अज्ञानामागची ‘पॉझीटीव्हिटी’

कोरोनाचे भय न बाळगता पोटाची खळगी भरण्यासाठी लाठ्या काठ्या फिरवत रस्त्यावर  उतरलेल्या आजीबाई  
आज जे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील प्रत्येक व्यक्ती मनाने खंबीर होण्याचा सल्ला देत आहे. यावरून मन खंबीर असेल तर अशक्य काही नाही हे पुन्हा अधोरेखीत होत आहे. यामुळे न घाबरता अज्ञानात सुखी  राहून कोरोनावर मात करता येते हे ध्यानात ठेवा आणि परिस्थितीचा सामना करा. अज्ञानामागच्या या ‘पॉझीटीव्हिटी’मुळेच कोरोनाबरोबरच्या लढाईत विजय तुमचाच आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरू नका, त्याचा बाऊ करू नका. सकारात्मक विचार करा. शरीराबरोबरच मनालाही सदृढ विचारांची सवय लावा. ही आता काळाची गरज आहे.  

दोन चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शांता पवार या पुण्यातील आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल झाला. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट आर्थिक अवस्था यामुळे
नाईलाजाने आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी लाठ्या काठ्या फिरवत रस्त्यावर उतरल्या. बघता बघता व्हिडीओ व्हायरल झाला आणि आजीबाईं रातोरात स्टार झाल्या. त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आजी म्हणाल्या की त्या सुदृढ असल्याने त्यांना कोरोना धरोणा झाला नाही. आणि झालाच तर मी त्याला घाबरत नाही.
खंर तर आजींना कोरोनाबद्दल किती माहित आहे ते ठाऊक नाहीये. पण मी त्याला घाबरत नाही या त्यांच्या पॉझीटिव्ह विचारानेच खरं तर त्यांना फिट ठेवलंय. म्हणूनच कोरोनाच्या या काळात भले भले सुशिक्षित हादरले असताना आजींसारखे मजबूत मनाचे व कमी शिकलेले लोकं पॉझीटिव्ह विचारांनी कोरोनाला निगेटीव्ह करत आहेत; तर दुसरीकडे कोरोना होण्याच्या भीतीने त्याची संपूर्ण माहिती मिळवणारे अतिसावध झाले आहेत. साधी शिंक जरी आली तरी त्यांचे हातपाय थरथरतात.
तर पॉझीटीव्ह असल्याचे कळताच आजाराशी लढण्याआधीच अवसान गाळून अंथरुन धरत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाशी लढण्याचे मनाशी ठरवलेले पॉझीटीव्ह क्वारनटाईन सेंटरमध्ये कुठे गरबा, कुठे हौजी तर कुठे गाण्याच्या भेंड्या खेळत कोरोनावर मात करताना दिसत आहेत. 
 

कोरोनाचा बाऊ न करता केवळ सकारात्मक विचार करत त्यावरील आवश्यक उपचार घेत अनेकजण बरे होत आहेत. हे कोरोनामुक्तांचा आकडा सांगतोय. कोरोनावर अद्यापतरी कुठलेही औषध नाहीये. पण तरीही व्हेंटीलेंटरवर गेलेले अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहेत. त्यांच्यातील सकारात्मक विचारच कोरोनाशी लढण्यात त्यांची मदत करत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील काहीजणांनी कोरोना काळातील आपले बरे वाईट अनुभव सोशल मिडीयावरही शेअर केले आहेत तर काही करत आहेत. या प्रत्येक पोस्टमध्ये जवळजवळ सगळ्यांनीच पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर प्रचंड भीती वाटल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यानंतर येणारे नातेवाईकांचे व मित्रमैत्रीणींचे फोन टाळण्याबरोबरच सोशल मिडीया खासकरून वृत्तवाहिन्यांपासून लांब राहिलो असेच सांगितले आहे. या सगळ्यांच्या पोस्टमधील अनेक मुद्दे जरी एकसारखे असले तरी कोरोना झाल्यानंतर प्रत्येकाने काही दिवसांसाठी का होईना पण सोशल मीडियापासून स्वत:ला दूर ठेवले यामागचे कारण जाणून घेणेही महत्वाचे आहे. या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना पॉझीटीव्ह होण्याच्या आधी कोरोना संबंधातील बातम्या, पोस्ट, फोटो, व्हिडीओ सगळ्यांनीच बघितले होते. दररोज वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा बघून तेही हादरले होते. पण तरीही कोरोनाच्या सगळ्या अपडेट डोळ्याखालून घालत होते.

 

सावधानता बाळगत होते. दुसऱ्यांचे हाल बघून हळहळतही होते. पण जेव्हा स्वत: पॉझीटीव्ह झाले तेव्हा मात्र केवळ मनोधैर्य टीकवण्यासाठी त्यांनी या मिळालेल्या माहितीचा विचार करणं बंद केलं. जे इतरांबरोबर झालं ते आपल्याबरोबरही होईल असे नाही. याबद्दल मनाची समजूत घातली. त्यासाठी फुकटचे व अनावश्यक सल्ले देणाऱ्या व्यक्तींचे फोन टाळले.

तसेच कोरोनाबद्दल अतिमाहिती देणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवले. सतत कोरोनाच्या बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या काहीजणांनी व त्यांच्या कुटुंबांनी त्या दिवसात बघितल्याच नाहीत. फक्त डॉक्टर सांगतात तेच केले आणि त्याचाच विचार केला. यामुळेच कोरोनातून मुक्त झाल्याचे अनेक पोस्टमध्ये कोरोनामुक्त झालेल्या योद्धानी सांगितलं आहे. थोडक्यात काय तर स्वत:ला त्या काळात ज्ञानापासून दूर ठेवले आणि अज्ञानी राहून सकारात्मकता वाढवली. त्यामुळे मानसिक ताण त्यांना जाणवला नाही. शरीराने उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. त्यामुळे ते कोरोनामुक्त झाले.

 
कधी कधी एखाद्या विषयाबद्दल असलेले आपलं ज्ञान डोकेदुखीचे कारण ठरु शकते. कारण पुढे काय होणार हे व्यक्तीला आधीच माहित असते. त्यामुळे व्यक्ती पुढच्या परिणामांचा विचार करत बसते आणि मनाने खचत जाते. ज्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात आणि मन हरलं की शरीर हरतचं. त्याप्रमाणे परिस्थिती चिंताजनक होत जाते. हे टाळण्यासाठी कधी कधी अज्ञानी होणं हे ज्ञानी असल्याचं चिन्ह असतं. यामुळे या कोरोना काळात बरेच अशिक्षित लोकं बरचं सकारात्मक बोलू लागले आहेत. कालपरवा साताऱ्यातील एका कोरोनाबाधीताने क्वारनटाईनमधला व्हिडीओ व्हायरल केला.

त्यात त्याने अतिशय शांतपणे कोरोना हाईल असं काही करू नका. अशी विनंती केली. कशाला उठसुठ घरातलं हे संपल ते संपल करत घराबाहेर पडता. कमी सामानात जेवण बनवा. काही गोष्टींशिवाय जगायला शिका. खर्च कमी होईल आणि कोरोना होणार नाही. नाहीतर माझ्यासारखं या खोलीत येऊन बसावं लागेल. १४ दिवस राहायचं. आज तिसरा दिवस आहे. मी बरा होणार हे मला माहित आहे. पण कंटाळा आलाय. माझ्याकडे मोबाईल आहे. पण मी तो बंद केलाय. नाहीतर लोक फुकटचा सल्ला देतात आणि घाबरवतात. जे मला ऐकायच नाहीये ते ऐकवत माझ्यात निगेटीव्हिटी तयार करतील. म्हणून लांब राहा. बातम्या बघू नका. असं सांगत लोकांना एकप्रकारे वस्तूस्थितीचं सांगितली आहे.