घरफिचर्सजान है तो जहान है !

जान है तो जहान है !

Subscribe

करोनाच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. लॉकडाऊन जितका वाढणार आहे त्याचा मोठा परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर होणार आहे. मात्र, हे माहीत असूनही नागरिकांच्या जीवाचे रक्षण म्हणून देशाच्या प्रमुखाला शेवटी नाईलाजाने का होईना लॉकडाऊन वाढवावा लागला आहे. हे सांगताना मोदी यांनी एक वाक्य आवर्जून म्हणाले ‘आर्थिकदृष्ठ्या पाहता हे खूप महाग आहे. याची मोठी किंमत मोजावी लागली, पण देशातील लोकांच्या जीवापुढे याची काही किंमत नाही.‘आज महासता अमेरिकेसह प्रगत युरोपियन देशात करोनामुळे मृत्यूचे तांडव सुरू असताना भारताने उचललेले पाऊल योग्य असेच म्हणावे लागेल. शेवटी जिवाशिवाय कशाचे मोल नाही. जान है तो जहान है! असे उगाचच म्हटले जात नाही.

पानीपतच्या युद्धात दत्ताजी शिंदे यांच्या मोठ्या पराक्रमाने युद्धभूमीही थरारून गेली असताना अब्दालीचे प्रचंड सैन्य त्यांना घेरून धारातीर्थ करत असताना अब्दाली दत्ताजी यांना छद्मीपणाने विचारतो,‘क्यो दत्ताजी और लढोंगे’. यावर तो मरणाच्या वाटेवर असलेला शूर सेनापती उद्गगारतो,‘बचेंगे तो और भी लढेंगे’. शेवटी क्रूरकर्मा अब्दाली एकाकी दत्ताजी यांना ठार मारतो. पण, आजही पानिपत डोळ्यासमोर येते तेव्हा प्रथम शेवटच्या श्वासापर्यंत झुंजणारा दत्ताजी डोळ्यासमोर येतो. हा इतिहास झाला. पण, आपल्या इतिहासातून ज्या देशाची जनता काही शिकत नाही त्याला वर्तमानही माफ करत नाही. आज करोनाविरोधातील लढाईने देशासमोर मोठे संकट आले असताना भारताच्या प्रत्येक नागरिकाला सजग राहण्याची गरज आहे. देशाला या घडीला तुमच्याकडून काय हवे आहे, हे आपल्यापरीने साधे नियम पाळत ते पूर्ण करण्याची गरज आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सुमारे १० मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. देशात सर्वप्रथम ओडिशाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. त्यानंतर पंजाबने १ मेपर्यंत तर, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, पश्चिम बंगाल यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. कर्नाटक सरकारने दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. याशिवाय ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि मेघालय यांनीही लॉकडाऊन कालावधी ३० एप्रिलपर्यंत नेला आहे. ‘भारताची लढाई मोठ्या हिमतीने सुरू आहे. नागरिकांच्या त्यागाने कोरनामुळे होणार्‍या नुकसानीला बर्‍यापैकी आवरण्यात यशस्वी झालो आहोत. तुम्हाला होणार्‍या त्रासाची मला कल्पना आहे.

कोणाला अन्न नाही, प्रवासी अडकले, पण तरी तुम्ही आपले कर्तव्य सोडले नाही. आपल्या देशात ५५० रुग्ण होते तेव्हा भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला. समस्या दिसली तेव्हाच आपण उपाययोजना केल्या. अनेक सार्वजनिक स्थळं तातडीने बंद केली. देशात येणार्‍या प्रत्येकाला १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यावर निर्बंध घातले. वेळीच हे सगळे निर्णय घेतले नसते तर आता भारतीची स्थिती काय असती याचा विचार करणेही अंगावर काटा आणतात. सोशल डिस्टिन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे मोठा फायदा देशाला झाला आहे. इतर देशांपेक्षा भारतात स्थिती आटोक्यात आहे. भारतातही करोनाच्या विरोधात लढाई जिंकण्यासाठी सगळ्यांकडून सांगण्यात आले की ‘लॉकडाऊन वाढवण्यात यावे’, असे सांगत मोदी यांनी जनतेचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. देशात आतापर्यंत १०,३६३ करोना व्हायरस रुग्ण आढळले आहेत, तर जवळपास १ हजार ३६ रुग्ण बरे झाले. यामध्ये ३९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मंगळवारी सकाळी एकूण मृतांचा आकडा ३३९ वर पोहोचला. संसर्ग झालेल्यांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १२११ नवीन करोनाग्रस्त, तर जवळपास ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेची संख्या पाहता भारतात संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असून प्रगत देशाच्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशाची करोनाविरोधातील लढाई खूप प्रभावी म्हणावी लागेल. तसे पाहता १३० कोटी लोकसंख्येच्या भारतात करोनाचा संसर्ग वेगाने वाढायला फार वेळ लागला नसता. प्रचंड झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीने उभी असलेली शहरे आणि ट्रेन, लोकल रेल्वे सेवा, सार्वजनिक वाहतूकवर असलेला गर्दीचा मोठा ताण पाहता हा करोनाचा संसर्ग थांबवणे मोठे कठीण काम होते. पण, वेळीच वाहतूक व्यवस्थेवर निर्बंध आणल्याने लोकांचा संपर्क कमी झाला. तबलिगी समाजाच्या दिल्लीतील कार्यक्रमामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली ती या समाजाच्या धर्माच्या अतिरेकी प्रेमामुळे तसेच केंद्र आणि दिल्ली सरकारमधील समन्वय अभावामुळे. यामुळे सर्व राज्य फुकटची कामाला लागली आणि तबलिगी यांना शोधून त्यांच्यावर उपाय तसेच त्यांना १४ दिवस टाळेबंद करण्यात खूप ताकद खर्ची झाली.

आता पुढच्या १८ दिवसांच्या टाळेबंदीत प्रत्येक धर्माच्या लोकांनी घरी सुरक्षित राहताना आपल्याबरोवर इतरांची काळजी घेणे हे देशकर्तव्य समजायला हवे. रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी झाली. तसेच आता रमजानचा सण घराच्या मर्यादेत साजरा करायला हवा. तसे झाले तर गर्दी टाळता येईल आणि एकमकांमध्ये अंतर ठेवण्याचा हेतू साध्य होईल. काही मिनिटे एकत्र आलो तर काय होणार आहे, असा सूचनांना पायदळी तुडवणारा अहंकार तुमच्याबरोबर इतरांनाही खाईत लोटणारा ठरू शकतो. आज देशापुढे फक्त करोनाला हरवण्याचे लक्ष्य नाही तर पुढे आर्थिक पातळीवर मोठा लढा द्यावा लागणार आहे. सध्या आपल्याकडे अन्नधान्य पुरेसे असले तरी आणि आगामी पर्जन्यकाळ समाधानकारक गेला तर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसेल. पण, शेती वगळता उद्योग व्यवसाय, नोकरी आणि रोजगार यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

आताच एकट्या भिवंडीत यंत्रमागावर काम करणार्‍या १ लाख लोकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. ७ हजार कोटींपेक्षा मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले असून हीच परिस्थिती इतर व्यवसायांमध्ये आहे. एक महिन्यांपेक्षा अधिक काळ कंपन्या बंद असून अब्जावधीचे नुकसान झाले आहे आणि पुढील काळात त्यात आणखी मोठ्या संख्येने वाढ होऊ शकते. आताच काही व्यवसाय उद्योगांनी आणि कंपन्यांनी कामगार कपातीचे संकेत दिले आहेत. काहींनी कपातीला सुरुवातही केली आहे. नोकर्‍या कमी करू नका, कामगारांना काढू नका असे मोदी कितीही सांगत असले तरी कंपन्या भविष्यात जिवंत राहण्यासाठी कामगार कपातही करणार हे ठरलेले आहे. यामुळे करोनानंतर देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे रहाणार आहे. यातून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने या संकटाचा कसा मुकाबला करते, यावर देशाची पुढची दिशा ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -