्यानं स्मशानभूमी सध्या सतत धगधगत असतात. तसं पाहिल्यास पारंपरिक पद्धतीनं सरणावर अंत्यसंस्कारासाठी ठिकठिकाणी भरपूर स्मशानभूमी उपलब्ध आहेत. पण कोरोनाचा रुग्ण असेल तर संसर्ग झपाट्याने पसरू नये म्हणून विद्युत दाहिनी, डिझेल दाहिनी किंवा गॅस दाहिनीतच अंत्यसंस्कार करण्यावर भर दिला जातो. अर्थात कोरोनाच्या रुग्णावर पारंपरिक पद्धतीनं सरणावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत, असा कोणताही नियम नाही. मात्र, सरणावर अंत्यसंस्कार करणं तितकं सुरक्षित नाही, जितकं दाहिनीत अंत्यसंस्कार करणं आहे. याचं शास्त्रीय कारण बघता लक्षात येतं की, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृताच्या शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अंत्यसंस्कारात मृतदेह अर्धवट जळू शकतो. शिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हॉस्पिटलपासून स्मशानभूमीपर्यंत येईपर्यंत मधल्या वेळेत मृतदेहावर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली जाते. त्यामुळे मृतदेहातील पाण्याचं प्रमाण वाढते. हा मृतदेह अर्धवट जळू नये म्हणून विद्युत, डिझेल वा गॅस दाहिनीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तसेही संसर्ग पसरू नये म्हणून पारंपरिक पद्धतीनं अंत्यसंस्कारापेक्षा गॅस किंवा विद्युत दाहिनी अधिक सुरक्षित असते. शिवाय अंत्यसंस्कारासाठी वेळही कमी लागतो. पारंपरिक पद्धतीनं अंत्यसंस्कार केल्यास एक मृतदेह जळण्यास सुमारे तीन ते चार तास लागतात. मात्र, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केल्यास अवघा दीड तास लागतो. त्यामुळे उर्वरित मृतदेहांवर कमी वेळात अंत्यसंस्कार करता येतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक स्मशानभूमीत आता विद्युत वा तत्सम दाहिन्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे.

हिंदू धर्मासह अन्य काही धर्मांत अंत्यविधीवेळी अग्निडाग देण्याची प्रथा आहे. लाकडाच्या चितेवर अशा प्रकारचा अग्निडाग दिला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर होतो. परिणामी वृक्षतोडही तितकीच होते. उदाहरण म्हणून आपण नाशिकचा अनुभव लक्षात घेऊ. नाशिकमध्ये डिझेल दाहिनीत गेल्या १७ वर्षात ३२ हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक मृतदेह जाळण्यासाठी साधारणत: ८ मण लाकडांचा वापर होतो. एक मण म्हणजे चाळीस किलो. म्हणजेच ३२ हजार मृतदेहांना अग्निडाग देण्यासाठी १ कोटी २ लाख किलो म्हणजेच १० हजार १९१ टन इतके लाकूड जळण्यापासून वाचले आहे. वृक्षतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यम आकाराच्या झाडांचे वजन साधारणत: ३०० किलो असते. म्हणजेच २० वर्षात तब्बल ३३ हजार ९७२ झाडे तोडण्यापासून वाचली आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार अशा दाहिनीतच केले जावेत यासाठी जनजागृती होणं अपेक्षित आहे. मुळात विद्युत दाहिनी असो वा गॅस, अग्निडाग देण्याची व्यवस्था या दाहिन्यांमध्येही करता येते. शिवाय या दाहिन्यांमधून अस्तींचं संकलनही करता येतं. त्यामुळे मृत्यूपश्चात विधी करण्यासही काही अडचण उद्भवत नाही. मात्र, सर्वसामान्य माणूस या दाहिन्यांचे शास्त्र समजून घ्यायलाच तयार नाही. पारंपरिक पद्धतीचा पगडा त्याच्या डोक्यात इतका बसला आहे की तो चांगल्या पर्यायांकडे दुर्लक्ष करतोय.

- Advertisement -

आज अनेक ठिकाणी गॅस दाहिनी बसवण्यात आली आहे. या दाहिनीत साधारणत: २४ गॅस सिलिंडरचा सेट असतो. यातील गॅस संपल्यानंतर तातडीनं नवीन सेट उपलब्ध होणे गरजचं असतं. पण बहुतांश ठिकाणचे प्रशासन चक्क तीन-तीन महिने सिलिंडरचा पुरवठा करत नसल्याने गॅस दाहिनी या काळात बंद राहते. परिणामी विद्युत दाहिनीवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे मृतदेह बाजूला ठेवत संबंधित नातेवाईकांना चक्क अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागते. गॅसचा पुरवठा वेळच्यावेळी केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. डिझेल दाहिनी, विद्युत दाहिनी आणि लाकडांपासून केले जाणारे अंत्यसंस्कार या तुलनेत गॅस दाहिनीसाठी खर्च कमी येतो. लाकडाच्या प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी सुमारे २४०० रुपये खर्च येतो. तर, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कारासाठी महिनाभराचा खर्च सुमारे दीड लाखांपर्यंत येतो. गॅस दाहिनीत अंत्यंसस्कारांसाठी महिन्याचा खर्च सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत येतो. अर्थात हा काळ खर्च मोजण्याचा नाही की हिशोबाचा. या काळात नागरिकांना मनस्ताप होणार नाही अशा सुविधा देणे हे शासन आणि प्रशासनाचे परम कर्तव्य आहे. त्यासाठी उदासीन असलेल्या व्यवस्थेत तातडीने आपल्या सुधारणा करणे अपेक्षित आहे. जगण्याने आणि मरणाने छळले होते, अशी म्हणण्याची वेळ कुणावरही येऊ नये ही अपेक्षा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -