घरफिचर्सस्त्री विरुद्ध राजकारणी स्त्री

स्त्री विरुद्ध राजकारणी स्त्री

Subscribe

म्हणजे काय?... द्यायलाच हवी... यापेक्षा वेगळी काय प्रतिक्रिया असणार कोणाही बाईची!... बाईच कशाला, कोणताही माणूस म्हणवणारा माणूस अशा नीचपणाबद्दल हेच बोलेल... लोकांच्या आयाबहिणींना पळवून न्यायला ही काय मोगलाई आहे काय? हेही टाका त्यात. आपल्या रामराज्य पार्टीच्या वरिष्ठांना आवडेल.

प्रसंग पहिला :
ताई :  ऑफिसात फायलींचा निपटारा करतायत, सभेत बसल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेतायत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत आहेत…

सेक्रेटरी (घाईघाईने येऊन) : ताई, एक भयंकर प्रकार घडलेला आहे. एका माणसाने स्त्रियांविषयी अपशब्द काढलेले आहेत. एखाद्याचं एखाद्या मुलीवर प्रेम जडलं तर तिला पळवून आणून जबरदस्तीने लग्न लावून देऊ, असं हे गृहस्थ म्हणाले आहेत.

- Advertisement -

ताई (संतापून) : हे भयंकर आहे. अशा माणसाला भर चौकात जोड्याने मारलं पाहिजे. आयाबहिणींबद्दल असं बेशरमपणे कसं बोलू शकतो कोणी?

सेक्रेटरी : ताई, ही प्रतिक्रिया देऊ का तुमची म्हणून…

- Advertisement -

ताई (आणखी संतापून) : म्हणजे काय?… द्यायलाच हवी… यापेक्षा वेगळी काय प्रतिक्रिया असणार कोणाही बाईची!… बाईच कशाला, कोणताही माणूस म्हणवणारा माणूस अशा नीचपणाबद्दल हेच बोलेल… लोकांच्या आयाबहिणींना पळवून न्यायला ही काय मोगलाई आहे काय? हेही टाका त्यात. आपल्या रामराज्य पार्टीच्या वरिष्ठांना आवडेल.
(सेक्रेटरी निघून जातो. प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना पाठवून देतो, सामान्य माणसांना ताई डॅशिंग वाटतात, त्यांना ताईंचं कौतुक वाटतं. हायकमांडकडून ताईंना फोन येतो. राज्य पातळीवरच्या वरिष्ठांकडून बोलावणं येतं. बंद दाराआड संवाद होतो. त्यांच्या हातातोंडाशी आलेलं महामंडळाचं अध्यक्षपद ‘पक्षविरोधी कारवायां’मुळे देता येणार नाही, असं त्यांना सांगितलं जातं. पुढच्या वेळच्या तिकीटाबद्दलही फेरविचार होऊ शकतो, असं सूचित केलं जातं. ताई बचाव करू पाहतात… वरिष्ठ त्यांच्याकडे पाहून फक्त हसतात… ती ‘निघा’ अशा आशयाची भावमुद्रा असते.)
***

प्रसंग दुसरा

आणखी काही दिवसांनी ताई ऑफिसात फायलींचा निपटारा करतायत, सभेत बसल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेतायत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत आहेत…
बदललेला सेक्रेटरी (घाईघाईने येऊन) : ताई, एक भयंकर प्रकार घडलेला आहे. एका माणसाने स्त्रियांविषयी अपशब्द काढलेले आहेत. (यांच्याकडे नररत्नांची खाणच आहे… शिवाय सर्वपक्षीय नररत्नांना वाल्मिकी पुनर्वसन योजनेअंतर्गत मुक्त प्रवेश…)

ताई (त्याला थांबवून) : मी आत येते. मग मला सांगा. (हातातलं काम त्या पूर्ण करतात, निरोप घेतात. मोबाइलवरच्या न्यूजअ‍ॅपमध्ये ताज्या बातम्या चेक करतात. मग आत जातात.) हं… आता बोला. आणि यापुढे हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं काही असेल तर फक्त महत्त्वाचं आहे, एवढंच सांगायचं. तपशील सांगायचे नाहीत. आजकाल भिंतींना पण कॅमेरे असतात.

सेक्रेटरी : ओके मॅडम. एक स्त्री म्हणून आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जनमानसात तुमची एक प्रतिमा आहे, म्हणून हा विषय काढला. एका माणसाने स्त्रियांविषयी अपशब्द काढलेले आहेत, तो म्हणाला…

ताई (अडवून) : थांबा थांबा थांबा. असे घाईवर येऊ नका. आधी माझे सगळे फोन बंद करा. सगळ्या स्टाफला सांगा की ताई अर्जंट मीटिंगमध्ये आहेत, मोकळ्या झाल्या की रिप्लाय देतील, बाइट देतील, प्रेस नोटही काढतील. आता सांगा…

सेक्रेटरी : तो बदमाश, नालायक, बेशरम मनुष्य म्हणाला…

ताई (भडकून) : अहो तुम्ही बिनमहत्वाची माहिती का देऊन राहिले मघापासून… आधी मला माणूस कोण आहे ते तर सांगा… मग बदमाश, नालायक, बेशरम आहे की नाही ते ठरवू या…

सेक्रेटरी : अहो ताई, पण तो फार भयंकर बोललाय बायकांविषयी… कोणत्याही स्त्रीचा भडका उडेल ते ऐकल्यावर….

ताई : सेक्रेटरी, सेक्रेटरी, तुम्हाला कोणी केलं हो सेक्रेटरी?… स्त्री आणि राजकारणी स्त्री यांच्यात फरक असतो. आपण ज्या देशात राहतो, तिथे माणसामाणसात फरक असतो. तुम्ही नुसतं स्त्रियांविषयी अपमानास्पद बोलण्याविषयी बोलताय. मी तुम्हाला बलात्काराचं उदाहरणं देते. ते कायम लक्षात ठेवा. बलात्कार झाल्याची बातमी आली तर लगेच माझ्याकडे येऊन उतावीळपणे प्रतिक्रिया मागू नका. बलात्कार कोणावर झालाय, तो कोणी केलाय याची माहिती घेत जा…

सेक्रेटरी : म्हणजे? बलात्कार बाईवर होतो आणि तो पुरुष करतो… तिथे या दोनच जाती असतात ना?

ताई : बरोबर. हे जगभरात बरोबर. पण, गोर्‍यांच्या देशात गोर्‍याने बलात्कार केलाय की काळ्याने, गोरीवर केलाय की काळीवर, याने फरक पडतो की नाही? आपल्या देशात तर हे आणखी गुंतागुंतीचं आहे. बलात्कार कोणत्या प्रांतात, कोणत्या जातीच्या माणसाने केलाय, कोणत्या धर्माच्या माणसाने केलाय हे पाहावं लागतं. बलात्कारिता कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे, हे पाहावं लागतं. मग आपल्या पक्षाचं अधिकृत धोरण काय आहे, ते पाहावं लागतं आणि मग निवेदन द्यावं लागतं. कधीकधी आपण लहान मुलीवर अनेक दिवस सामूहिक बलात्कार करणार्‍या माणसांच्या समर्थनार्थ मोर्चेसुद्धा काढतो… त्यापेक्षा मोठं काही घडलंय का?

सेक्रेटरी (स्तंभित होऊन) : नाही मॅडम.

ताई : मग एक काम करा. आपल्या कम्प्यूटरच्या प्रतिक्रियांच्या सेक्शनमध्ये स्त्री अत्याचारांचं फोल्डर आहे, त्यात फाइल आहेत. अत्याचारी विरोधी पक्षाचा असेल तर तीव्र निषेध. परधर्माचा असेल, तर फाशीची मागणी. स्वधर्माचा असेल, तर धर्माला कलंक. स्वधर्माचा स्वपक्षीय असेल, तर षडयंत्राची शक्यता वाटते. संवेदनशील जातवर्गातला असेल, तर माहिती मिळाल्यावरच प्रतिक्रिया देणे इष्ट राहील, या सगळ्या प्रतिक्रियांमधली योग्य ती धाडून द्या. अपमान करणारा स्वपक्षीय, उच्चजातीय, शाकाहारी, गोपूजक असेल, तर मोर्चाची तयारी करा… त्याच्या समर्थनार्थ!
(हे दोन्ही प्रसंग संपूर्णपणे काल्पनिक आहेत. मात्र ते कोणत्याही राजकारणी ताईच्या आयुष्यात घडलेच नसतील, अशी खात्री लेखक देऊ शकत नाही.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -