घरफिचर्सप्रणबदांच्या 'रेशीम' भेटीमुळे संघ चर्चेत

प्रणबदांच्या ‘रेशीम’ भेटीमुळे संघ चर्चेत

Subscribe

आपल्याच लोकांच्या तीव्र विरोधानंतरही माजी राष्ट्रपती डॉ. प्रणब मुखर्जी संघाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला आलेत आणि संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालेत, यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन आणि धन्यवाद! ते डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या घरीही गेलेत आणि तिथे त्यांनी आपल्या भावना अगदी स्पष्ट शब्दात लिहून व्यक्त केल्यात. स्मृतिमंदिरात जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला अभिवादन केले आणि कार्यक्रमात आपल्या मनातील विचार स्पष्टपणे मांडले. या सर्व कार्यक्रमात ते अत्यंत मोकळेपणाने वावरलेत. कार्यक्रमाच्या आधी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तसेच इतर विशेष अतिथींशी परिचयाचा कार्यक्रम होता. नागपूरचे संघचालक विशेष अतिथींचा परिचय करून देणारच होते, तेवढ्यात प्रणबदांनी म्हटले की प्रत्येक जण आपापला परिचय देतील आणि स्वत: उभे राहून सांगितले- ‘‘मी प्रणब मुखर्जी.” त्यांचा हा मोकळेपणा सर्वांना खूप भावला.

प्रणबदांनी आपले भाषण इंग्रजीत लिहून आणले होते. सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांचे भाषण हिंदीत होते. दोन्ही भाषणे म्हणजे ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति।चे उत्कृष्ट उदाहरण होते. दोघांनी वेगवेगळ्या शब्दांत जवळपास एकच विचार मांडला. प्रणबदांनी हे स्पष्ट केले की, पश्चिमेकडील राज्याधारित राष्ट्राची संकल्पना आणि भारतीय जीवनदृष्टीवर आधारित राष्ट्राची भारतीय संकल्पना वेगवेगळ्या आहेत.

- Advertisement -

त्यांनी ५००० वर्षांच्या अविरत सांस्कृतिक प्रवाहाचा उल्लेख केला. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘सर्वे भवन्तु सुखिन:’च्या परंपरेच्या विचारांचा पुनरुच्चार केला आणि सहिष्णुता, विविधता, सेक्युलॅरिझम (पंथनिरपेक्ष समानता) आणि संविधानाबाबत आपली मते मांडली.

मोहनराव भागवत यांच्या भाषणाचाही हाच भाव होता; परंतु शब्द जरा वेगळे होते. त्यांनी सहिष्णुता शब्दाऐवजी सर्वांच्या समावेशाचा विचार ठेवला. त्यांनी म्हटले, कुठल्याही भारतीयाला कुठलाही इतर भारतीय परका होऊ शकत नाही. कारण, सर्वांचे पूर्वज समान आहेत. रिलिजन, भाषा किंवा वंश या आधारावर नाही, तर जीवनदृष्टी आणि जीवनमूल्यांच्या आधारावरच भारताचे राष्ट्रजीवन विकसित झाले आहे आणि हाच भारतीय राष्ट्रजीवनाचा आधार आहे- हे दोघांनीही सांगितले.

- Advertisement -

मोहनराव भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले- संघ संघच राहील आणि प्रणबदा प्रणबदाच राहतील. प्रणबदा आणि मोहनराव भागवत या दोघांच्या भाषणात भारताच्या ५ हजार वर्षांपासूनच्या प्राचीन सर्वसमावेशक, वैविध्यपूर्ण आणि जगाला परिवार मानणाऱ्या जीवनदृष्टीचा व परंपरांचा गौरवपूर्ण उल्लेख झाला आहे. हीच जीवनदृष्टी आणि मूल्ये आपल्या भारताच्या संविधानातही अभिव्यक्त झाली आहेत. म्हणून हे संविधान आमचा वारसा आहे. पाकिस्तानचे (जो कधी काळी भारताचाच एक भाग होता) संविधानही भारताच्या संविधानासोबतच तयार झाले. परंतु, त्यांच्या संविधानात या उदारतेची, सर्वांना सामावून घेणारी, विविधतेचा उत्सव साजरा करणारी बाब नाही. आता प्रश्नच असा आहे की, दोन्ही एकाच समाजाचे आणि देशाचे भाग होते, मग असे का झाले? याचे कारण, भारताच्या अध्यात्मावर आधारित एकात्म व सर्वांगीण जीवनदृष्टीत दडले आहे. या जीवनदृष्टीला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी हिंदू जीवन दृष्टी (Hindu View Of Life) असे म्हटले आहे. पाकिस्तानने या जीवनदृष्टीला नाकारले; भारताने मात्र स्वीकारले.

ही उदार जीवनमूल्ये आमच्या प्राचीन एकात्म व सर्वांगीण जीवन दृष्टीचा परिणाम आहेत. ही मूल्ये आम्हाला संविधानामुळे नाही, तर संविधानाद्वारे मिळाली आहेत.

खलिल जिब्रानची ‘तुमची मुले’ नावाची एक कविता आहे. त्यात ते म्हणतात-तुमची मुले, तुमची मुले नाहीत.ती जीवन जगण्याच्या अदम्य इच्छेची अभिव्यक्ती आहेत.ती तुमच्यातून आलेली नाहीत, उलट तुमच्या माध्यमातून आली आहेत आणि ती तुमच्याजवळ आहेत, पण तुमची त्यांच्यावर मालकी नाही.

आमचे संविधान असे आहे म्हणून आम्ही असे आहोत, असे नाही. उलट, आम्ही शतकानुशतके असे राहात आलोत म्हणून आमचे संविधान असे आहे. त्याचा सन्मान आणि पालन सर्वांना करायचे आहे. संघाने हे नेहमीच केले आहे. स्वतंत्र भारतात घोर अन्यायपूर्वक लादण्यात आलेल्या दोन्ही बंदींच्या काळात, संविधानसंमत मार्गाने जे सत्याग्रह झालेत, ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात अभूतपूर्व, देशव्यापी, शांतिपूर्ण आणि अनुशासित होते. असा इतर कुठल्याही पक्षाचा अथवा संघटनेचा इतिहास नाही. संघाला संविधानविरोधी, लोकशाहीविरोधी, हिंसक म्हणत तसा प्रचार करणाèया कुठल्याही संघटनेचे किंवा पक्षाचे, संविधान लागू झाल्यानंतर संघाच्या सत्याग्रहासारखे व्यापक, शांतिपूर्ण आणि अनुशासित असे आजपर्यंत एकही उदाहरण नाही. याच्या उलट, संविधानाला पायदळी तुडवत हिंसेचा मार्ग स्वीकारणारे, आपल्याच सुरक्षा दलांवर भ्याड सशस्त्र हल्ला करणाèयांची बाजू घेणारे, त्यांना समर्थन देणारे लोक, संघालाच संविधानाचा उपदेश देताना दिसून येतात.

गेल्या २ एप्रिलला विशिष्ट हेतूने केवळ भाजपाशासित सहा राज्यांमध्येच घडवून आणलेल्या ‘भारत बंद’च्या काळात, विना कुणाच्या भडकविण्याने झालेल्या अनपेक्षित हिंसेच्या समर्थनार्थ राहुल गांधीसहित सर्व सेक्युलर-लिबरल नेते उघडपणे उभे होते. ही आहे यांची संविधाननिष्ठा!

प्रणबदांच्या भाषणानंतर, संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याला विरोध करणाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील खासच होत्या. या प्रतिक्रिया, भारताच्या राजकीय व वैचारिक क्षेत्रात कम्युनिस्टांच्या प्रभावाचे तसेच त्यांच्या वर्चस्वाचे स्मरण करून देणाऱ्या होत्या. त्यांची विचारधाराच अभारतीय असल्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेतही उदारता आणि सहिष्णुतेचा अभाव असणे स्वाभाविकच होते. त्यांनी म्हटले- प्रणबदांनी संघाला आरसा दाखवला. संघाच्या मंचावरून सेक्युलॅरिझम आणि नेहरूंच्या नावाचा उच्चार केला, इत्यादी… इत्यादी… परंतु, लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, प्रणबदांच्या नागपूरला येण्याला विरोध करणाऱ्यांपैकी कुणीही मोहनराव भागवतांच्या भाषणावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. असेही असेल की, त्यांनी ते भाषण ऐकलेच नसावे. कदाचित त्यांना ते ऐकण्यास लायकही वाटले नसावे. कारण त्यांची वृत्तीच मुळात जड आहे.

एक गंमत म्हणून सांगतो- प्रणबदांच्या संघाच्या कार्यक्रमात येण्याला जो अलोकतांत्रिक पद्धतीने कडाडून विरोध झाल्या, त्यामुळे देश-विदेशातील सर्व वृत्तवाहिन्यांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. त्यातून संघाला केवळ समजून घेण्याचीच नाही तर, प्रत्यक्ष बघण्याचीही संधी जगभरातील दर्शकांना मिळाली. यासाठी तरी या विरोध करणाऱ्यांना धन्यवादच द्यायला हवेत. १ ते ६ जूनपर्यंत संघाच्या वेबसाईटवर ‘जॉईन आरएसएसच्या’ दररोज सरासरी ३७८ रिक्वेस्ट येत होत्या. ७ जूनच्या कार्यक्रमाच्या दिवशी ही संख्या १७७९ इतकी होती. यासाठी देखील या सर्वांना धन्यवादच द्यायला हवेत.


डॉ. मनमोहन वैद्य 

सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -