घरफिचर्सनाटककार गोविंद बल्लाळ देवल

नाटककार गोविंद बल्लाळ देवल

Subscribe

सांगलीचा नाट्यानुकूल परिसर, वडील बंधू संगीशास्त्रज्ञ, दुसरे बंधू हे कुशल नट आणि किर्लोस्करांसारखे मुरब्बी नाट्यगुरू असे त्यांच्या भोवतालचे वातावरण नाट्याला पोषक होते. साहजिकच अल्पकाळ शिक्षकाचा व्यवसाय केल्यावर देवलांनी हयातभर नाट्यसेवेला वाहून घेतले.

गोविंद बल्लाळ देवल यांचा आज स्मृतिदिन. गोविंद बल्लाळ देवल हे प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यदिग्दर्शक. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८५५ रोजी सांगली संस्थानातील हरिपूर या ठिकाणी झाला. वडील बल्लाळ उर्फ बाळाजीपंत हे अल्प वेतनावर संस्थानी नोकर होते. देवलांचे ज्येष्ठ बंधू कृष्णाजीपंत ह्यांचा संगीतशास्त्राचा मोठा व्यासंग होता. मधले बंधू रामभाऊ हे त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीकर नाटक मंडळीतील एक उत्तम नट होते. देवलांचे मराठी शिक्षण प्राथमिक शाळेत आणि संस्कृतचे अध्ययन खासगीरित्या हरिपूरला झाले. वडीलबंधूंना नोकरी लागल्यावर कोल्हापूर व बेळगाव येथे माध्यमिक शिक्षण होऊन १८७८ मध्ये ते मॅट्रिक झाले. बेळगावच्या रहिवासात सुप्रसिद्ध नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्याशी त्यांचा दाट परिचय झाला. पुढे पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजातील शेतकी शिक्षणवर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून देवलांनी १८८० मध्ये प्रमाणपत्र मिळविले. सांगलीचा नाट्यानुकूल परिसर, वडील बंधू संगीशास्त्रज्ञ, दुसरे बंधू हे कुशल नट आणि किर्लोस्करांसारखे मुरब्बी नाट्यगुरू असे त्यांच्या भोवतालचे वातावरण नाट्याला पोषक होते. साहजिकच अल्पकाळ शिक्षकाचा व्यवसाय केल्यावर देवलांनी हयातभर नाट्यसेवेला वाहून घेतले.

पुण्यात असताना देवल आणि शंकरराव पाटकर यांनी आर्योद्धारक नावाची नाटक मंडळी नाट्यकलेला नवे वळण लावण्याच्या हेतूने स्थापन केली. या मंडळीत असताना परशुरामपंततात्या गोडबोल्यांनी मराठीत अनुवादिलेल्या वेणीसंहार नाटकातील अश्वत्थामा आणि महादेवशास्त्री कोल्हटकरांच्या अथेल्लोमधील अजितसिंग या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. १८८० साली किर्लोस्कर नाटक मंडळी स्थापन झाली. किर्लोस्कर पद्धतीची नाट्यपदे रचण्यात देवल कुशल होते. किर्लोस्करांच्या शाकुंतलातील शकुंतलेची पदे देवलांनी रचली आणि त्या मंडळीचे ते आधारस्तंभच बनले. देवलांनी इंग्रजीवरून तीन, संस्कृतवरून तीन व एक स्वतंत्र अशी एकूण सात नाटके रचली. टॉमस सदर्नकृत द फेट्ल मॅरेजवरून गॅरिकने तयार केलेल्या इझाबेला या रंगावृत्तीच्या आधारे दुर्गा (१८८६), शेक्सपिअरकृत ऑथेल्लोची रंगावृत्ती झुंझारराव (१८९०) व मर्फी आणि मोल्येर यांच्या अनुक्रमे ऑल इन द राँग आणि गॉनारेल या नाटकांवरून फाल्गुनराव अथवा तसबिरीचा घोटाळा (१८९३) ही त्यांची परकीय नाट्यकृतींची रूपांतरे होत. पुढे फाल्गुनरावचे गंधर्व नाटक मंडळीसाठी केलेले संगीत रूपांतर संशयकल्लोळ (१९१६) हे कमालीचे लोकप्रिय ठरले. मृच्छकटिक (१८८९), विक्रमोर्वशीय (१८८९) व बाणाच्या कादंबरीवर आधारलेले शापसंभ्रम (दुसरी आवृ. १९००) ही त्यांची संस्कृताधारे रचलेली नाटके. त्यांच्या दुर्गा नाटकाला राजाराम कॉलेजचे, तर शापसंभ्रमला इंदूरच्या महाराजांचे पारितोषिक मिळाले होते. पण या दोन्ही नाटकांपेक्षा त्यांच्या मृच्छकटिक, झुंझारराव आणि संशयकल्लोळ यांना प्रायोगिक यश विशेष लाभले. तथापि यांहीपेक्षा त्यांचे सं. शारदा (१८९९) हे नाटक साहित्यिक आणि प्रायोगिक या दोन्ही दृष्टींनी अद्वितीय ठरले. अत्यंत प्रयोगक्षम नाट्यकृतींचे लेखन आणि स्वाभाविक अभिनयशिक्षण या द्विविध प्रकारे रंगभूमीशी तादात्म्य पावून देवलांनी जी रंगभूमीची सेवा केली, ती चिरंतन स्वरूपाची आहे. अशा या थोर नाटककाराचे १४ जून १९१६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -