घरफिचर्सभाजपच्या गळ्यात सत्तेचा अमरपट्टा ?

भाजपच्या गळ्यात सत्तेचा अमरपट्टा ?

Subscribe

पत्रकारांच्या नोकर्‍या आणि सत्तेसाठी हपापलेले नेते याची सांगड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील घालत असतील तर हा त्यांना आणि त्यांच्या भाजप पक्षाला आलेला सत्तेचा माजच म्हणायला हवा. मोदींच्या अच्छे दिनांच्या काळात पत्रकारांच्या नोकर्‍या नाही तर अस्तित्व राहते की नाही अशी परिस्थिती असताना मंत्री अशी भाषा वापरत असतील तर हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आल्याचा माज आहे. पत्रकार त्यांच्या दहा पिढ्यांचे कल्याण करण्यासाठी या क्षेत्रात आलेले नाहीत. त्यांना नेत्यांसारखा अमाप पैसा कमावून मग राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारायच्या नाहीत. आणि मुख्य म्हणजे कुठलाच अमरपट्टा घेऊन ते जन्माला आलेले नाहीत.

उठता बसता भाजप, चालता बोलता भाजप, जेवण घेता घेता भाजप, चहा पिता पिता भाजप, झोपी जाताना भाजप, स्वप्नात भाजप, गाईत भाजप, जय श्रीराम बोलताना भाजप, जय हिंद म्हणताना भाजप, राष्ट्रगीत म्हणताना भाजप, टीव्हीवर भाजप, विरोधकांमध्ये भाजप आणि आता या देशाला आमच्याशिवाय तरणोपाय नाही म्हणूनही भाजप… ऐका हो ऐका, आता या लोकशाही देशात एकच पक्ष भाजप. भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलीय… प्रश्नचिन्ह देऊ की नको असे वाटत असताना शेवटी लोकशाहीवर अजूनही विश्वास असल्याने द्यावे तर लागणारच. आता सत्तेचा अमरपट्टा गळ्यात आल्याने सत्ताधार्‍यांना माज तर येणारच आणि सर्वत्र भाजप असल्याने सत्ताधार्‍यांना प्रश्न कोण विचारणार?

तीन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी एक प्रश्न विचारला. विरोधी पक्षांचे अनेक आमदार आपल्या संपर्कात आहेत. त्या सगळ्यांना आपला पक्ष सामावून घेणार, मग भाजपसाठी खस्ता खाणार्‍या कार्यकर्त्यांचे काय? त्यांनी काय कायम चादरी उचलायाच्या काय? यावर ते काहीसे घुश्यात बोलले, पण त्यांच्या चेहर्‍यावर दिसले नाही. भाजपच्या संघटन मंत्रीपदाचे काम केले असल्याने मोठा अनुभव गाठीशी असल्याने त्यांना समोरच्याला कसे सामोरे जायचे याचे वर्ग पाठ झाले आहेत. ते मला म्हणाले, तुमचा आताचा पेपर कितवा, म्हणजे नोकरी कितवी. मी उत्तरलो : सहावा. ते लगेच बोलते झाले- असेच आहे सर्वत्र. लोक जात येत असतात. विरोधी पक्षाचे लोक आज भाजपमध्ये येत आहेत त्याला कारण म्हणजे त्यांना सत्ता हवी आहे. स्वार्थासाठी विरोधी पक्षातील नेते आमच्या पक्षात येतायत… चंद्रकांतदादांच्या या उत्तरावर मी आणखी वाद घालू शकलो असतो.

- Advertisement -

पण, शांत बसलो. कारण आता पत्रकारांच्या नोकर्‍या आणि सत्तेसाठी हपापलेले नेते याची सांगड मंत्रीमहोदय घालत असतील तर हा त्यांना आणि त्यांच्या भाजप पक्षाला आलेला सत्तेचा माजच म्हणायला हवा. मोदींच्या अच्छे दिनांच्या काळात पत्रकारांच्या नोकर्‍या नाही तर अस्तित्व राहते की नाही अशी परिस्थिती असताना मंत्री अशी भाषा वापरत असतील तर हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आल्याचा माज आहे. पत्रकार त्यांच्या दहा पिढ्यांचे कल्याण करण्यासाठी या क्षेत्रात आलेले नाहीत. त्यांना नेत्यांसारखा अमाप पैसा कमावून मग राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारायच्या नाहीत. आणि मुख्य म्हणजे कुठलाच अमरपट्टा घेऊन ते जन्माला आलेले नाहीत.

अमरपट्टा गळ्यात घातलेल्या भाजपच्या थोडे मुळाशी जाऊ. ‘शेटजी-भटजींचा पक्ष’ अशी ओळख असलेल्या या पक्षाला आता मध्यम जाती, अन्य मागास वर्ग, दलित, आदिवासी अशा सर्व घटकांची मजबूत मतं मिळत आहेत. आर्थिक स्तरांचा विचार करता श्रीमंत आणि उच्च-मध्यमवर्गीयांप्रमाणेच मध्यमवर्गीय, निम्नमध्यमवर्गीय आणि गरीब घटकही पक्षाला मतदान करत आहेत. पूर्वी हा पक्ष प्रामुख्याने शहरी भागापुरता सीमित होता. आता छोटी शहरं, निमशहरांसह खेड्यांमध्ये नि पाड्यांमध्ये तो पोहोचला आहे. लोकसभेपासून जिल्हापरिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांपर्यंत सर्वत्र या पक्षाचं तगडं अस्तित्व निर्माण झालं आहे. जो पक्ष बरीच वर्षं राजकीयदृष्ठ्या अस्पृश्य मानला जात होता, तो आता किमान निवडणुकांत तरी देशातला सर्वाधिक स्वीकारार्ह पक्ष बनला आहे. एरवी एखादा पक्ष बळकट बनतोय असं लक्षात आलं, की अनेक विरोधी पक्ष स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या पक्षाविरोधात संघटित होतात, असा आजवरचा अनुभव आहे. काँग्रेसच्या प्रभावकाळात ही बाब देशभर घडत आलेली आहे. पण सध्या भाजप विस्तारत असूनही अनेक छोटे आणि प्रादेशिक पक्ष भाजपसोबत संसार करण्यास उत्सुक दिसत आहेत. यामुळे तर आपल्याच गळ्यात यापुढे सत्तेचा अमरपट्टा असेल असे तर भाजपला वाटत नसेल?

- Advertisement -

आजवरच्या इतिहासात कोणत्याही सत्ताधारी पक्षाला मिळाला नसेल एवढा पाठिंबा आज भाजपला माध्यमांतूनही मिळत आहे. आपल्याकडे आजवर माध्यमांनी नेहमीच सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्याची भूमिका बजावली आहे. जनतेचा आणि विरोधी शक्तींचा आवाज सत्ताधार्‍यांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम आहे, अशी भारतीय माध्यमांची पूर्वापार भूमिका राहिली आहे. मात्र २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेवर आल्यापासून माध्यमांतील एका मोठ्या गटाने ही भूमिका सोडून नरेंद्र मोदी आणि एकूणात भाजपची जोरदार पाठराखण चालवली आहे. मोदींचा वैयक्तिक करिष्मा, भाजपची पक्ष म्हणून ताकद, सरकारची कार्यशैली आणि माध्यमं चालवणार्‍या उद्योगांचे हितसंबंध यामुळेच असं घडत असणार! छापील व दृकश्राव्य माध्यमांप्रमाणेच सोशल मीडियातही भाजपविरोधी बोलणार्‍यांवर ज्या स्वरूपाची टीका होते, ती पाहता भाजपचं गारुड कल्पनेपलीकडे प्रस्थापित झाल्याचं दिसत आहे.

या गारुडातून मग सत्तेचा माज येतो. सीताराम येचुरी आणि सत्तेत भाजप सोबत असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनाही यांनी याच भाषेत सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारला आहे.

पार्टी विथ डिफरन्स म्हणणार्‍या भाजपला आता पक्ष वाढवण्यासाठी कोणीही चालते. भाजपमध्ये येता का जेलमध्ये जाता, अशी परिस्थिती केल्याने विरोधी पक्षाचे नेते येतही असतील म्हणून तुमच्या तत्वांना मुरड घाला, असे काही जनसंघ स्थापन करून भाजपला जन्म देणार्‍या दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितले नव्हते. उलट प्रसंगी विनायक दामोदर सावरकर यांची आक्रमक विचारधारा काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या महाकाय हिंदुस्थानसाठी आपला जनाधार वाढवण्यासाठी अडसर होऊ शकते म्हणून ती बाजूला ठेवून जनसंघाने पुढचा बिकट प्रवास करत आपले अस्तित्व टिकवून धरले. ती आपली विचारधारा बाजूला सारून काँग्रेसवाले राधाकृष्ण विखे पाटील भाजपला चालतात, हे म्हणजे चोर दरोडेखोरांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना पवित्र केल्यासारखे आहे.

भाजपने मारलेल्या अशा कोलांटउड्यांची एक मोठी यादीच आहे. ज्या जीएसटी कायद्याबद्दल भाजपने (आणि खुद्द मोदींनी) रान उठवलं होतं, तोच जीएसटी कायदा पूर्वीपेक्षा कडक करून आणण्याची किमया या मंडळींनी करून दाखवली आहे. यांचा आधार कार्डाला विरोध, मनरेगाला विरोध, अन्नसुरक्षा योजनेला विरोध, बांगलादेशासोबत जमीन हस्तांतरणाला विरोध, किरकोळ क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध… आणि आता? सर्वस्वी पलटी! या सर्व मुद्यांवर भाजपने पलटी का मारली असं विचारलं, तर ‘आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरी आहे’ असं सोप्पं उत्तर त्यांच्याकडे तयार आहे.

काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता असूनही देश पुढे नेला नाही, आहे तसा चालू ठेवला! काँग्रेसने जे अनेक कार्यक्रम आखले, योजना आखल्या, त्यांच्या अंमलबजावणीत ते कमालीचे अपयशी ठरले. १९९१ पासून तर हे काँग्रेसी कारभाराचं लक्षणच बनलं. जे केंद्रात घडलं तेच राज्या-राज्यांतही घडलं. या पार्श्वभूमीवर भाजपने सुशासनाचा, गुड गव्हर्नन्सचा नारा दिला. लालकृष्ण अडवाणींच्या काळात स्वराज्याचं सुराज्यात रूपांत करण्याची भाषा केली गेली. मोदींनी तर गहजब केला. ‘अच्छे दिन आने वाले है’ असं सांगत ‘सब का साथ, सब का विकास’चा वायदा केला. परदेशातून काळा पैसा चुटकीसरशी घेऊन येण्याचं आश्वाासन दिलं. शंभर नवी शहरं उभी करण्याची घोषणा केली. ‘माँ गंगा ने मुझे बुलाया है’ असं म्हणत गंगा स्वच्छतेचं वचन दिलं.

‘स्वच्छ भारत’चा भरपूर प्रचार करून देश चकाचक करण्याचं वातावरण तयार केलं. जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, मेक इन इंडिया असं आणखी बरंच काही सुशासनाच्या नार्‍यात अंतर्भूत होतं. ही आश्वासनं जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी असल्याने लोकांनीही भरभरून मतं दिली. काँग्रेसचं म्हणणं, यातील बहुतेक आश्वासनं त्यांच्या योजनांवरच आधारलेली होती. पण ते सोडा. मुद्दा असा, की मोदी सरकारने या योजनांचा बराच गाजावाजा करूनही या योजनांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचण्यात काँग्रेसपेक्षा फार मोठं यश मिळालेलं दिसत नाही. शिक्षण, आरोग्य वगैरेचं बजेट कमी केलं गेलं आहे आणि रोजगार वगैरेच्या बाबतीत तर चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. पण तरीही जाहिरातबाजी, प्रतिमानिर्मिती बरीच झाली; यशाचा आभास तर त्याहूनही जास्त झाला!

मोदींची कार्यशैलीच चमत्कृतीपूर्ण पावलं टाकून लोकांना भारून टाकण्याची आहे. इतिहासात स्वत:चं नाव अजरामर करण्याच्या प्रबळ इच्छेमुळे नोटाबंदी आणि बुलेट ट्रेनसारख्या अफाट आणि भव्यदिव्य गोष्टी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतो आहे. ‘अच्छे दिन’ प्रत्यक्षात आणण्यात जे अपयश आलं आहे, त्याला झाकण्यासाठी नोटाबंदीसारखं डोळे दिपवून टाकणारं पाऊल पंतप्रधानांनी टाकलं आहे. आपण तसं न म्हणता पंतप्रधानांच्या बाजूने विचार करूयात. काळा पैसा, परदेशी पैसा आणि दहशतवादी पैसा संपवण्यासाठीच त्यांनी हे पाऊल टाकलं, असं मानूयात. ही तीनही आव्हानं एका पावलाने संपणार असतील, तर त्यापाठी उभं राहायला हवंच की! पण सारा देश रांगेत आणि पंतप्रधानांच्या पाठीशी उभा राहूनही लोकांच्या हाती काय लागलं? परदेशी पैसा भारतात अजून आलेला नाही; नक्की किती काळा पैसा बाहेर आला तेही अजून कळलेलं नाही आणि दहशतवादी पैशांना अटकाव झालाय असं म्हणावं, तर पाकिस्तानी सीमेवर व काश्मीरात दहशतवादी कारवाया अजूनही सुरू आहेत.

मग नक्की आपल्या हाती काय आलंय? भारतीयांच्या हाती फार काही आलेले नाही. मोदींची छबी मोठी मोठी केली जात आहे आणि याच छबीत सत्तेच्या अमरपट्टा गळ्यात घालून आता भाजपशिवाय देशाला दुसरा पर्याय शिल्लक नाही, असा भास निर्माण केला जात आहे. अन्यथा गोव्यात काँग्रेसच्या आमदारांना विकत घेतल्याची चर्चा ( कितीची बोली लागली माहीत नाही, पण दोन आकडी कोटी मोजले गेले) सुरू असताना कर्नाटक सरकार पडले नसते. विशेष म्हणजे पत्रकारांचे कितवे पेपर असे बिनडोक प्रश्न विचारणार्‍या चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकार फोडण्यासाठी पुढाकार घेतला नसता. फडणवीस यांनी बिझनेस फंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रसाद लाड यांच्याकडे बंडखोर आमदारांना फोडण्याची जबाबदारी दिली आणि त्यांनी ती नीट पार पाडली.

विशेष म्हणजे कर्नाटक सरकार पडल्यानंतर मोदी आणि शहा यांनी भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सज्ज झालेल्या येडीयुरूप्पा यांच्या आधी फडणवीस यांना फोन करून शाबासकी दिली. आणि आता पुढे काही दिवस रंगणारी बातमी म्हणजे मध्य प्रदेशचे काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. मोदी आणि शहा यांचा आदेश यायचा बाकी मध्य प्रदेशमध्ये कमळ फुलणार, अशी घोषणा भाजपच्या नेत्यांनी केली आहे. सत्तेचा अमरपट्टा गळ्यात घालून फिरायचे आहे म्हटल्यावर लोकांनी निवडून दिलेल्या जनधाराचा गळा आवळला तर काय झाले? असा माज भाजपला आला आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -