घरफिचर्सकोरोनाच्या कृपेने गुणांची बरसात

कोरोनाच्या कृपेने गुणांची बरसात

Subscribe

दहावीच्या विद्यार्थ्यांवर कोरोनाच्या कृपेमुळे गुणांची बरसात झाली असली तरी अकरावी प्रवेशासाठी लवकरच सीईटी परीक्षा होईल आणि यातील गुणांच्या आधारेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यामुळे दहावी परीक्षेच्या निमित्ताने तयार झालेला गुणांचा फुगवटा या परीक्षेत निश्चितपणे फुटल्याशिवाय राहणार नाही. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त चांगला निकाल लावण्यावर शाळांचा भर असतो, त्यात आता कोरोनामुळे सोन्याहून पिवळे अशी स्थिती झालेली आहे. पण त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्याचे पुढील काळात होणारे सामाजिक दुष्परिणाम समाज म्हणून सगळ्यांनाच भोगावे लागणार आहेत.

दहावी परीक्षेच्या निकालानंतर बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी सोडले तर सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेअंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार झालेला हा निकाल शंभर टक्के लागणे अपेक्षितच होते. परंतु, त्यातून हुशार विद्यार्थ्यांचे खच्चीकरण व्हायला नको! वर्गात ‘ढ’ असलेल्या विद्यार्थ्याला आपल्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याने हुशार विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता या निकालानंतर वाढली आहे. त्यामुळे केवळ या गुणांच्या आधारे थेट अकरावीला प्रवेश न देता सीईटी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय स्वागतार्ह मानला पाहिजे. तसेच जुलैअखेर बारावी परीक्षांचे निकालही जाहीर होत असल्याने दहावी परीक्षेची पुनरावृत्ती झाली नाही, म्हणजे मिळवले.

दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.१६) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. महाराष्ट्रातील सर्व विभागांचा निकाल जवळपास शंभर टक्के लागला आहे. अपेक्षित निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकालपत्रक बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या वेबसाईटवर अक्षरशा ‘उड्या’ मारल्या. राज्यातील लाखो विद्यार्थी एकाच वेळी या वेबसाईटला भेट देणार असल्याने तशी तयारी विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करणार्‍या ‘एमकेसीएल’ या कंपनीने ठेवायला हवी होती. परंतु, ‘एमकेसीएल’चा गलथान कारभार पहिल्या काही मिनिटांतच उघड झाला. विद्यार्थ्यांना निकालपत्रक बघायला मिळत नसल्याने त्यांनी रात्री उशिरापर्यंत या संकेतस्थळावर निकाल बघण्याचा प्रयत्न केला. खेडे गावातील काही विद्यार्थी तर रात्री अडीच वाजेपर्यंत निकाल हाती पडण्याची वाट बघत होते. मुळात विद्यार्थ्यांची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. वर्ष-दीडवर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण फारसे प्रभावी ठरत असल्याने हा प्रयोग अशयस्वी झाल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र ठरवून निकालपत्रक तयार केले. शाळांनीच निकाल तयार केल्याने एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, याची पुरेपुर काळजी त्यांनी घेतली असणारच, यात शंका नाही. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यांच्यासाठी पुनर्परीक्षा घ्यायची म्हटले तरी राज्यात आता फक्त ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ते अती गंभीर कारणांमुळे झाले असावेत. नाहीतर कोरोनाच्या कृपेने विद्यार्थ्यांवर गुणांची बरसात झाली आहे. यापासून हे विद्यार्थीही वंचित राहिले नसते. तर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. राज्य मंडळाने दिलेली दोन्ही संकेतस्थळे बंद झाल्याने विद्यार्थी, पालक अन् मुख्याध्यापक या सर्वांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नाही म्हटल्यावर पालकांनी थेट शाळेशी संपर्क साधला. मुख्याध्यापकांना थेट विचारणा करुन आत्ताच निकालपत्रक देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मुख्यापकांनी शिक्षण मंडळाशी संपर्क साधत नेमका काय प्रकार घडलाय याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही फारसे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा परिस्थितीत रात्री उशिरापर्यंत हा सर्व खेळ सुरू होता. शेवटी दुसर्‍या दिवशी वेबसाईट पूर्ववत झाली आणि विद्यार्थ्यांना निकालपत्रक बघायला मिळाले. एकाच वेळी लाखो विद्यार्थी या वेबसाईटला भेट देणार आहेत, याची कल्पना ‘एमकेसीएल’ला आली नसेल का? असा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झाला. निकालानंतर तीव्र नाराजी शिक्षण मंडळालाही सहन करावी लागली. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघायचा होता. त्यामुळे तेही मित्रांसोबत तयारीत होते. एकंदरीत रात्री उशिरापर्यंत रंगलेला निकालाचा हा खेळ सकाळी मिटाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

- Advertisement -

गुणपत्रक हाती पडताच कोरोनामुळे विद्यार्थ्यांना आलेले नैराश्य काही काळासाठी नाहीसे झाले. त्याचे कारणही तसेच आहे, अनपेक्षित मिळालेले गुण असतील किंवा अनुत्तीर्ण होण्याची भीती मनात असलेल्या विद्यार्थ्यांना हा निकाल दिलासा देणारा ठरला. पण दुसर्‍या बाजूने विचार केला तर हुशार विद्यार्थ्यांवर यातून एकप्रकारे अन्यायच झाला आहे. अभ्यासात हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा अधिक गुण मिळाल्याची भावना त्यांच्या मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. एरवी दहावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका त्रयस्त शिक्षकांकडून तपासल्या जात असल्याने त्यात ‘वशिलेबाजी’ होण्याची शक्यता कमीच असते, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात आहे. परंतु, आजवर शाळेत तयार होणार्‍या निकालांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झालेला असतो. अमूक विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे वर्गात पहिला येणार किंवा हा नापास होणार, असा ढोबळ अंदाज या विद्यार्थ्यांनी वर्तवलेला असतो. परंतु, यंदा खोडकर विद्यार्थ्यांनाही चांगले गुण मिळाल्याने अकरावी किंवा डिप्लोमाच्या प्रवेशासाठी चुरस निर्माण होऊ शकते. अर्थात, दहावी परीक्षेतील गुणांच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. अकरावी प्रवेशासाठी लवकरच सीईटी परीक्षा होईल आणि यातील गुणांच्या आधारेच मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यामुळे दहावी परीक्षेच्या निमित्ताने तयार झालेला गुणांचा फुगवटा या परीक्षेत निश्चितपणे फुटल्याशिवाय राहणार नाही. अलीकडच्या काळात जास्तीत जास्त चांगला निकाल लावण्यावर शाळांचा भर असतो, त्यात आता कोरोनामुळे सोन्याहून पिवळे अशी स्थिती झालेली आहे. पण त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि त्याचे पुढील काळात होणारे सामाजिक दुष्परिणाम समाज म्हणून सगळ्यांनाच भोगावे लागणार आहेत. कारण आपल्याला कुठल्याही गोष्टीत गुणवत्ता हवी असते. पण त्याची रुजवात कुणी करायची हा प्रश्न बाकी उरतो.

दहावी निकालाची ‘परीक्षा’ रडत-कढत उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण मंडळाला आता बारावी परीक्षेचा धनुष्य पेलावा लागणार आहे. जुलै अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातही अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र ठरवण्यात आल्याने गुणांचा मोठा फुगा तयार होण्याची शक्यता आहे. विशेषत: बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना या निकालाची सर्वाधिक धास्ती वाटू लागली आहे. शंभर टक्क्यांपर्यंत निकाल पोहोचला तर पुढील प्रवेश परीक्षांवरच सर्व मदार ठेवावी लागेल. अन्यथा संपूर्ण करिअर बाधित होण्याचा धोका यातून संभवतो. येथे मूळ मुद्दा हा अभ्यासात हुशार किंवा मध्यम असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तुलना करण्याचा नसून, एखाद्या निकालामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला कशी कलाटणी मिळू शकते, याचा आहे. मूळात हुशार विद्यार्थी हे कोणत्याही परीक्षेसाठी तयार असतात. कोणत्याही कसोटीवर त्यांना उतरवले तरी ते ‘२४ कॅरेट’ सोन्यासारखे शुध्द ठरतील, यात शंकाच नाही. त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हायला नको, हा मूळ विषय आहे. अभ्यासात मध्यम असलेल्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले यापेक्षा हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी यापुढे शिक्षण मंडळाला घ्यावी लागेल. बारावी परीक्षेच्या निकालातही हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आल्याशिवाय राहणार नाही. बारावी असेल किंवा दहावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल यावर एकप्रकारे अविश्वास दाखवत तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) पदविका, पदवी अभ्यासक्रम असतील किंवा औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या अभ्यासक्रमांसाठीही सीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी जेईई, मेन्स, अ‍ॅडव्हान्स या प्रवेश परीक्षा पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्यामुळे शिक्षण मंडळांच्या गुणांचे महत्व कमी झाले आहे. परिणामी, खासगी क्लासेसचे महत्व वाढत गेले. महाविद्यालयात फक्त क्रमिक अभ्यासक्रम शिकवला जातो. तोही वेळेच्या मर्यादेत. याउलट लाखो रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी या विद्याशाखांची तयारी करुन घेतली जाते. बारावी परीक्षेचा निकालही दहावीप्रमाणेच मुक्त गुणांची उधळण करणारा लागला तर प्रवेश परीक्षांवरच विद्यार्थ्यांची खरी भिस्त असेल. परंतु, निकालातून विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कसा दूर करायचा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. कोरोनाच्या नावाने शिक्षण विभाग गुणांची मुक्त उधळण करत असल्याने हुशार विद्यार्थी मागे पडण्याची भीतीही वाढली आहे. अंतर्गत मूल्यमापनातून तयार झालेला फुगवटा कमी करायचा असेल तर प्रवेश परीक्षांवरच विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यावरुनच विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ठरणार असल्याने त्याशिवाय दुसरा पर्याय तरी सध्या दिसत नाही. या परीक्षा फक्त वेळेत झाल्या तर मिळवले. अन्यथा वर्षभरापासून तयारी करायची आणि ऐनवेळी परीक्षा रद्द व्हायची. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होते. अगोदरच खूप उशीर झाला आहे. त्यात अजून काही दिवस गेले तर चालू शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र संपलेले असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -