Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स ओटीटी नव्या भिडूचं नवं राज्य

ओटीटी नव्या भिडूचं नवं राज्य

करोनानंतरची मनोरंजनसृष्टी वेगळी असणार आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म यानंतर इंडस्ट्रीत आपली पावलं रोवण्यास सुरुवात करतील. ज्या प्रकारे यांचे वापरकर्ते वाढले आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी आता स्पर्धा सुरू होईल. चांगला कंटेंट शोधण्यासाठी पैशांचा पाऊस पाडला जाईल. या स्थितीत यापुढे येणारा कंटेंट कसा असेल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतीय सिनेमामध्ये गल्लेभरू सिनेमांना या नंतरच्या काळातही ओटीटी प्लॅटफॉर्मकडून कुठलाच धोका नाही, कारण तसे सिनेमे मोबाईल स्क्रीनवर पाहण्यालायक नसतात. मग अशावेळी कमी बजेटचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित केले जातील. अशा माध्यमांवर सिनेमे प्रदर्शित करणे आपल्यासाठी नवीन असले तरी बाहेर आता हे प्रकार लोकप्रिय झाले आहेत, पण या माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सिनेमांना लोकांचा प्रतिसाद मिळतो का? या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला नेटफ्लिक्सच्या भारतातील इतिहासाकडे पहावं लागेल.

Related Story

- Advertisement -

आपला देश आणि इथले लोक दोन्ही विलक्षण आहेत. जो कोणी आपल्याकडे येतो तो इथल्या वातावरणात मिसळून जातो आणि नाही मिसळला तरी आपण त्याला सामावून घेतोच. कला, साहित्य, संस्कृती, खाद्य काहीही असो बाहेरून आलं की त्याला स्पेशल इंडियन टच द्यावाच लागतो. मग चायनीज नुडल्सला जिर्‍याची फोडणी देणं असो किंवा फोडणीच्या भाताला फ्राईड राईस म्हणणं, जे काही नवीन आपल्याकडे आलं त्याला आपण आपल्यासारखं बनवलं. करोना काळात मनोरंजनाच्या माध्यमातदेखील काहीसा बदल झालाय. थिएटर बंद पडल्याने सिनेमांसाठी आणि मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सामान्य सिनेप्रेक्षकांसाठी हा प्लॅटफॉर्म अजूनही नवीन आहे.

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमसारखी माध्यमं गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे अस्तित्वात असली तरी त्यांची खरी ओळख ही गेल्या २-३ महिन्यात सामान्य प्रेक्षकाला झाली आहे. जेव्हा अशा माध्यमांचे वापरकर्ते वाढायला लागले तेव्हा प्लॅटफॉर्मवरील कंटेंटमध्ये बदल होणे साहजिकच, अमेझॉन, नेटफ्लिक्स यांच्यातील स्पर्धा आणि वाढता सामान्य भारतीय प्रेक्षक यांच्यामुळे या माध्यमांच्या कंटेंटवर प्रभाव पडलेला आहे. म्हणून येत्या काळात चायनीज नुडल्सला जिर्‍याची फोडणी देण्याचा विचित्र प्रकार आपल्याकडे चालतो, अगदी तसंच या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटच्या बाबतीत होऊ नये अशी आशा आहे. कारण गेल्या काही दिवसात प्रदर्शित झालेल्या मिसेस सिरीयल किलर, धूमकेतू आणि choked यांसारख्या सिनेमांनी ही भीती वाढवली आहे.

- Advertisement -

करोनानंतरची मनोरंजनसृष्टी वेगळी असणार आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म यानंतर इंडस्ट्रीत आपली पावलं रोवण्यास सुरुवात करतील. ज्या प्रकारे यांचे वापरकर्ते वाढले आहेत ते टिकवून ठेवण्यासाठी आता स्पर्धा सुरू होईल. चांगला कंटेंट शोधण्यासाठी पैशांचा पाऊस पाडला जाईल. या स्थितीत यापुढे येणारा कंटेंट कसा असेल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतीय सिनेमामध्ये गल्लेभरू सिनेमांना यानंतरच्या काळातही ओटीटी प्लॅटफॉर्मकडून कुठलाच धोका नाही, कारण तसे सिनेमे मोबाईल स्क्रीनवर पाहण्यालायक नसतात. मग अशावेळी कमी बजेटचे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित केले जातील. अशा माध्यमांवर सिनेमे प्रदर्शित करणे आपल्यासाठी नवीन असले तरी बाहेर आता हे प्रकार लोकप्रिय झाले आहेत, पण या माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सिनेमांना लोकांचा प्रतिसाद मिळतो का? या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला नेटफ्लिक्सच्या भारतातील इतिहासाकडे पहावं लागेल.

माझ्या माहितीप्रमाणे ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ हा पहिला हिंदी सिनेमा जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. आता या सिनेमाला थिएटरवर प्रदर्शित करण्यासाठी वितरकदेखील मिळत नव्हते अशी माहिती आहे. जेव्हा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमा म्हणूनदेखील हा चांगला होता, पण याला थिएटरसाठी वितरक मिळत नव्हते, पण हाच सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिट ठरला. फक्त सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या सिनेमानंतर असं वाटलं होत की, आता ओटीटीवर सिनेमांची संख्या वाढेल, पण असं घडलं नाही. १४ फेब्रुवारी २०१८ पासून ते आजतागायत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या हिंदी सिनेमांची संख्या १५ देखील नाही, असं का घडलं? याचं कारण म्हणजे त्या सिनेमानंतर चांगला म्हणावा असा एकही सिनेमा यावर प्रदर्शित झाला नाही. लास्ट स्टोरिज त्यातल्या त्यात बरा होता. मग असं का झालं? याउलट ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रेक्षक या काळात वाढत होता. हिंदी सिनेमे चालत नाहीत आणि हिंदी प्रेक्षक वाढतोय याला कारण काय? ते कारण होतं वेब सिरीज, हिंदी सिनेमात काहीच हाती न लागल्याने जेव्हा नेटफ्लिक्सने आपला मोर्चा वेबसिरिजकडे वळवला तेव्हा त्यांना तिथे यश मिळालं. ‘सेक्रेड गेम्स’ने नेटफ्लिक्सला त्यांचे पाय भारतात रोवण्यासाठी मदत केली आणि मग नंतरच्या काळात नेटफ्लिक्स आपल्याकडे प्रचलित झालं. दरम्यानच्या काळात नेटफ्लिक्सला स्वतःचा असा हिंदी सिनेमा बनविण्यात फार यश आलं नाही, म्हणून आपल्याला तिथं ‘मिसेस सिरीयल किलर’सारखा सिनेमा सहन करावा लागला.

- Advertisement -

नेटफ्लिक्सची ओळख म्हणजे चांगला कंटेंट, पण गेल्या काही काळात यालादेखील टिपिकल इंडियन टच मिळतो आहे. यावर प्रदर्शित केला जाणारा भारतीय कंटेंट कोण निवडतो आहे कुणास ठाऊक… पण त्याने नेटफ्लिक्सबद्दलचा लोकांचा विचार बदलतो आहे. अनुराग कश्यपचा चोक, शिरीष कुंदर (फराह खानचा नवरा) चा मिसेस सिरीयल किलर आणि त्या आधी आलेले काही हिंदी सिनेमे पाहिले तर ही गोष्ट लक्षात येईल. वेब सिरीज हा वेगळा प्रकार आहे ज्यात नेटफ्लिक्स उत्तम काम करतंय, पण जेव्हा प्रश्न सिनेमांचा येतो तेव्हा भारतीय सिनेमांच्या बाबतीत तेवढं यश नेटफ्लिक्सला मिळालेलं नाही. अमेझॉन प्राईमबद्दल बोलायचं झालं तर बोलण्यासारखं काहीच नाही, कारण यांचा अजून भोपळा फुटणे बाकी आहे. जो आता ‘गुलाबो सीताबो’च्या निमित्ताने फुटेल, मग जर यांच्याकडे चांगल्या हिंदी फिल्म्स नसतील तर मग यांना मिळणारा प्रतिसाद वाढेल हे मी कशाच्या आधारावर म्हणतोय? या मागे कारण आहे बॉलिवुडचे बदलते अर्थचक्र. करोनानंतरच्या काळात छोट्या सिनेमांसाठी थिएटर घेणं निर्मात्यांना परवडणार नाही. थिएटर घेतले तरी त्यात प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे सांगता येणार नाही. म्हणून रिस्क टाळून असे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करणे फायद्याचे ठरेल. वाढलेले वापरकर्ते आणि कंटेंटचं प्रमाण या दोन्ही गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडणार आहेत ज्यामुळे यांना फायदा होईल. हा फायदा दीर्घकालीन असेल कारण आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना मिसेस सिरीयल किलरसारखे प्रयोग करायची गरज पडणार नाही. त्यांच्याकडे स्वतः गुलाबो सीताबो, लक्ष्मी बॉम्ब यासारखे सिनेमे चालून येतील. या आधी जे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित केले जात होते त्या मागे स्पर्धा हे मुख्य कारण होतं. लोकांनी सबस्क्रिप्शन बंद करू नये म्हणून त्यांच्या ताटात वाटेल ते वाढलं जात होतं, आता क्वालिटीकडे लक्ष दिलं जाईल म्हणून इथे प्रदर्शित होणार्‍या कंटेंटचे स्वरूप बदलेल.

वेब सिरीज हा प्रकार ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी हुकमी एक्का ठरत आहे. एक चांगली वेब सिरीज प्लॅटफॉर्मच्या प्रेक्षकांना १ वर्षापासून ते ५ वर्षांपर्यंत खिळवून ठेऊ शकते. ब्रेकिंग बॅड हे त्याचेच उदाहरण, वेब सिरीजचे एकाहून अधिक सिझन येतात ज्यासाठी किमान ६ महिने ते १ वर्षाचा काळ लागतो. वेबसिरीज उत्तम असेल तर तिच्या पुढच्या सिझनची वाट प्रेक्षक पाहतात. या सहा महिन्यांच्या काळात अनेक प्रेक्षक सबस्क्रिप्शन बंद न करता त्या प्लॅटफॉर्मवरील दुसरा कंटेंट पाहत असतात, याचा फायदा ओटीटी प्लॅटफॉर्मला होतो. हिंदी वेबसिरीज बाबतीत विचार केला तर, सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन आला आणि आपल्याकडे नेटफ्लिक्स लोकांना माहिती झालं. याआधीही ते अस्तित्वात होतं, पण एका वेब सिरीजने त्याची प्रसिद्धी केली. सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन ऑक्टोबर २०१८ ला आला होता आणि दुसरा सिझन २०१९ मध्ये. या ८ ते १० महिन्यांच्या काळात सेक्रेड गेम्ससाठी म्हणून घेतलेलं सबस्क्रिप्शन अनेक लोकांनी थांबवलं नाही. त्यांनी यावर उपलब्ध असलेला वेगळा कंटेंट पाहिला, ओटीटी बाबतीत हेच होतं. तुमचा कंटेंट लोकांना आवडला तर ते सबस्क्रिप्शन कायम ठेवतात.

अमेझॉनच्या बाबतीत देखील हेच सेक्रेडला टक्कर म्हणून यांनी आणलेली मिर्झापूर लोकांना आवडली. त्यानंतर त्याच्याही पुढच्या सिझनसाठी लोकांनी वाट पाहिली. वेब सिरीज या प्रकारात आघाडीचे दोन्ही ओटीटी माध्यम भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. केवळ एकच जॉनर हाताळला असला तरी लोकांना ते आवडलं. म्हणून सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, फॅमिली मॅन, असूर, पाताल लोक अशा जवळपास एकाच जॉनरच्या सर्व वेब सिरीज लोकांनी पाहिल्या आणि पसंद केल्या आहेत. सोबतच स्टँड अप कॉमेडीचे शोज रिलीज करून तरुणांना आकर्षित करण्याचा यांचा नवीन फंडादेखील चालला. झाकीर खानपासून रम्या वैष्णवपर्यंत, सर्व स्टँड अप कॉमेडियन लोकांना एकत्रित आणून त्यांचे शोज इकडे रिलीज करण्याची ही कल्पना भारतीय युवा वर्गाला आवडली आहे.

भारतात आजघडीला ओटीटी प्लॅटफॉर्मची संख्या वाढते आहे. अमेझॉन, नेटफ्लिक्स, डिज्नी हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी ५, अल्ट बालाजी, ऍपल प्लस, एम एक्स प्लेयर, वुट, उल्लू हे आणि असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. एवढे प्लॅटफॉर्म उपलब्ध असले तरी भारतात अमेझॉन आणि नेटफ्लिक्स वगळता कदाचितच दुसर्‍या एखाद्या प्लॅटफॉर्मला तेवढी संधी मिळू शकेल. कारण कंटेंटच्या बाबतीत इतर सगळी माध्यमे अजून बरीच दूर दिसतात. अल्ट बालाजी जे टीव्हीवर दाखवू शकत नाही ते मोबाईलवर दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. एकता कपूरला जेवढं काही सुचतं ते सगळंच या प्लॅटफॉर्मवर आहे. म्हणून लोकांना आवडेल असा खूप चांगला कंटेंट सध्या तरी यावर उपलब्ध नाही. एम एक्स प्लेयर बी ग्रेड मुव्हीज आणि वेब सिरीज दाखवतंय ज्याचा एक वेगळा प्रेक्षक असला तरी तो मर्यादितच, बाकी चॅनल समूहांनी चालू केलेल्या ओटीटीवर बोलायचं झाल्यास, तिथं मालिका अर्धा दिवस आधी पहा या पलीकडे काहीच नाही. झी ५ आणि वूट यांनी काही प्रयत्न केलेत, पण ते अमेझॉन आणि नेटफ्लिक्स यांचं मार्केट खातील एवढे चांगले नक्कीच नाही.

अ‍ॅपल प्लस अजून लोकांना एवढं माहीत झालं नाही त्याची मार्केटिंग झाली तर कदाचित अ‍ॅपल प्लॅटफॉर्मवर ते प्रसिद्ध होऊ शकते. स्टारच्या मालकीचं हॉटस्टार आता डिज्नीने विकत घेतलंय, कदाचित या दोघांनंतर हा तिसरा खेळाडू होऊ शकतो, पण त्यालाही अजून वेळ आहे. म्हणून सद्य:स्थितीत या खेळात दोनच मुख्य खेळाडू आहेत जे आपली मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी खेळतील. या स्पर्धेतही अमेझॉन गेल्या काही काळापासून पुढे आहे. नेटफ्लिक्सच्या तुलनेत कमी दर, प्राईम मेंबर्ससाठी फ्री होमडिलिव्हरी अशा ग्राहकांना आकर्षित करणार्‍या ऑफर्स देऊन नेटफ्लिक्सचे मार्केट खाण्याचा पुरेपूर प्रयत्न अमेझॉनने केला आहे. यात अमेझॉनकडे असलेले ग्लोबल रिटेल मार्केट महत्त्वाची भूमिका बजावेल. एकंदरीत कंटेंट आणि सबस्क्रिप्शन अशा दोन्ही बाबतीत अमेझॉन प्राईम नेटफ्लिक्सला चांगली टक्कर देईल.

लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला आपला व्यवसाय वाढविण्यासाठी संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. सध्या यांचं वाढलेलं प्रस्थ पाहता लोक थिएटरकडे पाठ फिरवतील, अशी भीती काहींना वाटली, पण माझ्या मते याचा थिएटरवर काहीही परिणाम होणार नाही. जोपर्यंत कपल्स आहेत, कॉलेजची मुलं आहेत तोपर्यंत थिएटर्सला प्रेक्षकांची कमतरता भासणार नाही. याउलट नेटफ्लिक्स अमेझॉनमुळे नव्या लोकांना संधी मिळेल, जे काम टीव्हीएफसोबत मिळून अमेझॉनने केले आहे ते कदाचित छोट्या शहरात येऊनसुद्धा ते करतील. अर्थात, मनोरंजनाच्या क्षेत्रात नव्या असलेल्या या भिडूला राज्य तर मिळालंय, पण ते कुठवर चालतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

अनिकेत म्हस्के

- Advertisement -