घरफिचर्सपार्थ सांगतो आधुनिक गीता!

पार्थ सांगतो आधुनिक गीता!

Subscribe

अयोध्येत रामजन्मभूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी पायाभरणीची तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर उपसाहात्मक टीका केली. तसेच आपल्याला निमंत्रण मिळाले तरी पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नाही, असे सांगितले. पाचशे वर्षांच्या अखंड लढ्यानंतर आणि अनेक हिंदूंनी बलिदान केल्यानंतर राम मंदिराची पायाभरणी होत आहे. या भावनेचा सन्मान राखण्याचे शरद पवार विसरून गेले; पण त्याच वेळी त्यांचा नातू पार्थ पवार याने ट्विटरवर पत्र लिहून राम मंदिराविषयी जे व्यापक विचार आणि  सर्वधर्मियांनी एकमेकांचा आदर करण्याची जी भूमिका मांडली  आहे, ती पाहून खरं तो नव्या काळाला अनुसरून आधुनिक गीता सांगत आहे, असे वाटते. विशिष्ट समाजाच्या एकगठ्ठा मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन त्याने केलेला हा विचार खरंच अनुकरणीय आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तो त्यांचा वैयक्तिक विचार असल्याचे म्हटले असले तरी त्यांनी त्यातील व्यापकता लक्षात घ्यायला हवी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी पायाभरणी झाल्यानंतर ट्विटरवर एक जाहीर पत्र लिहून त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या पत्रात त्यांनी जे विचार मांडले आहेत, त्यातून त्यांची वैचारिक व्यापकता दिसून येतेे. हिंदूबहुल देशात राहत असताना हिंदूंच्याही भावना आहेत, याचा त्यांनी विचार केला आहे. सर्वधर्मसमभाव बाळगताना इतर धर्मियांच्या भावना जपल्या जातात, तशाच त्या हिंदूधर्मियांना असतात, त्याचे भान बर्‍याच राजकीय नेत्यांना दिसून येत नाही. काही राजकीय नेते तर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात इतकी एकांगी भूमिका घेतात की, ही मंडळी असं का करतात, केवळ निवडणूक जिंकणे इतकीच या मंडळीची इतिकर्तव्यता असते का, असा प्रश्न पडतो. आपण ज्या देशात राहतो, तिथे राहणार्‍या बहुसंख्य समाजालाही काही भावना आहेत, त्यांनाही श्रद्धा आहे. त्यांचे आराध्य दैवत आहे, याचा हे नेेते का विचार करत नाहीत, असा प्रश्न विचारशील माणसाला पडतो. इतर धर्मियांच्या भावनांचा आदर जरूर करावा; पण ते करत असताना इथल्या बहुसंख्य समाजाला गृहीत धरणेही समर्थनीय होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर उभारण्याला सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिल्यानंतर  केंद्र सरकारने न्यायालयाने मशिदीसाठी देण्यास सांगितलेल्या जागेवर मुस्लिमांना मशीद बांधून द्यावी, असे म्हटले होते.

- Advertisement -

अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमाची तारीख निश्चित झाल्यानंतर शरद पवार यांनी राम मंदिर उभारणीविषयी उपहासात्मक टीका केली होती. काही लोकांना राम मंदिर उभारल्यामुळे कोरोना जाईल, असे वाटत असेल म्हणून ते तसं करत असावेत, अशी टिप्पणी पवारांनी केली होती; पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, राम मंदिर हा भारतातील बहुसंख्य हिंदू समाजाच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्याचा सन्मान आपल्याला ठेवायला हवा, त्याची टर उडवून चालणार नाही. कारण कोरोनाशी लढाई ही दीर्घकाळ चालणार आहे. एका बाजूला राम मंदिरावर टीका करणारे पवार दुसर्‍या बाजूला कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प करून चालणार नाहीत, असे सांगत आहेत. म्हणजे आर्थिक व्यवहार चालवताना कोरोनाला बाजूला ठेवा; पण जेव्हा मंदिर उभारणीचा मुद्दा येतो तेव्हा कोरोना आडवा येतो, सारं काही चमत्कारिक आहे.

शरद पवार महाराष्ट्रातून लढवली गेलेली कुठलीच निवडणूक आजवर हरलेले नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे. पण जेव्हा त्यांनी अखिल भारतीय पातळीवर जाऊन काही करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मर्यादा पडल्या. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देशपातळीवर विस्तार करण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. महाराष्ट्रात ज्या शिवसेनेला त्यांनी नेहमीच जातीयवादी ठरवून त्यांच्यावर टीका  केली. त्यांच्याच सोबतीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली.

- Advertisement -

आस्था आणि आत्मियता काय असते, याविषयी शरद पवार ज्यांना आपले राजकीय गुरु मानतात त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची एक आठवण सांगितली जाते, ते केंद्रीय मंत्री असताना त्यांची गाडी हरयाणातून जात होती. त्यावेळी वाटेत त्यांना ‘पानिपत’ असा फलक दिसला. त्यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले. ते गाडीतून खाली उतरले. आजूबाजूचा परिसर बारकाईने न्याहाळला. सोबत उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना विचारले, इथे ‘काला आम’चे झाड कुठे होते? अधिकार्‍यांनी अंदाजाने ती जागा दाखवली. त्यानंतर यशवंतराव तिथे गेले. त्यांनी खाली वाकून आपल्या दोन्ही मुठींमध्ये तिथली माती भरून घेतली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्यानंतर सोबतच्या अधिकार्‍यांना ते म्हणाले, मित्रांनो, ही माती नाही, हे कपाळी लावायचे भस्म आहे. या मातीत माझ्या लाखो मराठी बांधवांनी आपले रक्त सांडले आहे. यशवंतरावांचे हे उद्गार ऐकून सोबतच्या अधिकार्‍यांनाही भरुन आले. यशवंतरावांनी त्यांच्या या आत्मियतेमुळे जनसामान्यांच्या हृदयसिंहासनावर स्थान मिळवले आहे.

शरद पवार यांना महाराष्ट्रात राजकीयदृष्ठ्या प्रबळ असलेल्या मराठा लॉबीचे प्रमुख मानले जाते, दिल्लीत त्यांना मराठा स्ट्राँगमॅन म्हणून ओळखले जाते. पण आपला मराठेपणा आणि त्यालाच लागून येणारे हिंदुत्व त्याविषयी त्यांना किती आस्था आहे, हे त्यांनी राम मंदिराविषयी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ हे राजकीय आत्मकथापर पुस्तक लिहिले आहे, त्यात ते म्हणतात, ‘मी संरक्षण मंत्री असताना पी. नरसिंह राव पंतप्रधान होते, शंकरराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री होते. जेव्हा अयोध्येत बाबरी मशिदीच्या परिसरात कारसेवक मोठ्या संख्येने जमू लागले तेव्हा आपण नरसिंह राव आणि शंकरराव चव्हाण यांना सांगितले होते की, बाबरी मशिदीभोवती लष्कर तैनात करा. कारण कारसेवकांकडून मशीद पाडली जाण्याची दाट शक्यता आहे. तरी पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि जे व्हायचे ते झाले.’ (प्रकरण- अयोध्या अध्याय आणि नंतर, पृष्ठ क्रमांक १४३) या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, नरसिंह राव आणि शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचे नेते असूनही त्यांना कुठे तरी जाणवत होतं की, हिंदूबहुल देशात पाचशे वर्षांपासून परकीय आक्रमक असलेल्या बाबराच्या आदेशाने बांधलेली ही मशीद उभी आहे. अयोध्या ही श्रीरामाची  जन्मभूमी आहे. या ठिकाणी असलेले रामाचे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत. कारण बाबर हा परकीय आक्रमक होता, त्यामुळे या देशात हिंदूंच्या आराध्य दैवताचे मंदिर उद्ध्वस्त करून येथील हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम त्याने केले. असे सगळेच आक्रमक करत असतात. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर त्यावेळी पंतप्रधान असलेले नरसिंह राव यांच्यावर जगभरातून टीका झाली, पण ते डगमगले नाहीत. त्याला ते सामोरे गेले.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर ईडीने धाडी टाकून शेवटी त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली  त्यावेळी पवारांविषयी चर्चा सुरू झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांची मुलगी सुप्रियाताई सुळे यांनी, ‘आम्ही मराठे आहोत, आम्ही कुणाला घाबरत नाही,’ असे विधान केले होते. ज्यावेळी प्रसंग अटीतटीचा येतो त्यावेळी माणसाला आपली जात आठवते, तोपर्यंत सर्वधर्मसमभाव असतो. मराठेपणाविषयी अभिमान असणार्‍यांनी समाजाकडे अधिक व्यापकतेने बघायला हवे. कारण मराठेपणाचा पाया हा हिंदुत्व आहे. शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हे लक्षात ठेवायला हवे. शरद पवारांनी हिंदुत्वावर ब्राह्मणत्वाचा शिक्का मारलेला आहे. ब्राह्मण किंवा ब्राह्मणशाहीला विरोध करताना त्यांनी बरेच वेळा हिंदुत्वविरोधी भूमिका घेतलेली दिसते.  महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराण्याचे विशेष स्थान आणि महत्व आहे. सुप्रियाताई सुळे यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय पातळीवरील एक प्रभावी आणि समंजस व्यक्तिमत्व मानलं जातं. त्यांनी ‘बाबा वाक्य प्रमाण’ या उक्तीतून बाहेर पडायला हवे. एक स्वतंत्र नेतृत्व म्हणून उभे राहण्यासाठी त्यांनी स्वत:ची भूमिका बनवायला हवी. व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. ज्यात या देशातील हिंदूंच्या आस्था, श्रद्धा आणि भावनांनाही स्थान असेल, तो व्यापक दृष्टिकोन पार्थ पवार यांच्याकडे असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. अयोध्येत बाबरी मशीद पतनापूर्वी भाजपच्या नेत्यांची भाषणे झाली, त्यावेळी मुरली मनोहर जोशी यांनी जे भाषण केले त्यात ते म्हणाले की, ‘बाबरी मशीद कृती समिती के नेता सय्यद शहाबुद्दीन को यह ध्यान मे रखाना चाहिए की, उनके और हमारे पुरखे एकही थे, बाबर उनका पुरखा नही था.’  इतकी व्यापकता बाळगली असती तर शरद पवार कधीच पंतप्रधान बनले असते; पण ही व्यापकता त्यांचा नातू पार्थमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच त्याने सर्वसमावेशकतेची आधुनिक गीता त्याच्या पत्रातून सांगितली आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -