घरफिचर्सराजकीय रंगात रंगतोय कोरोना!

राजकीय रंगात रंगतोय कोरोना!

Subscribe

राजकीय हेतूने प्रेरित नियमावलीचा परिणाम ठाकरे सरकारच्या प्रतिमेवर झालाय हे मात्र आता खात्रीशीर वाटू लागलंय

सणांच्या कालावधीतच फक्त कोरोना कसा काय येतो, असा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. नारायण राणेंच्या घराबाहेरील आंदोलन तसेच त्यांची मुंबईपासून ते कोकणातील जनआशीर्वाद यात्रा कशी काय चालते? राजकीय नेतेमंडळीच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभातील गर्दी कशी काय चालते? सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेशबंदी करत दुसरीकडे राजकीय नेतेमंडळी कशी काय मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जातात? असे अनेक प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडत आहेत. प्रत्येकवेळी या प्रश्नांना राजकीय पक्षांकडून वाचा फोडली जाणे गरजेचे नाही. पण या राजकीय हेतूने प्रेरित नियमावलीचा परिणाम ठाकरे सरकारच्या प्रतिमेवर झालाय हे मात्र आता खात्रीशीर वाटू लागले आहे.

मुंबईतील गणेशोत्सवात मानाचा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. जितकी चर्चा लालबागच्या राजाच्या रांगेची आणि गर्दीची असते, तितकीच चर्चा याठिकाणी येणार्‍या व्हीव्हीआयपींची आणि गणेश भक्तांकडून केल्या जाणार्‍या दानाच्या भेटवस्तूंचीही असते. गणेशोत्सवातील या सगळ्या घडामोडींसोबतच दरवर्षी चर्चा होते ती म्हणजे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची. अनंत चतुर्दशीला दुसर्‍या दिवशी सूर्योदय झाल्यानंतरही अनेकदा लालबागच्या राजाचे विसर्जन झाल्याच्या नोंदी आहेत. पण यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी झाले, कारण होते कोरोनाची नियमावली. गेली दोन वर्षे मुंबई, महाराष्ट्र आणि भारतासह जगभरात थैमान घालणार्‍या याच कोरोनाने एकच दहशत निर्माण केली. कोरोना नियमावलीच्या रूपाने सगळ्याच सणांवर बंधने आल्यानेच गेल्या काही दिवसात ठाकरे सरकारची सणवाराची हीच नियमावली सातत्याने चर्चेत आहे. आता या नियमावलीतील बंधनांना धर्माचे आणि धर्माच्या रंगाचेही रूप देण्याचे प्रकार राजकीय नेतेमंडळींकडून सुरू झाले आहे. कोरोनाच्या संसर्गाबाबत बोलायचे तर कोरोना कोणाताही धर्माचा रंग पाहत नाही आणि सणही पाहत नाही, जिथे गर्दी तिथे कोरोना हा सरळ सोपा संसर्गाचा मार्ग आहे. त्यामुळेच कोरोना सण उत्सवही पाहत नाही अन् धर्मही पाहत नाही हे नक्की.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीला मुलुंड ते कराड दरम्यान झालेल्या हाय वोल्टेज ड्राम्यानंतर किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर बेछूटपणे आरोप केले. मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. भगवा सोडा हिरवे व्हा, असे आव्हान किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. गणेश विसर्जनाला जाऊ द्यायचे नाही, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाऊ द्यायचे नाही, ही उद्धव ठाकरे सरकारची उद्धट कारवाई चालू देणार नाही, अशीही टीका किरीट सोमय्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी भगवा सोडून हिरवा पांघरायला सुरूवात केली आहे, या वक्तव्यावर संजय राऊत यांनीही पलटवार केला आहे. कोणता रंग आहे ते लवकरच कळेल अशा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. कायदेशीर कारवाईत रंगाचा प्रश्न कसा येतो? रंग बघून कोणतीही कारवाई केली जात नाही. शिवसेनेवर टीका करण्याआधी आपले अंतरंग झाकून पहावे, असेही राऊत म्हणाले. पण रंगाचा आणि नियमावलीचा दाखला मुख्यमंत्र्यांना देणारे किरीट सोमय्या हे पहिले नाहीत. राज ठाकरेंनीही याआधी हिंदू सणांवर घालण्यात येणार्‍या कारवाईवर टीका केली आहे.

ऑगस्ट महिन्याअखेरीस दहीहंडीच्या निमित्ताने सणांवर घातलेल्या बंदीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही टीका केली होती. केवळ हिंदू सणांनाच अशी नियमावली किंवा बंदी का येते, असाही सवाल यानिमित्ताने राज ठाकरे यांनी केला होता. तसेच राजकीय नेत्यांच्या सभांवर आणि आंदोलनावरही राज ठाकरेंनी टीका केली होती. महाविकास आघाडीतील पक्षाच्या आंदोलनाला कोरोना होत नाही का, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. त्याचवेळी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या निमित्तानेही त्यांनी कोरोनाच्या प्रतिबंधांची खिल्ली उडवली होती. कोरोनाच्या लाटा या समुद्राच्या लाटा आहेत का, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. सत्ताधार्‍यांकडून सोयीने कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचीही टीका त्यांनी केली होती. तसेच हिंदू सणांच्या वेळीच कोरोनाची नियमावली अंमलात कशी काय येते, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

- Advertisement -

किरीट सोमय्यांकडून मुख्यमंत्र्यांवर हिरवे पांघरण्याच्या वक्तव्याच्या आधीच भाजपने मंदिरे उघडण्यासाठीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात आंदोलन केले होते. राज्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये भाजपने मंदिरे उघडण्याची मागणी जोरदार पद्धतीने लावून धरली होती. पण अनेकदा मागणी करूनही मंदिरे उघडण्याबाबतचा कोणताही निर्णय ठाकरे सरकारकडून आला नाही. उलट गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सणांच्या निमित्ताने नियमावली कठोर होत गेली. संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सणाला यंदाही कोरोनाच्या निमित्ताने अनेक बंधने आली. आधी दहीहंडी आणि त्यापाठोपाठच आलेल्या गणेशोत्सवाविषयी निमयमावली आली. ठाकरे सरकारने गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांना नियमावली घालत सगळ्यांचा हिरमोड केला. सुरूवातीला आरटीपीसीआरची चाचणी त्यानंतर अ‍ॅन्टीजेन टेस्टची अट अशा सगळ्या नियमांच्या अटीत यंदाचाही गणेशोत्सव अडकला. त्यासोबतच जास्त निराशा झाली ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची. मुंबईतील गणेशोत्सवामध्ये दक्षिण मुंबईतील गणेश मंडळांना भेट देण्याची भाविकांची संधी यंदाच्या वर्षीही हुकली. यंदाही कोरोनाची नियमावली दाखवत संपूर्ण उत्सवावर मर्यादा आल्या. पण त्याचवेळी इतर धर्मियांच्या सणांना मिळणार्‍या परवानगीने चांगलेच राजकारण झालेले पहायला मिळाले. किरीट सोमय्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा या मुद्द्याला हात घालण्यात आला आहे. सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर कोणतेही पडसाद उमटले नसले तरीही सणांच्या निमित्ताने आलेल्या मर्यादांवर दबक्या आवाजात नक्कीच चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत सत्तेत सहभागी होऊन मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर उद्धव ठाकरे यांना सर्वधर्मसमभावाचा विसर पडून ते एकांगी झालेे आहेत का, अशी चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे, पण त्याचबरोबर त्यांना त्यांच्यासोबत असलेल्या सहकार्‍यांच्या भावनांचा आणि व्होट बँकेचा विचार करावा लागत आहे, पण त्याच वेळी ते हिंदुंना सण साजरे करताना प्रतिबंध घालत आहेत, ही बाब लोकांच्या मनाला खूपत आहे. कारण इतर धर्मियांच्या सणांनासुद्धा गर्दी होत असते, पण त्यांना कशी काय परवानगी दिली जाते, आमच्यावरच अन्याय का, अशी भावना जनमानसात पसरू लागली आहे. कोरोनाचा धोका सगळ्यांनाच आहे, मग निर्बंध फक्त हिंदुंच्या सणांवरच का, असे लोकांना वाटू लागले आहे.

सणांच्या कालावधीतच फक्त कोरोना कसा काय येतो, असा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. एरव्ही मुंबई लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करून बेस्ट बसेसमधून होणार्‍या गर्दीतून कोरोनाचा फैलाव होत नाही का? राणेंच्या घराबाहेरील आंदोलनातून युवा सेनेचे आंदोलन कसे काय चालते? नारायण राणेंची मुंबईपासून ते कोकणातील जनआशीर्वाद यात्रा कशी काय चालते? राजकीय नेतेमंडळीच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभातील गर्दी कशी काय चालते? सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेशबंदी करत दुसरीकडे राजकीय नेतेमंडळी कशी काय मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जातात? एखाद्या राजकीय नेत्यासाठी शक्तीप्रदर्शनासाठी केलेली गर्दी कशी चालते ? असे अनेक प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडत आहेत. पण त्याचे उत्तर त्यांना मिळत नाही. प्रत्येकवेळी या प्रश्नांना राजकीय पक्षांकडून वाचा फोडली जाणे गरजेचे नाही. पण या राजकीय हेतूने प्रेरित नियमावलीचा परिणाम ठाकरे सरकारच्या प्रतिमेवर झालाय हे मात्र आता खात्रीशीर वाटू लागले आहे. मुख्यमंत्रीपदावर असणार्‍या उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही धर्मासाठी झुकते माप दिले जाणे हे त्या पदाला शोभणारे नाही. शिवसेना राजकीय पक्ष म्हणून त्यांची कृती एकीकडे तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने वागणे हेच त्या पदाला शोभा देणारे आहे. पण तीन पक्षांच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंकडून सर्व सणांना एकसमान पद्धतीने न्याय देणे अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने राजकीय सूडबुद्धीनेही मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा नाही. तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी किरीट सोमय्यांविरोधातील कारवाईबाबत सीएमओचा हस्तक्षेप नाही हे सांगणेही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असे आहे.

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिन्ही राजकीय पक्षांचा राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबविण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जनतेला या कठीण काळात दिलासा देणे अपेक्षित आहे. ठाकरे सरकार म्हणून कोरोना नियमावलीचा सण उत्सवांच्या नियमावलीच्या नावाने होणारा वापर हा कुठेतरी रोखणे आता गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाच्या काळात एक चांगली परिस्थिती हाताळलेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंबाबत वेगळे मत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. सध्या राज्यात सोयीनुसार कोरोना नियमांचा केला जाणारा वापर पाहता, राजकीय सुडापोटी आणि राजकारणासाठी ही नियमावली ईडी आणि सीबीआय यासारख्या केंद्राच्या यंत्रणांसारखी टूल होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. अन्यथा परदेशात लोकांनी रस्त्यावर उतरून सत्ताधार्‍यांविरोधात जे बंड केले ती परिस्थिती यायला यापुढे वेळ लागणार नाही. लोकांनी नियम झुगारणे, कोरोना नियमावली विरोधात वागणे हे सध्या ठाकरे सरकारला परवडणारे नाही. अन्यथा उत्तर प्रदेशातील मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी, कुंभमेळा यासारखे प्रकार महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही. हीच ती लपवाछपवी आणि आकड्यांमधील तोडमोड करण्याची वेळ ठाकरे सरकारवर यायला लागणार वेळ लागणार नाही. म्हणूनच सर्वसामान्यांचा उद्रेक होणार नाही इतपत ही कोरोनाची नियमावली चुकीच्या पद्धतीने अंमलात येणार नाही हीच काय ती अपेक्षा. त्यामुळेच दिल्ली सरकारने ज्या पद्धतीने सर्वसामान्यांसाठी ज्या पद्धतीने गोष्टी खुल्या केल्या त्याच पद्धतीने मुंबईसह महाराष्ट्रातही गोष्टी उघड करण्याचे टायमिंग ठाकरे सरकारने गाठले म्हणजे मिळवले, याच आशेवर आता सर्वसामान्य नागरिक आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -