घरफिचर्सव्यक्ती आणि स्थिती !

व्यक्ती आणि स्थिती !

Subscribe

तत्कालीन मध्यमवर्गीय वाचकाला अपरिचित जगाचं दर्शन घडविणारी मधु मंगेश कर्णिकांची ‘माहीमची खाडी’ ही कादंबरी 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली आणि साहित्य जगतात या कादंबरीच्या रूपाने एक वादळ घोंगावत आलं. झोपडपट्टीतील जीवनाचे आणि त्यातील समस्यांचे वास्तववादी चित्रण ‘माहीमची खाडी’ मधून घडते. झोपडपट्टीतलं सर्व थरांतील दारिद्य्र, हातावर पोट घेऊन आला दिवस ढकलणारे लोक, काळे धंदे, बेकारी, दारू, मटका यांची व्यसनं, भविष्याचा विचार न करता काहीही करून जगण्याची धडपड, जुन्या पिढीतील नष्ट होत जाणारी ऊब, कौटुंबिक जीवनातील जीवघेणी विदारकता, जन्म घेणार्‍या बालकांच्या आणि त्यांच्या आयांच्या असह्य यातना, मृत्यू, तरुणांच्या गँगचं असंस्कृत वागणं आणि जगणं. स्त्री-पुरुषांचे शारीर पातळीवरचे संबंध या सर्वांचे समूहचित्रण प्रत्ययकारीपणे या कादंबरीत घडतं. या कादंबरीला अर्धशतक उलटून गेलं असताना त्यामधील माणसांच्या अंतरंगाचा वेध घेताना माहीम आणि आजूबाजूच्या भागाचे झालेले स्थित्यंतर आपल्याला मुंबईचा आरसा दाखवते. विशेष म्हणजे माहीमच्या खाडीचं कादंबरी म्हणून साहित्य विश्वातील स्थान अबाधित असल्याची साक्ष देतं. या सार्‍याचा हा कोलाज...

‘माहीमच्या खाडी’तील या व्यक्तिरेखा जरी भावनिकदृष्ठ्या कठोर वाटत असल्या तरी त्यांचे कुठेतरी वास्तवाशी नाते घट्ट जोडले गेले आहे. त्यामुळे जयाच्या बाबतीत तिची झालेली ही फरफट स्त्रीच्या एकंदरीत आयुष्याची फरफट म्हणता येईल. त्यामुळे आजही या व्यक्तिरेखांचा विचार केला तरी यांचा संदर्भ आजच्या काळाशी जोडता येईल. आजच्या काळातदेखील भिक्यासारखे वासनांध आहेत ज्यांची नाळ कुठेतरी आदिमकाळातील भावनेशी जोडली आहे. यातील नैतिकता पाळणारा दादू म्हणा किंवा सरजू कोळी म्हणा हा आजच्या काळातदेखील झोपडपट्टीत तिथल्या आजच्या पिढीला उपदेश देताना आढळेल. जेवडी बाँबे मोठी होईल. तेवढ्या हितल्या झोपडपट्ट्या मोठ्या होणार …हा न्यायच हाय साहेब…जगात शिरीमंत वाढले की गरीबी पण वाढणार. मधु मंगेश कर्णिक यांच्या माहीमची खाडी या कांदबरीला आता ५० वर्षे पूर्ण झाली असली तरी त्यातील पात्रे आजही माहीमच्या खाडी जवळील झोपडपट्टीत हिंडता फिरताना दिसतात.

1969 साली मधुभाई कर्णिक यांची ‘माहीमची खाडी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्याआधी म्हणजे साधारणपणे 1950 च्या आसपास मधुभाईंच्या कोकणातील भावविश्वावर आधारित साहित्याला हा एक वेगळा आयाम होता. आज माहीमची खाडी प्रकाशित होऊन जवळपास पन्नास वर्षांचा कालावधी होऊन गेला, तरीही या कादंबरीच्या आधारे खालील गोष्टी ज्या पन्नास वर्षानंतरदेखील टिकून आहेत त्यांचा उहापोह करून ह्या कादंबरीतील व्यक्तिरेखा पुन्हा तपासता येतात का किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंना चिकटून बसलेला माणूस या परिसरात कसा भासतो किंवा त्याचे भावविश्व या परिसरात किंवा अशा तत्सम परिसरात कसे प्रकट होते याचा एक संदर्भ घेता या कादंबरीचे सांस्कृतिक महत्व कसे विशद होते हे पाहणे जरुरीचे वाटते.

- Advertisement -

या कादंबरीच्या पात्रांचा विचार करता खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे
1. नागर व ग्रामीण अशा दोन्ही परिसराच्या अगदी वेगळ्या परिसरात वावरणार्‍या व्यक्तिरेखा
2. जीवनातील वैविध्याचे भान असणार्‍या पण आपल्यातला कलावंत जपणार्‍या व्यक्तिरेखा
3. भावनिक द्वंद्वाला कितपत प्राध्यान्य देता येईल हे तपासता येईल अशा व्यक्तिरेखा
4. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या हिंदोळ्यावर अडकलेल्या व्यक्तिरेखा
5. भावनिक, गरिबीला पिचलेल्या, शारीरिक भूक शमवण्याची दुर्दम्य इच्छा बाळगून त्या वस्तीत राहणार्‍या व्यक्तिरेखा
6. मानवी जीवनातील जन्म व मृत्यू यांच्या भयाने ग्रासलेली माणसे

अशा वेगवेगळ्या स्थरावर ह्या व्यक्तिरेखा आपल्याला तपासता येतील, मुळात या व्यक्तीरेखांचा शोध घेताना माहीमची खाडी ज्या परिसरात आहे तो परिसर नक्की काय उद्युक्त करतो ते बघता येईल. मध्यमवर्गीय जीवनाच्या पलीकडे हा परिसर अतिशय वेगळा आहे, या पूर्वी जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ या कादंबरीत अशी उघडी नागडी लैंगिकता वेगळ्या वळणावर हाताळली गेली आहे. या आधी मधुभाईंच्या ‘देवकी’ या कादंबरीतून लेखक म्हणून जी भूमिका प्रकट व्हायला हवी ती संवेदनशील होतीच, पण ह्या कादंबरीत ती फार ठळकपणे प्रकट झाली आहे.

- Advertisement -

एक वस्ती जी महानगरीय संस्कृतीपासून खूप दूर आहे, तिचा हा आविष्कार एवढा विस्तृतपणे येतो की, साहजिकपणे तिथली माणसे किंवा तेथील व्यक्तिरेखा तशाच येताना दिसतात. या कादंबरीतून झोपडपट्टीतील स्थिर-अस्थिर जीवन मोठ्या सामर्थ्याने प्रकट झाले आहे. त्यामुळे या कादंबरीतील व्यक्तिरेखादेखील स्थिर-अस्थिरच्या एका विशिष्ठ पातळीवर येताना दिसतात. झोपडपट्टीत असणारे दारिद्य्र, हातावर पोट असणारे केवळ उदरभरण या हेतूने दिवसाला काम करणारे लोक, त्याचबरोबर अनैतिक धंदे, बेकारी, दारू, मटका त्यांची व्यसने, त्यातून निर्माण होणारी कौटुंबिक विदारकता, जन्म आणि मृत्यू यांच्याबद्दल असणारी उदासीनता, झोपडपट्टीतील युवा मुलांची गँग आणि त्यांचे असांस्कृतिक वागणे, स्त्री पुरुषांचे शारीरिक पातळीवर येणारे संबंध त्यातून प्रकट होणारी नैतिकता यासारख्या अनेक घटना ह्या या पात्रांच्या भोवती फिरताना दिसतात.

या कादंबरीत अगदी सुरुवातीला रोशन नावाच्या तरुणीचा घागरा गळून पडतो आणि त्यामुळे तिथल्या पुरुषांच्या तोंडावर जी भाषा येते ती त्या वस्तीला शोभणारी अशीच आहे. त्यामुळे व्यक्तिरेखांच्या मुखात आलेली भाषा ही हिंदी, मराठी किंवा उर्दूमिश्रित आहे. हा भाषिक भेददेखील लेखक म्हणून मधुभाईंच्या बाबतीत दखलपात्र आहेच. या वस्तीत प्रत्येक पात्राची जगण्याची एक भाषा व एक तत्वज्ञान आहे.

जया नावाच्या तरूण मुलीचे पात्र उभे करताना मधुभाईंनी त्या वयाला आणि तिथल्या वातावरणाला शोभेल असा एक आयाम देताना त्या मुलीचे तत्वज्ञान मांडताना तिच्या भाषेत सांगायचे तर सकाळ-संध्याकाळ कुत्र्याला घालतात तसे चार घास पुढ्यात घातले म्हणजे सगळं संपलं ! खायचं कुत्र्या मांजरासारखं नी जगायचं त्यांच्या मोलाने …..का म्हणून ? ….रहायचं झोपडपट्टीत ..खायचं शिळपाक, कापड भिकार्‍याची अन तोंडात इभ्रत कशासाठी …? खूप पाह्यलं आजवर ….नाय राहावल …तुमची इभ्रत तुमच्यापाशी ….मला हक्काची कोठरी पाहिजे ….घरात नळ पाहिजे …झोपायला बिछाना पाहिजे … खायला मटण-चपाती पाहिजे.. नी अंगावर असली झळझळीत कापडा ….झालंच तर एक दिवस आड करून पिक्चर…

हे जगण्याचे तत्वज्ञान सांगताना ते मिळवण्यासाठी तिने तडजोड करायची तयारी दाखवली आहे, त्यामुळे या कादंबरीत जी पात्रे भेटतात ती तशी ठोस आहेत. म्हणजे गंगा म्हणा किंवा रोशन म्हणा किंवा ही जया यांची सर्वांची जगण्याची एक तर्‍हा आहे. त्यात महानगरीय संस्कार नाहीत. कारण ही वस्ती मुळात महानगरीत असून नसल्यासारखी. ह्या महानगरीय संस्कृतीत टॅक्सी किंवा मोटार ही दळणवळणाची साधनं पण इथल्या वस्तीला त्याचं वावडं आहे. गरोदर बाईला ह्या भागात टॅक्सी न मिळणे म्हणजे ह्या वस्तीला किती बाहेर ठेवले आहे याची कल्पना येतेच.

या झोपडपट्टीत सरजू कोळी, दादू यासारखे काही पुरुष आहेत जी नैतिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बाकी सगळा व्यवहार अनैतिक म्हणजे शामू पेंटरसारखा तरूण ह्या वस्तीतल्या तरुण मुलींना विकण्याच्या बेतात आहे. भिक्यासारखा तरूण हा आपल्या बहिणीला वाममार्गाला लावतो तेव्हा त्यातूनच एक वेगळ्या मनोवृत्तीला सामोरी जाणारी माणसं ह्या वस्तीत सापडतात. बायको आजारी असताना तिच्या बहिणीसोबत संसार मांडणारी माणसं ह्या वस्तीत आहेतच. ह्या कादंबरीत काशीराम आहे त्याने आपल्या आई आणि मुलाच्या नकळत आपली झोपडी विकली आणि ह्या दोघांना वार्‍यावर सोडून दिले. त्यामुळे मानवी स्वभावातील अनेक तर्‍हा या कादंबरीतून वेगळ्या स्थरावर प्रकट होताना दिसतात.

पण याच वस्तीत असणारा दादू हा मुस्लीम गृहस्थ तसा कुटुंबवत्सल आहे. तो काशीरामला सल्ला देताना म्हणतो हे बघ, या दुनियेत इन्सानियत ही एकच चीज शाबूत ठेवावी माणसाने, मग जग बुडालं तरी चालेल. आपली बायको, आपली आई, आपले बाल-बच्चे यांना हैराण करून कुणाला आजवर सुख मिळालं हाय …झोपडपट्टीच्या गंदगीत राहायला जरी त्यांना दिलं तरी त्या गंदगीत बुडून उपयोग नाय. ह्या संपूर्ण कादंबरीत सरजू कोळी आणि हा दादू मिया एवढी दोन पुरुष माणसे सच्ची दाखवली आहेत, ज्यांनी मानवी मूल्यांची घसरण थांबवण्यासाठी पराकाष्ठा केली आहे.

या झोपडपट्टीत जी अनाकलनीयता दाखवली गेली आहे, ती मानवाच्या भौतिक गरजा आणि प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे झोपडपट्टी जी वाढत गेली आहे ती गरज म्हणून. माणसाला डोक्यावर छप्पर हवं म्हणून झोपडं बांधलं, त्या झोपडीत राहणार्‍या माणसाच्या पोटाला अन्न हवं, पण ते मिळवण्यासाठी नोकरी नसल्यामुळे किंवा ती मिळवण्यासाठी शिक्षण नसल्याने त्याच्या जोडीला गरज म्हणून बेकायदेशीर धंद्याची पैदास झालेली आढळते. त्यातूनच जुन्या पिढीत धोंडूदादाची गँग त्याच्यापाठोपाठ काशीरामची दादागिरी सुरु झालेली आढळते.

यातील सरजू कोळी ही व्यक्तिरेखा जरी वृद्ध असली तरी दुसर्‍या बाजूला त्याची नीतीमत्ता किती वेगळी आहे हे विशद करताना मधुभाईंनी व्हायोलीनवाला उभा केला आहे. मधुभाईंच्या कथेत कलाकार ही व्यक्तिरेखा मुख्य करून चित्रकाराच्या रूपाने किंवा गायकाच्या रूपाने आली आहे. या कादंबरीत मात्र ती व्हायोलीनवादकाच्या रूपाने आली आहे. हा व्हायोलीनवाला मात्र थोडा कमजोर दाखवला आहे. त्याचं प्रेम हे त्याच्या कलेवर आहे. या कलावंताला दारूचे व्यसन आहे, ज्यावेळी श्यामा पेंटरने या कलावंताचे व्हायोलीन पळवले तेव्हा त्याने संघर्ष केलेला दिसत नाही, तर त्यावेळी सरजू कोळी याच्याकडे त्याने दाद मागितलेली दिसते.

सरजूने प्रसंगी शामूशी दोन हात करत व्हायोलीनवाल्यांचे व्हायोलीन मिळवून दिले. त्याच रात्री ह्या व्हायोलिनवादकाने झोपडपट्टी सोडली. झोपडपट्टी सोडली म्हणण्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांनी त्याला ती सोडायला लावली. तो गेला तेव्हा सरजू मात्र चांगलाच हळहळला. तेव्हा सरजूच्या जगण्याचे काय रहस्य आहे हे दोन प्रसंगातून व्यक्त होते. एक म्हणजे व्हायोलिनवाला झोपडपट्टी सोडून गेला तेव्हा कोण बी असूंदे ….पण माणूस दिलाचा होता ….इतका प्यायचा …पण कदी दंगा नाय का मस्ती नाय ….शिवी नाय की गाली नाय.. तुणतुण हातात आलं की बादशा ! बापडा गेला आपल्या माणसात …जावंदे ! सुखात राव्हंदे ….तकदीराचा फेरा चुकला म्हंजे बादशाला पण भिकारी बनावं लागत ….एवढा मोठा रामराजा ….पण त्याला बी वनवास चुकला नाय …..एवडे मोठे पांडव…. हे तत्वज्ञान समजून सरजू जगला, या झोपडपट्टीत राहिला.

दुसरा प्रसंग सांगता येईल तो म्हंजे झोपडपट्टी खालसा होणार ही बातमी जेव्हा किंवा त्याबाबत बोलणी जशी लोकांच्या कानावर येऊ लागली तसे सरजूने आपला अनुभव किंवा आपले ठोकताळे मांडले. हे ठोकताळे आजच्या काळातदेखील लागू पडतात. त्यामुळे पन्नास वर्षे झाली तरी कादंबरी पुन्हा नव्याने आपणाला भेटत राहते. यावरून सरजूचा या सामाजिक किंवा राजकीय जीवनाशी किती संबंध आला असेल किंवा त्यातील सत्य त्या पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेल्या माणसाने किती आत्मसात केलं असेल याची कल्पना येते, तो चिडून म्हणतो. झोपडपट्टी उठली पाहिजे. या खाडीत पाप लई माजलय साहेब. हित लोक आईला विचारत नाहीत. भाऊ भैनीला विचारत नाय. ….पडोसी पडोसीला, दोस्त दोस्ताला विचारत नाही. तुमी कितीपण मोठे रोड बांधा, बिल्डिंग बांधा, मुंबैमधली झोपडपट्टी नायशी करणं तुम्हाला जमणार नाही…..जेवडी बाँबे मोठी होईल. तेवढ्या हितल्या झोपडपट्ट्या मोठ्या होणार …हा न्यायच हाय साहेब…जगात शिरीमंत वाढले की गरीबी पण वाढणार…..

यावरून सरजू असेल किंवा दादू असेल या व्यक्तिरेखा वास्तववादी विचाराच्या आणि ढोस आहेत. या वस्तीच्या नैतिकतेला सुरुंग लावण्याचे काम शामाने केलेलं आढळेल. शामा हा तसा कामुक आहे तसा लोभी आहे म्हणजे त्याला धनाची भूक आहे, त्याला लैंगिकतेची भूक तर जास्त आहे. ही भूक केवळ त्याच्यापुरती मर्यादित नसून जयासारख्या स्त्रीला त्याने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडले, जेव्हा हे प्रकरण अंगावर शेकते आहे असं लक्षात आलं तेव्हा त्याने तिला तिच्या आईकडे पाठवले, त्यामुळे मानवी विकाराची जंत्री या वस्तीत वास करून आहे.

मंटू आणि भिक्या ही मात्र गर्तेत गेलेली आढळतात. शिक्षण, नैतिकता याच्या अज्ञानामुळे मंटूसारख्या माणसाने भिक्याला त्याच्या लैंगिक आजारावर उपचार म्हणून कोवळ्या मुलीशी संबंध ठेवण्यास सांगितले, मंटूचा सल्ला प्रमाण मानून भिक्याने रात्रीच्या अंधारात झोपडपट्टीतल्या दुकानात जाणार्‍या एका लहान मुलीला त्या हेतूने पकडलं, पण त्याला त्याचा हेतू पूर्ण करता आला नाही. कुत्र्याच्या भुंकण्याने तिथले पोलीस जागे झाले आणि त्यांनी भिक्याला पकडले. थोड्यावेळाने शहनिशा झाल्यावर कळून आलं की, ज्या मुलीला भिक्याने धरलं होतं ती भिक्याची सख्खी बहीण रतन होती. हा प्रसंग जरी दाहक असला तरी झोपडपट्टीत असणारी अर्धवट ज्ञानाने उजळ झालेली माणसे कसा घोटाळा करतात हेदेखील लक्षात येईल.

या कादंबरीत आलेल्या जया, रोशन, सकीना, गंगा या सर्व व्यक्तिरेखा त्यांच्यापरीने ठळकपणे आलेल्या असल्या तरी जया ही व्यक्तिरेखा झोपडपट्टीतल्या तरुण स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. तिच्या इच्छाआकांक्षा, त्यातून येणारे नैराश्य ही जयाच्या रूपाने वाचकांसमोर येत असतानाच. भिक्याच्या आतताई वागण्याने चिडलेली गंगा किती प्रखर आहे हे शेवटच्या प्रसंगातून कळतेच. अर्थात या स्त्रियांची दु:ख ही महानगरीय स्त्रीपेक्षा भावनिक पाळतीवर समान असली तरी भौतिक पातळीवर त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे गरीबी हा मुख्य घटक जरी केंद्रस्थानी ठेवला तरी त्याचा बाजूने इच्छेची त्रिज्या मोठी होत जाऊन निराशेचा परीघ फार मोठा होत जातो हे जयाच्या व्यक्तीरेखेवरून कळते.

या व्यक्तिरेखा जरी भावनिकदृष्ठ्या कठोर वाटत असल्या तरी त्यांचे कुठेतरी वास्तवाशी नाते घट्ट जोडले गेले आहे. त्यामुळे जयाच्या बाबतीत तिची झालेली ही फरफट स्त्रीच्या एकंदरीत आयुष्याची फरफट म्हणता येईल. त्यामुळे आजही या व्यक्तिरेखांचा विचार केला तरी यांचा संदर्भ आजच्या काळाशी जोडता येईल. आजच्या काळातदेखील भिक्यासारखे वासनांध आहेत ज्यांची नाळ कुठेतरी आदिमकाळातील भावनेशी जोडली आहे. यातील नैतिकता पाळणारा दादू म्हणा किंवा सरजू कोळी म्हणा हा आजच्या काळातदेखील झोपडपट्टीत तिथल्या आजच्या पिढीला उपदेश देताना आढळेल.

गरिबीला कंटाळलेली तरीही इच्छाआकांक्षेशी तडजोड न करता त्या पूर्ण करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी जया ही ठिकठिकाणी आढळेल. अनैतिक किंवा नैतिक यांच्यामधील रेषा पुसून जीवन जगणारे कितीतरी शामा पेंटर झोपडपट्टीच्या कोपर्‍या कोपर्‍यावर बसलेले आढळतील. आता प्रश्न असा राहतो की, या व्यक्तिरेखा फक्त झोपडपट्टी पुरत्या मर्यादित आहेत का ? …..तर ढोबळमानाने तसे म्हणणे चुकीचे ठरेल. ही आदिमभावना महानगरीय असो, ग्रामीण असो कुठल्याही संस्कृतीत आढळते.

गाव सोडून नवीन स्वप्न उराशी घेऊन आलेल्या कितीतरी मुली आजही वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त होताना आढळतात. मनातली स्वप्ने आशा पूर्ण करण्यासाठी आपल्यावरील मानवीबंधने जुगारण्यासाठी कितीतरी मुली (मुलेदेखील ) तयार होतात. त्यामुळे केवळ कल्पनाविष्कार म्हणून या कादंबरीत डोकावणे पूर्ण चुकीचे आहे. मधुभाईंनी ‘माहीमची खाडी’ लिहिताना जो स्थळ भाग ठेवला आहे, तो धड महानगरीय म्हणता येत नाही, तो महानगरीय संस्कृतीचा भागदेखील म्हणता येत नाही. त्यामुळे पात्रांच्या मुखी जी भाषा आहे ती खास झोपडपट्टी संस्कृतीचा भाग आहे. म्हणून त्या जागी केवळ फुल्या फुल्या न मांडता ते शब्द किंवा वाक्य तशीच येतात.

ही कादंबरी आणि त्यातील व्यक्तिरेखा या समाजशास्त्रीय, धर्मशास्त्र, राजकारण, शैक्षणिक स्थर, यांचे संदर्भ घेत विस्तारत जाताना आढळते. या कादंबरीतील पात्रांच्या बाबतीत नक्कीच वेगळी प्रयोगशीलता आढळते. यातील प्रत्येक पात्राच्या हाती शेवटी काही लागत नाही. म्हणून कादंबरी ही या पात्रांच्या निर्मितीतून सुखांत होईल ही कल्पना धूसर करणारी आहे. जशी गंगा हे पात्र विचारात घेता तिच्या कुटुंबातला प्रत्येक घटक तिला सोडून जातो, तिचा मुलगा भिक्या तोच तिच्या मुलीची शेवटी वाट लावतो. त्याच्या मागोमाग घर जाते. तिची वस्ती दुरावली जाते. त्यामुळे या कादंबरीतल्या व्यक्तिरेखा या सुख-दु:खाच्या वळणावर हेलकावताना आढळतात. या काहीशा नीती-अनीती, शास्त्र, श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या पलीकडे मानवीमूल्यांचा र्‍हास करणार्‍या आहेत.

त्यामुळे मधुभाईंच्या इतर महानगरीय संवेदना ठळकपणे साहित्यात ज्या पद्धतीने येतात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने या कादंबरीत येताना आढळतात. हे त्या कादंबरीत रंगवलेल्या पात्रामुळे. या व्यक्तिचित्रणात नीती-अनीती, बेदखलपणा, खोटेपणा, नाकर्तेपणा, त्यातील अस्ताव्यस्त लैंगिकता या सर्वातून प्रकट होणारी मानवीमूल्ये ही प्रखरपणे पुढे येतात. हे या व्यक्तिरेखांचे वैशिष्ठ्य आहे.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -