पंकजांचे पेल्यातील वादळ पेल्यातच…

दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राष्ट्रीय सचिवांसोबत पक्षवाढीबाबत चर्चा केली. मात्र नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्याशी त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केलेली नाही, असे भाजपकडून ठासून सांगितले जात आहे. याचे दोन अर्थ निघतात की मंत्रिमंडळात मुंडेपैकी कुणाला प्रतिनिधीत्व दिले नाही त्यामुळे जर नाराजी असेल तर त्या नाराजीला पक्षनेतृत्व किंमत देत नाही आणि दुसरा अर्थ अशा प्रकारच्या दबावतंत्राला अनुल्लेखाने मारायचे अशी रणनीती नेतृत्वाने केली असेल.

munde

भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दुसर्‍या विस्तारात डावलल्यामुळे बीड, नगर आणि मुंबईतील काही पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री आणि लोकनेता गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे पालवे काहीतरी मोठा निर्णय घेणार असे चित्र सर्वत्र रंगवले गेले आणि ब्रेकिंग न्यूजच्या दुनियेत गल्ली ते दिल्ली धुरळा उडवला गेला. पण ज्या गतीने नसलेले वादळ निर्माण करण्यात आले त्याच गतीने ते वादळ पेल्यामध्येच विसावले असेच म्हणावे लागेल. केंद्रीय मंत्रिमंडळात बीडच्या पंकजा यांची बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून औरंगाबादचे डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्री बनवण्यात आल्याने त्या नाराज आहेत, असं म्हटले जात होते पण पंकजा मुंडेंनी दोनच दिवसांपूर्वी मौन सोडले आणि प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने मी नाराज नाही. पंकजा आणि प्रीतम यांनी मंत्रिपदाची कधीच मागणी केली नव्हती, असं त्या जाहीर म्हणाल्या मात्र पुढच्याच दिवशी दिल्लीला रवाना झाल्या.

दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राष्ट्रीय सचिवांसोबत पक्षवाढीबाबत चर्चा केली. मात्र नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्याशी त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केलेली नाही, असे भाजपकडून ठासून सांगितले जात आहे. याचे दोन अर्थ निघतात की मंत्रिमंडळात मुंडेपैकी कुणाला प्रतिनिधीत्व दिले नाही त्यामुळे जर नाराजी असेल तर त्या नाराजीला पक्षनेतृत्व किंमत देत नाही आणि दुसरा अर्थ अशा प्रकारच्या दबावतंत्राला अनुल्लेखाने मारायचे अशी रणनीती नेतृत्वाने केली असेल. अन्यथा मंत्रिमंडळ विस्तारानंतर चारच दिवसात पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली, पण त्यात कुणाच्या नाराजीबाबत अवाक्षरही काढले जात नाही, यावरून नाराजीच्या वावड्या आणि काही जणांचे राजीनामे याला भाजप गांभीर्याने घेत नाही. नाही म्हणायला पक्षाचे राष्ट्रीय सचिव जे. पी. नड्डा यांनी पंकजा मुंडे यांना वेळ दिला. या भेटीत आपली नाही तर आपल्या समर्थकांची नाराजी असल्याची भावना पंकजा यांनी बोलून दाखवली त्यावर तुम्हीच कार्यकर्त्यांशी बोलून त्यांना शांत करा असा सल्ला नड्डा यांनी दिल्याने मोदी, शहा आणि नड्डा यांचे अगोदरच ठरलेले होते. त्यामुळे दिल्लीला बैठकीच्या निमित्ताने गेलेल्या पंकजा मुंडे यांना मोदी आणि शहांपुढे आपली आणि आपल्या समर्थकांची नाराजीही नीटपणे व्यक्त करता आलेली नाही.

पक्षाकडून आपल्यावर अन्याय होत असल्यानेच आपण राजीनामे देत असल्याचे बीड जिल्ह्यातील अनेक मुंडे समर्थक पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं, हे नाराजीचे एकमेव कारण नाही. पंकजा मुंडे यांच्या परळीतील पराभवाला पक्षातूनच रसद पुरवली गेली असा मुंडे समर्थकांना संशय आहे. तसेच विधान परिषदही न देता पंकजा यांना राज्यातून दूर करीत पक्षाच्या राष्ट्रीय सचिव करण्यामागेही राज्यातील शेठजी भटजीच कारणीभूत आहे, असा समज कार्यकर्त्यांचा झाला आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना डावलून वंजारा समाजाच्या डॉ. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात संधी देणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. नाराज होण्यासारखी अनेक छोटी-मोठी कारणे आहेत. पण आता आम्ही अन्याय सहन करणार नाही. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी कठीण काळात पक्षाला मोठं केलं. पण आता पक्षात निष्ठावंतांना डावलणारी एक टोळी तयार झाली आहे. नाराज होण्याची शंभर कारणे आहेत, असेच मुंडे समर्थकांना वाटू लागले आहे.

जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देण्याची प्रथा पक्षात सुरू झाली आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. हा एका व्यक्तीपुरता मर्यादित कधीच नव्हता. शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून असलेली भाजपची प्रतिमा गोपीनाथ मुंडे यांनी बदलली होती. त्यांनी भाजपला बहुजन चेहरा मिळून दिला. त्याच्या बळावरच भाजपने महाराष्ट्रात हातपाय पसरले. केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत महाराष्ट्रातून डॉ. भागवत कराड यांचा समावेश होता. कराड हेसुद्धा वंजारी समाजाचे नेते म्हणूनच ओळखले जातात. डॉ. कराड यांना गोपीनाथ मुंडे यांनीच राजकारणात आणले हे विशेष. वंजारी समाजातील भागवत कराडांना वर्षभरापूर्वीच राज्यसभेवर घेतले तर रमेश कराड यांनाही पंकजा मुंडे यांच्याऐवजी विधान परिषदेवर पाठवण्यात आले. हे दोन्ही नेते वंजारी समाजातून येतात. त्यामुळे मुंडे भगिनींचे समाजातील महत्व कमी करण्याचे हे डावपेच आहेत का, अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. जर नेता दुखावला तर कार्यकर्ते नक्कीच दुखावतात. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा दुखावल्या आहेत त्यामुळेच कार्यकर्ते बिथरले असल्याचे दिसते.

डॉ. कराड यांना मंत्रिपद मिळाल्याने हे नेते आमच्यावर लादले जात आहेत, अशी भावना पंकजा, प्रीतम मुंडे आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. म्हणूनच आम्ही ठरवू ते आमचे नेते असा संदेश वरिष्ठांकडे पाठवण्यासाठीच कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी राजीनाम्याचे शस्त्र उपासले होते. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी माझे नेते नरेंद मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा असे सांगत देवेंद्र फडणवीस यांना नेते मानणार नाही असा संदेश दिलेला आहे. पंकजांनी स्पष्टीकरण देऊनही पदाधिकार्‍यांनी राजीनामे देण्यामुळे दोन-तीन शक्यता निर्माण होतात. एकतर कार्यकर्ते भावनिक झाले आहेत, हे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललेलं असू शकतं. पण दुसरीकडे पंकजा मुंडेच्या बाजूने विचार केल्यास त्यांनी कार्यकर्त्यांमार्फत आपला संदेश पक्षाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षनेतृत्वाने त्याची फारशी दखल न घेतल्याने पदाधिकार्‍यांचे राजीनामे मी नामंजूर करीत आहे, असे सांगण्याची वेळ पंकजांवर आली.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी त्यांच्या वरळीतील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना धीर देत राजीनामे देऊ नका, असा आदेश दिलाय. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे फेटाळले आहेत. त्याचबरोबर कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवले. पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हापर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा अनादर करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू, असे सांगत त्यांनी नेतृत्वाला आव्हान देण्याची भाषाही केली आहे.

यानिमित्ताने गोपीनाथ मुंडे यांचा २००५ सालचा किस्सा आठवतो. पक्षात आपल्याला मानसन्मान मिळत नाही, असे म्हणत नाराजी असल्याचे मुंडेंच्या पहिल्या बंडाच्या वेळेस खरे चित्र भाजप आणि संघाला दिसले, तेव्हा दोघांकडून मुंडेंसोबत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा २०११ च्या सुमारास पुणे जिल्हाध्यक्ष पदाची निवड असो वा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवेळी पक्षाकडून आणि संघ अशा दोन्ही पातळ्यांवरून मुंडे यांना पाठिंबा न देण्याचीच भूमिका घेतली गेली. पक्षापेक्षा मुंडे मोठे नाहीत आणि मुंडे यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे ते पक्षाला वेठीस धरू शकत नाहीत असाच संदेश या निमित्ताने मुंडे यांना देण्यात आला होता. त्यावेळीही गोपीनाथ मुंडे नाराज होते.

अफाट श्रम घेऊन मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजवली, याबद्दल भाजपमध्ये कोणाच्याही मनात शंका नाही. उलट, मुंडे यांच्या या योगदानाबद्दल सर्वच नेते आदरपूर्वक उल्लेख करतात. महाराष्ट्रात भाजपमध्ये मुंडेंइतका लोकसंग्रह असलेला आणि महाराष्ट्राची नसन् नस जाणणारा दुसरा नेता नाही याबाबत भाजपच नव्हे तर विरोधकांतही दुमत नाही. पक्षासाठी दिवसरात्र एक करणारे मुंडेही १९८० ची निवडणूक पराभूत झाले होते. मात्र त्यानंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत पुढील ३० वर्षे महाराष्ट्रात भाजप म्हणजे मुंडे असेच समीकरण बनले होते. पंकजा यांचा राजकीय अनुभव जेमतेम १२ वर्षांचा. त्यात दोन वेळा आमदार आणि एकदा कॅबिनेट मंत्री. आयुष्यातील विधानसभेची तिसरी निवडणूक आपल्या चुलत भावाकडूनच हरल्या. त्यामुळे वडिलांप्रमाणे संघर्ष करण्याची तयारी पंकजा यांनी ठेवायला हवी. राजकीय जीवनात वारंवार नाराजी बोलून दाखवली की पक्षश्रेष्ठी किंमत देत नाही हे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून पंकजा यांनी शिकायला हवे. कारण ज्या चार जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे त्या चारही जणांच्या मागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे पंकजा यांना कळून चुकले आहे. असे असतानाही पंकजा यांनी माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा असे सांगून पुन्हा एकदा फडणवीस यांची खप्पामर्जी ओढवून घेतली आहे.

एकदा पराभव झाल्याने खचून न जाता पक्षसंघटन वाढवताना राज्यभर यात्रा किंवा दौरे काढून नेतृत्वाला दखल घ्यायला भाग पाडणे आवश्यक होते. कारण येत्या ९ महिन्यांत राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका आहेत. अशावेळी राज्यात भाजपतील बहुजन नेतृत्व संपलेले असताना पुन्हा एकदा नवीन वाद अकारण निर्माण करण्यापेक्षा कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणे आताची गरज आहे. दबाव तेव्हाच वाढतो जेव्हा नेतृत्व दखल घेते. यापूर्वीही एकदा पंकजा मुंडे नाराज झाल्या होत्या, त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्याचे जाहीर केले होते. मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असे घोषितही केले होते. त्यानुसार मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी उपोषणही केले होते. त्या शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या पाणी प्रश्नाच्या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले आणि पंकजा यांची नाराजी तिथेच शमली. त्यावेळीही त्यांचे बंड पेल्यातील वादळ ठरले आणि बाकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा त्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकारणात ठरवून काहीच होत नाही. जेव्हा आपली क्षमता असतानाही काही मिळत नसते तेव्हा संघर्षाशिवाय पर्याय नसतो. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारस असलेल्या पंकजा यांना आपल्या बळावरही पुढील राजकारण करावे लागेल. कारण नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर नजर टाकली तर लक्षात येईल की मास लीडरची गच्छंती झाली नाही, केवळ टीवटीव करून आभासी नेतृत्व असल्याचे दाखवणार्‍यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळाला तर काहींना कमी महत्वाचे पद मिळाले. त्यामुळे पंकजा यांना ठरवावे लागेल की वडिलांप्रमाणे मास लीडर व्हायचे की आभासी नेतृत्वाच्या जोरावर केंद्रीय नेतृत्वाला आव्हान द्यायचे.