घरफिचर्सकाँग्रेसची हुकुमाची राणी

काँग्रेसची हुकुमाची राणी

Subscribe

इंदिराजी आत्मविश्वासने म्हणाल्या, ‘नक्कीच. राष्ट्रीय क्षितीजावरती राजकारणात तिचा उदय होईल. ती मोठे कर्तृत्व गाजवेल. तुम्ही तोपर्यंत नक्कीच असाल. लोकांना तिच्यामध्ये मी दिसेन आणि तिला पाहून देशवासियांना माझी आठवण होईल. पुढल्या शतकावर प्रियांकाचा प्रभाव असेल. ते झाले की लोक मला विसरतील.’

उत्तर प्रदेशात २०१४ साली लोकसभा निवडणुकीचा माहोल होता. काँग्रेस निवडणुकीत मागे पडत होती. त्यावेळी प्रियांका गांधी यांना निवडणूक प्रचारात उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. वास्तविक राजकारणापासून प्रियांका गांधी यांना सातत्याने दूर ठेवण्यात आलेले होते. त्यांना मैदानात उतरावे लागले. राहुल गांधी यांच्या राजकीय मर्यादा स्पष्ट झाल्यावर अनेक भागातून प्रियांका यांना राजकारणात आणायची मागणी काँग्रेस पक्षातून झालेली होती. एका ठिकाणी तर तसे पोस्टर लावून काही कार्यकर्त्यांनी धरणे धरले होते. पण त्यांना गप्प करण्यात आले. त्याचे कारण उत्तर प्रदेशात त्या अगोदरच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. दिग्विजय सिंग यांच्यासोबत तीन महिने राहुलनी रान उठवले होते. कारण काँग्रेसला पुन्हा जुने वैभव प्राप्त करून द्यायचे, तर उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये पक्षाला प्रबळ बनवणे आवश्यक होते.

पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या वीस जागा काँग्रेसने जिंकल्या, तेव्हा त्याचे श्रेय राहुलना देण्याची स्पर्धा लागली होती. पण वास्तवात ते राहुलचे यश नव्हते, तर केंद्रातील सरकार बनवू शकणार्‍या आघाडीतला मोठा पक्ष म्हणून मिळालेला तो प्रतिसाद होता. पण राहुलनी उत्तर प्रदेशची हवा फिरवली, असा डंका पिटण्यात आला आणि त्यात लक्ष्य विसरले गेले. पुढे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून राहुलच्या राज्यातील प्रत्येक हालचालींना वारेमाप प्रसिद्धी देऊनही उपयोग झाला नाही. २० खासदार निवडून आणणार्‍या राहुलना पन्नास आमदारही निवडून आणता आले नाही. त्याच दरम्यान बिहारमध्ये असाच ‘एकला चालो रे’चा प्रयोग करून राहुलनी असलेल्या पक्ष संघटनेचा पुरता बोर्‍या वाजवला.

- Advertisement -

एकीकडे स्वपक्षातला विरोध गुंडाळून मोदी आक्रमक होत चालले होते आणि देशभर जनमानसावर आपली छाप उठवत होते. त्यांच्या तुलनेत राहुलचे अपयश अधिक ठळकपणे दिसू लागल्यावर काँग्रेसने नवा चेहरा पुढे आणावा, असाही सूर लागला होता. त्यात निदान प्रियांकाला प्रचारासाठी समोर आणायची मागणी होती. पण पक्षाध्यक्षा सोनियांनी ठामपणे नकार दिला. लोकसभेच्या रणभेरी वाजू लागल्यावर मोदींच्या तुलनेत राहुल यांचा टिकाव लागेना, तेव्हा पुन्हा प्रियांकाचा आग्रह सुरू झाला. शेवटी रायबरेली व अमेठीही धोक्यात असल्याचे जाणवले, तेव्हा घाईघाईने प्रियांकाला मागल्या आठवड्यात पुढे आणले गेले. महिनाभर आधी रायबरेलीत सोनिया उमेदवारी अर्ज भरायला गेल्या, तेव्हाही प्रियांकाला दूर ठेवण्यात आले होते. पण नंतरच्या भयगंडाने अमेठीत राहुल अर्ज भरायला जाताना प्रियांकाला समोर आणावे लागले. त्यावेळी प्रियांका हा काँग्रेससाठी आशेचा किरण होता. पण प्रियांका यांना पुढे आणण्यात त्यांच्या मातोश्री सोनियाच राजी नव्हत्या.

माजी पतंप्रधान इंदिरा गांधी यांचे राजकीय सचिव माखनलाल फोतेदार यांनी ‘दी चिनार लिव्हस् -पोलिटिकल मेमॉईर’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात फोतेदार लिहितात, २७ ऑक्टोबर १९८४ रोजी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावरील कारवाईनंतर जीवनाच्या अंतिम क्षणांची चाहुल लागलेल्या इंदिराजी त्यांच्या आवडत्या चिनार वृक्षांच्या पानगळीचा ऋतू अनुभवण्यासाठी काश्मीरमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी माझ्याशी निर्वाणीचे बोलणे करत त्या म्हणाल्या, ‘फोतेदारजी माझे फार आयुष्य उरले आहे, असे वाटत नाही. पण तिची, प्रियांकाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.’ त्यावर मी म्हणालो, ‘मी इतका जगेन असे वाटते का तुम्हाला.’ त्यावर इंदिराजी आत्मविश्वासने म्हणाल्या, ‘नक्कीच. राष्ट्रीय क्षितीजावरती राजकारणात तिचा उदय होईल. ती मोठे कर्तृत्व गाजवेल. तुम्ही तोपर्यंत नक्कीच असाल. लोकांना तिच्यामध्ये मी दिसेन आणि तिला पाहून देशवासियांना माझी आठवण होईल. पुढल्या शतकावर प्रियांकाचा प्रभाव असेल. ते झाले की लोक मला विसरतील.’ इंदिराजींच्या मृत्यूच्या तीन दिवस अगोदर मी घडलेला प्रसंग राजीव गांधी यांच्या कानावर घातला.

- Advertisement -

त्यावेळी राजीव गांधींनी, ‘अच्छा, मम्मीला प्रियांकाबद्दल असे वाटते काय?,’ असं सांगून राजीव यांनी तो विषय संपवला. पण इंदिराजीची अंतिम इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्याजवळ त्यांनी व्यक्त केलेली इच्छा योग्य माणसापर्यंत पोचावी म्हणून मी सतर्क होतो. राजीवजी जिवंत असेपर्यंत वारसदाराचा प्रश्न उद्भवला नाही. पण पुढे सोनियांनी राजकारणात प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा फोतेदार यांनी तो विषय सोनियांकडे काढला. १९९९ मध्ये सोनियांनी अमेठीमधून निवडणूक जिंकली होती. २००४ च्या निवडणुकीत आपण रायबरेलीमध्ये जाण्याचा आणि राहुलला अमेठीमध्ये आणण्याचा विचार त्या जुलै २००३ नंतर करत होत्या. राहुलला राजकारणामध्ये आणण्याबाबत त्यांनी माझा सल्ला विचारला. तेव्हा मी इंदिराजींनी सांगितलेली आणि मी लिहून घेतलेली त्यांची अंतिम इच्छा काय होती ती सोनियांच्या कानावर घातली. घराण्याची परंपरा प्रियांकावर सोपवण्याची त्यांची इच्छा ऐकून सोनिया उदास झाल्या. त्यांनी तुटकपणे मला विचारले, ‘इंदिराजींची खरेच ही अंतिम इच्छा होती काय?’ मी होकारार्थी मान हलवली आणि सर्व घटना सांगितली. हेच कथन मी राजीवजींनाही सांगितले होते आणि त्यांनी मला हा कागद जपून ठेव म्हणून सांगितले होते, असेही मी सोनियाजींना म्हणालो. मात्र हे ऐकताच सोनियाजींना आपला अपमान झाल्यासारखे वाटले. त्याच तिडिकीत त्या उठून दुसर्‍या खोलीत निघून गेल्या. इंदिराजींची अंतिम इच्छा मी सांगितली त्याबद्दल त्यांनी मला मनापासून कधी माफ केले नाही.

फोतेदार यांचा हा अनुभव खूप काही सांगून जातो. आपल्या नातीमधील राजकीय चमक इंदिराजींनी कधीच हेरली होती. मात्र आईने आपल्या मुलाला पुढे आणण्यासाठी जाणुनबुजून मुलीला राजकारणापासून लांब ठेवले. पण प्रियांकाची मातृभक्तीही तितकीच दाद देण्यासारखी होती. आपल्याला राजकारणापासून लांब ठेवले जात असल्याचे माहीत असूनही त्यांनी कधीही आपल्या आईला विरोध केला नाही. त्यांनी आपल्यातील बंडखोर प्रवृत्ती कधीच जागृत होऊ दिली नाही. प्रियांकाने राजकारणात यावे, अशी इच्छा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वारंवार व्यक्त केली. त्यांच्यासाठी पोस्टर लावून आंदोलनेही केली. मात्र प्रियांकाने आपला तोल ढळू दिला नाही. उलट आपला भाऊ आणि आई सांगेल ती जबाबदारी त्या प्रामाणिकपणे पार पाडत राहिल्या. मग कधी त्यांना उत्तर प्रदेशाच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करायला सांगितला गेला तर कधी विधानसभेचा. त्यातही प्रियांका कधीही उत्तर प्रदेशाबाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेतली गेली.

गांधी घराण्याचा राजकीय वारसा राहुल गांधी यांच्याकडे रहावा म्हणून पक्ष नेतृत्त्वाकडून आटापिटा होत होता. पण राहुल गांधी यांना मर्यादा होत्या. त्या मर्यादा मागील काही वर्षांत सिद्ध झालेल्या आहेत. तर दुसर्‍या बाजूला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय जनता पक्ष अधिक लोकप्रिय होत आहे. राजकारणातील प्रगल्भतेचा राहुल गांधी यांच्याकडे अभाव असताना आज नाईलाजास्तव प्रियांकांना राजकारणात आणावे लागले आहे. प्रियांकांच्या आगमनाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ नाहीशी व्हावी हा त्यामागील स्पष्ट हेतू आहे. पण तो हेतू साधताना सोनिया गांधींना आपल्या हट्टाला मुरड घालावी लागली आहे.

प्रियांकांना राजकारणात सक्रिय करण्यामागे सोनियांच्या काही निकटवर्तीयांचा हात असण्याची शक्यता आहे. २०१४ नंतर प्रियांकांच्या मागे अहमद पटेल आणि इतर काहीजण खंबीरपणे उभे होते. सोनिया काँग्रेसच्या अध्यक्षा असेपर्यंत प्रियांकांच्या राजकारण प्रवेशाव्यतिरिक्त या गटाचे सर्वकाही ऐकले जात होते. मात्र सोनिया गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यावर या गटाला डावलले जाऊ लागले. तशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. राहुल गांधींभोवती त्यांचा एक ग्रुप तयार झाला. हा ग्रुप सोनियांच्या निकटवर्तीयांना फारसे महत्त्व देईनासा झाला. त्यामुळे अहमद पटेल यांच्यासह अनेकांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते. आता मात्र प्रियांका राजकारणात सक्रिय झाल्यामुळे या गटाच्या आकांशा पल्लवित झाल्या आहेत.

आता राहिला प्रश्न प्रियांकांच्या राजकीय करिष्म्याचा, तर इतिहास मात्र त्याची साक्ष देत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत प्रियांका प्रचारात उतरल्या आणि उत्तर प्रदेशात सर्वत्र फिरल्या तर मतदानाचे पारडे फिरेल,असा गवगवा माध्यमातून सुरू झाला होता. २००४ पासून प्रियांका सातत्याने उत्तर प्रदेशभर नाही, तरी अमेठी व रायबरेलीत प्रचाराची धुरा सांभाळत आहे. त्याचे निकाल काय सांगतात, ते तपासून बघितले तरी प्रियांकांचा करिष्मा किती त्याचा अंदाज येऊ शकतो. २००४ व २००९ या दोन्ही लोकसभा मतदानात तिथे सोनिया व राहुल अफाट मतांनी जिंकले, हे कोणी नाकारू शकत नाही. पण जेव्हा गांधी खानदानाचा उमेदवार नसतो, तेव्हा प्रियांका तिथे प्रचाराला जाऊन काय प्रभाव पाडू शकल्या होत्या? गेल्या विधानसभा निवडणुकांतही प्रियांकांनी त्याच भागात मुक्काम ठोकलेला होता. भाऊ व आईच्या दोन लोकसभा मतदारसंघांत विधानसभेचे दहा मतदारसंघ येतात. तिथे प्रियांका प्रचार करत असूनही २०१२ साली दहापैकी फक्त तीन जागी काँग्रेस उमेदवारांना जिंकता आल्या होत्या. गांधी खानदानाचे बालेकिल्ले मानल्या जाणार्‍या अमेठी, रायबरेली भागातही प्रियांकाने प्रचार केलेले निम्मेही काँग्रेस उमेदवार यशस्वी होऊ शकलेले नाहीत. जिंकलेल्या तीनपैकी एक आमदार तर अमेठीच्या संस्थानिक राणी होत्या.

२०१४ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हाही प्रियांकाने त्याच दोन लोकसभा मतदारसंघात ठाण मांडले होते. अमेठीत भाजपाने स्मृती इराणी या नवख्या उमेदवाराला मैदानात धाडले होते. त्यांनी असा जोरदार प्रचार केला की अखेरच्या दोन दिवसात तिथे राहुल सोनियांनाही धाव घ्यावी लागलेली होती. ती निवडणूक फक्त ४०-५० हजारांच्या फरकाने जिंकतानाही एकदोन फेर्‍यात राहुल मागे पडलेले होते. दोन महिने प्रियांकाने अमेठीत मुक्काम ठोकल्यानंतर तिथे मतांवर पडलेला हा प्रभाव होता. प्रियांकाला बालेकिल्ल्यात आपल्या भावाची मते टिकवता आली नाही आणि विधानसभेत दहापैकी निम्म्याही काँग्रेस उमेदवारांना विजयी करून दाखवता आले नाही. त्यामुळे इतिहास तरी प्रियांकांच्या करिष्म्याबाबत साशंक दिसतो. मात्र प्रियांका राजकारणात आल्याने काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते नक्कीच खूश झाले आहेत.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -