घरफिचर्सहळवे क्षण - सुखद क्षणांचा प्रवास

हळवे क्षण – सुखद क्षणांचा प्रवास

Subscribe

कबड्डी या खेळामुळे शिस्त, नियमित व्यायाम व वेळेचे नियोजन अशा अनेक गोष्टी अंगवळणी पडल्या आणि आजही या गोष्टींना माझ्या जीवनातील स्थान कायम आहे. या खेळांमुळे का होईना खूप छान क्षण आणि व्यक्ती मला लाभले.

कबड्डी माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. शिस्त, नियमित व्यायाम व वेळेचे नियोजन अशा अनेक गोष्टी अंगवळणी पडल्या आणि आजही या गोष्टींना माझ्या जीवनातील स्थान कायम आहे. या खेळांमुळे का होईना खूप छान क्षण आणि व्यक्ती मला लाभले.

नोकरीला लागल्यापासून लिखाणाकडे तसं दुर्लक्ष झाले होते. मात्र आज बर्‍याच दिवसांनंतर लेखणी हातात घेतल्यावर लिहिण्याचा मोह झाला आणि अनेक विषय मनात रेंगाळू लागले. नेमक्या कोणत्या विषयावर लिहू हे समजत नव्हते. एकीकडे याचा विचार करीत असताना दुसरीकडे माझी इतर कामं सुरू होती. त्याचदरम्यान मला माझ्या कपाटातील एक बॅग माझ्या हाताशी लागली. त्यात काय हे पाहण्यासाठी बॅग उघडली अन् आयुष्यातील अविस्मरणीय क्षण टिपून ठेवणारा फोटो अल्बम हाती लागला. अल्बमची पानं उलटली आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. चेहर्‍यावर स्मित हास्य उमटले व आनंदाश्रू आले. आणि मग पटकन कागद आणि पेन घेतला व लिखाणास सुरूवात केली.

- Advertisement -

प्रत्येकाच्या जीवनात अविस्मरणीय आठवणी असतात. ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणं त्या गुलाबजाम सारख्या गोड तर कधी कैरीसारखं आंबट, मिरचीसारखं तिखट तर कधी औषधासारखं कडू देखील असतात. या आठवणी मनाच्या कोपर्‍यात कायमस्वरूपी घर करून राहतात. मलाही अल्बम उलगडल्यानंतर सर्वात आधी समोर आला तो बालपणातील सर्वात निरागस असणारे दिवस म्हणजेच शालेय जीवनातील फोटो. त्यात पिकनिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा महोत्सवाच्या फोटोंचा समावेश होता.

हे सारे फोटो पाहताना त्यावेळच्या मित्रमैत्रिणींसोबत केलेली धमाल-मस्ती असो किंवा चेहर्‍यावरील निरागसतेला उजाळा मिळत होता. त्यातही क्रीडा महोत्सव तीन दिवसांचा जरी असला तरी तो मला वर्षाचे बाराही महिने असावा असं वाटायचं. कारण पटांगण आणि मी जणू काही वेगळंच समीकरण होतं. याच काळात माझा कबड्डी खेळाशी जास्त जवळीकता वाढली. त्याला कारणही तसंच होतं. आमच्या पी.टी शिक्षिका क्रांती डहाळे यांनी माझ्यातील क्रीडा कौशल्य हेरलं होतं आणि खेळण्यासाठी देखील त्यांचेच प्रोत्साहन खूप मोलाचं ठरलं. त्या नियमित मैदानात शाळा सुटल्यानंतर काही निवडक विद्यार्थ्यांचा सराव घ्यायच्या. माझा कबड्डी खेळातील वाढता कल पाहून त्यांनी त्यांच्या परिचयाच्या गोरेगावमधील दत्तसेवा क्रीडा मंडळ क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. तिथे मला आणखीन छान मित्रमंडळींचा सहवास लाभला. त्यांच्यासोबत चार गोष्टी आणखीन शिकता आल्या.

- Advertisement -

अल्बममधील पानं पलटताना क्लबमधील कबड्डीच्या सरावांचे व सामन्यांचे फोटो एकेक करून मी पाहत होते आणि आठवणींच्या त्या कोपर्‍यात डोकावत होते. महाविद्यालयात गेल्यानंतर कबड्डी माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला. त्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. शिस्त, नियमित व्यायाम व वेळेचे नियोजन अशा अनेक गोष्टी अंगवळणी पडल्या आणि आजही या गोष्टींना माझ्या जीवनात स्थान कायम आहे. त्या छायाचित्रांतून मी खेळलेल्या राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील क्षण पाहताच पुन्हा नव्याने त्या अनुभवांचा आस्वाद घेत आहे असं वाटू लागले. प्रत्येक फोटोंमधील सवंगड्यांच्या चेहर्‍यावरील हावभाव जणू काही माझ्याशी बोलत होते. त्यानिमित्तानं पुन्हा जाणीव झाली की देवानं माझ्या वाट्याला चांगल्या माणसांचा ठेवा दिला. त्यासाठी देवाची मी खूप आभारी आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वातून खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांचे प्रेमळ स्वभाव व माझ्या सुखदुःखातील सहभागांमुळे आमच्या नात्यातील वीण आणखीनच घट्ट होत गेली.

prajakta kambli
प्राजक्ता कांबळी

अचानक हाती लागलेल्या अल्बममधील क्षणांनी माझ्या आठवणींना उजाळा तर दिलाच. त्याशिवाय त्या सुखद क्षणांचा प्रवासही घडविला. थोडा वेळ का होईना… मी आठवणींमध्ये रमले आणि रिफ्रेश झाले. खरंच किती सुंदर होते ते दिवस आणि ते क्षण…!


प्राजक्ता कांबळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -