घरलोकसभा २०१९जरा हटके‘राजगति’ दाखवते राजकारणातील सकारात्मकता

‘राजगति’ दाखवते राजकारणातील सकारात्मकता

Subscribe

‘राजगति’ हे नाटक केवळ प्रश्न निर्माण करून थांबत नाही तर प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातं आणि विचार करण्यास प्रेरित करतं. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या घटकांना हे नाटक प्रेक्षकांसमोर आणते. राजकारणाला बदलण्यासाठी राजकारण समजून घेणे आवश्यक आहे.

नाटक आणि राजकीय भूमिका याचा काय संबंध हा प्रश्न निर्माण होतोच. कारण, रंगभूमीवर काम करणारे असे कमी कलाकार आहेत जे मानतात की माझी सामाजिक जबाबदारी आहे व सामाजिक भूमिकेबरोबर राजकीय भूमिकाही आहे. कारण, राजकारण म्हटल्यानंतर गजकरण बोलण्याची पद्धत प्रत्येकाच्याच मनात आहे. मुख्यत्वे कलाकार त्यांची राजकीय भूमिका समजत नाहीत आणि ज्यावेळी कलाकार आपली राजकीय भूमिका समजतो त्यावेळी, तो समाजाचा एक मजबूत आधारस्तंभ होतो. रंगचिंतक मंजुल भारद्वाज नेहमी सांगतात, सरकारी अनुदानावर जगणारे कलाकार आपली भूमिका स्पष्टपणे मांडू शकत नाहीत. कारण, ते आश्रित असतात. जो शासनाच्या अनुदानावर रंगकर्म करतो, तो कलाकार विद्रोह कधीच करू शकत नाही.कारण,त्याला भीती असते आपल्या पोटापाण्याची. मग,अशा वेळी रंगकर्म बाजूला राहते आणि त्यांच्यासमोर सरकारचे गोडवे गाण्याची वेळ येते. सरकारच्या फक्त चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. परंतु त्यांची भूमिका शासनाला प्रश्न विचारण्याची आहे हे ते विसरून जातात.

- Advertisement -

मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित ‘राजगति’ हे नाटक राजकारणाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देते. राजकारण घाणेरडे आहे, राजकारणाचा आणि माझा काय संबंध ? पासून राजकारणाचा वैचारिकतेपर्यंतचा प्रवास या नाटकाच्या माध्यमातून मांडला आहे. नाटकामध्ये रंगकर्मींची असणारी भूमिका ही क्षणात विचारांप्रमाणे बदलणारी दिसते. नाटकातील एक-एक दृश्य विचार म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. खरं तर हे नाटक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करते. त्याचबरोबर, जाणीव करून देते ‘माझ्या भूमिकेची’. नाटक ‘राजगति’ने राजनीतिकडे पाहण्याचा माझ्यात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.

या नाटकाचे सौंदर्य म्हणजे नाटकामधील दृश्य रचना, लेखकाच्या सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेची जाणीव करून देते. त्याचबरोबर प्रेक्षकांना आपल्या उत्कृष्ट लेखन शैलीने नाटकाच्या सुरुवातीपासून विचार करण्यासाठी प्रेरित करते. नाटकामध्ये गांधी, भगत सिंग, आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या तत्वांना बखुबीने मांडले आहे. कलाकारांचा अभिनय हा लेखकाच्या रचनेला एका उंचीवर घेऊन जातो. नाटकामध्ये अवतरीत झालेले युगपुरुष प्रेक्षकांना त्या त्या काळामध्ये घेऊन जातात. जाणीव करून देतात इतिहासाची, घडलेल्या घटनेची आणि त्यांच्या तत्वांची.

- Advertisement -

एका बाजूला देशात विचारांचा चिखल झालेला असताना व्यक्तींच्या मनातील नकारात्मकता, नैराश्य यांचा निचरा करून नवीन पद्धतीने सार्वभौमिक विचार करण्यासाठी ‘राजगति’ हे नाटक प्रेरित करते. विकारवादी शक्ती बहुमताने जिंकून येते. देशाच्या जनतेला त्यांच्या हितासाठी विकासाचे गाजर दाखवते. अशात, भारतीय जनमानस विकास या शब्दानेच प्रभावित होऊन आपल्या नैतिक जबाबदारीपासून पळ काढतो आणि देशाची अधोगती होत राहते.

नाटकामधील महत्त्वाचा गाभा म्हणजे विचार आणि विकार यांचे लेखकाने केलेले विश्लेषण, प्रेक्षकांना सद्य:स्थितीत सुरू असणार्‍या राजकारणाची जाणीव करून देते. त्याचबरोबर ह्या विकारातून मुक्त होण्यासाठीचा मार्ग या नाटकात मांडला आहे…रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या लेखनशैलीचं हे एक वैशिष्ठ्य आहे. ते आपल्या संहितेमध्ये प्रश्न विचारतात. त्याचबरोबर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या संहितेमध्ये असतात. जेणे करून प्रेक्षकांच्या मनातील गोंधळ थांबतो आणि नाटकाच्या शेवटपर्यंत मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे नाटकांमधूनच प्रेक्षकांना मिळतात.

या नाटकाचे प्रत्येक दृश्य प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करून जाते, की आता पुढे काय होणार आहे? नाटकामध्ये ‘मंडल-कमंडल आणि भूमंडल’ हे दृश्य प्रेक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे देते …घडत असणार्‍या सद्य:स्थितीचे दर्शन या नाटकात मांडले आहे… त्यामुळे, हे दृश्य पाहून प्रेक्षक संवादात प्रेक्षकांनी मत मांडले की, समाजातील जळजळीत वास्तव ‘राजगति’ नाटकात दाखवले आहे !

‘राजगति’ हे नाटक केवळ प्रश्न निर्माण करून थांबत नाही तर प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जातं आणि विचार करण्यास प्रेरित करतं. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या घटकांना हे नाटक प्रेक्षकांसमोर आणते. राजकारणाला बदलण्यासाठी राजकारण समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी ‘राजगति’चे चार मुख्य बिंदू आहेत ..१) सत्ता २)व्यवस्था ३) राजनैतिक चरित्र ४) राजनीति … राजनीतिमध्ये असणार्‍या व्यक्तीचं चरित्र हे खराब असू शकतं… आणि त्या खराब चरित्राचा दोष आपण राजकारणाला देतो…

‘राजगति’ हे नाटक एक ग्रंथ आहे… जे राजनीति किती शुद्ध आहे ते सांगतं,व्यवस्था बदलण्यासाठी राजनैतिक चरित्र स्वच्छ असणे किती महत्त्वाचं आहे ते सांगतं,त्याचबरोबर व्यवस्था चालवण्यासाठी असणारी नीति किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देते…

नाटक ‘राजगति’ हे नाटक सर्वात आधी राजकीय मंडळींनी पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
हे परिवर्तनवादी नाटक सादर करणारे कलाकार : अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, प्रियंका कांबळी, सचिन गाडेकर, सिद्धांत साळवी, मनीष घाग, सुरेखा साळुंखे, स्वाती वाघ आणि तुषार म्हस्के आहेत.
राजगति नाटकाच्या प्रक्रियेमुळे माझी दृष्टी स्पष्ट झाली. राजकारणाला शिव्या देण्यात काहीच अर्थ नाही. राजकारणामध्ये बदल आणण्यासाठी माझी भूमिका काय आहे? आणि मला माझी भूमिका कशा पद्धतीने बदलता येईल, निभावता येईल हे मला समजले.

नाटक ‘राजगति’ने माझ्यातील राजकारणाविषयी असणार्‍या संवेदना जागृत केल्या. बदलाची अपेक्षा नेहमी कोणीतरी दुसरा करणार आणि त्यानंतर मी बदल करणार, हीच माझीही मानसिकता होती. ‘राजगति’ नाटकामुळे जाणीव झाली की, हा देश माझा आहे . त्यात, माझी एक भूमिका आहे. सत्तेत असणारा एक व्यक्ती निर्णय घेतो आणि दुसर्‍या दिवशी जनता रांगेत उभी राहते. याचाच अर्थ माझा राजकारणाशी थेट संबंध आहे. मग, मी माझ्या आसपासची परिस्थिती पाहू लागलो. माझ्या लक्षात आले, इथे फक्त विकासाचा नगारा वाजतोय. पण माझ्या जीवन व्यवहारात असणार्‍या गोष्टी अजूनही बदललेल्या नाहीत. त्या क्षणापासूनच थेट सत्तेत असणार्‍या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची हिंमत माझ्यात आली. मी स्थानिक नगरसेवकांपासून सुरुवात केली, त्यांनी मी निर्माण केलेल्या प्रश्नांची नोंद घेतली आणि त्यात बदल केला.

राजकारणाविषयी नकारात्मकता ही सर्वांमध्ये आहे. राजकारण घाणेरडे आहे,यामध्ये असणारी माणसे वाईट असतात. असं प्रत्येक सामान्य व्यक्ती बोलत असते. राजकारणाची सकारात्मक बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली’ मी मालाडमध्ये २१ जानेवारी २०१८ ला सकाळी ७. ३० वाजता अप्पा पाडा रिक्षा स्टॅन्डपासून ते मालाड रेल्वे स्थानकापर्यंत काढली. यामध्ये, ३५ ते ४० जण सहभागी झाले होते. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित ‘राजनीति’च्या पवित्र व्याख्येचं वाचन करत चाललो होतो, सकाळची वेळ आणि रस्त्याने चालणारी माणसे कुतूहलाने पाहत होती. त्यांच्यापर्यंत राजनीतिची पवित्र व्याख्या जशी पोहचत होती, तसा त्यांच्याकडून येणारा रिस्पॉन्स हा सकारात्मक जाणवत होता. सहभागी झालेल्या ३५ ते ४० जणांचा रिस्पॉन्स हा होता की, आतापर्यंत राजकारणाला मी वाईट समजत होतो, परंतु ४० ते ४५ मिनिटे ही व्याख्या वाचत आल्यानंतर जाणवले राजकारण वाईट नाही. ही मानसिकता बदलण्याचे काम ह्या राजनैतिक चिंतन रैलीमधून झाले.

राजगति नाटकामुळे माझ्या आत जळत असणार्‍या आगीला आता योग्य दिशा मिळत आहे. राजकीय निर्णय, त्यांचा थेट होणारा परिणाम, राजकीय मंडळींची जुमलेबाजी आणि राजकीय घडामोडी यांच्यावर लिहिण्याची योग्यता राजगति नाटकाच्या प्रक्रियेतून माझ्या आत निर्माण झाली आहे.

-तुषार म्हस्के ( रंंगकर्मी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -